१. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या पुढे जाऊ नका१ आणि अल्लाहचे भय बाळगत राहा. निःसंशय अल्लाह ऐकणारा, जाणणारा आहे.
____________________
(१) अर्थात धर्माच्या संदर्भात स्वतःच एखादा निर्णय घेत जाऊ नका, ना स्वतःच्या आकलन व विचाराला प्राधान्य द्या, किंबहुना अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आदेशआचे पालन करा. आपल्यातर्फे धर्मात वाढकिंवा बिदआत (नव्या गोष्टी) जारी करणे, अल्लाह आणि पैगंबराच्या पुढे जाण्याचे दुःसाहस करणे होय. जे कोणत्याही ईमानधारकासाठी योग्य नव्हे. त्याचप्रमाणे एखादा फतवा कुरआन व हदीसमध्ये विचार न करता दिला जावा आणि दिल्यानंतर जर तो शरिअतविरूद्ध दिल्याचे स्पष्ट व्हावे, तर त्यावर अडून राहणे देखील, या आयतीत दिल्या गेलेल्या अनुमतीच्या विरूद्ध आहे. ईमान राखणाऱ्याचे आचरण तर अल्लाह आणि पैगंबराच्या आदेशापुढे समर्पण आणि पालन करण्यासाठी नतमस्तक होणे होय. त्याच्या विरोधात आपले स्वतःचे कथन किंवा एखाद्या इमामाच्या विचारावर अडून राहणे नव्हे.