ترجمة سورة الأنعام

الترجمة الماراتية
ترجمة معاني سورة الأنعام باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. सर्व प्रशंसा त्या अल्लाहकरिता आहे, ज्याने आकाशांना व जमिनीला निर्माण केले आणि अंधःकार व प्रकाश बनविला तरीदेखील ईमान न राखणारे लोक (इतरांना) आपल्या पालनकर्त्याच्या बरोबरीचा मानतात.
२. त्यानेच तुम्हाला मातीपासून घडविले, मग एक अवधी ठरविला आणि एक निर्धारीत अवधी त्याच्याजवळ आहे तरीही तुम्ही संशयात पडले आहाता?
३. आणि तोच अल्लाह आहे आकाशांमध्ये आणि जमिनीवर. तो तुमचे गुप्त भेद व जाहीर सर्व काही जाणतो आणि तुमच्या कमाईला जाणून आहे.१
____________________
(१) ‘अहले सुन्नत’ अर्थात ‘सलफ’ची श्रद्धा आहे की अल्लाह स्वतः अर्शवर आहे. जसा तो प्रशंसनीय आहे. परंतु आपल्या ज्ञानाच्या आधारे तो सर्व ठिकाणी आहे. अर्थात त्याच्या ज्ञानकक्षेच्या बाहेर काहीही नाही. तथापि काही लोकांच्या मते तो अर्शवर नाही तर सर्व ठिकाणी आहे आणि ते या आयतीद्वआरे आपल्या धारणेचे(आकिदा) समर्थन करतात की ती शक्ती जिला आकाशांमध्ये व धरतीवर ‘अल्लाह’ म्हणून पुकारतात आणि आकाशांमध्ये व धरतीवर जिची राज्यसत्ता आहे. आणि या दोन्ही ठिकाणी जिला उपास्य समजले जाते ती शक्ती अर्थात अल्लाह तुमचे प्रकट-अप्रकट सर्व कर्म चांगल्या प्रकारे जाणतो. (फतहुल कदीर) याचे दुसरे प्रमाणही प्रस्तुत केले गेले आहे, जे धर्माचे सखोल ज्ञान बाळगणाऱ्या विद्वानांच्या भाष्यात आढळते. उदा. ‘तफसीर तबरी’ आणि ‘इब्ने कसीर’ वगैरे.
४. आणि त्यांच्याजवळ त्यांच्या पालनकर्त्याच्या निशाण्यांपैकी कोणतीही निशाणी आणली गेली तरीही ते तिच्यापासून तोंड फिरवितात.
५. त्यांनी त्या सत्य-ग्रंथालाही खोटे ठरविले, जेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहोचला तेव्हा लवकरच त्यांना खबर मिळेल त्या गोष्टीची जिची ते थट्टा उडवित होते.
६. काय त्यांनी पाहिले नाही की आम्ही त्यांच्यापूर्वी कित्येक जनसमूहांना नष्ट करून टाकले, ज्यांना आम्ही या जगात एवढे सामर्थ्य प्रदान केले होते तसे तुम्हालाही प्रदान केले नाही आणि आम्ही त्यांच्यावर मुसळधार पाऊस पाडला आणि आम्ही त्यांच्या खालून जलप्रवाह जारी केले, मग आम्ही त्यांना त्यांच्या अपराधांपायी बरबाद करून टाकले आणि त्यांच्यानंतर दुसरा जनसमूह निर्माण केला.
७. आणि जर आम्ही कागदावर लिहिलेला एखादा ग्रंथ जरी तुमच्यावर उतरविला असता, आणि त्यास या लोकांनी आपल्या हातांनी स्पर्शही केला असता, तरीदेखील हे इन्कारी लोक असेच म्हणाले असते की ही तर उघड जादू आहे आणखी काही नाही.
८. आणि ते म्हणाले, तुमच्यावर एखादाा फरिश्ता का नाही उतरविला गेला? आणि जर आम्ही फरिश्ता उतरविला असता तर सारा किस्साच पूर्ण झाला असता, मग त्यांना (थोडासाही) अवसर दिला गेला नसता.
९. आणि जर आम्ही पैगंबराला फरिश्ता बनविले असते तर त्याला पुरुष रूप दिले असते आणि तरीदेखील त्यावर त्याच लोकांनी संशय घेतला असता, जे या क्षणी संशय घेत आहेत.
१०. आणि तुमच्यापूर्वी अनेक पैगंबरांची थट्टा उडविली गेली, तर ते थट्टा उडवित होते, त्यांच्या त्या थट्टा-मस्करीचा दुष्परिणाम त्यांच्यावर उलटला.
११. तुम्ही सांगा, जरा जमिनीवर हिंडून फिरून पाहा की खोटे ठरविणाऱ्यांचा कसा अंत झाला!
१२. तुम्ही सांगा की, जे काही आकाशांमध्ये व जमिनीवर आहे ते सर्व कोणाच्या मालकीचे आहे? तुम्ही सांगा, सर्व काही अल्लाहच्याच मालकीचे आहे. दया कृपा करणे अल्लाहने स्वतःवर अनिवार्य करून घेतले आहे. तुम्हाला अल्लाह कयामतच्या दिवशी एकत्र करील, यात मुळीच शंका नाही. ज्या लोकांनी स्वतःचा सर्वनाश करून घेतला आहे, तेच ईमान राखणारे नाहीत.
१३. आणि जे काही दिवस आणि रात्रीत राहते ते सर्व काही अल्लाहचेच आहे आणि अल्लाह खूप ऐकणारा आणि मोठा जाणणारा आहे.
१४. तुम्ही सांगा, काय मी त्या अल्लाहशिवाय दुसऱ्याला आपला सहाय्यक मित्र बनवू, जो आकाशांचा व जमिनीचा रचयिता आहे आणि तो सर्वांना खाऊ घालतो, त्याला कोणी खाऊ घालत नाही. तुम्ही सांगा, मला हा आदेश दिला गेला आहे की मी त्या सर्वांत प्रथम राहावे, ज्यांनी अल्लाहसाठी आत्मसमर्पण केले आणि अनेकेश्वरवाद्यांपैकी कधीही न राहावे.
१५. तुम्ही सांगा की मी जर आपल्या पालनकर्त्याचा आदेश मानला नाही तर एका मोठ्या दिवसाच्या अज़ाब (शिक्षा-यातने) चे मला भय वाटते.
१६. ज्याच्यावरून हा अज़ाब त्या दिवशी हटविला गेला, तर त्याच्यावर अल्लाहने फार मोठी दया केली आणि ही स्पष्ट अशी सफलता आहे.
१७. आणि जर अल्लाह तुम्हाला काही त्रास-यातना देईल तर तिला दूर करणारा अल्लाहशिवाय अन्य कोणीही नाही आणि जर अल्लाह तुम्हाला लाभ प्रदान करील तर तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.
१८. तोच आपल्या दासांवर प्रभावशाली आणि वर्चस्वशाली आहे आणि तोच हिकमत बाळगणारा, खबर राखणारा आहे.
१९. तुम्ही सांगा की कोणाची साक्ष मोठी आहे? सांगा की आमच्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाह साक्षी आहे आणि हा कुरआन माझ्याकडे वहयी (अवतरीत) केला गेला आहे, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्हाला आणि ज्यांच्यापर्यंत हे पोहोचेल, त्या सर्वांना सचेत करावे.१ काय तुम्ही साक्ष देता की अल्लाहसोबत अन्य इतर उपास्ये (माबूद) आहेत? तुम्ही सांगा की मी या गोष्टीची साक्ष नाही देत. तुम्ही सांगा, तो एकच उपासना करण्यायोग्य आहे आणि मी तुमच्या शिर्कपासून मुक्त आहे.
____________________
(१) रबीअ बिन अनस कथन करतात की आता ज्या कोणापर्यंत कुरआन पोहोचले, जर तो पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा सच्चा अनुयायी आहे तर त्याचे हे कर्तव्य ठरते की त्यानेही लोकांना अल्लाहकडे, त्याचप्रमाणे बोलवावे ज्याप्रमाणे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लोकांना आवाहन करीत असत आणि त्याचप्रमाणे जागृत करावे जसे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जागृत केले होते. (इब्ने कसीर)
२०. ज्यांना आम्ही ग्रंथ (तौरात आणि इंजील) दिला आहे ते तुम्हाला (हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना) त्याचप्रमाणे ओळखतात, ज्याप्रमाणे आपल्या पुत्रांना ओळखतात. जे स्वतः आपल्याला हरवून बसले आहेत, तेच ईमान राखणार नाहीत.
२१. आणि या हून मोठा अत्याचारी कोण आहे, जो अल्लाहवर खोटा आळ घेईल त्याच्या निशाण्यां (प्रतिकां) ना खोटे जाणेल. निःसंशय, अत्याचारी लोक सफल होत नाहीत.
२२. आणि ज्या दिवशी आम्ही सर्वांना एकत्र करू, मंग ज्यांनी अल्लाहसोबत दुसऱ्यांना सहभागी ठरविले, त्यांना सांगू, कोठे आहेत ते, ज्यांना तुम्ही (अल्लाहचा) सहभागी जाणत होते (तो दिवस आठवतो).
२३. मग त्यांच्या शिर्कची, याखेरीज कोणतीही सबब नसेल की म्हणतील, आमच्या पालनकर्त्या अल्लाहची शपथ, आम्ही अनेक ईश्वरांची उपासना करणारे नव्हतो. १
____________________
(१) फितना या शब्दाचा एक अर्थ शिर्क आणि एक अर्थ तौबा असा केला गेला आहे. अर्थात शेवटी हे लोक प्रमाण व क्षमा याचना सादर करून अज़ाबपासून सुटका प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील की आम्ही तर अनेक ईश्वरांचे उपासक नव्हतो. या ठिकाणी ही शंका नसावी की तिथे तर माणसाचे हात पाय साक्ष देतील आणि तोंडावर मोहर लावली जाईल, मग हे इन्कार कसे करतील? याचे उत्तर हजरत अब्बास यांनी दिले आहे की जेव्हा मूर्तिपूजक पाहतील की ईमानधारक जन्नतमध्ये प्रवेश करीत आहेत, तेव्हा ते आपसात सल्लामसलत करून मूर्तिपूजा करण्याचाच इन्कार करतील तेव्हा अल्लाह त्यांच्या तोंडावर मोहर लावील आणि त्यांचे हात पाय त्यांच्या कृत-कर्मांची साक्ष देतील. मग ते सर्वश्रेष्ठ अल्लाहपासून कोणतीही गोष्ट लपविण्याचे सामर्थ्य राखू शकणार नाहीत. (इब्ने कसीर)
२४. बघा, आपल्याविषयी त्यांनी कसे खोटे सांगितले आणि त्यांचे ते मिथ्या आरोप त्यांच्याकडून हरवले, गायब झाले.
२५. त्यांच्यापैकी काहीजण तुमच्याकडे कान लावून बसतात आणि आम्ही त्यांच्या हृदयांवर पडदे टाकून ठेवले आहेत की त्यास समजावे आणि त्यांचे कान बधीर आहेत आणि सर्व निशाण्या त्यांनी पाहून घेतल्या तरीही त्यांच्यावर ईमान राखणार नाहीत, येथपर्यंत की जेव्हा ते तुमच्याजवळ येतात, भांडण करतात, ईमान न राखणारे म्हणतात की या सर्व थोर बुजूर्ग लोकांच्या कथा-कहाण्या आहेत.
२६. आणि हे लोक याच्यापासून दुसऱ्यांनाही रोखतात आणि स्वतःदेखील दूर दूर राहतात आणि हे स्वतःचा सर्वनाश करून घेत आहेत आणि ध्यानी घेत नाही.
२७. आणि जर तुम्ही त्या वेळी पाहाल, जेव्हा या लोकांना जहन्नमच्या जवळ उभे केले जाईल, तेव्हा म्हणतील, अरेरे! आम्हाला पुन्हा परत पाठविले गेले तर किती चांगले होईल (आणि असे झाल्यास) तर आम्ही आपल्या पालनकर्त्याच्या निशाण्यांना खोटे ठरवणार नाही आणि आम्ही ईमान राखणाऱ्यांपैकी होऊ.
२८. किंबहुना ज्या गोष्टीला यापूर्वी लपवित असत, ती त्यांच्यासमोर आली आहे. जर या लोकांना पुन्हा परत पाठविले गेले, तरीही हे तेच करतील, ज्यापासून यांना रोखले गेले होते आणि निःसंशय हे लोक खोटे आहेत.
२९. आणि हे असे म्हणतात की केवळ हे ऐहिक जीवनच आमचे जीवन आहे आणि आम्हाला दुसऱ्यांदा जिवंत केले जाणार नाही.
३०. आणि जर तुम्ही त्या वेळी पाहाल, जेव्हा हे लोक आपल्या पालनकर्त्यासमोर उभे केले जातील, अल्लाह फर्माविल, काय हे खरे नाही? ते म्हणतील, निःसंशय, पालनकर्त्याची शपथ, हे खरे आहे. अल्लाह फर्माविल, तर मग आपल्या ईमान न राखण्याच्या परिणामी अज़ाब (शिक्षा-यातना) सहन करा.
३१. निःसंशय, मोठ्या तोट्यात पडले ते लोक ज्यांनी अल्लहाची भेट होण्याला खोटे ठरविले, येथपर्यंत की जेव्हा ती निर्धारीत वेळ त्यांच्यावर अचानक येईल, तेव्हा म्हणतील, की अरेरे! खेद आहे आमच्या सुस्तीबद्दल जी या बाबतीत झाली आणि त्यांची अवस्था अशी होईल की आपले ओझे आपल्या कमरेवर लादुन घेतलेले असतील. शावधान! ते मोठेे वाईट ओझे लादून घेतील.
३२. आणि या जगाचे जीवन तर, खेळ-तमाशाव्यतिरिक्त आणखी काहीच नाही. आणि अंतिम घर (आखिरत) अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता अधिक चांगले आहे, काय तुम्ही विचार चिंतन करीत नाही?
३३. आम्ही हे चांगल्या प्रकारे जाणतो की, त्यांच्या कथनांनी तुम्ही दुःखी कष्टी होता, तर हे लोक तुम्हाला खोटे म्हणत नाहीत, तर हे अत्याचारी अल्लाहच्या आयतींचा इन्कार करतात.१
____________________
(१) पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना इन्कारी लोकांतर्फे खोटे ठरविले जाण्यावर जे दुःख होत असे, त्याच्या निराकरणासाठी व पैगंबरांना सांत्वना देण्यासाठी हे सांगितले जात आहे की हे तुम्हाला खोटे ठरवित नाही. किंबहुना हे अल्लाहच्या आयतींना खोटे ठरवित आहेत. अर्थात ते अत्याचार करीत आहेत आजदेखील जे लोक पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या आदर्श चारित्र्य, न्यायदान, ईमानदारी व सत्यतेविषयी खूप जोरदार भाषणे देतात, परंतु पैगंबरांचे अनुसरण करण्यात त्यांना कठीणता वाटते. पैगंबरांच्या तुलनेत ते विचार चिंतन आणि आपल्या नेत्यांच्या कथनाला जास्त महत्त्व देतात. त्यांन स्वतःलाच विचारावे की हे कोणाचे चारित्र्य आहे जे त्यांनी अंगिकारले आहे?
३४. आणि तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांनाही खोटे ठरविले गेले आहे आणि त्यांनी, त्या खोटे ठरविले जाण्यावर धीर-संयम राखला आणि त्यांना त्रास-यातना दिली गेली, येथपावेतो की त्यांच्याजवळ आमची मदत पोहोचली. अल्लाहचे फर्मान कोणी बदलणारा नाही आणि तुमच्याजवळ पैगंबरांचे वृत्तांत येऊन पोहोचले आहेत.
३५. आणि जर त्यांचे तोंड फिरविणे तुम्हाला असह्य होत असेल तर तुमच्याने हे शक्य असेल तर जमिनीत एखादे भुयार किंवा आकाशात (चढून जाण्यासाठी) एखादी शिडी शोधा आणि त्यांना एखादा मोजिजा (चमत्कार) आणून दाखवा. अल्लाहने इच्छिले असते तर त्या सर्वांना सत्य मार्गावर जमा केले असते. यास्तव नादान लोकांपैकी होऊ नका.
३६. आणि तेच लोक स्वीकार करतात, जे ऐकतात आणि मेलेल्या लोकांना अल्लाह जिवंत करून उठविल, मग सर्व त्या (अल्लाहच्याच) कडे आणले जातील.
३७. आणि ते म्हणाले की, त्यांच्यावर त्यांच्या पानलकर्त्यातर्फे एखादा मोजिजा (चमत्कार) का नाही उतरविला गेला? तुम्ही सांगा की अल्लाह एखादा चमत्कार उतरविण्याचे पुरेपूर सामर्थ्य राखतो तथापि बहुतेक लोक जाणत नाहीत.
३८. आणि जितक्या प्रकारचे सजीव जमिनीवर चालणारे आहेत, आणि जितक्या प्रकारचे पंखांनी उडणारे पक्षी आहेत, त्यांच्यापैकी कोणीही असा नाही, जो तुमच्यासारखा एक समूह नसावा. आम्ही ग्रंथात लिहून ठेवण्यात एकही गोष्ट सोडली नाही, मग सर्व लोक आपल्या पालनकर्त्याजवळ जमा केले जातील.
३९. आणि ज्या लोकांनी आमच्या आयतींचा इन्कार केला, ते बहीरे, मुके आहेत, अंधारात पडले आहेत. अल्लाह ज्याला इच्छितो पथभ्रष्ट करतो आणि ज्याला इच्छितो सन्मार्गास लावतो.
४०. तुम्ही सांगा की आपली काय अवस्था होईल ते सांगा की जर तुमच्यावर अल्लाहचा एखादा अज़ाब येऊन कोसळावा किंवा तुमच्यापर्यंत कयामतच येऊन पोहचावी, तर काय अल्लाहशिवाय इतरांना पुकाराल? (सांगा) जर तुम्ही सच्चे असाल.
४१. किंबहुना, विशेषतः त्यालाच पुकाराल, मग ज्यासाठी तुम्ही पुकाराल, जर त्याने इच्छिले तर त्यास हटवूनही देईल आणि ज्यांना तुम्ही अल्लाहचे सहभागी ठरविता, त्या सर्वांना विसरून जाल.
४२. आणि आम्ही तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या इतर जनसमूहांकडेही पैगंबर पाठविले होते. त्यांनादेखील आम्ही गरीबी व रोगराईने धरले, यासाठी की त्यांनी गयावया करावी.
४३. अशा प्रकारे जेव्हा त्यांना आमची सजा मिळाली तर ते कमजोर का नाही पडतील? परंतु त्यांची मने कठोर झालीत आणि सैतानाने त्यांच्या कर्मांना, त्यांच्या विचारात चांगले करून दाखविले.
४४. आणि जेव्हा ते त्या उपदेशाला विसरले, ज्याची त्यांना शिकवण दिली गेली होती, तर आम्ही त्यांच्यावर प्रत्येक चीज-वस्तूचे दरवाजे खुले केले, येथपर्यंत की जेव्हा आपण प्राप्त केलेल्या चीजवस्तूंवर ते घमेंड करू लागले तेव्हा त्यांना आम्ही अचानक तावडीत घेतले, मग ते निराश होऊन बसले.
४५. मग अत्याचारी लोकांची पाळेमुळे कापली गेली आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहची प्रशंसा आहे, जो साऱ्या जगाचा पालनहार आहे.
४६. तुम्ही त्यांना सांगा, बरे हे सांगा की जर अल्लाह तुमची ऐकण्याची व पाहण्याची शक्ती पूर्णतः हिरावून घेईल आणि तुमच्या हृदयांवर मोहर लावून देईल तर अल्लाहशिवाय कोणी उपास्य (माबूद) आहे जो तुम्हाला हे पुन्हा परत करील? तुम्ही पाहा की आम्ही कशा प्रकारे आपल्या निशाण्यांना अनेक रूपांनी प्रस्तुत करीत आहोत, तरीदेखील ते कानाडोळा करीत आहेत.
४७. तुम्ही सांगा, बरे हे सांगा की जर तुमच्यावर अल्लाहचा अज़ाब अचानक किंवा सावध असताना कोसळून पडला तर (या स्थितीत) काय अत्याचारी लोकांशिवाय दुसरा कोणी मारला जाईल?
४८. आणि आम्ही पैगंबर अशासाठी पाठवितो की त्यांनी शुभ-वार्ता दयावी आणि लोकांना (दुष्परिणतीचे) भय दाखवावे, मग जो कोणी ईमान राखील आणि आपले वर्तन सुधारेल तर अशांना ना कसले भय राहील आणि ना ते दुःखी होतील.
४९. आणि जे लोक आमच्या आयतींना खोटे ठरवतील, तर त्यांना अल्लाहचा अज़ाब येऊन घेरेल, कारण ते अवज्ञाकारी आहेत.
५०. तुम्ही सांगा की मी ना तर तुम्हाला हे सांगतो की माझ्याजवळ अल्लाहचा खजिना आहे आणि ना मी परोक्ष गोष्टींना जाणतो आणि ना मी असे सांगतो की मी फरिश्ता आहे, मी तर केवळ, जे काही वहयीच्या रूपाने माझ्याजवळ येते, त्याचे अनुसरण करतो.१ तुम्ही सांगा की आंधळा आणि डोळस दोघे समान कसे असू शकतात? तर मग तुम्ही विचार चिंतन का नाही करीत?
____________________
(१) ‘माझ्याजवळ अल्लाहचे खजिने नाहीत’ यास अभिप्रेत हे की प्रत्येक प्रकारचे सामर्थ्य मी बाळगणार नाही की मी तुम्हाला अल्लाहच्या हुकूमाविना व मर्जीविना एखादा चमत्कार दाखवावा, जसे तुम्ही इच्छिता, ज्याला पाहून तुम्हाला माझ्या सत्यतेवर विश्वास बसावा. मी परोक्ष ज्ञानही बाळगत नाही की ज्याद्वारे मी भविष्यकालीन घटनांबद्दल तुम्हाला माहीत करावे. मी फरिश्ता असण्याचाही दावा करीत नाही की ज्यामुळे तुम्ही मला अशी कामे करण्यास विवश करावे, जी मानव-सामर्थ्यापलीकडची असावीत, मी तर केवळ त्या वहयीला मानणारा आहे जी माझ्यावर अवतरीत केली गेली आणि या हदीसमध्येही उल्लेखित आहे. जसे की पैगंबरानी फर्माविले, मला कुरआनसोबत त्याच्याच समानही प्रदान केले गेले यात ‘समान’शी अभिप्रेत पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची हदीस (कथने व आचरणशैली) आहेत.
५१. आणि अशा लोकांना भय दाखवा, जे या गोष्टीचे भय बाळगतात की आपल्या पालनकर्त्यासमोर अशा स्थितीत एकत्र केले जातील की अल्लाहखेरीज जेवढे आहेत, ना त्यांची मदत करतील आणि ना कोणी शिफारस करणारा असेल, या आशेसह की त्यांनी भय राखावे.
५२. आणि तुम्ही त्यांना बाहेर काढू नका, जे सकाळ-संध्याकाळ आपल्या पालनकर्त्याची उपासना करतात, विशेषतः त्याची मर्जी प्राप्त करू इच्छितात, त्यांच्या हिशोबाशी तुमचा किंचितही संबंध नाही आणि तुमच्या हिशोबाशी त्यांचा किंचितही संबंध नाही की ज्यामुळे तुम्ही त्यांना बाहेर घालवावे, किंबहुना तुम्ही अत्याचार करणाऱ्यांपैकी ठराल.
५३. आणि अशा प्रकारे आम्ही त्यांना आपसात कसोटीत टाकले, यासाठी की त्यांनी म्हणावे, काय अल्लाहने आमच्यामधून फक्त यांच्यावरच उपकार केला? तेव्हा काय असे नाही की अल्लाह कृतज्ञशील लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो.
५४. आणि तुमच्याजवळ जेव्हा ते लोक येतील, जे आमच्या आयतींवर ईमान राखतात, तर त्यांना सांगा, तुमच्यावर सलामती असो तुमच्या पालनकर्त्याने स्वतःवर दया अनिवार्य करून घेतली आहे की तुमच्यापैकी ज्याने मूर्खपणाने वाईट कृत्य केले मग त्यानंतर क्षमा याचना केली आणि सुधारणा करून घेतली तर अल्लाह मोठा माफ करणारा दया करणारा आहे.
५५. अशा प्रकारे आम्ही आपल्या आयतींचे सविस्तर निवेदन करतो यासाठी की अपराधी लोकांचा मार्ग स्पष्ट व्हावा.
५६. तुम्ही सांगा की मला या गोष्टीपासून रोखले गेले आहे की मी त्यांची उपासना करावी, ज्यांना अल्लाहशिवाय तुम्ही पुकारता. तुम्ही सांगा की मी तुमच्या मनाच्या इच्छेनुसार चालणार नाही कारण अशा स्थितीत मी मार्गभ्रष्ट होईन आणि सन्मार्गावर राहणार नाही.
५७. तुम्ही सांगा, माझ्याजवळ माझ्या पालनकर्त्यातर्फे एक प्रमाण आहे आणि ते तुम्ही खोटे ठरविता. ज्या गोष्टीची तुम्ही घाई करीत आहात ती माझ्याजवळ नाही. अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणाचाही आदेश नाही अल्लाह वास्तव गोष्टींना स्पष्टतः सांगतो आणि तोच सर्वांत चांगला फैसला करणारा आहे.
५८. तुम्ही सांगा, ज्या गोष्टीची तुम्ही एवढ्या घाईने मागणी करीत आहात ती जर माझ्या अवाख्यात असती तर माझ्या व तुमच्या दरम्यान केव्हाच फैसला झाला असता आणि अल्लाह अत्याचारी लोकांना चांगल्या प्रकारे ओळखतो.
५९. आणि त्या (अल्लाह) कडेच परोक्षाच्या चाव्या आहेत, ज्यांना फक्त तोच जाणतो आणि जे काही धरतीवर आणि जलाशयात आहे ते सर्व तो जाणतो आणि जमिनीच्या अंधःकारात एक दाणाही खाली पडत नाही. आणि ना एखादी ओली व कोरडी वस्तू पडते, परंतु हे सर्व काही स्पष्ट ग्रंथात नमूद आहे.१
____________________
(१) स्पष्ट ग्रंथाशी अभिप्रेत ‘सुरक्षित ग्रंथ’ या आयतीद्वारे हे स्पष्ट कळते की गैब (परोक्ष) चे ज्ञान फक्त अल्लाहलाच आहे. समस्त परोक्षा-खजिना त्याच्याचजवळ आहे. यास्तव कृतघ्न, अनेकेश्वरवादी आणि विरोधी लोकांवर केव्हा अज़ाब टाकायचा तेही अल्लाह जाणतो. हदीसमधील उल्लेखानुसार परोक्ष गोष्टी पाच आहेत? १. खयामतचे ज्ञान. २. पर्जन्यवृष्टी. ३. मातेच्या गर्भातले मूल. ४. उद्या घडणारी घटना. ५. मृत्यु कोणत्या जागी होईल. या पाचही गोष्टींचे ज्ञान फक्त अल्लाहला आहे. (सही बुखारी :तफसीर सूरह अल अनआम)
६०. तोच (अल्लाह) होय, जो रात्री तुमचा आत्मा (एक पट) ताब्यात घेतो आणि दिवसा जे काही करता तेही जाणतो, मग तुम्हाला त्यात एक ठरलेली मुदत पूर्ण करण्याकरिता जागे करतो. मग तुम्हाला त्याच्याचकडे परत जायचे आहे. तेव्हा तुम्ही जे काही करीत राहिले ते तुम्हाला सांगेल.
६१. तोच आपल्या दासांवर वर्चस्वशाली आहे आणि तुमच्यावर देखरेख ठेवणारे (फरिश्ते) पाठवितो, येथ पर्यंत की जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याचा मृत्यु (समय) जवळ येतो, तेव्हा आमचे फरिश्ते त्याचा जीव काढून घेतात आणि ते किंचितही आळस करीत नाहीत.
६२. मग ते आपल्या सच्चा पालनकर्त्या (अल्लाह) जवळ आणले जातील सावधान! त्याचाच आदेश चालेल आणि तो फार लवकर हिशोब घेईल.
६३. तुम्ही सांगा, जमीन आणि जलाशयाच्या अंधःकारातून जेव्हा त्याला नरमी आणि हळू स्वरात पुकारता की जर आम्हाला यातून सोडवशिल तर आम्ही खआत्रीने तुझे कृतज्ञशील बनू, तेव्हा कोण तुम्हाला वाचवितो.
६४. तुम्ही स्वतः सांगा की यापासून आणि प्रत्येक संकटापासून तुम्हाला अल्लाहच वाचवितो, पण तरीही तुम्ही शिर्क करता.
६५. तुम्ही सांगा, तोच तुमच्यावर, तुमच्यावरून किंवा तुमच्या पायांखालून अज़ाब (शिक्षा-यातना) पाठविण्याचे किंवा तुमचे अनेक समूह बनवून आपसात लढाईची मजा चाखविण्याचे सामर्थ्य राखतो. तुम्ही पाहा की आम्ही अनेकरित्या कशा प्रकारे आपल्या आयतींचे निवेदन करतो, यासाठी की त्यांना समजावे.
६६. आणि तुमच्या जनसमूहाने त्याला खोटे ठरविले वास्तविक ते सत्य आहे. तुम्ही सांगा की मी तुमच्यावर अधिकारी (निरीक्षक) नाही.
६७. प्रत्येक खबरीची एक निर्धारीत वेळ आहे आणि हे तुम्ही फार लवकर जाणून घ्याल.
६८. आणि जेव्हा तुम्ही त्या लोकांना पाहाल, जे आमच्या आयतींमध्ये व्यंग दोष काढत आहेत, तेव्हा अशा लोकांपासून वेगळे व्हा, येथपर्यंत की ते दुसऱ्या कामात गुंतावेत आणि जर तुम्हाला सैतान विसरही पाडेल तरी आठवण आल्यावर पुन्हा अशा अत्याचारी लोकांसोबत बसू नका.
६९. आणि जे लोक अल्लाहचे भय राखून वागतात, त्यांच्यावर त्यांच्या पकडीचा काहीच परिणाम होणार नाही. मात्र त्यांना शिकवण देत राहाणे (चांगले आहे) कदाचित तेदेखील अल्लाहचे भय राखून दुष्कर्मापासून दूर राहू लागतील.
७०. आणि अशा लोकांशी कधीही नाते ठेवू नका, ज्यांनी आपल्या दीन (धर्मा) ला खेळ-तमाशा बनवून ठेवले आहे आणि ऐहिक जीवनाने त्यांना धोक्यात टाकले आहे. आणि या कुरआनाद्वारे उपदेश जरूर करीत राहा, यासाठी की एखादा मनुष्य आपल्या कर्मांमुळे अशा प्रकारे न फसावा की कोणी अल्लाहशिवाय त्याची मदत करणारा नसावा आणि ना शिफारस करणारा आणि अवस्था अशी व्हावी की जर सारे जग भरून मोबदल्यात देऊन टाकील, तरीही त्याच्याकडून घेतले न जावे. ते असेच लोक आहेत की आपल्या कर्मांमुळे अडकून पडले. त्यांच्यासाठी खूप गरम पाणी पिण्याचे असेल आणि त्यांच्या कुप्र (इन्कारा) मुळे मोठी दुःदायक शिक्षा-यातना असेल.
७१. तुम्ही सांगा, काय आम्ही अल्लाहशिवाय त्याला पुकारावे जो आमचे भले-बुरे काहीच करू शकत नसावा, आणि अल्लाहचे मार्गदर्शन लाभल्यानंतर त्या माणसासारखे टाचा रगडत परत फिरविले जावे, जणू सैतानाने बहकविले असावे आणि तो धरतीवर भटकत फिरत असावा. त्याचे साथीदार त्याला सरळ मार्गाकडे बोलावित असावेत की आमच्या जवळ ये. तुम्ही सांगा, अल्लाहचे मार्गदर्शनच खऱ्या अर्थाने मार्गदर्शन आहे. आणि आम्हाला हा आदेश दिला गेला आहे की समस्त जगाच्या स्वामीसाठी स्वतःला त्याच्या हवाली करावे.
७२. आणि नमाज कायम करा आणि त्या (अल्लाह) चे भय राखा, तो, तोच आहे, ज्याच्याकडे तुम्ही एकत्रित केले जाल.
७३. त्यानेच आकाशआंना व जमिनीला सत्यासह निर्माण केले, आणि ज्या दिवशी तो फर्माविल, होऊन जा तर होऊन जाईल. त्याचे वचन अगदी सत्य आहे, आणि ज्या दिवशी शंख फुंकला जाईल, राज्य सत्ता त्याचीच असेल. तो जाणणारा आहे परोक्ष आणि अस्तित्वाचा आणितो हिकमतशाली व खबर राखणारा आहे.
७४. आणि स्मरण करा, जेव्हा इब्राहीम आपले पिता आजरला म्हणाले, काय तुम्ही मुर्त्यांना उपास्य (माबूद) बनवित आहात? मी तर तुम्हाला व तुमच्या लोकांना उघड मार्गभ्रष्टतेत पाहतोय.
७५. आणि अशा प्रकारे आम्ही इब्राहीमला आकाशांची व जमिनीची राज्य-सत्ता दाखविली यासाठी की त्यांनी पुरेपूर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी व्हावे.
७६. मग जेव्हा त्यांच्यावर रात्रीचा अंधार पसरला तेव्हा एक तारा पाहिला, म्हणाले की हा माझा पालनहार आहे, मग जेव्हा तो बुडाला तेव्हा म्हणाले की मी अस्त पावणाऱ्याशी प्रेम राखत नाही.
७७. मग जेव्हा चंद्राला चमकताना पाहिले, तेव्हा म्हणाले, हा माझा पालनकर्ता आहे, मग जेव्हा तो बुडाला तेव्हा म्हणाले की जर माझ्या पालनकर्त्याने मला सरळ मार्ग दाखविला नाही तर मी मार्गभ्रष्ट झालेल्यांपैकी होईन.
७८. मग जेव्हा सूर्याला चमकताना पाहिले, तेव्हा म्हणाले, हा माझा पालनहार आहे. हा तर सर्वांत मोठा आहे, परंतु जेव्हा तो बुडाला तेव्हा म्हणाले, की निःसंशय मी तुमच्या शिर्कपासून मुक्त आहे.
७९. मी आपले तोंड त्याच्याकडे फिरवून घेतले, ज्याने आकाशांना व जमिनीला निर्माण केले एकाग्रतापूर्वक, आणि मी अनेकेश्वरवाद्यांपैकी नाही.
८०. आणि त्यांच्याशी, त्यांचे लोक हुज्जत करू लागले. पैगंबर (इब्राहीम) म्हणाले, काय तुम्ही अल्लाहविषयी माझ्याशी वाद घालता. वास्तविक त्याने मला सरळ मार्ग दाखविला आहे आणि ज्यांना तुम्ही अल्लाहसोबत सामील करता, मी त्यांचे भय राखत नाही, परंतु हे की माझा पालनकर्ता एखाद्या कारणाने इच्छिल. माझ्या पालनकर्त्याने प्रत्येक गोष्टीला आपल्या ज्ञानकक्षेत घेरलेले आहे. काय तुम्ही तरीही विचार करीत नाही?
८१. आणि मी त्या वस्तूचे का म्हणून भय राखावे जिला तुम्ही अल्लाहचा सहभागी ठरविले आहे, वास्तविक तुम्ही त्या वस्तूला अल्लाहचा सहभागी बनविण्यापासून भित नाही, ज्याचे तुमच्याजवळ अल्लाहने एखादे प्रमाण उतरविले नाही. मग या दोन्ही समूहांमध्ये कोण शांतीचा जास्त हक्कदार आहे, जर तुम्ही जाणत असाल.
८२. ज्या लोकांनी ईमान राखले आणि आपल्या ईमानात कसल्याही प्रकारच्या शिर्कचे मिश्रण केले नाही, त्यांच्याचसाठी शांती आहे आणि तेच सरळ मार्गावर आहेत.
८३. आणि हे आमचे प्रमाण आहे जे आम्ही इब्राहिमला त्यााच्या जनसमूहाच्या मुकाबल्यात दिले. आम्ही ज्याला इच्छितो त्याचे दर्जे बुलंद (उंचवितो ) निःशंय तुमचा पालनकर्ता हिकमतशाली सर्वज्ञ आहे
८४. आणि आम्ही त्यांना इसहाक आणि याकूब प्रदान केले आणि प्रत्येकाला सरळ मार्ग दाखविला आणि यापूर्वी नूहला मार्ग दाखविला आणि संततीत दाऊद आणि सुलेमान आणि अय्यूब आणि यूसुफ आणि मूसा व हारून यांना आणि अशा प्रकारे आम्ही नेकी (सत्कर्म) करणाऱ्या लोकांना मोबदला प्रदान करतो.
८५. आणि जकरिया आणि यह्या आणि ईसा आणि इलियास यांना, हे सर्व नेक सदाचारी लोकांपैकी होते.
८६. आणि इस्माईल आणि यसअ आणि यूनुस आणि लूत यांना, या सर्वांना आम्ही या जगातील लोकांवर श्रेष्ठता प्रदान केली.
८७. आणि त्यांच्या वाडवडील, संतती आणि भावांमधून आणि आम्ही त्यांची निवड केली आणि त्यांना सरळ मार्ग दाखविला.
८८. हाच अल्लाहचा मार्ग आहे आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो, त्याला मार्ग दाखवितो आणि जर त्या लोकांनीही अल्लाहसोबत दुसऱ्यांना सहभागी केले असते तर त्यांचे कर्म वाया गेले असते.
८९. यांनाच आम्ही ग्रंथ आणि हिकमत आणि नुबूवत (पैगंबरी) प्रदान केली आणि जर या लोकांनी यास मानले नाही, तर आम्ही अशा लोकांना तयार करून ठेवले आहे, जे याचा इन्कार करणार नाहीत.
९०. हेच ते लोक होते, ज्यांना अल्लाहने उचित मार्ग दाखविला, यास्तव तुम्ही त्यांच्या मार्गाचे अनुसरण करा. तुम्ही सांगा की मी याबद्दल कसलाही मोबदला मागत नाही. समस्त जगातील लोकांकरिता ही केवळ स्मरणिका आहे.
९१. आणि त्यांनी, अल्लाहची जशी कदर केली पाहिजे होती तशी कदर केली नाही. जेव्हा ते असे म्हणाले की अल्लाहने कोणा माणसावर काही उतरविले नाही. तुम्ही सांगा, मूसा जो ग्रंथ तुमच्याजवळ घेऊन आले, जो लोकांकरिता दिव्य प्रकाश आणि मार्गदर्शन आहे, तो कोणी उतरविला, ज्याला तुम्ही वेगवेगळ्या पानांमध्ये ठेवता, ज्यातून काही जाहीर करता आणि अधिकांश लपविता आणि तुम्हाला ते ज्ञान दिले गेले, जे तुम्ही आणि तुमचे वाडवडील जाणत नव्हते. तुम्ही सांगा की अल्लाहनेच उतरविला होता. मग त्यांना त्यांच्या दोष काढण्यात, खेळ तमाशा करीत सोडून द्या.
९२. आणि हादेखील एक शुभ ग्रंथ आहे, जो आम्ही अवतरीत केला आहे. आपल्या पूर्वीच्या ग्रंथांची सत्यता दर्शवितो, यासाठी की तुम्ही मूळ वस्ती (मक्का) आणि त्याच्या जवळपासच्या (शहरांना म्हणजे समस्त मानवविश्वा) ला सूचित करावे आणि जे आखिरतवर ईमान राखतात, तेच याला मानतील आणि तेच आपल्या नमाजांचे रक्षण करतील.
९३. आणि त्याहून मोठा अत्याचारी आणखी कोण असू शकतो, जो अल्लाहवर खोटा आरोप ठेवील किंवा असे म्हणेल की माझ्याकडे वहयी आली आहे, वास्तविक त्याच्याकडे काहीच आले नाही आणि जो असे म्हणाला की, ज्याप्रकारे अल्लाहने उतरविले तसे मीदेखील उतरविन. जर तुम्ही अत्याचारींना मृत्युच्या कठोर शिक्षा-यातनेत पाहाल, जेव्हा फरिश्ते आपले हात पुढे करून म्हणतील, आपला जीव काढा. आज तुम्हाला अल्लाहवर नाहक आरोप ठेवण्यामुळे आणि घमेंडीने त्याच्या आयतींचा इन्कार करण्यापायी अपमानदायक मोबदला दिला जाईल.
९४. आणि तुम्ही आमच्याजवळ एकटे-एकटे आलात, जसे तुम्हाला पहिल्यांदा निर्माण केले गेले आणि तुम्हाला जे दिले ते आपल्या मागे सोडून आलात आणि तुमची शिफारस करणारे आम्हाला दृष्टीस पडत नाहीत, ज्यांना तुम्ही आपल्या कार्यात आमचा सहभागी समजत होते. निःसंशय तुमचे आणि त्यांचे संबंध तुटले आणि तुमचे ते विचार तुमच्यापासून हरवले.
९५. अल्लाहच बीज आणि कोय फाडून अंकूर बाहेर काढतो. तो सजीवाला निर्जीवातून, निर्जीवाला सजीवातून बाहेर काढतो. तोच अल्लाह आहे. मग तुम्ही कोठे उलट बहकत जात आहात?
९६. तो प्रातःकाळ फाडणारा आहे आणि त्याने रात्रीला आराम करण्यासाठी आणि सूर्य आणि चंद्राला हिशोब लावण्यासाठी बनविले. ही निर्धारीत गोष्ट आहे, जबरदस्त ज्ञान बाळगणाऱ्या (अल्लाह) ची.
९७. आणि त्यानेच तुमच्यासाठी तारे बनविले, यासाठी की तुम्ही जमीन आणि समुद्राच्या अंधारात त्यांच्याद्वारे मार्ग जाणून घ्यावा. आम्ही त्या लोकांसाठी निशाण्या सांगितल्या आहेत, जे ज्ञान बाळगतात.
९८. आणि त्यानेच तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले. मग तुमचे एक कायमस्वरूपी आणि एक सुपूर्द होण्याचे ठिकाण आहे. आम्ही त्यांच्यासाठी निशाण्या (चिन्हे) सांगितल्या आहेत. जे ज्ञान बाळगतात.
९९. आणि तोच होय, ज्याने आकाशातून पर्जन्यवृष्टी केली. मग आम्ही त्याद्वारे सर्व प्रकारची वनस्पती उगवली, मग त्याद्वारे हिरवेगार शेती उत्पन्न केली, ज्यापासून आम्ही थरावर थर असलेले धान्य आणि खजूरीच्या गाभ्याशी लटकणारे घोंस आणि द्राक्ष व जैतून व डाळींबाच्या बागा उत्पन करतो, ज्या एकाच प्रकारच्या आणि अनेक प्रकारच्या असतात. त्यांची फळे पाहा, जेव्हा ती लागतात, त्यांचे पिकणे, निःसंशय या सर्वांत, त्या लोकांकरिता निशाण्या (चिन्हे) आहेत, जे ईमान राखतात.
१००. आणि लोकांनी जिन्नांना अल्लाहचे सहभागी बनविले आहे, वास्तविक त्यानेच त्यांना निर्माण केले आहे आणि त्या (अल्लाह) च्याकरिता पुत्र आणि कन्या, मनाने ठरवून घेतल्या, कसल्याही ज्ञानाविना तो (अल्लाह) यांनी सांगितलेल्या अवगुणांपासून मुक्त आणि उत्तम आहे.
१०१. तो आकाशांची व धरतीची िनिर्मती करणारा आहे, त्याला संतती कशी असू शकते? वास्तविक त्याची कोणतीही पत्नी नाही आणि तो प्रत्येक चीज-वस्तूचा निर्माणकर्ता आणि जाणणारा आहे.
१०२. तोच अल्लाह तुमचा पालनकर्ता आहे, त्याच्याखेरीज कोणीही उपास्य (माबूद) नाही, प्रत्येक चीज-वस्तूचा रचयिता, यास्तव फक्त त्याचीच उपासना करा आणि तो प्रत्येक गोष्टीची देखभाल ठेवणारा आहे.
१०३. डोळे त्याला पाहू शकत नाहीत आणि तो सर्व नजरा पाहतो आणि तो अतिसूक्ष्मदर्शी, भेद जाणणारा खबर राखणारा आहे.
१०४. तुमच्या पालनकर्त्यातर्फे तुमच्याजवळ प्रमाण घेऊन पोहोचले आहे तेव्हा जो पाहील, आपल्या भल्याकरिता (पाहील) आणि जो आंधळा बनून राहील, तो आपले अहित ( नुकसान) करून घेईल आणि मी तुमचा रक्षक नाही.
१०५. अशा प्रकारे आम्ही (पवित्र कुरआनाच्या) आयतींना पुन्हा पुन्हा सांगात आहोत, यासाठी की त्यांनी सांगावे की तुम्ही वाचून ऐकविले त्या लोकांकरिता जे जाणतात आम्ही ते चांगल्या प्रकारे स्पष्ट करून सांगावे.
१०६. तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशा (वहयी) चे अनुसरण करा की अल्लाहशिवाय कोणीही उपास्य (माबूद) नाही आणि अनेकेश्वरवाद्यांपासून विमुख व्हा.
१०७. आणि अल्लाहने इच्छिले असते तर यांनी इतरांना अल्लाहचे सहभागी ठरविले नसते आणि आम्ही तुम्हाला या लोकांवर देखरेख ठेवणारा बनविले नाही, आणि ना तुम्ही त्यांच्यावर अधिकार राखणारे आहात.
१०८. आणि जे लोक अल्लाहशिवाय दुसऱ्यांना पुकारतात त्यांना अपशब्द वापरू नका, अन्यथा शत्रू बनून अजाणतेपणी तेदेखील अल्लाहसाठी अपशब्द वापरतील. अशा प्रकारे आम्ही प्रत्येक जनसमूहासाठी त्यांचे कर्म सुशोभित बनविले आहे, मग त्यांना आपल्या पालनकर्त्याकडेच परतायचे आहे. यास्तव तो त्यांना त्याबाबत सूचित करील जे काही ते करीत राहिले.
१०९. आणि त्यांनी जोरदारपणे अल्लाहची शपथ घेतली की त्यांच्याजवळ एखादी निशाणी आली तर खात्रीने मानतील. तुम्ही सांगा की निशाण्या अल्लाहजवळ आहेत आणि तुम्हाला काय माहीत की त्या निशाण्या येऊन पोहचतील, तरीही ते मानणार नाहीत.
११०. आणि आम्ही त्यांची मने व डोळे फिरवून टाकू जसे त्यांनी पूर्वी यावर ईमान राखले नाही आणि त्यांना त्यांच्या विद्रोहा (च्या अंधारा) त असेच भटकत ठेवू.
१११. आणि जर आम्ही त्यांच्याजवळ फरिश्ते उतरविले असते, आणि त्यांच्याशी मेलेल्या लोकांनी बातचित केली असती आणि त्यांच्यापुढे सर्व चीज-वस्तू जमा केली असती तरीदेखील अल्लाहच्या इच्छेविना यांनी ईमान राखले नसते, परंतु यांच्यापैकी बहुतेक लोक मूर्खता करीत आहेत.
११२. आणि अशा प्रकारे प्रत्येक पैगंबराकरिता जिन्नांच्या आणि मानवांच्या सैतानांना शत्रू बनविले१ जे आपसात भुरळ पडण्याकरिता मनमोहक गोष्टी मनात आणतात आणि जर तुमच्या पालनकर्त्याने इच्छिले असते तर त्यांनी असे केले नसते. तेव्हा तुम्ही त्यांना व त्यांच्या कारस्थानाला सोडा.
____________________
(१) ही तीच गोष्ट होय जी अनेकरित्या पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना धीर-सांत्वना देण्यासाठी सांगितली गेली की तुमच्यापूर्वी जेवढे पैगंबर आलेत त्यांनाही खोटे ठरविले गेले, सजा-यातना दिल्या गेल्या. तात्पर्य, ज्याप्रकारे त्यांनी धीर-संयम व हिंमत राखली त्याच प्रकारे तुम्हीही या सत्याच्या शत्रूंपुढे धीर, संयम आणि दृढता दाखवा. यावरून हे कळाले की सैतानाचे अनुयायी मनवांखेरीज जिन्नांमध्येही आहेत, आणि हे ते होते जे दोन्ही गटांचे शत्रु, विद्रोही, अत्याचारी आणि दुराचारी गर्विष्ठ आहेत.
११३. आणि यासाठी की त्यांची मने त्याकडे प्रवृत्त व्हावीत, जे आखिरतवर ईमान राखत नाही आणि तशाने आनंदित व्हावेत आणि तोच अपराध करावा जो ते लोक करीत होते.१
____________________
(१) अर्थात सैतानाच्या वाईट इराद्याला तेच लोक बळी पडतात, जे आखिरतवर ईमान राखत नाहीत, आणि हे खरे आहे की ज्या प्रकारे लोकांच्या मनात आखिरतचा विश्वास कमजोर होत चालला आहे, तद्‌नुषंगे लोक सैतानी व्यूहात फसत चालले आहेत.
११४. तर काय मी अल्लाहखेरीज अन्य एखाद्या शासकाचा शोध घ्यावा वास्तविक त्यानेच तुमच्याकडे एक सविस्तर ग्रंथ (कुरआन) अवतरीत केला आणि आम्ही ज्यांना ग्रंथ प्रदान केला आहे, ते जाणतात की खरोखर तो तुमच्या पालनकर्त्यातर्फे सत्यासह आहे, तेव्हा तुम्ही संशय करणाऱ्यांपैकी होऊ नका.
११५. आणि तुमच्या पालनकर्त्याची वचने सत्यकथन आणि न्यायाने परिपूर्ण झालीत. त्याच्या वाणीला कोणीही बदलू शकत नाही आणि तो चांगल्या प्रकारे ऐकणारा, जाणणारा आहे.
११६. आणि जगात राहणाऱ्यांपैकी तुम्ही जर अधिकांश लोकांचे अनुसरण कराल तर ते तुम्हाला अल्लाहच्या मार्गापासून हटवतील. ते फक्त निराधार कल्पनांच्या मागे चालतात आणि अटकळीच्या गोष्टी करतात.१
____________________
(१) कुरआनात सांगितलेल्या सत्याचे अवलोकन प्रत्येक कालखंडात केले जाऊ शकते अन्य एका ठिकाणी अल्लाहने फर्माविले, ‘’तुमच्या मर्जीनंतरही अधिकांश लोक ईमान राखणार नाहीत.’’ (सूरह यूसुफ-१०३) तात्पर्य, सत्य आणि सचोटीच्या मार्गावर चालणारे नेहमी फार थोडे असतात ज्यावरून हेही सिद्ध होते की सत्याचा आधार प्रमाण व पुरावा आहे. लोकांची कमी अधिक संख्या नव्हे. ज्या गोष्टीला जास्तीत जास्त लोकांनी मानले ती सत्य असावी असे नाही आणि कमी लोक सत्यनिष्ठ नाहीत असेही नाही, किंबहुना कुरआनाद्वआरे या सत्याच्या आधारावर शक्य आहे की सत्यनिष्ठ संख्येने कमी असतात आणि खोटे लोक जास्त. ज्याची पुष्टी हदीसद्वारे होते. पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले, माझे अनुयायी ७३ गटांमध्ये विभागले जातील, ज्यापैकी फक्त एक गट जन्नतमध्ये जाईल, बाकी सर्व जहन्नममध्ये जातील आणि जन्नतमध्ये जाणाऱ्या गटाची लक्षणे सांगितली की जो माझ्या आणि माझ्या सहाबांच्या मार्गावर चालणारा असेल. (अबु दाऊद- किताबुस सुन्नः, प्रकरण शरह अस सुन्नः नं. ४५९६, तिर्मिजी- किताबुल ईमान, प्रकरण माजाअ फी श्फ्तराक हाजेहिल उम्मः)
११७. निःसंशय तुमचा पालनकर्ता त्यांना चांगल्या प्रकारे जाणतो, जे त्याच्या मार्गापासून विचलित होतात आणि तो त्यांनाही चांगल्या प्रकारे जाणतो जे त्याच्या मार्गावर चालतात.
११८. तर ज्या (जनावरा) वर अल्लाहचे नाव घेतले जाईल, त्यातून खा, जर तुम्ही त्याच्या (अल्लाहच्या) हुकूमावर ईमान राखत असाल.
११९. आणि तुमच्यासाठी कोणती गोष्ट याचे कारण असावी की तुम्ही अशा जनावरांमधून न खावे, ज्यावर अल्लाहचे नाव घेतले गेले असेल जरी अल्लाहने त्या सर्व जनावरांचा तपशील सांगितला आहे. ज्यांना तुमच्यासाठी हराम केले गेले आहे, परंतु तेदेखील जेव्हा तुम्हाला सक्त गरज भासल्यास (वैध आहे) आणि हे निश्चित आहे की बहुतेक लोक आपल्या चुकीच्या इराद्यांवर, कसल्याही प्रमाणाविना भटकतात. निःसंशय अल्लाह अतिरेक करणाऱ्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो.
१२०. तुम्ही उघड आणि लपलेले असे सर्व अपराध सोडून द्या. निःसंशय जे लोक गुन्हा कमवितात, त्यांना त्यांच्या दुष्कर्मांचा मोबदला लवकरच दिला जाईल.
१२१. आणि ते खाऊ नका, ज्या जनावरावर जिबह करतेवेळी अल्लाहचे नाव घेतले गेले नसेल आणि हे दुष्कृत्य आहे आणि सैतान आपल्या मित्रांच्या मनात अशा गोष्टी भरवितात की त्यांनी तुमच्याशी भांडण करावे जर तुम्ही त्यांचे म्हणणे मानले तर खचितच तुम्ही शिर्क करणारे व्हाल.
१२२. आणि असा मनुष्य, जो पूर्वी मेलेला होता, मग आम्ही त्याला जिवंत केले आणि त्याच्यासाठी दिव्य प्रकाश बनविला, ज्याद्वारे तो लोकांमध्ये चालतो, काय त्या माणसासारखा असू शकतो, जो अंधारात असावा, आणि त्यातून बाहेर पडू शकत नसावा? अशाच अधर्मी लोकांकरिता त्यांचे आचरण सुशोभित बनविले गेले आहे.
१२३. आणि अशा प्रकारे आम्ही प्रत्येक वस्तीच्या मोठ्या अपराध्यांना कट-कारस्थान रचण्यासाठी बनविले यासाठी की त्यांनी वस्तीत कारस्थान रचावे आणि ते आपल्याच विरूद्ध कारस्थान रचतात मात्र त्यांना ते कळून येत नाही.
१२४. आणि जेव्हा त्यांच्याजवळ एखादी आयत येते तेव्हा म्हणतात की आम्ही कधीही विश्वास ठेवणार नाहीत जोपर्यंत आम्हालाही तशीच आयत दिली जात नाही, जी अल्लाहच्या पैगंबरांना दिली गेली. अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो की त्याने आपली पैगंबरी (रिसालत) कोणत्या ठिकाणी राखावी. लवकरच ज्यांनी अपराध केले आहेत, त्यांना अल्लाहच्या ठिकाणी अपमानित व्हायचे आहे आणि जे कट-कारस्थान ते करीत राहिले, त्याचा मोबदला फार मोठा अज़ाब आहे.
१२५. ज्याला अल्लाह सरळ मार्ग दाखवू इच्छितो त्याची छाती (हृदय) इस्लाम (धर्मा) करिता खुली करतो आणि ज्याला मार्गभ्रष्ट करू इच्छितो, त्याची छाती आणखी जास्त संकुचित करतो, जणू काही तो आकाशात चढत आहे. अशा प्रकारे अल्लाह त्यांना घाणीत टाकतो जे ईमान राखत नाही.
१२६. हा तुमच्या पालनकर्त्याचा सरळ मार्ग आहे आम्ही आयतींचे सविस्तर वर्णन त्या जनसमूहाकरिता दिले आहे, जे बोध प्राप्त करतात.
१२७. यांच्याचसाठी त्यांच्या पालनकर्त्याच्या ठिकाणी सलामतीचे घर आहे आणि तोच त्यांच्या सत्कर्मांच्या आधारावर त्यांचा मित्र आहे.
१२८. आणि ज्या दिवशी अल्लाह या सर्वांना एकत्र करील (आणि फर्माविल) हे जिन्न-समूह! तुम्ही मानवांपैकी बहुतेकांना आत्मसात केले आणि मानवांपैकी त्यांचे मित्र म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला आपसात लाभ पोहचव आणि आम्ही तुझ्या निर्धारीत वेळेस, जी तू आमच्यासाठी निश्चित केली, जाऊन पोहोचलो. (अल्लाह) फर्माविल, की तुमची जागा जहन्नममध्ये आहे, ज्यात तुम्ही सदैव राहाल, परंतु अल्लाह इच्छिल, निःसंशय तुमचा पालनकर्ता हिकमतशाली, ज्ञानी आहे.
१२९. अशाच प्रकारे आम्ही अत्याचारी लोकांना त्यांच्या दुष्कृत्यांपायी एकमेकांचे दोस्त बनवितो.
१३०. हे जिन्न आणि मानवांच्या समूहांनो! काय तुमच्याजवळ तुमच्यामधून रसूल (पैगंबर) नाही आलेत? जे तुमच्यासमोर आमच्या आयती वाचून ऐकवित होते आणि तुम्हाला या (कयामतच्या) दिवसाचा सामना करण्याबाबत सचेत करीत राहिले. ते म्हणतील, आम्ही स्वतःविरूद्ध साक्षी आहोत आणि ऐहिक जीवनाने त्यांना धोक्यात ठेवले आणि ते स्वतःविरूद्धच साक्ष देतील की ते काफिर (इन्कारी) होते.
१३१. (पैगंबर पाठविले गेले) कारण तुमचा पालनकर्ता एखाद्या वस्तीच्या लोकांना एखाद्या अत्याचारापायी नष्ट करीत नाही, जेव्हा तेथील रहिवाशी गाफील असावेत.
१३२. आणि प्रत्येकासाठी त्याच्या कर्मानुसार अनेक दर्जे आहेत आणि तुमचा पालनकर्ता या कर्मांशी गाफील नाही जी ते करीत आहेत.
१३३. आणि तुमचा पालनकर्ता निःस्पृह दया करणारा आहे. जर त्याने इच्छिले तर तुमचा सर्वनाश करून टाकील आणि तुमच्यानंतर ज्याला इच्छिल तुमच्या जागी आणून ठेवील, जसे तुम्हाला अन्य एका जनसमूहाच्या वंशात निर्माण केले.
१३४. ज्या गोष्टीचा तुम्हाला वायदा दिला जात आहे, ती निःसंशय घडून येणार आहे आणि तुम्ही विवश करू शकत नाही.
१३५. तुम्ही सांगा, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही आपल्या ठिकाणी आपले कर्म करीत राहा, मीदेखील (आपल्या जागी) कर्म करीत आहे. तुम्हाला लवकरच माहीत पडेल की कोणाचा शेवट या जगानंतर (चांगला) होतो. निःसंशय अत्याचार करणारे कधीही सफल होणार नाहीत.
१३६. आणि अल्लाहने जी शेती आणि जनावरे निर्माण केलीत, त्यांनी त्यांच्यातून काही भाग अल्लाहचा ठरविला आणि आपल्या कल्पनेनुसार म्हणाले की हा हिस्सा अल्लाहचा आहे, आणि हा आमच्या उपास्य-देवतांचा, मग जो आमच्या दैवतांचा (हिस्सा) आहे, तो अल्लाहपर्यंत पोहचत नाही, मात्र जो अल्लाहचा आहे तो त्यांच्या दैवतांपर्यंत पोहोचतो. किती वाईट फैसला ते करतात!
१३७. आणि अशा प्रकारे बहुतेक अनेकेश्वरवाद्यांकरिता त्यांच्या दैवतांनी त्यांना बरबाद करण्यासाठी आणि त्यांच्यावर त्यांचा धर्म संशयास्पद बनविण्यासाठी, त्यांच्या संततीच्या हत्येला सुशोभित बनविले आहे आणि अल्लाहने इच्छिले असते तर त्यांनी असे केले नसते तेव्हा तुम्ही त्यांना आणि त्यांच्या मनाने रचलेल्या गोष्टीला सोडून द्या.
१३८. आणि ते म्हणाले, ही जनावरे आणि शेती हराम आहे, याला तोच खाईल, ज्याला आम्ही आपल्या इच्छेने खायला सांगू आणि काही जनावरांची पाठ (अर्थात स्वार होणे) हराम आहे आणि काही जनावरांवर (जिबह करतेवेळी) अल्लाहचे नाव घेत नाही, अल्लाहवर खोटे रचण्याकरिता अल्लाह त्यांना त्यांच्या आरोपाचा मोबदला लवकरच देईल.
१३९. आणि ते म्हणाले, या जनावरांच्या गर्भात जे आहे ते विशेषतः आमच्या पुरुषांकरिता आहे आणि आमच्या बायकांवर हराम आहे, मात्र जर ते मृत असेल तर त्यात सर्वांचा हिस्सा आहे. तो (अल्लाह) त्यांच्या या कथनाचा मोबदला लवकरच देईल. निःसंशय तो हिकमतशाली, जाणणारा आहे.
१४०. मोठ्या नुकसानात राहिले ते ज्यांनी ज्ञानाविना मूर्खपणाने आपल्या संततीची हत्या केली आणि अल्लाहने जी रोजी (आजीविका) प्रदान केली तिला हराम ठरवून घेतले अल्लाहवर खोटे रचण्यापायी, ते मार्गभ्रष्ट झाले आणि सन्मार्गावर राहिले नाहीत.
१४१. तोच (अल्लाह) आहे, ज्याने वेलींच्या आणि विनावेलींच्या बागा निर्माण केल्या, आणि खजूर व शेती ज्यांचा स्वाद अनेक प्रकारचा आहे, आणि जैतून व डाळिंबे एक प्रकारची, अनेकविध (अनेकप्रकारची). जेव्हा त्यांना फळे येतील तेव्हा तुम्ही ती खा आणि त्याच्या कापणीच्या दिवशी त्याचा हक्क जरूर अदा करा आणि उधळपट्टीने खर्च करू नका. निःसंशय, अल्लाह उधळपट्टी करणाऱ्यांशी प्रेम राखत नाही.
१४२. आणि जनावरांमध्ये काही ओझे लादण्यायोग्य आणि काही जमिनीला लागून असलेले बनविले. खा, जे तुम्हाला अल्लाहने प्रदान केले आहे, आणि सैतानाच्या पद-चिन्हांचे अन्‌ुसरण करू नका. निःसंशय, तो तुमचा उघड शत्रू आहे.
१४३. आठ प्रकारचे जोडे (बनविले) मेंढीच्या जातीचे दोन, बकरीच्या जातीचे दोन. तुम्ही सांगा की अल्लाहने दोघांच्या नराला हराम केले आहे किंवा दोघांच्या मादीला? किंवा त्याला जो दोन्ही माद्यांच्या गर्भाशयात आहे मला ज्ञानासह सांगा, जर सच्चे असाल.
१४४. आणि उंटामध्ये दोन आणि गायीच्या जातीत दोन. तुम्ही सांगा, काय अल्लाहने दोन्ही माद्यांना किंवा दोन्ही नरांना हराम केले आहे? किंवा त्याला, जो दोन्ही माद्यांच्या गर्भाशयात सामील असेल. काय तुम्ही त्या वेळी हजर होते, जेव्हा अल्लाहने याचा आदेश दिला? मग त्याहून मोठा अत्याचारी कोण असेल, जो अल्लाहवर खोटा आरोप ठेवील, यासाठी की कसल्याही ज्ञानाविना लोकांना मार्गभ्रष्ट करावे. निःसंशय, अल्लाह अत्याचारी लोकांना मार्ग दाखवित नाही.
१४५. तुम्ही सांगा, मला जो आदेश दिला गेला आहे, त्यात कोणा खाणाऱ्याकरिता कोणतेही खाद्य हराम आढळत नाही. परंतु हे की ते मेलेले असेल, किंवा वाहते रक्त, किंवा डुकराचे मांस, यासाठी की ते अगदी नापाक (अस्वच्छ-अशुद्ध) आहे किंवा जे शिर्कचे कारण असेल, ज्यावर अल्लाहशिवाय दुसऱ्यांचे नाव घेतले गेले असेल, मग जो कोणी लाचार असेल वास्तविक विद्रोही आणि मर्यादेचे उल्लंघन करणारा नसेल तर अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.
१४६. आणि आम्ही यहूदी लोकांवर नखे असलेली जनावरे हराम केली आणि गाय व बकरीची चरबी त्यांच्यावर हराम केली, मात्र जी दोघांच्या पाठीवर आणि आतड्यात असेल किंवा जी एखाद्या हाडाशी लागून असेल. आम्ही हा त्यांच्या (धर्माशी) विद्रोहाचा मोबदला दिला आणि आम्ही सच्चे आहोत.
१४७. जर तो तुम्हाला खोटे ठरविल तर सांगा की तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) ची दया अतिशय विस्तृत आहे आणि त्याचा अज़ाब (शिक्षा-यातना) अपराधी लोकांवरून टळू शकत नाही.
१४८. अनेक ईश्वरांची उपासना करणारे म्हणतील, अल्लाहने इच्छिले असते तर आम्ही आणि आमच्या वाड-वडिलांनी, अल्लाहसोबत दुसऱ्यांना उपास्य मानले नसते, ना एखाद्या वस्तूला हराम ठरविले असते अशा प्रकारे यांच्या पूर्वीच्या लोकांनी खोटे ठरविले, येथपर्यंत की आमच्या अज़ाबचा स्वाद चाखून घेतला. त्यांना सांगा, काय तुमच्याजवळ एखादे ज्ञान आहे तर ते आमच्यासाठी बाहेर काढा (जाहीर करा) तुम्ही अटकळीवर चालता आणि फक्त अनुमान लावता.
१४९. तुम्ही सांगा, मग अल्लाहचेच प्रमाण प्रभावशाली आहे, यास्तव त्याने जर इच्छिले तर तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करू शकतो.
१५०. तुम्ही सांगा, आपल्या त्या साक्ष देणाऱ्यांना आणा, ज्यांनी ही साक्ष द्यावी की अल्लाहने याला हरामे केले आहे, मग जर ते साक्ष देतील तर तुम्ही त्यांच्यासोबत साक्ष देऊ नका आणि त्यांच्या मनमानी इच्छा-आकांक्षांचे अनुसरण करू नका आणि ज्यांनी आमच्या आयतींना खोटे ठरविले आणि जे आखिरतवर ईमान राखत नाही आणि (इतरांना)आपल्या पालनकर्त्यासमान मानतात.
१५१. तुम्ही सांगा की, या, मी वाचून ऐकवू की तुम्हाला तुमच्या पालनकर्त्याने कशापासून मनाई केली आहे. ते हे की त्याच्यासोबत कोणत्याही चीज-वस्तूला सहभागी करू नका आणि माता पित्याशी नेक वर्तन करा आणि आपल्या संततीची गरीबीमुळे हत्या करू नका. आम्ही तुम्हाला आणि त्यांना रोजी (आजिविका) प्रदान करतो आणि खुल्या व छुप्या निर्लज्जतेच्या जवळ जाऊ नका आणि त्या जीवाला ज्याबाबत अल्लाहने मनाई केली आहे, ठार मारू नका, परंतु धर्मशास्त्रीय (शरीअतच्या) कारणाने. तुम्हाला त्याने याचाच आदेश दिला आहे, यासाठी की तुम्ही समजून घ्यावे.
१५२. आणि अनाथाच्या संपत्तीच्या जवळही जाऊ नका, तथापि खूप चांगल्या पद्धतीने, येथेपर्यंत की ते तारुण्यावस्थेस पोहोचावेत, आणि न्यायासह माप-तोल पूर्ण करा. आम्ही कोणावर त्याच्या कुवतीपेक्षा जास्त भार ठेवत नाही आणि जेव्हा बोलाल, तेव्हा न्याय करा, मग तो जवळचा नातेवाईक का असेना आणि अल्लाहशी केलेला वायदा पूर्ण करा. त्याने तुम्हा लोकांना याचाच आदेश दिला आहे यासाठी की तुम्ही स्मरण राखावे.
१५३. आणि हाच माझा सरळ मार्ग आहे यास्तव त्यावरच चाला आणि इतर मार्गांवर चालू नका, अन्यथा तुम्हाला त्याच्या मार्गपासून दूर करतील त्याने (अल्लाहने) याचाच आदेश दिला आहे यासाठी की तुम्ही सुरक्षित राहावे.
१५४. आणि आम्ही (पैगंबर) मूसा यांना ग्रंथ प्रदान केला, त्याच्यावर आपली कृपा देणगी (नेमत) पूर्ण करण्यासाठी, ज्याने सत्कर्मे केलीत आणि प्रत्येक गोष्टीचा तपशील आणि मार्गदर्शन आणि दया कृपाकरिता, यासाठी की त्यांनी आपल्या पालनकर्त्याशी भेट होण्यावर ईमान राखावे.
१५५. आणि हा (पवित्र कुरआन) एक शुभ ग्रंथ आहे, जो आम्ही अवतरित केला, यास्तव तुम्ही याचे अनुसरण करा, यासाठी की तुमच्यावर दया केली जावी.
१५६. यासाठी की असे न म्हणावे की आमच्या पूर्वी दोन जनसमूहांवर ग्रंथ (तौरात आणि इंजील) अवतरित केले गेले आणि आम्ही त्यांच्या शिकवणीपासून अनभिज्ञ राहिलो.
१५७. किंवा तुम्ही असे न म्हणावे की जर आमच्यावर ग्रंथ अवतरित झाला असता तर आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक सत्य मार्गावर राहिलो असतो. तेव्हा तुमच्याजवळ तुमच्या पालनकर्त्यातर्फे स्पष्ट प्रमाण आणि मार्गदर्शन व दया येऊन पोहोचली आहे. मग त्याहून जास्त अत्याचारी कोण आहे, ज्याने अल्लाहच्या आयतींना खोटे ठरविले आणि त्यांच्याकडून तोंड फिरविले आम्ही लवकरच अशा लोकांना मोठा सक्त अज़ाब देऊ जे आमच्या आयतींकडून तोंड फिरवितात.
१५८. ते फरिश्त्यांच्या आगमनाची प्रतिक्षा करीत आहेत की आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या आगमनाची की तुमच्या पालनकर्त्याच्या एखाद्या निशाणीच्या आगमनाची? ज्या दिवशी तुमच्या पालनकर्त्यातर्फे निशाणी येईल, तेव्हा कोणत्याही माणसाला त्याचे ईमान कामी पडणार नाही, ज्याने यापूर्वी ईमान राखले नसेल किंवा आपल्या ईमानाने एखादे सत्कर्म केले नसेल. तुम्ही सांगा, तुम्ही प्रतिक्षा करा, आम्ही (देखील) प्रतिक्षा करीत आहोत.
१५९. निःसंशय, ज्यांनी आपल्या धर्माला वेगवेगळे करून घेतले आणि अनेक धार्मिक पंथ-संप्रदाय बनले, त्यांच्याशी तुमचे कसलेही नाते नाही, त्याचा फैसला अल्लाहजवळ आहे, मग तो त्यांना त्याबाबत सांगेल की ते कसकसे कर्म करीत राहिले.
१६०. जो मनुष्य सत्कर्म करील तर त्याला त्याच्या दहा पट (मोबदला) मिळेल आणि जो दुष्कर्म करील तर त्याला त्याच्याइतकीच सजा मिळेल आणि त्या लोकांवर किंचितही अत्याचार होणार नाही.
१६१. तुम्ही सांगा, मला माझ्या पालनकर्त्याने एक सरळ मार्ग दाखविला आहे की तो एक मजबूत व कायम राहणारा दीन (धर्म) आहे जो मार्ग आहे इब्राहीमचा जे अल्लाहकडे एकचित्त होते आणि ते अनेकेश्वरवाद्यांपैकी नव्हते.
१६२. तुम्ही सांगा, निःसंशय माझी नमाज, माझी सर्व उपासना, माझे जीवन, आणि मृत्यु, समस्त विश्वाच्या अल्लाहकरिता आहे.
१६३. त्याचा (अल्लाहचा) कोणीही सहभागी नाही. मला याचाच आदेश दिला गेला आहे आणि मी सर्वांत प्रथम ईमान राखणारा आहे.
१६४. तुम्ही सांगा, काय मी अल्लाहखेरीज दुसऱ्या पालनकर्त्याचा शोध घेऊ वास्तविक तोच प्रत्येक चीज वस्तूचा स्वामी (उपास्य) आहे आणि जो कोणी, जे काही कमवील, ते त्यालाच भोगावे लागेल आणि कोणीही कोणा दुसऱ्यांचे ओझे उचलणार नाही, मग तुम्हाला तुमच्या पालनकर्त्याकडे दुसऱ्यांदा जायचे आहे. तो तुम्हाला तुमच्या मतभेदांविषयी सांगेल.
१६५. आणि त्यानेच तुम्हाला धरतीत खलीफा बनविले आणि एकमेकांवर दर्जे प्रदान केले, यासाठी की जे काही तुम्हाला प्रदान केले, त्यात तुमची कसोटी घ्यावी. निःसंशय, तुमचा पालनकर्ता लवकरच अज़ाब (शिक्षा-यातना) देणार आहे आणि निःसंशय तो मोठा माफ करणारा आहे, दया करणारा आहे.
Icon