ترجمة معاني سورة التغابن
باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية
.
من تأليف:
محمد شفيع أنصاري
.
ﰡ
१. आकाशांची आणि धरतीची प्रत्येक वस्तू अल्लाहची पवित्रता वर्णन करते, त्याचीच राज्य-सत्ता आहे आणि त्याचीच स्तुती-प्रशंसा आहे. आणि तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.
२. त्यानेच तुम्हाला निर्माण केले आहे, मग तुमच्यापैकी काही काफिर (इन्कारी) आहेत आणि काही ईमान राखणारे आहेत आणि तुम्ही जे काही करीत आहात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे पाहत आहे.
३. त्यानेच आकाशांना आणि धरतीला सत्यासह (बुद्धिकौशल्याने) निर्माण केले, त्यानेच तुमचे चेहरे मोहरे बनविले आणि खूप सुंदर बनविले आणि त्याच्याचकडे परतायचे आहे.
४. तो आकाशांच्या आणि जमिनीच्या सर्व वस्तूंचे ज्ञान राखतो, आणि जे काही तुम्ही लपविता आणि जाहीर करता ते सर्व तो जाणतो. अल्लाह तर छातीतल्या (मनातल्या) गोष्टी देखील जाणतो.
५. काय तुम्हाला या पूर्वीच्या काफिरांची खबर नाही पोहचली, ज्यांनी आपल्या कर्मांच्या परिणामांचा स्वाद चाखला, आणि ज्यांच्यासाठी दुःखदायक शिक्षा यातना आहे.
६. हे या कारणास्तव की त्यांच्याजवळ त्यांचे पैगंबर स्पष्ट प्रमाण (पुरावे) घेऊन आले तेव्हा ते म्हणाले की काय एक मनुष्य आम्हाला मार्गदर्शन करील?१ आणि इन्कार केला व तोंड फिरविले आणि अल्लाहने त्यांची पर्वा केली नाही, आणि अल्लाह तर आहेच मोठा निःस्पृह, सर्वगुण संपन्न.
____________________
(१) हे त्यांच्या इन्कारा (कुप्र) मुळे आहे की त्यांनी हा कुप्र, जो दोन्ही जमात त्यांच्या शिक्षा यातनेचे कारण बनला, यासाठी अंगीकारला की त्यांनी एक मनुष्याला आपला मार्गदर्शक मानण्यास इन्कार केला, अर्थात एका माणसाचे पैगंबर बनून लोकांना सन्मार्ग दाखविण्यासाठी येणे, त्यांच्यासाठी स्वीकार करण्यायोग्य नव्हते. असे आजच्या काळात देखील बिदअती (धर्मात नव्या गोष्टी सामील करणाऱ्या) लोकांसाठी पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांना मनुष्य मानणे मोठे असह्य व कठीण वाटते.
७. त्या काफिर (इन्कारी) लोकांनी असे गृहीत धरले आहे की त्यांना दुसऱ्यांदा जिवंत केले जाणार नाही. तुम्ही सांगा की का नाही? अल्लाहची शपथ! तुम्हाला अवश्य पुन्हा जिवंत केले जाईल, मग जे काही (कर्म) तुम्ही केले आहे त्याची खबर तुम्हाला दिली जाईल आणि अल्लाहकरिता हे फारच सोपे आहे.
८. तेव्हा तुम्ही अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर आणि त्या दिव्य तेजावर जो आम्ही अवतरित केला आहे, ईमान राखा, आणि अल्लाह तुमच्या प्रत्येक कर्माला (चांगल्या प्रकारे) जाणून आहे.
९. ज्या दिवशी अल्लाह तुम्हा सर्वांना, त्या एकत्रित केले जाण्याच्या दिवशी एकत्र करील, तोच पराजय आणि विजयाचा दिवस आहे, आणि जो (मनुष्य) अल्लाहवर ईमान राखून सत्कर्म करील, अल्लाह त्याच्यापासून त्याची दुष्कर्मे दूर करील आणि त्याला जन्नतीमध्ये दाखल करील, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत, ज्यांच्यात ते सदैवकाळ राहतील. हीच फार मोठी सफलता आहे.
१०. आणि ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला आणि आमच्या आयतींना खोटे ठरविले, ते सर्वच जहन्नममध्ये जाणारे आहेत, ज्यात ते नेहमी राहतील. ते मोठे वाईट ठिकाण आहे.
११. कोणतेही संकट अल्लाहच्या आज्ञेविना पोहचू शकत नाही आणि जो कोणी अल्लाहवर ईमान राखतो, अल्लाह त्याच्या हृदयाला मार्गदर्शन करतो, आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणणारा आहे.
१२. (लोकांनो!) अल्लाहच्या आदेशाचे पालन करा आणि पैगंबराचे आज्ञापालन करा, मग जर तुम्ही तोंड फिरविणारे व्हाल तर आमच्या पैगंबराचे कर्तव्य केवळ स्पष्टपणे (संदेश) पोहचविणे आहे.
१३. अल्लाहखेरीज कोणीही सच्चा माबूद (खरा उपास्य) नाही, आणि ईमान राखणाऱ्यांनी केवळ अल्लाहवरच भरवसा ठेवला पाहिजे.
१४. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुमच्या काही पत्न्या आणि संततीपैकी काही तुमचे शत्रू आहेत, तेव्हा त्यांच्यापासून सतर्क राहा आणि जर तुम्ही माफ कराल, व सोडून द्याल आणि माफ कराल तर अल्लाह माफ करणारा, दयाळू आहे.
१५. तुमची धन-संपत्ती आणि तुमची संतती (तर खात्रीने) तुमची कसोटी आहे१ आणि फार मोठा मोबदला, अल्लाहजवळ आहे.
____________________
(१) अर्थात जे तुम्हाला हराम कमाईसाठी प्रोत्साहित करतात आणि अल्लाहचा हक्क पूर्ण करण्यापासून रोखतात, तेव्हा या परीक्षेत तुम्ही त्याच वेळी सफल होऊ शकता जेव्हा तुम्ही अल्लाहची अवज्ञा करण्यात त्यांचे अनुसरण न कराल, अर्थात हे की धन आणि संतती, एकीकडे अल्लाहचे नजराणे आहेत तर दुसरीकडे माणसाच्या कसोटीचे साधनेही आहेत. अशा प्रकारे अल्लाह पाहतो की माझा आज्ञाधारक दास कोण आहे आणि अवज्ञाकारी कोण?
१६. तेव्हा यथासंभव अल्लाहचे भय बाळगत राहा आणि ऐकत व आज्ञापालन करीत राहा, आणि (अल्लाहच्या मार्गात) दान करीत राहा, जे तुमच्यासाठी अधिक चांगले आहे आणि जे लोक आपल्या मनाच्या लालसेपासून सुरक्षित ठेवले गेले, तेच सफल आहेत.
१७. जर तुम्ही अल्लाहला चांगले कर्ज द्याल (अर्थात त्याच्या मार्गात खर्च कराल) तर तो ते तुमच्यासाठी वाढवित जाईल आणि तुमचे अपराधही माफ करील. आणि अल्लाह मोठा कदर करणारा आणि सहन करणारा आहे.
१८. तो लपलेल्या आणि उघड गोष्टी जाणणारा, जबरदस्त व हिकमतशाली आहे.