ترجمة سورة يوسف

الترجمة الماراتية
ترجمة معاني سورة يوسف باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. अलिफ. लाम. रॉ या स्पष्ट ग्रंथाच्या आयती आहेत.
२. निःसंशय, आम्ही हे अरबी कुरआन अवतरीत केले आहे, यासाठी की तुम्ही समजू शकावे.
३. आम्ही तुमच्यासमोर सर्वांत उत्तम निवेदन प्रस्तुत करतो, या कारणास्तव की आम्ही आपल्याकडे हा कुरआन वहयी (अवतरित संदेशा) द्वारे उतरविला आहे आणि निःसंशय याच्यापूर्वी तुम्ही न जाणणाऱ्यांपैकी होते.१
____________________
(१) पवित्र कुरआनच्या या शब्दांद्वारेही स्पष्ट होते की पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना अपरोक्ष (गैबचे) ज्ञान नव्हते, अन्यथा अल्लाहने त्यांना न जाणणारे म्हटले नसते. दुसरे हे की पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहचे सच्चे पैगंबर आहेत. कारण त्यांच्यावर वहयीद्वारेच या सत्य घटनेला सांगितले गेले आहे. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ना कोणाचे शिष्य होते की गुरूपासून शिकून सांगितले होते आणि ना कोणा दुसऱ्याशी असे नाते होते की ज्याच्यापासून ऐकून इतिहासाची ही घटना तिच्या खास अहवालासह पैगंबरांनी प्रसारित केली असती. तेव्हा यात मुळीच शंका नाही की हे सर्वश्रेष्ठ अल्लाहने वहयीच्या माध्यमाने पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर अवतरित केले आहे, जसे या ठिकाणी स्पष्ट केले गेले आहे.
४. जेव्हा यूसुफ आपल्या पित्यास म्हणाले, हे पिता! मी अकरा ताऱ्यांना आणि सूर्य-चंद्राला पाहिले की ते सर्व मला सजदा करीत आहेत.
५. (याकूब) म्हणाले, हे माझ्या प्रिय पुत्रा! आपल्या या स्वप्नाची चर्चा आपल्या भावांजवळ करू नकोस, असे न व्हावे की त्यांनी तुझ्याशी काही कपट करावे. सैतान तर मानवाचा उघड शत्रू आहे.
६. आणि अशा प्रकारे तुमचा पालनकर्ता तुमची निवड करेल आणि तुम्हाला घटना व मामल्याचा खुलासा (अर्थात स्वप्नफल) सांगण्याची शिकवण देईल आणि आपली कृपा-देणगी तुम्हाला पूर्णतः प्रदान करील, आणि याकूबच्या परिवारालाही, जशी त्याने यापूर्वी तुमच्या दोन पूर्वजांना अर्थात इब्राहीम आणि इसहाकलाही भरपूर कृपा-देणगी प्रदान केली. निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा ज्ञान बाळगणारा आणि हिकमतशाही आहे.
७. निःसंशय, यूसुफ आणि त्याच्या भावांमध्ये विचारणाऱ्यांकरिता मोठ्या निशाण्या आहेत.
८. जेव्हा यूसुफचे भाऊ म्हणाले, यूसुफ आणि त्याचा भाऊ आमच्या पित्याला आमच्यापेक्षा जास्त प्रिय आहेत, वास्तविक आम्ही लोक एक शक्तिशाली जमात आहोत. निश्चितच आमचे पिता स्पष्ट चूक करीत आहेत.
९. यूसुफची हत्या करून टाका किंवा त्याला एखाद्या (अज्ञात) स्थळी पोहचवा, यासाठी की तुमच्या पित्याचे ध्यान तुमच्याकडे व्हावे. त्यानंतर तुम्ही नेक सदाचारी व्हा.
१०. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, यूसुफची हत्या करू नका, किंबहुना त्याला एखाद्या ओसाड विहिरीच्या तळाशी टाकून द्या, यासाठी की त्याला एखाद्या प्रवाशी काफिल्याने उचलून न्यावे. जर तुम्हाला काही करायचेच आहे तर असेच करा.
११. ते म्हणाले, हे पिता! शेवटी तुम्ही यूसुफच्या बाबतीत आमच्यावर विश्वास का नाही ठेवत, आम्ही तर त्याचे हितचिंतक आहोत.
१२. उद्या तुम्ही त्याला अवश्य आमच्यासोबत पाठवा, यासाठी की त्याने खूप खावे प्यावे आणि खेळावे. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो.
१३. (याकूब) म्हणाले, तुमचे त्याला घेऊन जाणे माझ्यासाठी फार दुःखदायक ठरेल. मला हे भयदेखील लागून राहील की तुमच्या गाफीलपणामुळे त्याला लांडगा खाऊन टाकील.
१४. त्यांनी उत्तर दिले, आमच्यासारख्या मोठ्या शक्तिशाली समूहाच्या उपस्थितीत जर त्याला लांडगा खाऊन टाकील तर आम्ही अगदी निकामी ठरू.
१५. मग जेव्हा त्याला घेऊन निघाले आणि सर्वांनी मिळून दृढनिश्चय केला की त्याला ओसाड व खूप खोल अशा विहिरीच्या तळाशी फेकून द्यावे. आम्ही यूसुफकडे वहयी (ईशसंदेश) पाठविली की निःसंशय (आता ती वेळ येत आहे) की तुम्ही त्यांना या गोष्टीची खबर अशा स्थितीत सांगाल की ते जाणतही नसतील.
१६. आणि रात्री (इशा) च्या वेळेस (ते सर्व) आपल्या पित्याजवळ रडत रडत पोहोचले.
१७. आणि म्हणू लागले की प्रिय पिता! आम्ही आपसात धावण्याच्या शर्यतीत लागलो, आणि यूसुफला आमच्या सामानाजवळ सोडले तेव्हा लांडग्याने त्याला खाऊन टाकले. तुम्ही तर आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही, मग आम्ही पुरेपूर सच्चे असलो तरी.
१८. आणि यूसुफचा सदरा खोट्या रक्ताने भिजवून आणला. (पिता) म्हणाले, (असे नाही घडले) किंबहुना तुम्ही आपल्या मनाने एक गोष्ट रचली आहे, आता सबुरी करणेच उत्तम आहे आणि तुमच्या मनगढत गोष्टींवर अल्लाहशीच मदतीची प्रार्थना (दुआ) आहे.
१९. आणि एक प्रवासी काफिला आला आणि त्यांनी आपल्या पाणी आणणाऱ्याला पाठविले, त्याने आपला डोल (बादली) विहीरीत टाकला, उद्‌गारला, वाहवा! काय आनंदाची गोष्ट आहे! हा तर एक बालक आहे. त्यांनी त्याला व्यापार-सामुग्री समजून लपविले आणि जे काही ते करीत होते, अल्लाह चांगले जाणून होता.
२०. आणि त्यांनी त्याला फारच थोड्या किंमतीत (अर्थात) काही मोजक्या दिरमांवर विकून टाकले. ते तर यूसुफच्या बाबतीत अधिक रुचिहीन होते.
२१. आणि मिस्र देशाच्या लोकांपैकी, ज्याने त्याला खरेदी केले होते, तो आपल्या पत्नीस म्हणाला की याला आदर-सन्मानपूर्वक ठेवा. संभवतः हा आम्हाला लाभ पोहचवील किंवा आम्ही याला आपला पुत्रच बनवून घेऊ. अशा प्रकारे आम्ही (मिस्रच्या) धरतीवर यूसुफचे पाय स्थिर केले, यासाठी की आम्ही त्याला स्वप्नाचा खुलासा सांगण्याचे काही ज्ञान शिकवावे अल्लाह आपल्या इराद्याला पूर्ण करण्याचे सामर्थ्य राखतो, परंतु अधिकांश लोक अनभिज्ञ असतात.
२२. आणि जेव्हा (यूसुफ) पूर्ण तारुण्यावस्थेस पोहोचले, आम्ही त्यांना फैसला करण्याचे सामर्थ्य आणि ज्ञान प्रदान केले, आम्ही भलाई करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला देतो.
२३. आणि त्या स्त्रीने, जिच्या घरी यूसुफ होते, यूसुफला फुसलावणे सुरू केले, जेणेकरून त्याने आपल्या मनावर ताबा ठेवणे सोडून द्यावे आणि दार बंद करून ती म्हणू लागली, या (जवळ) या. (यूसुफ) म्हणाले, अल्लाह रक्षण करो! तो माझा पालनकर्ता आहे. त्याने मला खूप चांगल्या प्रकारे ठेवले आहे. निश्चितच अन्याय करणाऱ्यांचे कदापि भले होत नाही.
२४. आणि त्या स्त्रीने यूसुफची इच्छा धरली आणि यूसुफनेही तिची इच्छा धरली असती जर त्यांनी आपल्या पालनकर्त्याचे प्रमाण पाहून घेतले नसते. असेच घडले, यासाठी की आम्ही यूसुफपासून दुष्कर्म आणि निर्लज्जता दूर करावी. निःसंशय ते आमच्या निवडक दासांपैकी होते.
२५. आणि दोघेजण दाराकडे धावले. त्या स्त्रीने यूसुफचे वस्त्र (सदरा) मागच्या बाजूने ओढून फाडले आणि त्या स्त्रीचा पती दोघांना दाराशीच मिळाला, तेव्हा ती म्हणू लागली की जो मनुष्य तुमच्या पत्नीशी वाईट इच्छा धरेल, त्याची शिक्षा हीच आहे की त्याला कैदी बनविले जावे किंवा दुसरी एखादी कठोर शिक्षा दिली जावी.
२६. (यूसुफ) म्हणाले, ही स्त्रीच मला फूस लावून (माझ्या मनोकामनाच्या रक्षणात बेपर्वा करू) इच्छित होती आणि स्त्रीच्या समाजाच्या एका माणसाने साक्ष दिली की जर त्याचा सदरा पुढच्या बाजूने फाटला असेल तर स्त्री (आपल्या कथनात) खरी आहे आणि यूसुफ खोटे बोलणाऱ्यांपैकी आहे.
२७. आणि जर त्याचा सदरा मागच्या बाजूने फाडला गेला आहे, तर स्त्री खोटी आहे आणि यूसुफ खऱ्यांपैकी आहे.
२८. तर पतीने जेव्हा पाहिले की सदरा मागच्या बाजूने फाटला आहे, तेव्हा स्पष्ट सांगितले की ही तर तुम्हा स्त्रियांची चाल आहे. निःसंशय तुमचे डावपेच मोठे भारी आहेत.
२९. यूसुफ, आता या गोष्टीला दृष्टीआड करा आणि (हे स्त्री!) आपल्या अपराधांची क्षमा माग. निःसंशय तू अपराध्यांपैकी आहेस.
३०. आणि मग शहरातल्या स्त्रियांमध्ये चर्चा होऊ लागली की अजीजची पत्नी आपल्या (तरुण) गुलामाला आपली गरज पूर्ण करण्यासाठी बहकविण्यात व फुसलाविण्यात लागलेली असते. तिच्या मनात यूसुफचे प्रेम (ठाण मांडून) बसले आहे. आमच्या मते तर ती उघड चूक करीत आहे.
३१. तिने जेव्हा त्यांची ही कुत्सित निंदा ऐकली, तेव्हा त्यांना (भोजनासाठी) आमंत्रित केले आणि त्यांच्यासाठी एका सभेचा इतमामही केला आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला एक एक चाकू दिला आणि म्हणाली, हे यूसुफ! यांच्या समोर या. त्या स्त्रियांनी जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा खूप मोठे जाणले आणि (नकळत) आपले हात कापून घेतले आणि त्या उद्‌गारल्या, पाकी (पवित्रता) अल्लाहकरिता आहे. ऱ मनुष्य कदापि नाही. हा तर खात्रीने कोणी फार मोठा फरिश्ता आहे.
३२. (त्या वेळी मिस्रच्या अजीजची पत्नी) म्हणाली, हाच तो, ज्याच्याविषयी तुम्ही मला बरे-वाईट बोलत होत्या. मी सर्व प्रकारे याच्याकडून आपली इच्छा पूर्ण करू इच्छिले, परंतु हा निष्कलंक राहिला आणि जे काही मी याला सांगत आहे, जर ते हा करणार नाही तर निश्चितच याला कैदी बनविले जाईल आणि खात्रीने हा मोठा अपमानित होईल.
३३. यूसुफ म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! ज्या गोष्टीकडे या स्त्रिया मला बोलावित आहेत, त्यापेक्षा कारागृह मला जास्त प्रिय आहे. जर तू यांचे कपट (मोहजाल) माझ्यापासून दूर केले नाहीस तर मी यांच्याकडे आकर्षित होईन आणि अगदी मूर्खांमध्ये सामील होईन.
३४. त्यांच्या पालनकर्त्याने त्यांची दुआ (प्रार्थना) स्वीकारली आणि त्या स्त्रियांच्या कपटापासून यूसुफला वाचविले. निःसंशय तो ऐकणारा आणि जाणणारा आहे.
३५. मग त्या सर्व निशाण्यांना पाहून घेतल्यावर त्यांना हेच भले वाटले की यूसुफला काही काळ कारागृहात ठेवावे.
३६. आणि त्यांच्यासोबत इतर दोन तरुण कारागृहात आले. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, मी स्वप्नात स्वतःला दारु गाळताना पाहिले आहे, आणि दुसरा म्हणाला, मी स्वप्नात काय पाहतो की मी आपल्या डोक्यावर भाकरी ठेवल्या आहेत, ज्यांना पक्षी खात आहेत. तुम्ही याचा अर्थ (खुलासा) आम्हाला सांगावा. आम्हाला तर तुम्ही गुणवान दिसता.
३७. (यूसुफ) म्हणाले, तुम्हाला जे भोजन दिले जाते, ते तुमच्याजवळ पोहचण्यापूर्वीच मी तुम्हाला त्याचा खुलासा सांगेने, हे सर्व काही त्या ज्ञानामुळे आहे जे मला माझ्या पालनकर्त्याने शिकविले आहे. मी त्या लोकांचा दीन (धर्म) सोडला आहे, जे अल्लाहवर ईमान राखत नाही आणि आखिरतलाही मान्य करीत नाही.
३८. मी आपल्या पित्या आणि पूर्वजांच्या (धर्मा) चा अनुयायी आहे. अर्थात इसहाक आणि याकूब (च्या दीन) चा. आम्हाला हे कधीही मान्य नाही की आम्ही अल्लाहसोबत अन्य एखाद्याला सहभागी ठरवावे. आमच्यावर आणि इतर सर्व लोकांवर अल्लाहची ही विशेष कृपा आहे. परंतु अधिकांश लोक कृतघ्न असतात.
३९. हे माझ्या कारागृहातील साथीदारांनो! काय अनेक प्रकारची अनेक उपास्ये चांगली आहेत की एक जबरदस्त शक्तिशाली अल्लाह चांगला?
४०. त्याच्याखेरीज ज्यांची उपासना तुम्ही करीत आहात ते सर्व नावापुरतेच आहेत, ज्यांना तुम्ही आणि तुमच्या पूर्वजांनी मनाने रचून घेतले आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाहने यांचा कोणताही पुरावा अवतरित केला नाही. फैसला देणे अल्लाहचेच काम आहे. त्याचा आदेश आहे की तुम्ही सर्व त्याच्याशिवाय कोणाचीही भक्ती- उपासना करू नका. हाच सत्य धर्म आहे, परंतु अधिकांश लोक जाणत नाहीत.
४१. हे कारागृहातील माझ्या साथीदारांनो! तुम्हा दोघांपैकी एक तर आपल्या स्वामीला मद्य पाजण्यासाठी नियुक्त केला जाईल, परंतु दुसऱ्याला फासावर लटकविले जाईल आणि पक्षी त्याचे डोके टोच मारून मारून खातील. तुम्ही दोघे ज्याविषयी विचारत होते त्याचा फैसला झाला.
४२. आणि ज्याच्याविषयी यूसुफची कल्पना होती की दोघांपैकी ज्याला सुटका मिळेल, त्याला म्हणाले, आपल्या राजाजवळ माझीही चर्चा कर. मग सैतानाने त्याला राजाजवळ बोलण्याचा विसर पाडला आणि यूसुफला अनेक वर्षे कारागृहात राहावे लागले.
४३. आणि राजाने सांगितले, मी स्वप्न पाहिले की सात धष्टपुष्ट गायी आहेत, ज्यांना सात दुबळ्या गायी खात आहेत आणि सात हिरवी कणसे आहेत तर दुसरी सात कणसे अगदी सुकलेली. हे दरबारी लोकांनो! माझ्या या स्वप्नाचा खुलासा सांगा, जर तुम्ही स्वप्नफल सांगू शकत असाल.
४४. दरबारी लोकांनी उत्तर दिले, ही तर विसकटलेल्या (विचारांची) स्वप्ने आहेत आणि अशा प्रकारच्या व्यग्रचित्त स्वप्नांचा खुलासा आम्ही जाणत नाही.
४५. आणि त्या कैद्यांपैकी सुटका झालेल्याला अकस्मात आठवण झाली, आणि तो म्हणू लागला, मी तुम्हाला याचा खुलासा येऊन सांगतो. मला जाण्याची परवानगी द्यावी.
४६. हे यूसुफ! हे अगदी सच्चे यूसुफ! तुम्ही आम्हाला या स्वप्नाचा खुलासा सांगा की सात धष्टपुष्ट गायी आहेत, ज्यांना सात दुबळ्या गायी खात आहेत आणि सात अगदी हिरवी कणसे आहेत आणि दुसरी सात कणसे अगदी सुकलेली आहेत. यासाठी की मी परत जाऊन त्या लोकांना सांगावे की त्या सर्वांनी जाणून घ्यावे.
४७. (यूसुफ यांनी) उत्तर दिले की तुम्ही सतत सात वर्षे सवयीनुसार धान्य पेरा आणि (पीक आल्यावर) त्याची कापणी करून कणसांसमेत राहू द्या. आपल्या खाण्यासाठी थोड्या संख्येशिवाय.
४८. त्यानंतरची सात वर्षे मोठ्या दुष्काळाची येतील ती ते धान्य खाऊन टाकतील जे तुम्ही त्यांच्यासाठी जमा करून ठेवले होते. त्याशिवाय जे थोडेसे तुम्ही रोखून ठेवाल.
४९. मग याच्यानंतर जे वर्ष येईल, त्यात लोकांसाठी खूप पाऊस पडेल आणि त्यात ते (द्राक्षाचा रसदेखील) खूप गाळतील.
५०. आणि राजा म्हणाला, त्याला (यूसुफला) माझ्याजवळ आणा. जेव्हा संदेश पोहचविणारा यूसुफजवळ पोहोचला तेव्हा यूसुफ म्हणाले, आपल्या राजाकडे परत जा आणि त्यांना विचारा की त्या स्त्रियांची खरी कहाणी काय आहे, ज्यांनी आपले हात कापून घेतले होते. त्यांचे कपट चांगल्या प्रकारे जाणणारा माझा पालनकर्ताच आहे.
५१. (राजाने) विचारले, हे स्त्रियांनो! त्या वेळची खरी कहाणी काय आहे, जेव्हा तुम्ही कपट करून यूसुफला त्याच्या मनापासून बहकवू इच्छित होत्या? त्यांनी स्पष्ट उत्तर दिले की (अल्लाह जाणतो) आम्ही यूसुफमध्ये कोणातही वाईट गुण पाहिला नाही, मग तर अजीजची पत्नीही उद्‌गारली, आता तर सत्य उघडकीस आलेच आहे. मीच त्याला बहकविणयाचा प्रयत्न केला होता त्याच्या मनापासून (विचलित करण्याचा) आणि निःसंशय तो खऱ्या लोकांपैकी आहे.
५२. हे या कारणास्तव की (अजीज) ला माहीत व्हावे की मी त्याच्याशी विश्वासघात केला नाही आणि हेही की अल्लाह कपट करणाऱ्यांचा डाव सफल होऊ देत नाही.
५३. आणि मी आपल्या मनाच्या पावित्र्याचे वर्णन करीत नाही, निःसंशय, मन तर वाईट गोष्टीचीच प्रेरणार देणारे आहे, परंतु हे की माझा पालनकर्ताच आपली दया- कृपा करील. निश्चितच माझा पालनकर्ता माफ करणारा, दया करणारा आहे.
५४. आणि बादशहा म्हणाला, त्याला माझ्या समोर आणा की मी त्याला आपल्या व्यक्तिगत कामांकरिता नेमून घ्यावे. मग जेव्हा त्याच्याशी वार्तालाप करू लागला, तेव्हा म्हणाला, तुम्ही आजपासून आमचे येथे सन्मानित आणि विश्वसनीय (अमानतदार) आहात.
५५. (यूसुफ) म्हणाले, तुम्ही मला देशाच्या खजीन्यावर नियुक्त करा. मी संरक्षक आणि जाणकार आहे.
५६. आणि अशा प्रकारे आम्ही यूसुफला देशाचा सूत्रधार बनविले की त्याने वाटेल तिथे राहावे. आम्ही ज्याला इच्छितो, त्याच्यापर्यंत आपली दया- कृपा पोहचवितो, आणि आम्ही सत्कर्म करणाऱ्यांच्या आचरणाचे फळ वाया जाऊ देत नाही.
५७. आणि निःसंशय ईमान राखणाऱ्यांचा आणि दुराचारापासून दूर राहणाऱ्यांचा आखिरतचा मोबदला कितीतरी चांगला आहे.
५८. आणि यूसुफचे भाऊ आले आणि यूसुफजवळ गेले तेव्हा यूसुफने त्यांना ओळखून घेतले, परंतु त्यांनी त्याला ओळखले नाही.
५९. आणि जेव्हा त्यांचे सामान तयार केले गेले तेव्हा यूसुफ म्हणाले, तुम्ही माझ्याजवळ आपल्या त्या भावाला आणा, जो तुमच्या पित्यापासून आहे, काय तुम्ही नाही पाहिले की मी मापही पुरेपूर देतो आणि अतिथीचे चांगल्या प्रकारे आदरातिथ्य करणाऱ्यांपैकी आहे.
६०. परंतु जर तुम्ही त्याला माझ्याजवळ आणले नाही तर माझ्याकडून तुम्हाला कसलेही माप मिळणार नाही, किंबहुना तुम्ही माझ्याजवळही येऊ शकणार नाहीत.
६१. ते म्हणाले, ठीक आहे, आम्ही त्याच्या पित्याशी या संदर्भात गोडीगुलाबीने बोलून पूर्ण प्रयत्न करू.
६२. आणि आपल्या सेवकांना सांगितले की त्यांचा माल (धन) त्यांच्याच पोत्यांमध्ये ठेवून द्या की जेव्हा परतून आपल्या कुटुंबात जातील तेव्हा आपले धन ओळखून घेतील, फार शक्य आहे की ते पुन्हा येतील.
६३. जेव्हा ते लोक परतून आपल्या पित्याजवळ गेले तेव्हा म्हणू लागले, आम्हाला तर धान्य देण्यावर प्रतिबंध घातला गेला. आता तुम्ही आमच्यासोबत भावाला पाठवा की आम्ही माप भरून आणावे. आम्ही त्याच्या रक्षणाची हमी देतो.
६४. (याकूब) म्हणाले, काय मी याच्या बाबतीत तुमच्यावर तसाच विश्वास ठेवू जसा यापूर्वी याच्या भावाबाबत विश्वास ठेवला? सर्वश्रेष्ठ अल्लाहच सर्वांत उत्तम संरक्षक आहे आणि तो समस्त कृपावानांमध्ये जास्त कृपावान आहे.
६५. आणि जेव्हा त्यांनी आपले सामान उघडले तेव्हा त्यात त्यांना आपली रक्कम आढळली, जी त्यांना परत केली गेली होती. म्हणाले, हे पिता! आम्हाला आणखी काय पाहिजे? ही आमची रक्कम आम्हाला परत केली गेली आहे आणि आम्ही आपल्या कुटुंबाकरिता धान्य आणून देऊ आणि आपल्या भावाचे रक्षण करू आणि एक उंटाचे माप जास्त आणू. हे माप तर जास्त सोपे आहे.
६६. (याकूब) म्हणाले, मी तर त्याला तुमच्यासोबत कधीही पाठविणार नाही, जोपर्यंत तुम्ही अल्लाहला मध्यस्थी ठेवून मला वचन द्याल की तुम्ही त्याला माझ्याजवळ पोचवाल, याखेरीज की तुम्ही सर्व कैदी बनविले जाल. जेव्हा त्यांनी पक्के वचन दिले तेव्हा ते म्हणाले की आम्ही जे काही बोलत आहोत, अल्लाह त्याचा संरक्षक आहे.
६७. आणि (याकूब) म्हणाले, हे माझ्या मुलांनो! तुम्ही सर्व एकाच दारातून प्रवेश करू नका, किंबहुना अनेक दारांमधून वेगवेगळे होऊन प्रवेश करा. मी अल्लाहतर्फे आलेल्या कोणत्याही गोष्टीला तुमच्या वरून टाळू शकत नाही. आदेश केवळ अल्लाहचाच चालतो, माझा संपूर्ण विश्वास त्याच्यावरच आहे आणि प्रत्येक भरोसा ठेवणाऱ्याने त्याच्यावरच भरोसा ठेवला पाहिजे.
६८. आणि जेव्हा ते त्याच मार्गांनी, ज्यांचा आदेश त्यांच्या पित्याने दिला होता, गेले, काहीच नव्हते की अल्लाहने जी गोष्ट निश्चित केली आहे, तिच्यापासून ते त्यांना किंचितही वाचवतील. तथापि याकूबच्या मनात एक विचार आला, जो त्याने पूर्ण केला. निःसंशय ते आम्ही शिकविलेल्या त्या ज्ञानाने संपन्न होते, परंतु अधिकांश लोक जाणत नाहीत.
६९. आणि ते सर्व यूसुफजवळ पोहोचले, तेव्हा यूसुफने आपल्या भावाला आपल्याजवळ बसविले आणि म्हटले, मी तुझा भाऊ (यूसुफ) आहे, आतापावेतो हे जे काही करत राहिले, त्याबद्दल दुःख करू नकोस.
७०. मग जेव्हा त्यांचे सामान (धान्याने भरून) तयार केले तेव्हा आपल्या भावाच्या सामानात आपला पाणी पिण्याचा प्याला ठेवून दिला, मग एका ऐलान करणाऱ्याने ऐलान केले, हे काफिलावाल्यांनो! तुम्ही लोक तर चोर आहात!
७१. त्यांनी त्याच्याकडे तोंड फिरवून म्हटले, तुमची कोणती वस्तू हरवली आहे?
७२. उत्तर दिले की शाही प्याला हरवला आहे, जो तो घेऊन येईल त्याला एक उंटाचे ओझे इतके धान्य मिळेल. या वचनाची मी हमी देतो.
७३. ते म्हणाले, अल्लाहची शपथ! तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता की आम्ही देशात उपद्रव निर्माण करण्यासाठी आलो नाहीत आणि ना आम्ही चोर आहोत.
७४. ते म्हणाले, बरे चोरीची काय शिक्षा आहे जर तुम्ही खोटे ठराल.
७५. उत्तर दिले, याची शिक्षा हीच की ज्याच्या सामान्यात तो प्याला आढळून येईल तोच त्याच्या बदली आहे. आम्ही तर अत्याचारींना हीच शिक्षा देत असतो.
७६. मग (यूसुफ) ने आपल्या भावाचे सामान तपासण्यापूर्वी दुसऱ्यांचे सामान तपासायला सुरुवात केली, मग त्याने पिण्याचा प्याला आपल्या भावाच्या सामानातून काढला. आम्ही यूसुफकरिता अशा प्रकारे ही योजना बनविली. त्या बादशहाच्या कायद्यानुसार तो आपल्या भावाला (रोखून) ठेवू शकत नव्हता, परंतु हे की अल्लाहला मंजूर असेल. आम्ही ज्याला इच्छितो त्याचा दर्जा बुलंद करतो. प्रत्येक ज्ञान राखणाऱ्यावर (मोठेपणात) एक मोठा ज्ञानी अस्तित्वात आहे.
७७. ते म्हणाले, जर याने चोरी केली आहे तर (नवलाची गोष्ट नव्हे) याच्या भावानेही यापूर्वी चोरी केली आहे. यूसुफने ही गोष्ट आपल्या मनात ठेवली आणि त्यांच्यासमोर अगदी जाहीर केले नाही, म्हटले की तुम्ही वाईट ठिकाणी आहात आणि जे काही तुम्ही सांगत आहात अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.
७८. ते म्हणाले, हे मिस्र देशाचा सर्वाधिकार राखणारे! याचे पिता अतिशय वृद्ध मनुष्य आहेत. तुम्ही याच्याऐवजी आमच्यापैकी एखाद्याला ठेवून घ्या. आम्ही असे पाहतो की तुम्ही मोठे सज्जन मनुष्य आहात.
७९. (यूसुफ) म्हणाले की आम्हाला ज्याच्याजवळ आमची वस्तू आढळून आली आहे त्याला सोडून दुसऱ्यांना बंदी बनविण्यापासून अल्लाहचे शरण इच्छितो. असे केल्याने निश्चितच आम्ही अन्याय करणाऱ्यांपैकी ठरू.
८०. जेव्हा हे, यूसुफकडून निराश झाले, तेव्हा एकांतात बसून सल्लामसलत करू लागले. त्यांच्यापैकी जो सर्वांत मोठा होता तो म्हणाला की तुम्हाला माहीत नाही की तुमच्या पित्याने तुमच्याकडून अल्लाहला मध्यस्थी ठेवून पक्के वचन घेतले आहे आणि याच्यापूर्वी तुम्ही यूसुफविषयी अपराध केलेला आहे. आता मी तर भूमीतून पाय काढणार नाही, जोपर्यंत पिता स्वतः मला अनुमती देत नाहीत किंवा सर्वश्रेष्ठ अल्लाह माझ्या या समस्येचा फैसला करील. तोच सर्वोत्तम शासक आहे.
८१. तुम्ही सर्व पित्याच्या सेवेत परत जा आणि सांगा की हे पिता! तुमच्या पुत्राने चोरी केली आणि आम्ही तीच साक्ष दिली, जी आम्ही जाणत होतो. आम्ही काही परोक्ष (गैब) चे रक्षण करणारे तर नव्हतो.
८२. आणि तुम्ही त्या शहराच्या लोकांना विचारा, जिथे आम्ही होतो आणि त्या प्रवाशांनाही विचारा ज्यांच्यासोबत आम्ही आलो आहोत आणि निःसंशय आम्ही पूर्णपणे सच्चे आहोत.
८३. (याकूब) म्हणाले, असे नाही, किंबहुना तुम्ही आपल्यातर्फे एक गोष्ट रचून घेतली, तेव्हा आता संयम राखणेच उत्तम आहे. संभवतः सर्वश्रेष्ठ अल्लाह त्या सर्वांना माझ्याजवळ पोहचविल. तोच ज्ञानी आणि हिकमतशाली आहे.
८४. आणि मग (याकूबने) त्यांच्याकडून तोंड फिरवून घेतले आणि म्हटले, अरेरे, यूसुफ! त्यांचे डोळे दुःखातिरेकाने पांढरे झाले होते आणि ते या दुःखाला सहन करीत होते.
८५. (पुत्र) म्हणाले, अल्लाहची शपथ! तुम्ही नेहमी यूसुफच्या आठवणीत भान हरपून राहाल येथेपर्यंत की अगदी गळून जाल किंवा मरण पावाल.
८६. (याकूब) म्हणाले, मी तर आपल्या संकट आणि दुःखाचे गाऱ्हाणे अल्लाहजवळ मांडत आहे. मला अल्लाहतर्फे त्या गोष्टींचे ज्ञान प्राप्त आहे, ज्यांच्याबाबत तुम्ही अनभिज्ञ आहात.
८७. माझ्या प्रिय पुत्रांनो! तुम्ही जा आणि यूसुफ आणि त्याच्या भावाचा चांगल्या प्रकारे शोध घ्या आणि अल्लाहच्या दयेपासून निराश होऊ नका. निःसंशय, अल्लाहच्या दया-कृपेपासून तेच लोक निराश होतात जे काफिर (इन्कारी) असतात.
८८. मग जेव्हा हे लोक यूसुफजवळ पोहोचले, तेव्हा म्हणू लागले की हे अजीज! आम्ही आणि आमचे कुटुंब अतिशय अडचणीत आहे, आम्ही थोडीशी तुच्छ पुंजी आणली आहे, परंतु तुम्ही आम्हाला धान्याचे पूर्ण माप देऊन टाका आणि आम्हाला दान म्हणून द्या. निश्चितच अल्लाह दान देणाऱ्यांना चांगला मोबदला देतो.
८९. (यूसुफ) म्हणाले, तुमच्या ध्यानात तरी आहे का की तुम्ही यूसुफ आणि त्याच्या भावाशी आपल्या नादानपणात काय काय केले?
९०. ते म्हणाले, काय (खरोखर) तूच यूसुफ आहेस? उत्तर दिले, होय! मीच तो यूसुफ आणि हा माझा भाऊ आहे. अल्लाहने आमच्यावर दया आणि कृपा केली. खरी गोष्ट अशी की जो कोणी अल्लाहचे भय राखून दुराचारापासून अलिप्त राहील आणि धीर-संयम राखील तर अल्लाह एखाद्या सत्कर्म करणाऱ्याचा मोबदला वाया जाऊ देत नाही.
९१. ते म्हणाले, अल्लाहची शपथ! अल्लाहने तुला आमच्यावर श्रेष्ठता प्रदान केली आहे आणि हेही सत्य आहे की आम्ही अपराधी आहोत.
९२. उत्तर दिले, आज तुमच्यावर कसलाही आरोप नाही, अल्लाह तुम्हाला माफ करो, तो तर समस्त दया करणाऱ्यांमध्ये सर्वात मोठा दया करणारा आहे.
९३. माझा हा सदरा तुम्ही घेऊन जा आणि तो माझ्या पित्याच्या तोंडावर टाका की (ज्यामुळे) ते पाहू लागतील आणि येतील आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला माझ्याजवळ घेऊन या.
९४. आणि जेव्हा हा काफिला (मायदेशी) निघाला, तेव्हा त्यांचे पिता (याकूब) म्हणाले, मला यूसुफचा सुगंध येत आहे, जर तुम्ही मला मूर्ख समजत नसाल.
९५. (पुत्र) म्हणू लागले की अल्लाहची शपथ! तुम्ही तर अजूनही आपल्या त्याच जुन्या चुकीवर कायम आहात!
९६. जेव्हा शुभ समाचार देणाऱ्याने पोहोचून त्यांच्या तोंडावर तो सदरा टाकला, त्याच क्षणी त्यांना पुनश्च दिसू लागले. म्हणाले की, काय मी तुम्हाला सांगत नव्हतो की मी अल्लाहतर्फे त्या गोष्टी जाणतो, ज्या तुम्ही नाही जाणत.
९७. ते म्हणाले, हे पिता! तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा-याचना (माफीची दुआ) करा. निःसंशय आम्ही अपराधी आहोत.
९८. म्हणाले, ठीक आहे. मी लवकरच तुमच्यासाठी आपल्या पालनकर्त्याजवळ माफीची दुआ-प्रार्थना करेन. निश्चितच तो मोठा क्षमाशील, आणि अतिशय दयावान आहे.
९९. जेव्हा हा समस्त परिवार यूसुफजवळ पोहोचला, तेव्हा यूसुफने आपल्या माता-पित्यास आपल्याजवळ जागा दिली आणि म्हटले, अल्लाहने इच्छिल्यास तुम्ही सर्व मिस्र देशात सुख-शांतीपूर्वक राहाल.
१००. आणि आपल्या सिंहासनावर आपल्या माता-पित्यास उच्चस्थानी बसविले आणि सर्व त्याच्यासमोर सजद्यात पडले१ आणि सर्व म्हणाले, हे पिता! हा माझ्या पहिल्या स्वप्नाचा खुलासा आहे, माझ्या पालनकर्त्याने तो पूर्ण करून दाखविला. त्याने माझ्यावर फार मोठा उपकार केला, की जेव्हा मला कैदखान्यातून बाहेर काढले आणि तुम्ही लोकांना वाळवंटातून येथे आणले त्या मतभेदानंतर, जो सैतानाने माझ्या आणि माझ्या भावांच्या दरम्यान निर्माण केला होता. माझा पालनकर्ता, ज्याच्यासाठी इच्छितो, त्याच्यासाठी उत्तम उपाययोजना करतो. निःसंशय तो मोठा जाणणारा, हिकमत बाळगणारा आहे.
____________________
(१) काहींनी याचा अनुवाद असा केला आहे की आदर सन्मानार्थ यूसुफसमोर झुकले, परंतु ‘व खर्‌रू लहू सुज्जदन्‌’ हे शब्द दर्शवितात की त्यांनी यूसुफसमोर जमिनीवर माथा टेकला. हा सजदा माथा टेकण्याच्या अर्थाने आहे, तरीही हा सजदा आदर व सन्मानासाठी आहे, उपासना म्हणून नाही आणि आदराप्रित्यर्थ सजदा हजरत याकूब यांच्या शरीअतमध्ये उचित होता. इस्लाममध्ये शिर्कवर प्रतिबंध लावण्याकरिता अशा प्रकारचे आदरार्थी सजदे करणे वर्ज्य ठरविले गेले आणि आता आदर-सन्मान व्यक्त करण्यासाठी कोणालाही सजदा करणे अनुचित आहे.
१०१. हे माझ्या पालनकर्त्या! तू मला राज्य (सत्ताधिकार) प्रदान केला आणि मला स्वप्नांचा अर्थ लावण्याचे ज्ञान दिले. हे आकाशांचा व धरतीचा निर्माणकर्ता! तूच या जगात आणि आखिरतमध्ये माझा मित्र आणि मदत करणारा आहेस. तू मला इस्लामच्या अवस्थेत मृत्यु दे आणि मला नेकी करणाऱ्यांमध्ये सामील कर.
१०२. हे परोक्षा (गैब) च्या खबरींपैकी आहे, जे आम्ही तुमच्याकडे वहयी करीत आहोत आणि तुम्ही त्यांच्याजवळ नव्हते जेव्हा त्यांनी आपला बेत पक्का करून घेतला होता आणि ते कपट कारस्थान करू लागले होते.
१०३. तुम्ही कितीही इच्छा धरा, पण अधिकांश लोक ईमान राखणार नाहीत.
१०४. आणि तुम्ही त्यांच्याकडून याबद्दल काही मजूरी मागत नाही, हा तर समस्त विश्वाकरिता बोध-उपदेश आहे.
१०५. आणि आकाशांमध्ये आणि धरतीत अनेक निशाण्या आहेत, ज्यांच्यापासून हे लोक तोंड फिरवून निघून जातात.
१०६. आणि त्यांच्यापैकी बहुतेक लोक अल्लाहवर ईमान राखत असतानाही शिर्क करणारे आहेत.१
____________________
(१) ही ती वस्तुस्थिती आहे, जिला कुरआनाने अनेक ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे की हे मूर्तीपूजक हे मान्य करतात की आकाश व धरतीचा रचयिता, स्वामी, पालनहार आणि संचालक केवळ अल्लाहच आहे, तरीही ते उपासनेत अल्लाहसोबत इतरांनाही सामील करतात. अशा प्रकारे अधिकांश लोक अनेकेश्वरवादी आहेत अर्थात प्रत्येक कालखंडातील लोक तौहीद (एकेश्वरवाद) उपासना मानण्यास तयार होत नाही. आजच्या काळात कबरींची पूजा करणाऱ्यांचा शिर्कही असाच आहे की ते कबरीत गाडल्या गेलेल्या बुजूर्गांना उपास्य समजून त्यांना मदतीसाठी पुकारतात आणि अनेकविध उपासना पद्धती अंगीकारतात.
१०७. काय ते या गोष्टीपासून निर्भय झाले आहेत की त्यांच्याजवळ अल्लाहच्या शिक्षा-यातनांपैकी एखादी सर्वसामान्य शिक्षा यावी किंवा त्यांच्यावर अचानक कयामत येऊन कोसळावी आणि ते गाफील असावेत.
१०८. (तुम्ही) सांगा, माझा हाच मार्ग आहे. मी आणि माझे अनुयायी अल्लाहकडे बोलावित आहेत पूर्ण विश्वास आणि श्रद्धेसह १ आणि अल्लाह पवित्र आहे आणि मी अनेकेश्वरवाद्यांपैकी नाही.
____________________
(१) अर्थात तौहीद (एकेश्वरवाद) चा मार्ग हाच माझा मार्ग आहे, किंबहुना समस्त पैगंबरांचाही हाच मार्ग होता. याच मार्गाकडे मी आणि माझे अनुयायी मजबूत ईमानासह आणि धार्मिक नियमांच्या प्रमाणासह लोकांना आवाहन करतो.
१०९. आणि तुमच्यापूर्वी आम्ही वस्तीवाल्यांमध्ये जेवढेदेखील पैगंबर पाठविले ते सर्व पुरुषच होते, ज्यांच्याकडे आम्ही वहयी (प्रकाशना) उतरवित राहिली काय धरतीवर या लोकांनी हिंडून फिरून पाहिले नाही की त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांचा कसा परिणाम (अंत) झाला? निःसंशय, अल्लाहचे भय राखणाऱ्या व त्याचा आज्ञाभंग करण्यापासून दूर राहणाऱ्या लोकांकरिता आखिरतचे घर फार उत्तम आहे. काय तरीही तुम्ही ध्यानी घेत नाही?
११०. येथेपर्यंत की जेव्हा पैगंबर निराश होऊ लागले आणि उम्मत (जनसमुदाया) चे लोक असे समजू लागले की त्यांना खोटे सांगितले गेले, त्वरित त्यांच्यापर्यंत आमची मदत येऊन पोहोचली. आम्ही ज्याला इच्छिले त्याला सुटका प्रदान केली. खरी गोष्ट अशी की आमचा अज़ाब (शिक्षा-यातना) अपराधी लोकांवरून टाळला जात नाही.
१११. यांच्या कहाण्यां (वृत्तांता) मध्ये बुद्धिमानांकरिता निश्चितच बोध आणि तंबी आहे. हा कुरआन काही खोट्या रचलेल्या गोष्टी नाही, किंबहुना हे सत्य-समर्थन आहे त्या ग्रंथांचे जे याच्या पूर्वीचे आहेत, आणि प्रत्येक गोष्टीचे सविस्तर वर्णन आणि मार्गदर्शन व दया-कृपा आहे ईमान राखणाऱ्यांकरिता.
Icon