surah.translation .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. आलिफ.लाम.मीम.रॉ. या कुरआनाच्या आयती आहेत आणि तुमच्या पालनकर्त्यातर्फे जे काही तुमच्याकडे उतरविले गेले आहेत ते सर्व सत्य आहे, परंतु अधिकांश लोक ईमान राखत नाहीत (विश्वास बाळगत नाही).
२. अल्लाह तो आहे, ज्याने आकाशांना खांबांविना उंच राखले आहे की तुम्ही पाहत आहात, मग तो अर्श (ईशसिंहासना) वर स्थिर आहे, त्यानेच सूर्य आणि चंद्राला अधीन करून ठेवले आहे. प्रत्येक निर्धारीत वेळेवर चालत आहे. तोच सर्व कामाची व्यवस्था राखतो. तो आपल्या निशाण्यांचे स्पष्टपणे निवेदन करीत आहे. यासाठी की तुम्ही आपल्या पालनकर्त्याशी भेट होण्यावर विश्वास करावा.
३. आणि त्यानेच जमिनीला पसरवून दिले आहे आणि तिच्यात पर्वत आणि नद्या निर्माण केल्या आहेत आणि त्यात प्रत्येक प्रकारच्या फळांच्या जोड्या दुहेरी निर्माण केल्या आहेत. तो रात्रीने दिवसाला लपवितो, निश्चितच विचार चिंतन करणाऱ्यांसाठी यात अनेक निशाण्या (बोधचिन्हे) आहेत.
४. आणि जमिनीत अनेक प्रकारचे तुकडे एकमेकांशी मिळते जुळते आहेत, आणि द्राक्षांच्या बागा आहेत आणि शेते आहेत आणि फांद्या असलेली खजुरीची झाडे आहेत आणि काही असे आहेत ज्यांना फांद्या नाहीत. सर्वांना एकाच प्रकारचे पाणी दिले जाते, तरीही आम्ही एकावर एकाला फळांमध्ये श्रेष्ठता प्रदान करतो. यात बुद्धिमान लोकांकरिता अनेक निशाण्या आहेत.
५. आणि जर तुम्हाला नवल वाटत असेल तर खरोखर त्यांचे हे म्हणणे आश्चर्यकारक आहे की काय जेव्हा आम्ही (मेल्यानंतर) माती होऊन जाऊ तेव्हा काय आम्ही नव्याने जन्म घेऊ? हेच ते लोक होत, ज्यांनी आपल्या पालनकर्त्याशी इन्कार केला आणि हेच ते लोक होत, ज्यांच्या गळ्यात जोखड (फंदे) असतील आणि हेच होत जे जहन्नममध्ये राहणारे आहेत, जे सदैव त्यात राहतील.
६. आणि जे सुख-संपन्न अवस्थेपूर्वीच तुमच्याजवळ शिक्षेची याचना करण्यात घाई करीत आहेत, निःसंशय, त्यांच्यापूर्वी (उदाहरणादाखल) शिक्षा-यातना आलेल्या आहेत, आणि निःसंशय तुमचा पालनकर्ता माफ करणारा आहे, लोकांच्या अनुचित अत्याचारानंतरही आणि निश्चितच तुमचा पालनकर्ता कठोर दंड देणाराही आहे.
७. आणि काफिर (कृतघ्न लोक) म्हणतात की त्याच्यावर त्याच्या पालनकर्त्यातर्फे एखादी निशाणी (चमत्कार) का नाही अवतरित केला गेला? खरी गोष्ट अशी की तुम्ही तर केवळ सचेत करणारे आहात आणि प्रत्येक जनसमूहासाठी मार्गदर्शन करणारा आहे.१
____________________
(१) अर्थात प्रत्येक जाती-जमातीच्या मार्गदर्शनासाठी अल्लाहने पैगंबर अवश्य पाठविला आहे. आता ही गोष्ट वेगळी की त्या जनसमूहांनी तो मार्ग अंगीकारला किंवा नाही अंगीकारला, तथापि सरळ मार्ग दाखविण्यासाठी अल्लाहचा संदेश घेऊन येणारा प्रत्येक जाती-जमातीत अवश्य आला.
८. मादा आपल्या पोटात (गर्भात) जे काही राखते ते अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो १ आणि पोटा (गर्भाशया) चे घटणे-वाढणेही जाणतो. प्रत्येक गोष्ट त्याच्याजवळ अनुमानानुसार आहे.
____________________
(१) मातेच्या गर्भात काय आहे, पुत्र की कन्या, सुंदर किंवा कुरुप, सदाचारी किंवा दुराचारी, दीर्घायुषी किंवा अल्पायुषी वगैरे सर्व गोष्टी केवळ सर्वश्रेष्ठ अल्लाहच जाणतो.
९. लपलेल्या आणि उघड अशा सर्व गोष्टींचे तो ज्ञान राखणारा आहे. सर्वांत महान सर्वांत उच्च आणि सर्वांत उत्तम आहे.
१०. तुमच्यापैकी एखाद्याचे आपली गोष्ट लपवून सांगणे किंवा ती मोठ्या आवाजात सांगणे आणि जो रात्री लपलेला असेल आणि जो दिवसा चालत असेल, सर्व अल्लाहकरिता सारखेच आहे.
११. त्याचे संरक्षक मानवाच्या पुढे मागे तैनात आहेत, जे अल्लाहच्या आदेशाने त्याचे रक्षण करतात. एखाद्या जनसमूहाची अवस्था सर्वश्रेष्ठ अल्लाह तोपर्यंत बदलत नाही, जोपर्यंत तो स्वतः बदलत नाही, जे त्यांच्या मनात आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाह जेव्हा एखाद्या जनसमूहाला सजा देण्याचा निर्णय घेतो, तेव्हा तो निर्णय बदलत नाही आणि त्याच्याखेरीज कोणीही त्यांचा मदतकर्ता नाही.
१२. तो अल्लाहच होय, जो तुम्हाला विजेची चमक दाखवितो यासाठी की तुम्ही भयभीत व्हावे आणि उमेद बाळगावी आणि अवजड ढगांनाही तोच निर्माण करतो.
१३. आणि मेघ-गर्जना त्याची स्तुती-प्रशंसा आणि गुणगान करते आणि फरिश्तेदेखील त्याच्या भयाने, तोच आकाशातून वीज पाडतो. आणि ज्याच्यावर इच्छितो, त्याच्यावर पाडतो. काफिर लोक अल्लाहविषयी वाद-विवाद घालत आहेत आणि अल्लाह जबरदस्त शक्तिशाली आहे.
१४. त्यालाच पुकारणे खरे आहे. जे लोक त्याच्याखेरीज दुसऱ्यांना पुकारतात, ते त्यांच्या कोणत्याही हाकेला उत्तर देत नाहीत जणू एखाद्या माणसाने आपले हात पाण्याकडे पसरविले असावेत की पाणी त्यांच्या तोंडात येऊन पडावे, वास्तविक ते पाणी त्यांच्या तोंडात जाणार नाही.१ त्या काफिर लोकांचे जेवढे पुकारणे आहे सर्व पथभ्रष्ट आहे.
____________________
(१) अर्थात जे लोक अल्लाहला सोडून इतरांना मदतीसाठी पुकारतात, त्यांचे उदाहरण असे की जणू एखाद्याने पाण्याकडे हात पसरवून पाण्याला सांगावे, ये माझ्या तोंडात ये, उघड आहे पाणी न चालणारे आहे, त्याला काय माहीत की हात पसरविणाऱ्याची गरज काय आहे आणि न त्याला हे माहीत की मला तोंडापर्यंत येण्याचे सांगितले जात आहे, आणि त्याच्यात हे सामर्थ्य नाही की आपल्या जागेवरून चालत जाऊन, त्याच्या तोंडापर्यंत पोहचावे. अशा प्रकारे हे अनेक ईश्वरांची भक्ती आराधना करणारे अल्लाहखेरीज ज्यांना पुकारतात, त्यांना माहीतही नाही की कोणी त्यांना पुकारत आहे, आणि त्याची अमकी एक गरज आहे आणि ना ती गरज पूर्ण करण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य आहे.
१५. आणि आकाशांमध्ये व जमिनीवर असलेले समस्त जीव राजी-खुशीने व ना खुशीने अल्लाहलाच सजदा करतात आणि त्यांच्या सावल्यासुद्धा सकाळ-संध्याकाळ अल्लाहला सजदा करतात.
१६. (तुम्ही) विचारा, आकाशांचा आणि जमिनीचा पालनकर्ता कोण आहे? सांगा अल्लाह! त्यांना सांगा, काय तरीही तुम्ही याच्याखेरीज दुसऱ्यांना मदत करणारे बनवित आहात, जे स्वतः आपल्या जीवाच्या लाभ-हानीचा अधिकार बाळगत नाही. सांगा, काय आंधळा आणि डोळस दोन्ही समान असू शकतात? किंवा अंधार आणि प्रकाश समान असू शकतो? काय, ज्यांना हे अल्लाहचा सहभागी बनवित आहेत, त्यांनीही अल्लाहप्रमाणे काही निर्माण केले आहे की त्यांच्या पाहण्यात निर्मितीच संदिग्ध ठरली? तुम्ही सांगा, केवळ अल्लाहच सर्व वस्तूंना निर्माण करणारा आहे. तो एकटा आहे आणि मोठा जबरदस्त वर्चस्वशाली आहे.
१७. त्यानेच आकाशातून पर्जन्य वृष्टी केली, मग आपापल्या सामर्थ्यानुसार नाले वाहू लागले, मग पाण्याच्या प्रवाहाने वर चढून फेस उचलला आणि त्या वस्तूतही जिला आगीत टाकून तापवितात दागिने किंवा सामानाकरिता, त्याच प्रकारचा फेस आहे. अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ अल्लाह सत्य आणि असत्याला स्पष्ट करण्यासाठी उदाहरण देतो. आता तो फेस निकामी होऊन निघून जातो, परंतु ज्या गोष्टी लोकांना लाभ पोहचविणाऱ्या आहेत, त्या धरतीत टिकून राहतात. सर्वश्रेष्ठ अल्लाह अशा प्रकारे उदाहरण देत असतो.
१८. ज्या लोकांनी आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाचे पालन केले, त्यांच्याकरिता भलाई आहे आणि ज्या लोकांनी त्याच्या आदेशाचे अनुसरण केले नाही, तर धरतीवर जे काही आहे ते सर्व त्याच्याजवळ असेल आणि त्यासोबत तेवढेच आणखी जास्त असेल मग ते सर्व काही आपल्या बदली (बचावासाठी) देऊन टाकील. हेच ते लोक होत, ज्यांच्यासाठी मोठा वाईट हिशोब आहे आणि त्यांचे ठिकाण जहन्नम आहे, जे फार वाईट ठिकाण आहे.
१९. काय तो मनुष्य, ज्याला हे माहीत असावे की जे तुमच्याकडे तुमच्या पालनकर्त्यातर्फे उतरविले गेले आहे ते सत्य आहे, काय त्या माणसासारखा असू शकतो जो आंधळा असावा. बोध-उपदेश तर तेच स्वीकारतात जे बुद्धिमान असावेत.
२०. जे लोक अल्लाहला दिलेले वचन पूर्ण करतात आणि वचन भंग करीत नाही.
२१. आणि अल्लाहने ज्या गोष्टींना जोडण्याचा आदेश दिला आहे, ते त्यांना जोडतात आणि ते आपल्या पालनकर्त्याचे भय राखतात आणि हिशोबाच्या कठोरतेचेही भय राखतात.
२२. आणि ते आपल्या पालनकर्त्याच्या प्रसन्नतेखातीर धीर-संयम राखतात आणि नमाजांना सातत्याने कायम राखतात आणि जे काही आम्ही त्यांना देऊन ठेवले आहे ते (धन) उघड आणि छुप्या रीतीने खर्च करतात आणि वाईट व्यवहाराला भलेपणाने टाळतात. अशाच लोकांकरिता आखिरतचे घर आहे.
२३. आणि नेहमी राहणाऱ्या बागा, जिथे हे स्वतः जातील आणि त्यांचे वाडवडील, आणि पत्न्या, आणि संतानापैकी जे नेक काम करणारे असतील, त्यांच्याजवळ फरिश्ते प्रत्येक दारातून येतील.
२४. (म्हणतील की) तुमच्यावर शांती-सलामती असो धीर-संयमाच्या मोबदल्यात किती उत्तम मोबदला आहे या आखिरतच्या घराचा!
२५. आणि जे लोक अल्लाहला दिलेले वचन, ते दृढ-मजबूत केल्यानंतर तोडून टाकतात आणि ज्या गोष्टींना अल्लाहने जोडण्याचा आदेश दिला आहे त्यांना तोडून टाकतात आणि धरतीत उपद्रव (फसाद) पसरवितात त्यांच्यावर धिःक्कार आहे आणि त्यांच्यासाठी वाईट घर आहे.
२६. सर्वश्रेष्ठ अल्लाह ज्याची रोजी (आजिविका) इच्छितो वाढवितो आणि ज्याची इच्छितो घटवितो. हे लोक तर ऐहिक जीवनातच मग्न झालेत.१ वास्तविक हे जग, आखिरतच्या तुलनेत अगदी तुच्छ सामुग्री आहे.२
____________________
(१) एखाद्याला जर ऐहिक धन संपत्ती खूप जास्त लाभत आहे, वास्तविक तो अल्लाहचा अवज्ञाकारी आहे, तर ही खूप आनंदित आणि बेपर्वा होण्याची बाब नव्हे, कारण ही संधी आहे. न जाणो केव्हा ही मुदत संपेल आणि माणूस अल्लाहच्या पकडीत सापडेल. (२) हदीस वचनात उल्लेखित आहे की या जगाचे मूल्य आखिरत अर्थात मरणोत्तर जीवनाच्या तुलनेत असे आहे की जणू एखाद्याने आपले बोट समुद्रात बुडवून बाहेर काढावे तेव्हा पाहावे की समुद्राच्या अफाट जलाशयाच्या तुलनेत त्याच्या त्या बोटात केवढे पाणी आले?
२७. काफिर (ईमान न राखणारे) म्हणतात की त्याच्यावर त्याच्या पालनकर्त्यातर्फे एखादी निशाणी (चमत्कार) का नाही उतरविला गेला? उत्तर द्या, ज्याला अल्लाह पथभ्रष्ट करू इच्छितो, त्याला पथभ्रष्ट करतो आणि जो त्याच्याकडे झुकतो त्याला मार्ग दाखवितो.
२८. ज्या लोकांनी ईमान राखले, त्यांची मने, अल्लाहच्या स्मरणाने शांती प्राप्त करतात. लक्षात ठेवा की अल्लाहच्या स्मरणानेच हृदयाला शांती समाधान लाभते.
२९. ज्या लोकांनी ईमान राखले आणि ज्यांनी सत्कर्मेदेखील केलीत त्यांच्याकरिता सुख-संपन्न अवस्था आहे आणि सर्वांत उत्तम स्थान आहे.
३०. त्याच प्रकारे आम्ही तुम्हाला त्या जनसमूहात पाठविले, ज्यात यापूर्वी अनेक जनसमूह होऊन गेलेत, यासाठी की तुम्ही त्यांना, आमच्यातर्फे जी वहयी (प्रकाशना) तुमच्यावर अवतरित केली आहे, वाचून ऐकवा. हे लोक परम दयाळू (रहमान) अल्लाहचा इन्कार करणारे आहेत. तुम्ही सांगा, माझा स्वामी व पालनकर्ता तर तोच आहे, निःसंशय, त्याच्याखेरीज कोणीही उपासनेस पात्र नाही. त्याच्यावरच माझा भरोसा आहे आणि त्याच्याचकडे मला परत जायचे आहे.
३१. आणि जर (गृहीत धरले की) कुरआनद्वारे पर्वत चालविले गेले असते किंवा जमिनीचे तुकडे तुकडे केले गेले असते किंवा मेलेल्या लोकांशी संभाषण करविले गेले असते (तरीही त्यांनी ईमान राखले नसते). खरी गोष्ट अशी की समस्त कार्ये अल्लाहच्याच हाती आहेत, तेव्हा काय ईमान राखणाऱ्यांचे मन या गोष्टीवर संतुष्ट होत नाही की जर अल्लाहने इच्छिले तर समस्त लोकांना सरळ मार्गावर आणील. ईमान न राखणाऱ्याला तर त्यांच्या इन्कारापायी नेहमी कोणती न कोणती सक्त सजा मिळतच राहील, किंवा त्यांच्या घरांच्या जवळपास उतरत राहील. येथेपर्यंत की अल्लाहचा वायदा येऊन पोहोचेल. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह वायद्याविरूद्ध जात नाही.
३२. आणि निःसंशय, तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांशी थट्टा-मस्करी केली गेली होती, आणि मीदेखील त्या काफिरांना थोडे सैल सोडले, नंतर मात्र त्यांना पकडीत घेतले, तर कशी राहिली माझी शिक्षा (अज़ाब)?
३३. तर काय तो अल्लाह जो समाचार घेणारा आहे प्रत्येक माणसाचा त्याने केलेल्या कर्माबद्दल, आणि त्या लोकांनी अल्लाहचे भागीदार ठरविले आहेत. सांगा, जरा त्यांची नावे तर सांगा, किंवा अल्लाहला तुम्ही त्या गोष्टी सांगत आहात, ज्या तो धरतीवर जाणतच नाही, किंवा केवळ वरवरच्या गोष्टी बनवित आहात.१ खरी गोष्ट अशी की कुप्र (इन्कार) करणाऱ्यांकरिता, त्यांची कपट-कारस्थाने भलेही चांगली दाखविली गेली असोत आणि त्यांना सत्य मार्गापासून रोखले गेले आहे आणि ज्याला अल्लाह मार्गभ्रष्ट करील, त्याला मार्ग दाखविणारा कोणीही नाही.
____________________
(१) या ठिकाणी मूळ शब्द (जाहिर), कल्पना या अर्थाने आहे. अर्थात या त्यांच्या केवळ काल्पनिक गोष्टी आहेत. अर्थात हे की तुम्ही या आराध्य दैवतांची पूजा या विचाराने करता की हे तुम्हाला लाभ हानी पोहचवू शकतात आणि तुम्ही त्यांची नावेदेखील देवता ठेवलेली आहेत. जरी ही नावे तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी ठेवली आहेत, ज्यांचे कोणतेही प्रमाण अल्लाहने अवतरित केले नाही. हे केवळ कल्पना आणि मनाला आवडेल तसे करतात. (सूरह अल्‌ नज्म-२३)
३४. त्यांच्यासाठी या जगाच्या जीवनातही दुःख आहे आणि आखिरत (मरणोत्तर जीवना) चा अज़ाब तर फार सक्त आहे आणि त्यांना अल्लाहच्या प्रकोपापासून वाचविणारा कोणीही नाही.
३५. त्या जन्नतचे उदाहरण, ज्याचा वायदा अल्लाहचे भय राखणाऱ्यांशी केला गेला आहे, असे आहे की तिच्याखाली प्रवाह वाहत असतील, तिची फळे नेहमी राहणारी आहेत आणि तिची सावलीदेखील. हा आहे मोबदला अल्लाहचे भय राखणाऱ्यांचा आणि काफिर लोकांचा शेवट जहन्नम आहे.
३६. आणि ज्यांना आम्ही ग्रंथ प्रदान केला आहे, ते तर त्याद्वारे खूप आनंदित होतात, जे काही तुमच्यावर अवतरित केले जाते आणि इतर संप्रदाय, त्यातल्या काही गोष्टींना मान्य करीत नाही. तुम्ही त्यांना सांगून टाका की मला तर केवळ हाच आदेश दिला गेला आहे की मी अल्लाहची उपासना करावी आणि त्याच्यासोबत कोणाला भागीदार न बनवावे, मी त्याच्याचकडे बोलवित आहे आणि त्याच्याचकडे मला परतून जायचे आहे.
३७. आणि अशा प्रकारे आम्ही हा कुरआन, अरबी भाषेतील फर्मान अवतरित केले आहे, आणि जर तुम्ही यांच्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण केले, याच्यानंतरही की तुमच्याजवळ ज्ञान येऊन पोहोचले आहे, तर अल्लाहच्या विरोधात तुम्हाला ना कोणी समर्थन देणारा भेटेल आणि ना रक्षण करणारा.
३८. आणि आम्ही तुमच्या पूर्वीही अनेक रसूल (पैगंबर) पाठविले आहेत, आणि आम्ही त्या सर्वांना पत्नी आणि संतान राखणारा बनविले होते. अल्लाहच्या हुकुमाविना एखादी निशाणी आणून दाखविणे कोणत्याही पैगंबराच्या अखत्यारातील (अवाख्यातील) गोष्ट नाही. प्रत्येक निर्धारीत वायद्याचा एक ग्रंथ आहे.
३९. अल्लाह जे इच्छिल मिटवून टाकील आणि जे इच्छिल सुरक्षित ठेवील. सुरक्षित ग्रंथ (लौहे महफूज) त्याच्याचजवळ आहे.
४०. आणि त्यांच्याशी केलेल्या वायद्यांपैकी जर एखादा आम्ही तुम्हाला दाखवून द्यावा किंवा तुम्हाला आम्ही मृत्यु द्यावा तर तुमच्यावर केवळ पोहचविण्याचीच जबाबदारी आहे, हिशोब घ्यायचे काम तर आमचे आहे.
४१. काय ते नाही पाहत की आम्ही धरतीला तिच्या किनाऱ्यांकडून घटवित आलो आहोत. अल्लाह आदेश देतो आणि कोणीही त्याच्या आदेशाला पाठीमागे टाकणारा नाही. तो लवकरच हिशोब घेणार आहे.
४२. आणि त्यांच्या पूर्वीच्या लोकांनीही कपट-कारस्थान करण्यात काही कसर सोडली नव्हती, परंतु समस्त उपाययोजना अल्लाहचीच आहे. मनुष्य जे काही करीत आहे, अल्लाह ते जाणतो. ईमान न राखणाऱ्यांना लवकरच माहीत पडेल की आखिरतचा मोबदला कोणासाठी आहे.
४३. आणि हे इन्कारी लोक असे म्हणतात की तुम्ही अल्लाहचे पैगंबर नाहीत. (तुम्ही) उत्तर द्या की माझ्या आणि तुमच्या दरम्यान साक्ष देण्यासाठी अल्लाह पुरेसा आहे, आणि तो, ज्याच्याजवळ ग्रंथाचे ज्ञान आहे.