ترجمة معاني سورة يس باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. यासीन *
____________________
* ‘सूरह यासीन’च्या विशेषता व श्रेष्ठता संदर्भात अनेक कथने प्रसिद्ध आहेत. त्यापैकी उदा. ही सूरह कुरआनाचे हृदय आहे, हिला अशा व्यक्तीवर पढले जावे, जो मरणासन्न असावा वगैरे. परंतु सनद व प्रमाणच्या आधारावर कोणतेही कथन उचित नाही. काही पूर्णतः बनावटी आहेत तर काही प्रमाणदृष्ट्या कमकुवत आहेत. ‘कुरआनचे हृदय’ सांगणाऱ्या कथनाला हदीसचे विद्वान अलबानी यांनी बनावटी (रचलेली) म्हटले आहे. (अद्‌ दईफा, हदीस क्रमांक १६९)
२. शपथ आहे बुद्धी-कौशल्ययुक्त (आणि मजबूत) कुरआनाची.
३. की निश्चितच तुम्ही पैगंबरांपैकी आहात.
४. सरळ मार्गावर आहात.
५. (हा कुरआन, अल्लाह) जबरदस्त, मोठ्या दया करणाऱ्यातर्फे अवतरित केला गेला आहे.
६. यासाठी की तुम्ही अशा लोकांना खबरदार करावे, ज्यांच्या वाडवडिलांना खबरदार केले गेले नव्हते. यास्तव ते गफलतीत पडले आहेत.
७. त्यांच्यापैकी अधिकांश लोकांबाबत ही गोष्ट साबित झाली आहे. यास्तव हे लोक ईमान राखणार नाहीत.
८. आम्ही त्यांच्या मानांवर तौक (जोखंड) टाकले आहे, जे त्यांच्या हनुवटीपर्यंत आहे, ज्यामुळे त्यांची डोकी वर उठलेल्या स्थितीत आहेत.
९. आणि आम्ही एक आड त्यांच्यासमोर उभा केला आणि एक आड त्यांच्या मागे उभा केला, ज्याद्वारे आम्ही त्यांना झाकून टाकले, तेव्हा ते पाहू शकत नाही.
१०. आणि त्यांच्या संदर्भात तुमचे भय दाखविणे किंवा न दाखविणे दोन्ही सारखेच आहे. हे ईमान बाळगणार नाहीत.
११. तुम्ही केवळ अशाच माणसाला भय दाखवू शकता, जो उपदेशाचे अनुसरण करील आणि रहमान (अल्लाह) चे न पाहता भय बाळगेल, तेव्हा तुम्ही अशा माणसाला क्षमा आणि उत्तम मोबदला दिला जाण्याची खूशखबर ऐकवा.
१२. निःसंशय, आम्ही मृतांना जिवंत करू आणि आम्ही लिहित असतो जे कर्म देखील लोक पुढे पाठवितात आणि त्यांची ती कर्मेही, जी ते मागे सोडून जातात आणि प्रत्येक गोष्टीस आम्ही एका स्पष्ट ग्रंथात संकलित करून ठेवले आहे.
१३. आणि तुम्ही त्यांच्यासमोर एक उदाहरण (अर्थात एका) वस्तीवाल्यांचा किस्सा (त्या काळचा) सादर करा, जेव्हा त्या वस्तीत अनेक रसूल आले.
१४. जेव्हा आम्ही त्यांच्याजवळ दोन रसूल पाठविलेत, तेव्हा त्या लोकांनी (प्रथम) त्या दोघांना समर्थन दिले, तेव्हा ते तिघे म्हणाले, आम्ही तुमच्याकडे (पैगंबर बनवून) पाठविलो गेलो आहोत.
१५. ते लोक म्हणाले, तुम्ही तर आमच्यासारखेच साधारण मनुष्य आहात आणि रहमान (दयावान) ने कोणतीही गोष्ट अवतरित केली नाही. तुम्ही केवळ खोटे बोलता.
१६. ते रसूल म्हणाले, आमचा पालनकर्ता जाणतो की आम्हाला तुमच्याकडे रसूल बनवून पाठविले गेले आहे.
१७. आणि आमचे कर्तव्य तर केवळ स्पष्टपणे पोहचविणे एवढेच आहे.
१८. ते म्हणाले की आम्ही तर तुम्हाला अभद्र समजतो आणि जर तुम्ही हे थांबविले नाही तर आम्ही तुम्हाला दगडांनी ठेचून तुमचे कामच तमाम करून टाकू आणि तुम्हाला आमच्यातर्फे सक्त शिक्षा मिळेल.
१९. ते पैगंबर म्हणाले की तुमची अभद्रता तर तुमच्या सोबतीला आहे, काय तिला (अशुभ समजता) की तुम्हाला शिकवण दिली जावी, किंबहुना तुम्ही तर मर्यादेचे उल्लंघन करणारे लोक आहात.
२०. आणि एक मुष्य त्या शहराच्या शेवटच्या किनाऱ्याकडून धावत आला, तो म्हणाला, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! या पैगंबरांच्या मार्गाचे अनुसरण करा.
२१. अशा लोकांच्या मार्गाचे अनुसरण करा, जे तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाहीत आणि ते सत्य - मार्गावर आहेत.
२२. आणि मला काय झाले आहे की मी त्याची उपासना न करावी, ज्याने मला निर्माण केले आणि तुम्ही सर्व त्याच्याचकडे परतविले जाल.
२३. काय मी त्याला सोडून अशांना उपास्य बनवू की जर (अल्लाह) दयावान (रहमान) मला एखादे नुकसान पोहचवू इच्छिल तर त्यांची शिफारस मला काहीच फायदा पोहचवू शकणार नाही आणि ना ते मला वाचवू शकतील.
२४. मग तर मी निश्चितच उघड मार्गभ्रष्टतेत आहे.
२५. माझे म्हणणे ऐका! मी तर (साफ मनाने) तुम्हा सर्वांच्या पालनकर्त्यावर ईमान राखले आहे.
२६. (त्याला) सांगितले गेले की जन्नतमध्ये दाखल हो. तो म्हणाला, माझ्या जनसमूहानेही जाणून घेतले असते तर बरे झाले असते!
२७. की मला माझ्या पालनकर्त्याने माफ केले आणि मला प्रतिष्ठित लोकांमध्ये सामील केले.१
____________________
(१) अर्थात ज्या ईमान आणि तौहीद (एकेश्वरवादा) मुळे मला माझ्या रबने (पालनकर्त्याने) माफ केले, हीच गोष्ट माझ्या जनसमूहानेही जाणून घेतली असती तर! यासाठी की त्यांनीही ईमान व तौहीद (एकेश्वरवादा) चा अंगीकार करून अल्लाहच्या क्षमा आणि त्याच्या कृपा - देणग्यांना पात्र व्हावे. अशा प्रकारे तो मेल्यानंतरही आपल्या जनसमूहाच्या लोकांचा हितचिंतक राहिला. एक सच्चा ईमानधारकाला असेच असायला हवे की त्याने प्रत्येक क्षणी लोकांचे शुभचिंतक असावे, त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, मार्गभ्रष्ट करू नये. लोक त्याला वाटे ते म्हणोत आणि त्याच्याशी कसेही वर्तन करोत, येथपावेतो की त्याला जिवे ठार मारोत.
२८. आणि त्यानंतर आम्ही त्याच्या जनसमूहावर आकाशातून एखादे सैन्य अवतरित केले नाही आणि ना अशा प्रकारे आम्ही अवतरित करतो.
२९. तो तर केवळ एक भयंकर चित्कार होता, ज्यामुळे ते सर्वच्या सर्व विझून गेले.
३०. (अशा) दासांबद्दल खेद! कधीही असा कोणताही रसूल (पैगंबर) त्यांच्याजवळ आला नाही, ज्याची त्यांनी थट्टा उडविली नसेल.
३१. काय त्यांनी नाही पाहिले की त्यांच्यापूर्वी कित्येक जनसमूहांना आम्ही नष्ट करून टाकले की ते यांच्याकडे परतणार नाहीत.
३२. प्रत्येक जनसमूह एकत्रित होऊन आमच्या समोर हजर केला जाईल.
३३. आणि त्यांच्यासाठी एक निशाणी मृत (कोरडी) जमीन आहे जिला आम्ही जिवंत केले आणि तिच्यातून अन्न (धान्य) काढले ज्यातून ते खातात.
३४. आणि आम्ही तिच्यात खजुरीच्या आणि द्राक्षांच्या बागा निर्माण केल्या आणि ज्यांच्यात झरे देखील प्रवाहित केले.
३५. यासाठी की (लोकांनी) तिची फळे खावीत आणि त्यांच्या हातांनी ते बनविले नाही, मग ते कृतज्ञता का नाही व्यक्त करीत?
३६. तो (अल्लाह) मोठा पवित्र आहे, ज्याने प्रत्येक वस्तूच्या जोड्या निर्माण केल्या, मग त्या जमिनीतून उगविलेल्या वस्तू असोत, किंवा यांचे स्वतःचे (अस्तित्व) असो, मग त्या (वस्तू) असोत, ज्यांना हे जाणतही नाहीत.
३७. आणि त्यांच्यासाठी एक निशाणी रात्र आहे, जिच्यातून आम्ही दिवसाला ओढून घेतो, तेव्हा ते अचानक अंधारात राहतात.
३८. आणि सूर्याकरिता जे निर्धारित मार्ग आहेत, तो त्यावरच चालत राहतो.१ हे आहे निर्धारित केलेले जबरदस्त ज्ञानी (अल्लाह) चे.
____________________
(१) अर्थात आपल्या आसावर चालत राहतो, जो अल्लाहने त्याच्यासाठी निर्धारित केला आहे. इथूनच तो आपल्या प्रवासाला आरंभ करतो, आणि तिथेच संपवितो. त्यापासून किंचितही ढळत नाही की ज्यामुळे एखाद्या ग्रहाशी टक्कर व्हावी.
३९. आणि चंद्राच्या आम्ही मजली निर्धारित केलेल्या आहेत. येथेपर्यंत की तो पुनश्च जुन्या फांदीसारखा होतो.
४०. ना सूर्याच्या आवाक्यात आहे की चंद्राला जाऊन धरावे आणि ना रात्र, दिवसाच्या पुढे जाणारी आहे आणि सर्वच्या सर्व आकाशात तरंगत फिरतात.
४१. आणि त्यांच्यासाठी एक निशाणी (ही देखील) आहे की आम्ही त्यांच्या संततीला भरलेल्या नौकेत स्वार केले.
४२. आणि यांच्यासाठी त्यासारख्याच इतर वस्तू निर्माण केल्या, ज्यांच्यावर ते स्वार होतात.
४३. आणि जर आम्ही इच्छिले असते तर त्यांना बुडवून टाकले असते, मग ना कोणी त्यांची मदत करणारा असता आणि ना ते वाचवले गेले असते.
४४. परंतु आम्ही आपल्यातर्फे दया - कृपा करतो आणि एका ठराविक मुदतीपर्यंत त्यांना लाभ देत आहोत.
४५. आणि त्यांना जेव्हा (कधी) सांगितले जाते की पुढच्या - मागच्या (दुष्कर्मां) पासून अलिप्त राहा, यासाठी की तुमच्यावर दया केली जावी.
४६. आणि त्यांच्याजवळ त्यांच्या पालनकर्त्याकडून अशी एखादी निशाणी येत नाही जिच्यापासून हे तोंड फिरवित नसावेत.
४७. आणि त्यांना जेव्हा सांगितले जाते की अल्लाहने जे दिले आहे, त्यातून काही खर्च करा, तेव्हा हे काफिर, ईमान राखणाऱ्यांना उत्तर देतात की आम्ही त्यांना का खाऊ घालावे, ज्यांना अल्लाहने इच्छिले असते तर स्वतःच खाऊ - पिऊ घातले असते? तुम्ही तर आहातच उघड मार्गभ्रष्टतेत.
४८. आणि ते म्हणतात, हा वायदा (कयामतची धमकी) केव्हा पूर्ण होईल, सच्चे असाल तर सांगा.
४९. त्यांना केवळ एका भयंकर चित्काराची प्रतीक्षा आहे, जो त्यांना येऊन धरेल आणि हे आपसात लढत - भांडतच असतील.
५०. त्यावेळी हे ना वसीयत (मृत्युपत्र) करू शकतील आणि ना - आपल्या कुटुंबाकडे परतू शकतील.
५१. आणि सूर (शंख) फुंकला जाताच सर्वच्या सर्व आपल्या कबरीमधून आपल्या पालनकर्त्याकडे (जलद गतीने) चालू लागतील.
५२. म्हणतील, अरेरे! आम्हाला आमच्या आरामच्या जागेतून कोणी उठविले? हेच आहे ते, ज्याचा वायदा रहमान (दयावान) ने केला होता, आणि पैगंबरांनी खरे खरे सांगितले होते.
५३. असे नव्हे, परंतु एक भयंकर गर्जना की अचानक सर्वच्या सर्व जमा होऊन आमच्या समोर हजर केले जातील.
५४. तेव्हा आज कोणत्याही माणसावर किंचितही अत्याचार केला जाणार नाही आणि तुम्हाला त्याच कर्मांचा मोबदला दिला जाईल, जे तुम्ही करीत होते.
५५. निःसंशय, जन्नतवाले लोक आजच्या दिवशी आपल्या (मनोरंजन) कार्यात व्यस्त आणि आनंदित आहेत.
५६. ते आणि त्यांच्या पत्न्या सावलीत आसनांवर तक्के लावून बसले असतील.
५७. त्यांच्याकरिता जन्नतमध्ये प्रत्येक प्रकारचे मेवे असतील, आणि इतरही, जे काही ते मागतील.
५८. दया करणाऱ्या पालनकर्त्यातर्फे त्यांना ‘सलाम’ म्हटले जाईल.
५९. आणि हे अपराध्यांनो! आज तुम्ही वेगळे व्हा.
६०. हे आदमची संतती! काय मी तुमच्याकडून वचन नव्हते घेतले की तुम्ही सैतानाची उपासना न करावी. तो तर तुमचा उघड शत्रू आहे.
६१. आणि फक्त माझीच उपासना करावी. हाच सरळ मार्ग आहे.
६२. आणि सैतानाने तर तुमच्यापैकी अधिकांश समूहांना मार्गभ्रष्ट केले आहे. काय तुम्ही अक्कल नाही बाळगत?१
____________________
(१) अर्थात तुम्हाला एवढी सुद्धा अक्कल नाही की सैतान तुमचा शत्रू आहे, त्याचे म्हणणे मान्य करालया नको आणि मी (अल्लाह) तुमचा स्वामी व पालनकर्ता आहे. मीच तुम्हाला रोजीरोटी देतो आणि मीच तुमचे रात्रंदिवस संरक्षण करतो, यास्तव तुम्ही माझा आदेश मानला पाहिजे. तुम्ही तर सैतानाचे शत्रुत्व आणि माझ्या उपासनेचा हक्क न जाणून निर्बुद्धता आणि मूर्खपणा दाखवित आहात.
६३. हीच ती जहन्नम आहे, जिचा वायदा तुम्हाला दिला जात होता.
६४. आपल्या कुप्र (इन्कारा) चा मोबदला प्राप्त करण्याकरिता आज तिच्यात दाखल व्हा.
६५. आम्ही आज त्यांच्या तोंडावर मोहर लावून देऊ आणि त्यांचे हात आमच्याशी बोलतील आणि त्यांचे पाय साक्ष देतील, त्यांच्या त्या कर्मांची, जे ते करीत होते.
६६. आणि आम्ही इच्छिले असते तर त्यांचे डोळे आंधळे करून टाकले असते, मग हे मार्गाकडे धावत गेले असते, मग त्यांना कशा प्रकारे दिसून आले असते?
६७. आणि आम्ही इच्छिले असते तर त्यांच्या जागेवरच त्यांचे चेहरे बिघडवून (विकृत करून) टाकले असते. मग ना ते हिंडू फिरू शकले असते आणि ना परतू शकले असते.
६८. आणि आम्ही ज्याला वृद्ध करतो, त्याला जन्माच्या वेळेच्या अवस्थेकडे दुसऱ्यांदा परतवितो, मग काय हे तरीही समजून घेत नाही?
६९. आणि ना तर आम्ही या पैगंबरास काव्य (कविता) शिकविले, आणि ना हा त्यास योग्य आहे. हा तर केवळ बोध उपदेश आणि स्पष्ट कुरआन आहे.
७०. यासाठी की त्याने प्रत्येक माणसाला सावध करावे, जो जिवंत आहे आणि सत्य (प्रमाण) प्रस्थापित व्हावे.
७१. काय ते नाही पाहात की आम्ही आपल्या हातांनी बनविलेल्या वस्तूंपैकी, त्याच्यासाठी चतुष्पाद (गुरे-ढोरे) ही निर्माण केले ज्यांचे हे मालक बनले आहेत.
७२. आणि त्यां (पशूं) ना आम्ही त्यांच्या अधीन केले आहे, ज्यांच्यापैकी काही तर त्यांची वाहने आहेत आणि काहीं (चे मांस) खातात.
७३. आणि त्यांना त्यांच्यापासून इतरही अनेक फायदे आहेत, आणि पिण्याच्या वस्तू काय तरीही हे कृतज्ञता दर्शवित नाही?
७४. आणि ते अल्लाहखेरीज दुसऱ्यांनाही उपास्य बनवितात (या आशेने) की त्यांची मदत केली जावी.
७५. (वास्तविक) त्यांना मदत करण्याचे ते सामर्थ्य बाळगत नाहीत, तथापि हे (अनेकेश्वरवादी) त्यांचे सैन्य या नात्याने हजर आहेत.
७६. यास्तव त्यांच्या गोष्टी (बोलण्या) ने दुःखी कष्टी न व्हावे आम्ही त्यांच्या लपलेल्या व उघड सर्वच गोष्टींना (चांगल्या प्रकारे) जाणतो.
७७. काय माणसाला एवढेही माहीत नाही की आम्ही त्याला विर्यापासून निर्माण केले आहे, तरीही तो उघड भांडखोर बनून बसला.
७८. आणि त्याने आमच्यासाठी उदाहरणे सांगितली आणि आपल्या (मूळ) उत्पत्तीला विसरला, म्हणाला की या सडल्या कुजल्या हाडांना कोण (पुन्हा) जिवंत करू शकतो?
७९. सांगा की त्यांना तो जिवंत करील, ज्याने त्यांना पहिल्यांदा निर्माण केले, जो सर्व प्रकारची उत्पत्ती चांगल्या प्रकारे जाणणारा आहे.
८०. तोच होय, ज्याने तुमच्यासाठी हिरव्या वृक्षापासून आग निर्माण केली, ज्याद्वारे तुम्ही आग प्रज्वलित करता.
८१. ज्याने आकाशांना आणि धरतीला निर्माण केले आहे, काय तो यांच्यासारख्यांना निर्माण करण्यास समर्थ नाही? निश्चितच समर्थ आहे आणि तोच निर्माण करणारा, जाणणारा आहे.
८२. जेव्हा तो एखाद्या गोष्टीचा इरादा करतो, तेव्हा त्याचे एवढे म्हणणे (पुरेसे) आहे की घडून ये, ती गोष्ट तत्काळ घडून येते.
८३. मोठा पवित्र आहे तो अल्लाह, ज्याच्या हाती प्रत्येक गोष्टीचा सत्ताधिकार आहे आणि ज्याच्याकडे तुम्ही सर्व परतविले जाल.