ﮜ
surah.translation
.
من تأليف:
محمد شفيع أنصاري
.
ﰡ
१. सर्वश्रेष्ठ अल्लाहचा आदेश येऊन पोहोचला, आता याची घाई माजवू नका समस्त पवित्रता त्याच्यासाठी आहे, तो सर्वांत महान आहे, त्या सर्वांपेक्षा ज्यांना हे अल्लाहच्या जवळ भागीदार असल्याचे सांगतात.
२. तोच फरिश्त्यांना आपली वहयी (प्रकाशना) देऊन आपल्या आदेशाद्वारे आपल्या दासांपैकी, ज्याच्यावर इच्छितो उतरवितो, यासाठी की, तुम्ही, लोकांना सचेत करावे की माझ्याशिवाय दुसरा कोणीही उपासनेस पात्र नाही, यास्तव तुम्ही माझे भय राखा.
३. त्यानेच आकाशांना आणि धरतीला सत्यासह निर्माण केले. तो तर त्याहून उच्चतम आहे जे अनेकेश्वरवादी करतात.
४. त्याने मानवांना वीर्यापासून निर्माण केले, मग तो उघड भांडखोर बनला.
५. त्यानेच जनावरे निर्माण केलीत, ज्यात तुमच्यासाठी उष्णता देणारे कपडे आहेत. इतरही अनेक फायदे आहेत आणि काही तुमच्या खाण्यासाठी उपयोगी पडतात.
६. आणि त्यांच्यात तुमच्यासाठी शोभाही आहे जेव्हा त्यांना चारून आणाल तेव्हाही आणि जेव्हा चारण्यासाठी न्याल तेव्हाही.
७. आणि ते तुमचे ओझे त्या शहरांपर्यंत उचलून नेतात, जिथे तुम्ही जीव अर्धा केल्याविना पोहचू शकत नव्हते. निःसंशय, तुमचा पालनकर्ता अतिशय स्नेहशील आणि खूप खूप दया करणारा आहे.
८. आणि घोड्यांना, खच्चरांना, गाढवांना (त्यानेच निर्माण केले) यासाठी की तुम्ही त्यांना वाहनाच्या स्वरूपात वापरात आणावे आणि ते शोभा सजावटीचे साधनही आहेत. इतरही तो अशा वस्तू निर्माण करतो, ज्या तुम्ही जाणत नाहीत.
९. आणि अल्लाहपर्यंत पोहचण्याचा मार्ग सरळ मार्ग आहे आणि काही वाकडे मार्गही आहेत आणि त्याने इच्छिले असते तर तुम्हा सर्वांना सरळ मार्गास लावले असते.
१०. तोच तुमच्या फायद्याकरिता आकाशातून पर्जन्य वृष्टी करतो जे तुम्ही पीता ही आणि त्याद्वारे उगवलेल्या झाडांना तुम्ही आपल्या जनावरांनना चारतात.
११. याच्याचद्वारे तो तुमच्यासाठी शेती आणि जैतून आणि खजूर आणि द्राक्ष व सर्व प्रकारची फळे उगवितो. निःसंशय, चिंतन करणाऱ्या लोकांसाठी यात मोठ्या निशाण्या आहेत.
१२. आणि त्यानेच रात्र आणि दिवसाला आणि सूर्य व चंद्राला तुमच्या सेवेत लावले आहे आणि तारे देखील त्याच्याच हुकुमाच्या अधीन आहेत. निःसंशय, यात बुद्धिमानांकरिता अनेक प्रकारच्या निशाण्या आहेत.
१३. आणि इतरही (विविध प्रकारच्या) अनेक रंग रूप असलेल्या वस्तू त्याने तुमच्यासाठी धरतीत पसरवून ठेवल्या आहेत. निःसंशय, बोध प्राप्त करणाऱ्यांकरिता यात मोठ्या जबरदस्त निशाण्या आहेत.
१४. आणि समुद्रांनाही तुमच्या अधीन करून ठेवले आहे की तुम्ही यातून निघालेले ताजे मांस खावे आणि यातून आपल्या अंगावर घालण्याकरिता दागिने काढू शकावे, आणि तुम्ही पाहाल की नावा यात पाण्याला चिरत चालतात आणि यासाठीही की तुम्ही त्याच्या कृपेचा शोध घ्यावा आणि संभवतः तुम्ही कृतज्ञताही व्यक्त करावी.
१५. आणि त्याने धरतीवर पर्वत गाडले आहेत, यासाठी की तिने तुमच्यासह हलू नये आणि नद्या व मार्ग बनविले, यासाठी की तुम्ही उद्दिष्टाप्रत पोहचावे.
१६. दुसऱ्याही अनेक निशाण्या (निर्धारीत केल्या) आणि ताऱ्यांद्वारेही लोक मार्ग प्राप्त करून घेतात.
१७. तर काय तो, जो निर्माण करतो, त्याच्या समान आहे, जो निर्माण करू शकत नाही? काय तुम्ही कधीच विचार करीत नाही?
१८. आणि जर तुम्ही अल्लाहच्या देणग्यांचा हिशोब (गणना) करू पाहाल तर तुम्ही तो कधीच करू शकत नाही. निःसंशय, अल्लाह मोफा माफ करणारा दया करणारा आहे.
१९. आणि जे काही तुम्ही लपवाल किंवा उघड कराल, अल्लाह सर्व काही जाणतो.
२०. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहखेरीज ज्यांना हे लोक पुकारतात ते कोणतीही वस्तू निर्माण करू शकत नाही, उलट हे स्वतः निर्माण केले गेले आहेत.
२१. मेलेले आहेत, जिवंत नाहीत. त्यांना तर हेही माहीत नाही की केव्हा (जिवंत करून) उठवले जातील.
२२. तुम्हा सर्वांचा माबूद (उपास्य) केवळ अल्लाह एकटा आहे, आणि आखिरतवर ईमान न राखणाऱ्यांची मने भ्रष्ट आहेत. आणि ते स्वतः गर्विष्ठ आहेत.
२३. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह, त्या प्रत्येक गोष्टीला, जिला ते लपवितात आणि जिला जाहीर करतात, चांगल्या प्रकारे जाणतो. अल्लाह घमेंडी लोकांना पसंत करीत नाही.
२४. आणि त्यांना जेव्हा विचारले जाते की तुमच्या पालनकर्त्याने काय अवतरीत केले आहे, तेव्हा उत्तर देतात की पूर्वीच्या लोकांच्या कथा कहाण्या आहेत.
२५. (याचाच परिणाम असेल) की कयामतच्या दिवशी हे लोक आपल्या पूर्ण ओझ्यासह, त्यांच्या ओझ्याचेही भागीदार ठरतील, ज्यांना ज्ञानाविना पथभ्रष्ट करीत राहिले, पाहा तर किती वाीट ओझे उचलत आहेत.
२६. त्यांच्या पूर्वीच्या लोकांनीही कावेबाजपणा केला. (शेवटी) अल्लाहने त्यांच्या (कट-कारस्थानाच्या) घरांना मुळा (पाया) पासून उखडून टाकले आणि त्यांच्या (डोक्यांवर) छत वरून कोसळले आणि त्यांच्याजव अज़ाब (शिक्षा-यातना) अशा ठिकाणाहून आला, जे ठिकाण त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते.
२७. मग कयामतच्या दिवशीही सर्वश्रेष्ठ अल्लाह त्यांना अपमानित करील आणि फर्माविल की माझे ते भागीदार कोठे आहेत, ज्यांच्याविषयी तुम्ही लढत झगडत होते. ज्यांना ज्ञान दिले गेले होते, ते उत्तर देतील की आज तर इन्कार करणाऱ्यांना अपमान आणि वाईटपणाने चांगली मिठी मारली.
२८. ते लोक, जे आपल्या प्राणांवर जुलूम अत्याचार करतात, फरिश्ते जेव्हा त्यांचा प्राण काढू लागतात तेव्हा त्या वेळी ते झुकतात की आम्ही वाईट आचरण करीत नव्हतो, का नाही? अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो, जे काही तुम्ही करीत होते.
२९. तेव्हा आता तुम्ही नेहमी करीत जहन्नमच्या दरवाजातून (जहन्नममध्ये) प्रवेश करा. तर किती वाईट ठिकाण आहे घमेंड करणाऱ्यांचे.
३०. आणि अल्लाहचे भय राखणाऱ्यांना विचारले जाते की तुमच्या पालनकर्त्याने काय अवतरित केले आहे, तेव्हा ते उत्तर देतात की उत्तमात उत्तम. ज्या लोकांनी सत्कर्मे केलीत, त्यांच्यासाठी या जगात भलाई आहे, आणि निःसंशय आखिरतचे घर तर फार उत्तम आहे. आणि किती चांगले घर आहे, अल्लाहचे भय राखणाऱ्यांचे.
३१. सदैव काळ राहणाऱ्या बागांमध्ये जातील, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत. ते जे मागतील ते तिथे त्यांच्यासाठी हजर असेल. अल्लाहचे भय राखून दुराचारापासून दूर राहणाऱ्यांना अल्लाह असाच मोबदला प्रदान करतो.
३२. ते लोक, ज्याचा प्राण फरिश्ते अशा अवस्थेत काढतात की ते स्वच्छ पवित्र असावेत, म्हणतात की तुमच्यासाठी सलामतीच सलामती आहे. आपल्या त्या कर्मांच्या मोबदल्यात जन्नतमध्ये जा, जे तुम्ही करीत होते.
३३. काय हे याच गोष्टीची वाट पाहात आहेत की त्यांच्याजवळ फरिश्ते यावेत किंवा तुमच्या पालनकर्त्याचा आदेश यावा? त्या लोकांनीही असेच केले, जे यांच्यापूर्वी होऊन गेलेत. अल्लाहने त्यांच्यावर कोणताही अत्याचार केला नाही, उलट ते स्वतःच आपल्या प्राणांवर अत्याचार करीत राहिले.
३४. तेव्हा त्यांच्या दुष्कर्मांचा मोबदला त्यांना मिळाला आणि ज्या गोष्टीची ते थट्टा उडवित होते, तिने त्यांना येऊन घेरले.
३५. आणि अनेकेश्वरवादी म्हणाले, जर अल्लाहने इच्छिले असते तर आम्ही आणि आमचे वाडवडील त्याच्याखेरीज दुसऱ्याचे उपासक झाले नसते, ना त्याच्या हुकुमाविना एखाद्या वस्तूला हराम (अवैध) ठरविले असते. हेच आचरण त्यांच्या पूर्वीच्या लोकांचेही राहिले, तेव्हा पैगंबरांची जबाबदारी केवळ स्पष्ट संदेश पोहचविण्याची आहे.
३६. आणि आम्ही प्रत्येक जनसमूहात पैगंबर पाठविले की (लोक हो!) केवळ अल्लाहची उपासना करा आणि तागूत (अल्लाहखेरीजची सर्व असत्य उपास्ये) पासून दूर राहा, तर काही लोकांना अल्लाहने मार्गदर्शन प्रदान केले आणि काहींवर मार्गभ्रष्टता सिद्ध झाली. आता तुम्ही स्वतः धरतीवर हिंडून फिरून पाहा की खोटे ठरविणाऱ्यांचा शेवट कसा झाला!
३७. तरीही तुम्ही त्यांना मार्गदर्शन लाभावे अशी इच्छा बाळगत राहिले परंतु अल्लाह ज्याला मार्गभ्रष्ट करतो, त्याला सन्मार्ग दाखवित नाही, आणि ना त्यांचा कोणी मदतकर्ता असतो.
३८. आणि ते लोक मोठमोठ्या शपथा घेऊन सांगतात की मेलेल्या लोकांना अल्लाह जिवंत करणार नाही. का नाही, (अवश्य जिवंत करेल) हा तर त्याचा अगदी सच्चा आणि पक्का वायदा आहे, परंतु अधिकांश लोक जाणत नाहीत.
३९. अशासाठीही की, हे लोक ज्या गोष्टीत मतभेद करीत होते, तिला अल्लाहने स्पष्ट करून सांगावे आणि यासाठीही इन्कार करणाऱ्यांनी स्वतः आपण खोटे असल्याचे जाणून घ्यावे.
४०. आम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा इरादा करतो, तेव्हा आम्हाला केवळ इतकेच सांगावे लागते की घडून ये आणि ती गोष्ट घडून येते.
४१. आणि ज्या लोकांनी अत्याचार सहन केल्यानंतर, अल्लाहच्या मार्गात देशत्याग केला, आम्ही त्यांना सर्वांत उत्तम जागा या जगात प्रदान करू आणि आखिरतचा मोबदला तर अतिशय मोठा आहे. लोकांनी हे जाणून घेतले असते तर किती बरे झाले असते!
४२. ज्या लोकांनी धीर संयम राखला, आणि आपल्या पालनकर्त्यावर भरोसा करीत राहिले.
४३. आणि तुमच्या पूर्वीही आम्ही पुरुषांनाच (पैगंबर म्हणून) पाठवित राहिलो, ज्यांच्याकडे वहयी (प्रकाशना) अवतरित करीत होतो. जर तुम्ही जाणत नसाल तर ज्ञानी लोकांना विचारा.१
____________________
(१) मूळ शब्द ‘अहलज्जिक्री’ यास अभिप्रेत ग्रंथधारक होत जे पूर्वीच्या पैगंबरांना आणि त्यांच्या इतिहासाला जाणून होते अर्थात हे की आम्ही जेवढे पैगंबर पाठविले, ते मानवच होते. यास्तव मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम देखील जर मानव आहेत तर ही नवीन गोष्ट नाही की त्यामुळे तुम्ही त्यांच्या पैगंबर असण्याचा इन्कार करावा. शंका असेल तर ग्रंथधारकांना विचारा की पूर्वीच्या काळातील सर्व पैगंबर मानव होते की फरिश्ते? जर ते फरिश्ते होते तर अवश्य इन्कार करा आणि जर ते सर्व मानव होते तर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या पैगंबरपदाचा इन्कार कोणत्या सबबीवर?
____________________
(१) मूळ शब्द ‘अहलज्जिक्री’ यास अभिप्रेत ग्रंथधारक होत जे पूर्वीच्या पैगंबरांना आणि त्यांच्या इतिहासाला जाणून होते अर्थात हे की आम्ही जेवढे पैगंबर पाठविले, ते मानवच होते. यास्तव मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम देखील जर मानव आहेत तर ही नवीन गोष्ट नाही की त्यामुळे तुम्ही त्यांच्या पैगंबर असण्याचा इन्कार करावा. शंका असेल तर ग्रंथधारकांना विचारा की पूर्वीच्या काळातील सर्व पैगंबर मानव होते की फरिश्ते? जर ते फरिश्ते होते तर अवश्य इन्कार करा आणि जर ते सर्व मानव होते तर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या पैगंबरपदाचा इन्कार कोणत्या सबबीवर?
४४. निशाण्या आणि ग्रंथांसह. हे स्मरण (ग्रंथ) आम्ही तुमच्याकडे अवतरित केला आहे की लोकांकडे जे उतरविले गेले आहे, तुम्ही त्यांना ते स्पष्टपणे सांगावे, कदाचित त्यांनी विचारा चिंतन करावे.
४५. वाईट कावेबाज करणारे, काय या गोष्टीपासून निर्भय झाले आहेत की अल्लाह त्यांना जमिनीत धसवून टाकील किंवा त्यांच्याजवळ अशा ठिकाणाहून अज़ाब (शिक्षा-यातना) यावी, ज्या ठिकाणाची त्यांना शंका आणि कल्पनाही नसावी.
४६. किंवा त्यांना चालता फिरता धरून घ्यावे, हे कोणत्याही प्रकारे अल्लाहला विवश (लाचार) करू शकत नाही.
४७. किंवा त्यांना भय दाखवून पकडीत घ्यावे, निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा करुणाशील आणि मोठा दयाशील आहे.
४८. काय त्यांनी अल्लाहच्या निर्मितीपैकी कोणालाही पाहिले नाही की त्याची सावली उजव्या-डाव्या बाजूकडे झुकून अल्लाहसमोर सजदा करते, आणि आपली लाचारी व्यक्त करते.
४९. आणि निःसंशय, आकाशांमधील आणि धरतीचे समस्त सजीव आणि फरिश्ते, सर्वश्रेष्ठ अल्लाहसमोर सजदा करतात आणि किंचितही घमेंड करीत नाही.
५०. आणि आपल्या पालनकर्त्याशी, जो त्यांच्यावरती आहे, थरथर कापत राहतात आणि जो आदेश मिळेल, त्याचे पालन करण्यात मग्न राहतात.
५१. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहने सांगून टाकले आहे की दोन माबूद (उपास्ये) बनवू नका. माबूद तर तोच फक्त एकटा आहे, तेव्हा तुम्ही सर्व केवळ माझेच भय राखा.
५२. आणि आकाशांमध्ये आणि धरतीत जे काही आहे, सर्व त्याचेच आहे, आणि त्याचीच उपासना नेहमी अनिवार्य आहे. काय तरीही तुम्ही त्याच्याखेरीज दुसऱ्यांचे भय बाळगता?
५३. आणि तुमच्याजवळ जेवढ्या देखील अल्लाहच्या कृपा देणग्या आहेत सर्व त्यानेच प्रदान केलेल्या आहेत. आता जेव्हा देखील तुम्हाला एखादी कष्ट-यातना आल्यास त्याच्याचकडे दुआ-प्रार्थना करता.
५४. आणि जेव्हा मात्र त्याने ती कष्ट-यातना तुमच्यापासून दूर केली तेव्हा तुमच्यापैकी काही लोक आपल्या पालनकर्त्यासोबत भागीदार बनवू लागतात.
५५. यासाठी की आम्ही प्रदान केलेल्या देणग्यांशी कृतघ्नता दाखवावी (ठीक आहे) थोडा लाभ प्राप्त करून घ्या. शेवटी तुम्हाला माहीतच पडेल.
५६. आणि ज्याला ते जाणतही नाही, त्याचा हिस्सा आम्ही दिलेल्या वस्तूंमध्ये निश्चित करतात, अल्लाहची शपथ! तुमच्या या आरोपाबद्दल तुम्हाला अवश्य विचारणा होईल.
५७. आणि ते पवित्र अल्लाहकरीता मुली निर्धारीत करतात, आणि स्वतःसाठी ते, जे त्यांच्या इच्छेनुसार असेल.
५८. आणि त्यांच्यापैकी जेव्हा एखाद्याला मुलगी झाल्याची खबर दिली जाते तेव्हा त्याचे तोंड काळवंडते आणि तो मनातल्या मनात कुढू लागतो.
५९. या वाईट बातमीमुळे, लोकांपासून तोंड लपवित फिरतो विचार करतो काय या अपमानाला सोबतच राहू द्यावी की हिला मातीत गाडून टाकावे किती वाईट निर्णय घेतात हे!
६०. आखिरतवर ईमान न राखणाऱ्यांचेच वाईट उदाहरण आहे. अल्लाहकरिता तर अतिशय उच्च उदाहरण आहे. तो मोठा वर्चस्वशाली आणि हिकमत बाळगणारा आहे.
६१. आणि जर लोकांच्या दुराचाराबद्दल अल्लाहने त्यांना पकडीत घेणे सुरू केले असते तर धरतीवर एक देखील जीव वाचला नसता, परंतु तो तर त्यांना एका निर्धारीत अवधीपर्यंत ढील (सवड) देतो, मग जेव्हा त्यांची ती वेळ येते तेव्हा ते एक क्षण ना मागे राहू शकतात आणि ना पुढे जाऊ शकतात.
६२. आणि ते स्वतःसाठी जे अप्रिय समजतात, ते अल्लाहसाठी सिद्ध करतात आणि त्यांच्या जीभा खोट्या गोष्टींचे वर्णन करतात की त्यांच्यासाठी भलाई आहे?(मुळीच नाही), वास्तविक त्यांच्यासाठी आग आहे आणि हे लोक, जहन्नमी लोकांच्या पुढे पुढे जाणारे आहेत.
६३. अल्लाहची शपथ! आम्ही तुमच्या पूर्वीच्या जनसमूहांकडेही आपले पैगंबर पाठविले, परंतु सैतानाने त्यांच्या दुष्कर्मांना त्यांच्या नजरेत चांगले ठरविले. तो सैतान आज देखील त्यांचा दोस्त बनलेला आहे आणि त्यांच्यासाठी दुःखदायक अज़ाब आहे.
६४. आणि हा ग्रंथ आम्ही तुमच्यावर अशासाठी अवतरित केला आहे की तुम्ही ती प्रत्येक गोष्ट उघड करावी, ज्याबाबत ते मतभेद करीत आहेत आणि हा ग्रंथ ईमान राखणाऱ्यांकरिता मार्गदर्शन आणि दया आहे.
६५. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह आकाशातून पर्जन्य वृष्टी करून, त्याद्वआरे धरतीला तिच्या मृत्युनंतर जिवंत करतो. निःसंशय यात त्या लोकांकरिता निशाण्या आहेत, जे ऐकतील.
६६. आणि तुमच्यासाठी तर जनावरांमध्येही मोठा बोध आहे की आम्ही तुम्हाला त्याच्या पोटात जे काही आहे, त्याच्यातूनच शेण आणि रक्ताच्या मधून शुद्ध निर्भेळ दूध पाजतो, जे पिणाऱ्यांसाठी सहजपणे पचवले जाते.
६७. आणि खजुरीच्या व द्राक्षांच्या वृक्षांच्या फळांपासून तुम्ही मद्य तयार करता आणि उत्तम अन्न-सामुग्रीही. निःसंशय अक्कल राखणाऱ्या लोकांकरिता यातही फार मोठी निशाणी आहे.
६८. आणि तुमच्या पालनकर्त्याने मधमाशीलाही प्रेरणा दिली की पर्वतांवर, झाडांवर आणि लोकांनी बनविलेल्या उंच उंच इमारतींवर आपले घर (पोळे) बनव.
६९. आणि प्रत्येक प्रकारचे फळ खा आणि आपल्या (पालनकर्त्याच्या) सहज सुलभ मार्गांवर चालत फिरत राहा. त्यांच्या पोटातून पेयद्रव बाहेर पडतो, ज्याचे अनेक रंग आहेत, आणि ज्यात लोकांसाठी स्वास्थ्य आहे. विचार-चिंतन करणाऱ्यांसाठी यातही फार मोठी निशाणी आहे.
७०. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहनेच तुम्हा सर्वांना निर्माण केले आहे. तोच नंतर तुम्हाला मृत्यु देईल, आणि तुमच्यात काही असेही आहेत जे अतिशय वाईट वया (खूप म्हातारवया) कडे परतविले जातात, की खूप काही जाणून घेतल्यानंतरही न जाणावे. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्व काही जाणणारा आणि सामर्थ्य राखणारा आहे.
७१. आणि अल्लाहनेच तुमच्यापैकी एकाला दुसऱ्यावर रोजी (अन्न सामुग्री) मध्ये वृद्धी प्रदान केली आहे, तथापि त्यांना जास्त प्रदान केले गेले आहे ते आपली आजिविका, आपल्या अधीन असलेल्या दासां (नोकरा) ना देत नाहीत की ते आणि हे त्यात सम समान होतील. काय हे लोक अल्लाहच्या उपकारांचा इन्कार करीत आहेत?
७२. आणि अल्लाहने तुमच्यासाठी तुमच्यामधूनच तुमच्या पत्न्या निर्माण केल्या आणि तुमच्या पत्न्यांपासून तुमचे पुत्र आणि नातू निर्माण केले आणि तुम्हाला उत्तमोत्तम वस्तू खायला दिल्या, तर काय, असे असतानाही लोक असत्यावर ईमान राखतील? आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या कृपा देणग्यांशी कृतघ्नता दाखवतील?
७३. आणि ते अल्लाहशिवाय त्यांची उपासना करतात, जे आकाशांमधून आणि जमिनीतून त्यांना किंचितही रोजी देऊ शकत नाही आणि कसलेही सामर्थ्य बाळगत नाही.
७४. तेव्हा, सर्वश्रेष्ठ अल्लाहकरिता उदाहरण बनवू नका, अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो आणि तुम्ही नाही जाणत.
७५. अल्लाह एक उदाहरण सांगत आहे की एक गुलाम आहे दुसऱ्याच्या मालकीचा, जो कसलाही अधिकार राखत नाही आणि एक दुसरा मनुष्य आहे, ज्याला आम्ही आपल्या जवळून फार उत्तम धन देऊन ठेवले आहे. ज्यातून तो लपवून आणि उघडपणे खर्च करतो, काय हे दोन्ही जण समान ठरू शकतात? अल्लाहकरिताच समस्त स्तुती- प्रशंसा आहे. परंतु त्यांच्यापैकी बहुतेक जाणत नाहीत.
७६. आणि अल्लाह एक दुसरे उदाहरण सांगतो दोन माणसांचे, ज्यांच्यापैकी एक मुका आहे आणि कोणत्याही गोष्टीचा अधिकार बाळगत नाही, किंबहुना तो आपल्या मालकावर ओझे आहे, मालक त्याला कोठेही पाठविल पण तो कसलाही भलेपणा आणत नाही. काय हा आणि तो, जो न्यायाचा आदेश देतो आणि सरळ मार्गावरही चालतो, समान असू शकतात?
७७. आणि आकाशांच्या व धरतीच्या (सर्व) लपलेल्या वस्तूंचे ज्ञान केवळ अल्लाहलाच आहे, आणि कयामतची बाब देखील अशीच आहे, जणू पापणीचे झपकणे, किंबहुना याहूनही अधिक जवळ. निःसंशय अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्याचे सामर्थ्य राखतो.
७८. आणि अल्लाहने तुम्हाला तुमच्या मातांच्या उदरातून बाहेर काढले की त्या वेळी तुम्ही काहीच जाणत नव्हते. त्यानेच तुमचे कान आणि डोळे आणि हृदय बनविले, यासाठी की तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकावे.
७९. काय त्या लोकांनी पक्ष्यांना नाही पाहिले, जे आदेशआनुसार आकाशात नियंत्रित आहेत, ज्यांना अल्लाहखेरीज दुसऱ्या कुणी धरून ठेवले नाही. निःसंशय, यात ईमान राखणाऱ्यांकरिता मोठ्या निशाण्या आहेत.
८०. आणि अल्लाहने तुमच्यासाठी तुमच्या घरांमध्ये निवासाचे स्थान बनविले आहे आणि त्यानेच तुमच्यासाठी जनावरांच्या कातडीची घरे (तंबू) बनविले, जी तुम्हाला हलकी दिसून येतात, आपल्या प्रस्थानाच्या दिवशी आणि आपल्या पडाव टाकण्याच्या दिवशीही आणि त्यांची लोकर, लव (रोये) आणि केसांपासूनही त्याने अनेकविध वस्तू आणि एका निर्धारीत वेळेपर्यंत लाभदायक वस्तू आणि बनविल्या.
८१. आणि अल्लाहनेच तुमच्यासाठी आपल्या निर्माण केलेल्या वस्तूंमधून सावली बनविली आहे, आणि त्यानेच तुमच्यासाठी पर्वतांमध्ये गुहा बनविली आणि त्यानेच तुमच्यासाठी कपडे बनविले आहेत, जे तुम्हाला उष्णतेपासून सुरक्षित राखतील आणि अशी चिलखते देखील जी तुम्हाला युद्ध-प्रसंगी उपयोगी पडतील. तो अशा प्रकारे आपली कृपा देणगी पुरेपूर प्रदान करीत आहे, यासाठी की तुम्ही त्याचे आज्ञधारक व्हावे.
८२. तरीही जर हे तोंड फिरवूनच राहतील तर तुमची जबाबदारी केवळ साफ आणि स्पष्टपणे पोहचवून देणे एवढीच आहे.
८३. अल्लाहच्या कृपा देणगींना हे जाणत व ओळखत असतानाही त्यांच्या इन्कार करीत आहेत, किंबहुना त्यांच्यातले बहुतेक जण तर कृतघ्न आहेत.
८४. आणि ज्या दिवशी आम्ही प्रत्येक जनसमूहातून साक्षी उभा करू, मग इन्कारी लोकांना ना अनुमती दिली जाईल आणि ना त्यांना क्षमा-याचना करण्यास सांगितले जाईल.
८५. आणि जेव्हा हे अत्याचारी लोक अज़ाब (शिक्षा-यातना) पाहून घेतील, मग ना तो त्याच्यावरून सौम्य केला जाईल आणि ना त्यांना ढील (सवड) दिली जाईल.
८६. आणि जेव्हा अल्लाहचा सहभागी ठरविणारे आपल्या सहभागींना पाहतील तेव्हा म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या! हेच ते आमचे सहभागी, ज्यांना आम्ही तुला सोडून पुकारत असू, मग ते त्यांना उत्तर देतील की तुम्ही पूर्णतः खोटारडे आहात.
८७. आणि त्या दिवशी ते सर्व (लाचार होऊन) अल्लाहसमोर आज्ञाधारक होणे मान्य करतील आणि यापूर्वी, ज्या खोट्या गोष्टी ते रचत होते, त्या सर्व त्यांच्यापासून हरवतील.
८८. ज्या लोकांनी इन्कार केला आणि अल्लाहच्या मार्गापासून रोखले, आम्ही त्यांना अज़ाबवर अज़ाब वाढवित जाऊ. हा मोबदला असेल त्यांच्या उपद्रवकारितेचा!
८९. आणि ज्या दिवशी आम्ही प्रत्येक जनसमूहात त्यांच्यातूनच त्यांच्यावर साक्ष देणारा बनवून आणू आणि आम्ही तुमच्यावर हा ग्रंथ अवतरित केला आहे ज्यात प्रत्येक गोष्टीचे स्पष्ट वर्णन आहे आणि मुसलमानांकरिता मार्गदर्शन, दया आणि खूशखबर आहे.
९०. निःसंशय, अल्लाह न्यायाचा, भलेपणाचा आणि जवळच्या नातेवाईकांशी चांगले वर्तन करण्याचा आदेश देतो, आणि निर्लज्जतेच्या कामांपासून आणि वाईट गोष्टींपासून आणि अत्याचारापासून रोखतो. तो स्वतः तुम्हाला उपदेश करीत आहे, यासाठी की तुम्ही बोध प्राप्त करावा.
९१. आणि अल्लाहशी केलेला वायदा पूर्ण करा, जेव्हा तुम्ही आपसात वायदे आणि वचन-करार कराल आणि शपथांना, त्यांच्या मजबूतीनंतर तोडू नका, ज्याअर्थी तुम्ही अल्लाहला आपला जामीन ठरवून घेतले आहे. निःसंशय, तुम्ही जे काही करता, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.
९२. आणि त्या (स्त्री) सारखे होऊ नका, जिने आपले सूत मजबूत कातल्यानंतर तुकडे तुकडे करून टाकले की तुम्ही आपल्या शपथांना आपसात छळ-कपटाचे निमित्त बनवावे, यासाठी की एक गट दुसऱ्या गटापेक्षा उच्च ठरावा. खरी गोष्ट हीच की या वायद्याद्वारे अल्लाह तुमची परीक्षा घेत आहे. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह तुमच्यासाठी कयामतच्या दिवशी तुम्हाला प्रत्येक गोष्टीला स्पष्ट करून सांगेल, जिच्याबाबत तुम्ही मतभेद करीत होते.
९३. आणि अल्लाहने इच्छिले असते तर तुम्हा सर्वांना एकाच मताचे बनविले असते, परंतु तो ज्याला इच्छितो मार्गभ्रष्ट करतो, आणि ज्याला इच्छितो सन्मार्ग दाखवितो. निःसंशय, तुम्ही जे काही करीत आहात, त्याबाबत विचारणा केली जाणार आहे.
९४. आणि तुम्ही आपल्या शपथांना आपसातील वैर-द्वेषाचे साधन बनवू नका, अन्यथा तुमची पावले आपल्या मजबुती (स्थिरते) नंतर डळमळू लागतील आणि तुम्हाला सक्त शिक्षा-यातना चाखावी लागेल, कारण की तुम्ही अल्लाहच्या मार्गापासून रोखले आणि तुम्हाला जास्त कठोर शिक्षा-यातना होईल.
९५. आणि तुम्ही अल्लाहच्या वायद्यास थोड्याशा किंमतीवर विकत जाऊ नका. लक्षात ठेवा, अल्लाहच्या जवळची वस्तूच तुमच्यासाठी उत्तम आहे जर तुम्ही जाणत असाल.
९६. तुमच्याजवळ जे काही आहे, ते सर्व नाश पावणारे आहे आणि अल्लाहजवळ जे काही आहे नेहमी राहणारे आहे आणि सबुरी राखणाऱ्यांना आम्ही चांगल्या कर्माचा चांगला मोबदला अवश्य प्रदान करू.
९७. जो मनुष्य सत्कर्म करील, पुरुष असो किंवा स्त्री, आणि ईमान राखणाराही असेल, तर आम्ही त्याला निःसंशय उत्तम जीवन प्रदान करू आणि त्यांच्या नेकीच्या कर्मांचा उत्तम मोबदलाही त्यांना अवश्य प्रदान करू.
९८. कुरआन पठण करताना, धिःक्कारलेल्या सैतानापासून अल्लाहचे शरण मागत जा.
९९. (निश्चितच) त्याचा जोर अशा लोकांवर कधीही चालत नाही, जे ईमान राखतात, आणि आपल्या पालनकर्त्यावर भरोसा ठेवतात.
१००. मात्र, अशा लोकांवर त्याचा प्रभाव जरूर आहे, जे त्याच्याशी मैत्री ठेवतात आणि त्याला अल्लाहचा भागीदार बनवितात.
१०१. आणि जेव्हा आम्ही एखाद्या आयतीच्या जागी दुसरी आयत बदलतो आणि जे काही अल्लाह अवतरित करतो, ते तो चांगल्या प्रकारे जाणतो तेव्हा ते म्हणतात की तुम्ही तर हे स्वतः रचून आणता, वास्तविक त्यांच्यापैकी बहुतेक लोक जाणतच नाहीत.
१०२. तुम्ही सांगा की त्यास तुमच्या पालनकर्त्यातर्फे जिब्रील सत्यासह घेऊन आले आहेत, यासाठी की ईमान राखणाऱ्यांना अल्लाहने स्थैर्य प्रदान करावे आणि मुसलमानांकरिता मार्गदर्शन आणि खूशखबर ठरावी.
१०३. आणि आम्हाला चांगले माहीत आहे, जे इन्कारी म्हणतात की त्यांना तर एक माणूस शिकवितो ज्या माणसाकडे यांचा इशारा आहे तो तर ग़ैरअरबी (अजमी) आहे आणि हा कुरआन तर स्पष्ट अरबी भाषेत आहे.
१०४. जे लोक अल्लाहच्या आयतींवर ईमान राखत नाही, त्यांना अल्लाहतर्फेही मार्गदर्शन लाभत नाही आणि त्यांच्यासाठी दुःखदायक अज़ाब आहे.
१०५. खोटा आरोप तर तेच ठेवतात, ज्यांचे अल्लाहच्या आयतींवर ईमान नसते आणि हेच लोक खोटे आहेत.
१०६. जो मनुष्य आपल्या ईमानानंतर अल्लाहशी इन्कार करील, त्याच्याखेरीज, ज्याला तसे करण्यास भाग पाडले जावे आणि त्याचे मन मात्र ईमानावर कायम असावे, परंतु जे लोक अगदी मोकळ्या मनाने कुप्र (इन्कार) करतील तर अशा लोकांवर अल्लाहचा प्रकोप आहे आणि अशाच लोकांसाठी भयंकर शिक्षा यातना आहे.
१०७. हे अशासाठी की त्यांनी ऐहिक जीवनाला मरणोत्तर जीवनापेक्षा अधिक चांगले समजून घेतले. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह इन्कार करणाऱ्या लोकांना मार्ग दाखवित नाही.
१०८. हे असे लोक होते, ज्यांच्या हृदयांवर आणि ज्यांच्या कानांवर आणि डोळ्यांवर अल्लाहने मोहर लावली आहे आणि हेच लोक गाफील आहेत.
१०९. निःसंशय, हेच लोक आखिरत (मरणोत्तर जीवना) मध्ये फार मोठे नुकसान उचलणार आहेत.
११०. मग ज्या लोकांनी कसोटीत टाकले गेल्यानंतर (धार्मिक कारणांनी) देशत्याग केला, मग जिहाद केला आणि धीर-संयम दाखविला, निःसंशय, तुमचा पालनकर्ता, या गोष्टीनंतर त्यांना माफ करणारा आणि दया करणारा आहे.
१११. ज्या दिवशी प्रत्येक मनुष्य स्वतःसाठी वादविवाद घालत येईल आणि प्रत्येकाला त्याच्या कृत कर्माचा पुरेपूर मोबदला दिला जाईल आणि लोकांवर किंचितही अत्याचार केला जाणार नाही.
११२. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह त्या वस्तीचे उदाहरण सादर करतो, जी सुख-शांतीपूर्वक होती. तिची रोजी (आजिविवका) तिच्याजवळ सुसंपन्नतेसह सर्व मार्गांनी चालून येत होती, मग त्या वस्तीने अल्लाहच्या कृपा देणग्यांचा इन्कार केला, तेव्हा सर्वश्रेष्ठ अल्लाहने तिला भूक आणि भयाचा स्वाद चाखविला. हा मोबदला होता त्यांच्या वाईट कर्मांचा.
११३. आणि त्यांच्याजवळ, त्यांच्यामधूनच पैगंबर येऊन पोहोचला, तरीही त्यांनी त्याला खोटे ठरविले, तेव्हा अज़ाब (शिक्षा-यातना) ने त्यांना येऊन धरले आणि ते होतेच अत्याचारी.
११४. आणि जी काही हलाल (उचित) आणि पाक रोजी (आजिविका) अल्लाहने तुम्हाला देऊन ठेवली आहे, ती खा आणि अल्लाहच्या देणगी (नेमत) बद्दल कृतज्ञता व्यक्त करा, जर तुम्ही त्याचीच उपासना करत असाल.
११५. तुमच्याकरिता केवळ मेलेले आणि रक्त आणि डुकराचे मांस आणि ज्या वस्तूवर अल्लाहशिवाय दुसऱ्याचे नाव घेतले जाईल, हराम आहे. तरीही जर एखादा मनुष्य लाचार केला जावा आणि तो अत्याचारी नसावा आणि ना मर्यादेचे उल्लंघन करणारा असावा तर निःसंशय अल्लाह माफ करणारा आणि खूप दया करणारा आहे.
११६. आणि एखाद्या वस्तूला आपल्या तोंडाने खोटेच सांगत जाऊ नका की ही हलाल आहे आणि ही हराम आहे की (अशाने) अल्लाहवर खोटा आरोप लावाल. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाहवर खोटा आरोप रचणारे सफलतेपासून वंचितच राहतात.
११७. त्यांना फार कमी लाभ प्राप्त होतो आणि त्यांच्यासाठी दुःखदायक अज़ाब (शिक्ष-यातना) आहे.
११८. आणि यहूदी लोकांवर आम्ही जे काही हराम केले होते, ते आम्ही यापूर्वीच तुम्हाला ऐकविले आहे. आम्ही त्यांच्यावर अत्याचार केला नाही किंबहुना ते स्वतःच आपल्या प्राणांवर जुलूम करीत राहिले.
११९. की जो कोणी अज्ञानाने वाईट कर्म करील, मग त्यानंतर तौबा (क्षमा-याचना) करील आणि (आपल्या आचरणात) सुधारणाही करून घेईल तर मग तुमचा पालनकर्ता निश्चितच मोठा माफ करणारा आणि अतिशय दया करणारा आहे.
१२०. निःसंशय, इब्राहीम (मुस्लिम जनसमूहाचे) प्रमुख आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचे मोठे आज्ञाधारक, सगळीकडून अलग होऊन फक्त एक अल्लाहचे झाले होते आणि अनेक ईश्वरांची उपासना करणाऱ्यांपैकी नव्हते.
१२१. सर्वश्रेष्ठ अल्लाहने प्रदान केलेल्या कृपा देणग्यांबद्दल कृतज्ञशील होते. अल्लाहने त्यांना निवडून घेतले होते आणि त्यांना सरळ मार्ग दाखविला होता.
१२२. आणि आम्ही त्यांना या जगातही भलाई प्रदान केली आणि निःसंशय आखिरतमध्येही ते नेक सदाचारी लोकांपैकी आहेत.
१२३. मग आम्ही तुमच्याकडे वहयी (प्रकाशना) पाठविली की तुम्ही इब्राहीमच्याच मार्गाचे अनुसरण करा, जे सर्वांपासून अलग होऊन एक अल्लाहचे झाले होते आणि ते अनेक ईश्वरांची उपासना करणाऱ्यांपैकी नव्हते.
१२४. शनिवारच्या दिवसाचे महत्त्व तर फक्त त्या लोकांकरिता अत्यावश्य ठरविले गेले होते, ज्यांनी त्यात मतभेद केला होता. वास्तविक तुमचा पालनकर्ता स्वतःच त्यांच्यात त्यांच्या मतभेदाचा फैसला कयामतच्या दिवशी करेल.
१२५. आपल्या पालनकर्त्याकडे लोकांना हिकमतीने आणि उत्तम अशा शिकवणीसह बोलवा आणि त्यांच्याशी खूप चांगल्या प्रकारे बोला. निःसंशय तुमचा पालनकर्ता, आपल्या मार्गापासून भटकलेल्या लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो आणि सन्मार्गावर चालणाऱ्यांनाही तो पूर्णतः जाणून आहे.
१२६. आणि (एखाद्याशी) सूड घ्यायचाच असेल तर अगदी तेवढाच घ्या जेवढे दुःख तुम्हाला पोहचविले गेले असेल आणि जर सबुरी राखाला तर निःसंशय सबुरी राखणाऱ्यांसाठी हेच उत्तम आहे.
१२७. तुम्ही धीर-संयम राखा. अल्लाहच्या दयेविना तुम्ही धीर-संयम राखूच शकत नाही आणि त्यांच्या अवस्थेने दुःखी कष्टी होऊ नका आणि जो कावेबाजपणा हे करतात, त्यामुळे मन संकुचित करू नका.
१२८. निःसंशय, जे लोक अल्लाहचे भय राखून, दुराचारापासून दूर राहतात आणि सत्कर्म करीत राहतात, अल्लाह त्यांच्या पाठीशी आहे.