ترجمة سورة النساء

الترجمة الماراتية
ترجمة معاني سورة النساء باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. हे लोकांनो! आपल्या त्या पालनकर्त्याचे भय राखा, ज्याने तुम्हाला एकाच जीवापासून निर्माण केले आणि त्याच्यापासूनच त्याच्या पत्नीलाही निर्माण केले, आणि त्या दोघांपासून अनेक स्त्री-पुरुष पसरविले आणि त्या अल्लाहचे भय राखा, ज्याच्या नावाने तुम्ही एकमेकांकडे याचना करतात आणि नाते-संबंध तोडण्यापासूनही (स्वतःला वाचवा) निःसंशय, अल्लाह तुम्हा सर्वांची देखरेख करणारा आहे.
२. आणि अनाथांना त्यांची धन-संपत्ती देऊन टाका आणि अनाथांचा चांगला माल हडप करून त्याऐवजी खरबा माल देऊ नका. आणि आपल्या मालात (धनात) त्यांचा माल मिसळवून गिळंकृत करू नका. निःसंशय हा फार मोठा अपराध आहे.
३. आणि जर तुम्हाला हे भय वाटत असेल की अनाथ मुलींशी विवाह करून तुम्ही न्याय (वर्तन) करू शकणार नाहीत तर मग इतर स्त्रियांपैकी ज्या तुम्हाला चांगल्या वाटतील त्यांच्याशी तुम्ही विवाह करून घ्या. दोन-दोन, तीन-तीन, चार-चार, परंतु (अशा स्थितीत) न्याय न राखला जाण्याचे भय असेल तर एक (पत्नी) पुरेशी आहे अथवा तुमच्या मालकीच्या दासींना. हे अधिक निकट आहे की (असे केल्याने अन्यायाकडे आणि) एकतर्फी झुकण्यापासून वाचाल.
४. आणि स्त्रियांना त्यांचे महर (विवाहप्रसंगी वरातर्फे वधूसाठी निर्धारीत केलेली रक्कम) राजीखुशीने देऊन टाका आणि जर स्त्री आपल्या मर्जीने काही महर सोडून देईल तर तो उचित समजून खाऊ पिऊ शकता.
५. आपली ती धन-संपत्ती, जिला अल्लाहने तुमच्या जीवनाचा आधार बनविले आहे ती नादान व अक्कल नसलेल्यांना देऊ नका आणि त्यातून त्यांना खाऊ घाला, त्यांना कपडे-लत्ते द्या आणि त्यांच्याशी नरमीने बोला.
६. आणि अनाथांना ते वयात येइपर्यंत त्यांची देखरेख ठेवा आणि त्यांची परीक्षा घेत राहा. मग जेव्हा तुम्हाला त्यांच्यात सुधारणा व लायकी दिसून येईल, तेव्हा त्यांची संपत्ती त्यांच्या हवाली करा आणि ते मोठे होतील या भीतीने त्यांचे धन घाईघाईने उधळपट्टी करीत खाऊन टाकू नका. श्रीमंतांनी त्यांच्या संपत्तीबाबत असे करण्यापासून अलिप्त राहावे, तथापि गरीब असेल तर त्याने वाजवी रितीनेे खावे, मग जेव्हा तुम्ही त्यांना त्यांची संपत्ती सोपवाल तेव्हा साक्षी करून घ्या, आणि हिशोब घेण्यासाठी तर अल्लाह पुरेसा आहे.
७. आई-बाप आणि जवळच्या नातेवाईकांच्या संपत्तीत पुरुषांचा हिस्सा आहे, आणि स्त्रियांचाही (अर्थात जी धन-संपत्ती आई-वडील आणि जवळचे नातेवाईक मागे सोडून जातील), मग ती संपत्ती कमी असो किंवा जास्त (त्यात) हिस्सा ठरलेला आहे.१
____________________
(१) इस्लामच्या आगमनापूर्वी हादेखील अत्याचार होता की स्त्रियांना आणि लहान मुलांना वारस या नात्याने काहीच दिले जात नव्हते. केवळ मोठी मुले, जी लढण्यायोग्य असत तेच साऱ्या संपत्तीचे उत्तराधिकारी मानले जात. या आयतीत सर्वश्रेष्ठ अल्लाहने फर्माविले की पुरुषांप्रमाणे स्त्रिया आणि लहान मुले-मुलीदेखील आपल्या माता-पित्याचे आणि नातेवाईकांचे वारसदार ठरतील. त्यांना वारसाहक्कापासून वंचित ठेवले जाणार नाही.
८. आणि वाटणीच्या वेळी जेव्हा नातेवाईक, अनाथ आणि गरीब दुबळे येतील तर तुम्ही त्या संपत्तीतून त्यांनाही थोडे-फार द्या आणि त्यांच्याशी नरमीने बोला.
९. लोकांनी हा विचार केला पाहिजे की आपल्या मागे जर ते लहान लहान कमजोर मुलेबाळे सोडून मेले असते तर त्यांना आपल्या मुलांबद्दल कशी भीती वाटली असती, स्वतः आपल्यावर कयास(अंदाज) करून भय राखले पाहिजे आणि त्यांनी अल्लाहचे भय बाळगले पाहिजे आणि बोलताना यथायोग्य बोलले पाहिजे.
१०. जे लोक नाहक अत्याचारपूर्वक अनाथांची संपत्ती गिळंकृत करतात, ते आपल्या पोटात आग भरत आहेत आणि ते जहन्नममध्ये जातील.
११. सर्वश्रेष्ठ अल्लाह तुम्हाला तुमच्या संततीविषयी आदेश देतो की एका मुलाचा हिस्सा दोन मुलींच्या हिश्याइतका आहे. जर फक्त मुलीच असतील आणि त्या दोनपेक्षा जास्त असतील तर त्यांना, मयताने मागे सोडलेल्या संपत्तीमधून दोन तृतियांश हिस्सा मिळेल आणि जर एकच मुलगी असेल तर तिच्यासाठी अर्धा हिस्सा आहे आणि मयताच्या आई-बापापैकी प्रत्येकाला, त्याने मागे सोडलेल्या संपत्तीचा सहावा हिस्सा आहे. मयताला संतान असेल अथवा संतान नसेल, आणि आई-बाप वारसदार असतील तर मग त्याच्या आईचा तिसरा हिस्सा आहे. तथापि मयताचे जर अनेक भाऊ असतील तर मग त्याच्या आईचा सहावा हिस्सा आहे. हा हिस्सा मयताने केलेल्या मृत्युपत्रा (वसीयत) ची पूर्तता केल्यानंतर आहे किंवा त्याचे कर्ज फेडल्यानंतर. तुमचा पिता असेल किंवा तुमची मुले, पण तुम्ही नाही जाणत की त्यांच्यापैकी कोण तुम्हाला लाभ पोहचविण्यात जास्त जवळचा आहे. हे सर्व हिस्से अल्लाहतर्फे निर्धारीत केलेले आहेत. निःसंशय अल्लाह सर्व काही जाणणारा हिकमतशाली आहे.
१२. आणि तुमच्या पत्न्या, जी काही संपत्ती मागे सोडून जातील आणि त्यांना मुलेबाळे नसतील तर त्यात तुमचा अर्धा हिस्सा आहे आणि जर त्यांना मुलेबाळे असतील तर त्यांनी मागे सोडलेल्या संपत्तीत तुमचा चौथा हिस्सा आहे, मात्र त्यांनी केलेल्या मृत्युपत्राची पूर्तता झाल्यानंतर किंवा त्यांचे कर्ज फेडल्यानंतर आणि जी संपत्ती तुम्ही आपल्या मागे सोडून जाल, त्यात त्यांचा एक चतुर्थांश हिस्सा आहे जर तुम्हाला संतती नसेल, आणि जर तुम्हाला संतती असेल तर मग त्यांना तुम्ही मागे सोडलेल्या संपत्तीत आठवा हिस्सा मिळेल, मात्र तुम्ही केलेल्या मृत्युपत्राची पूर्तता झाल्यानंतर आणि तुमचे कर्ज फेडून झाल्यानंतर, आणि जर अशा पुरुष किंवा स्त्रीने मागे सोडलेल्या संपत्तीचा मामला आला, ज्याला आई-बाप किंवा मुलेबाळे नसतील, परंतु भाऊ-बहीण असतील तर त्यांच्यापैकी प्रत्येकाला सहावा हिस्सा मिळेल आणि जर याहून जास्त असतील तर एक तृतियांश संपत्तीत सर्वांचा हिस्सा राहील. मात्र त्याने केलेल्या मृत्युपत्राची पूर्तता झाल्यानंतर व कर्जाची अदायगी झाल्यानंतरच अशा प्रकारे की इतरांना नुकसान पोहचविले गेले नसावे. हे अल्लाहतर्फे निर्धारीत केलेले आहे आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट जाणणारा आणि धर्य राखणारा आहे.
१३. या सर्वश्रेष्ठ अल्लाहने निर्धारीत केलेल्या सीमा आहेत आणि जो कोणी अल्लाह आणि त्याचे रसूल (पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या आदेशाचे पालन करील, त्याला अल्लाह जन्नतमध्ये दाखल करील, ज्यांच्या खाली नहरी (प्रवाह) वाहत असतील, ज्यात ते नेहमी नेहमी राहतील, आणि ही फार मोठी सफलता आहे.
१४. आणि जो मनुष्य अल्लाहची आणि रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांची अवज्ञा करील आणि अल्लाहने निर्धारीत केलेल्या सीमांचे उल्लंघन करील त्याला तो जहन्नममध्ये टाकील, ज्यात तो नेहमी नेहमी राहील. अशा लोकांकरिता अपमानदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.
१५. तुमच्या स्त्रियांपैकी ज्या व्यभिचार करतील तर त्यांच्याबद्दल आपल्यापैकी चार साक्षीदार बोलवून घ्या जर त्यांनी साक्ष दिली तर त्या स्त्रियांना घरात बंदिस्त करून ठेवा, येथपर्यंत की मृत्युने त्यांचे आयुष्य संपवावे, किंवा सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्यांच्यासाठी एखादा दुसरा मार्ग काढावा.
१६. आणि तुमच्यापैकी जे दोनजण असे कृत्य करतील तर त्यांना दुःख-यातना द्या. जर ते तौबा (क्षमा-याचना) करतील आणि आपले आचरण सुधारतील तर त्यांना सोडून द्या. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह तौबा (क्षमा-याचना) कबूल करणारा आणि दया करणारा आहे.
१७. अल्लाह केवळ अशाच लोकांची तौबा कबूल करतो, जे अजाणतेपणी वाईट कृत्य करून बसतात, पण लवकरच तसे कृत्य करणे सोडतात आणि अल्लाहजवळ माफी मागतात, जेव्हा अल्लाहदेखील त्यांची क्षमा-याचना स्वीकारतो अल्लाह सर्व काही जाणणारा बुद्धिमान आहे.
१८. आणि त्यांची तौबा कदापि कबूल नाही, जे दुष्कर्मांवर दुष्कर्म करीत जातात इतके की त्यांच्यापैकी एखाद्याचे मरण जवळ येऊन ठेपते, तेव्हा म्हणू लागतो की आता मी तौबा करतो! आणि अशा लोकांचीही तौबा कबूल केली जात नाही जे इन्कार करण्याच्या अवस्थेतच मरण पावतात. अशाच लोकांसाठी आम्ही सक्त अज़ाब (कठोर शिक्षा-यातना) तयार करून ठेवला आहे.
१९. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुमच्यासाठी हे हलाल (वैध) नव्हे की जबरदस्तीने स्त्रियांचे, त्यांच्या मर्जीविरूद्ध वारसदार बनावे१ आणि आपण दिलेले त्यांच्याकडून काही परत घ्यावे या हेतुने त्यांना रोखून ठेवू नका मात्र जर त्या उघडपणे एखादे दुष्कर्म आणि व्यभिचाराचे काम करतील तर गोष्ट वेगळी. त्यांच्याशी चांगले वर्तन राखा, मग त्या तुम्हाला नापसंत का असेनात, कारण फार शक्य आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीला वाईट जाणावे आणि अल्लाहने तिच्यात मोठी भलाई आणि खूबी ठेवली असावी.
____________________
(१) इस्लामच्या आगमनापूर्वी स्त्रियांवर हाही अत्याचार होत असे की एखाद्याच्या मृत्युनंतर त्याच्या घरचे लोक, मयताच्या मागे सोडलेल्या संपत्तीप्रमाणे तिच्या पत्नीचेही जबरदस्तीने उत्तराधिकारी बनत आणि स्वतः आपल्या मर्जीने तिच्या इच्छेविरूद्ध तिच्याशी विवाह करून घेत किंवा आपल्या भावाशी, पुतण्याशी विवाह करून देत. एवढेच नव्हे तर, सावत्र मुलगा आपल्या मरण पावलेल्या बापाच्या पत्नीशी विवाह करून घेई किंवा वाटल्यास तिला दुसऱ्या कोणाशी विवाह करण्याची परवानगी देत नसत. ती बिचारी संपूर्ण आयुष्य अशाच स्थितीत जगण्यास विवश होत असे. इस्लामने अत्याचारपूर्ण अशा सर्व पद्धतींना हराम (अवैध) ठरविले.
२०. आणि जर एका पत्नीच्या ठिकाणी तुम्ही दुसरी पत्नी करू इच्छित असाल तर त्यांच्यापैकी एखादीला तुम्ही धन-संपत्तीचा खजिना देऊन ठेवला असेल, तरीही त्यातून काही (परत) घेऊ नका. काय तुम्ही तिला बदनाम करून उघड अशा अपराधाने परत घ्याल?
२१. आणि तुम्ही ते कसे परत घ्याल? यानंतरही की तुम्ही एकमेकांशी सहवास केलेला आहे आणि त्या स्त्रियांनी तुमच्याकडून पक्का वायदा-करार घेतला आहे.
२२. आणि त्या स्त्रियांशी विवाह करू नका, ज्यांच्याशी तुमच्या पित्यांनी विवाह केला असेल, परंतु यापूर्वी जे झाले ते झाले हे निर्लज्जतेचे काम आणि कपटीपणामुळे आहे आणि मोठा वाईट (आचरणाचा) मार्ग आहे.
२३. तुमच्यावर हराम (निषिद्ध) केल्या गेल्या तुमच्या माता आणि कन्या, आणि तुमच्या बहिणी तुमच्या आत्या तुमच्या मावश्या , भावाच्या मुली, बहिणीच्या मुली आणि तुमच्या त्या माता, ज्यांनी तुम्हाला आपले दूध पाजले असेल आणि तुमच्या (आईच्या) दुधात सहभागी असलेल्या बहिणी, तुमची सासू आणि तुम्ही ज्यांचे पालनपोषण केले त्या मुली ज्या तुमच्या कुशीत (कडेवर) आहेत तुमच्या त्या स्त्रियांपासून ज्यांच्याशी तुम्ही सहवास केलेला आहे, परंतु जर तुम्ही त्यांच्याशी सहवास केला नसेल तर तुमच्यावर कसलाही गुन्हा नाही, आणि तुमच्या सख्या पुत्रांच्या पत्न्यासुद्धा हराम आहेत आणि दोन बहिणींना एकाच वेळा (एकत्रपणे) निकाहमध्ये जमा करणे हेदेखील हराम आहे. मात्र यापूर्वी जे झाले ते झाले. निःसंशय अल्लाह मोठा माफ करणारा, मेहरबान, दयावान आहे.
२४. आणि (तुमच्यासाठी) विवाहित स्त्रिया (अवैध) केल्या गेल्या आहेत तथापि जी (दासी) तुमच्या स्वतःच्या मालकीची असेल. हे आदेश अल्लाहने तुमच्यावर अनिवार्य केले आहेत आणि याखेरीज ज्या दुसऱ्या स्त्रिया तुमच्यासाठी हलाल (वैध) केल्या गेल्या आहेत की आपले धन (महर) अदा करून त्यांच्याशी विवाह करा, व्यभिचारासाठी नाही तर पावित्र्य कायम राखण्याकरिता, यास्तव ज्यांच्यापासून तुम्ही लाभ घ्याल त्यांना त्यांचा महर अदा करा आणि तुम्ही ठरलेल्या महर नंतर एकमेकांच्या मर्जीने जे वाटेल ते ठरवाल तर यात तुमच्यावर काही गुन्हा नाही. निःसंशय अल्लाह सर्व काही जाणणारा हिकमतशाली आहे.
२५. आणि तुमच्यापैकी जो स्वतंत्र अशा मुलसमान स्त्रीशी विवाह करण्याचे सामर्थ्य बाळगत नसेल तर त्याने त्या मुसलमान दासीशी (विवाह करावा) जी स्वतःच्या मालकीची असावी. अल्लाह तुमच्या कर्माशी पूर्णतः जाणता आहे. तुम्ही आपसात एकमेकांचे जोडीदार आहात, यास्तव तुम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या परवानगीने त्यांच्याशी विवाह करा आणि नियमानुसार त्यांचा महर देऊन टाका. त्या सत्शील, सदाचारी असाव्यात, उघडपणे दुराचार करणाऱ्या नसाव्यात, न लपून छपून प्रेम-संबंध राखणाऱ्या असाव्यात, मग जेव्हा त्या विवाहित झाल्यानंतर पुन्हा व्यभिचार करतील तर त्यांच्यासाठी, स्वतंत्र स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या शिक्षेच्या निम्मी शिक्षा आहे. हा विवाहाचा आदेश त्याच्यासाठी आहे ज्याला आपल्या हातून कुकर्म होईल अशी भीती आहे धीर धराल तर तुमच्यासाठी उत्तम आहे. आणि अल्लाह माफ करणारा, दया करणारा आहे.
२६. अल्लाह इच्छितो की तुमच्यासाठी स्पष्ट आदेशांचे निवेदन करावे आणि तुम्हाला त्या लोकांच्या उचित मार्गावर चालवावे, जे तुमच्या पूर्वी होऊन गेलेत आणि तुमची क्षमा-याचना (तौबा) कबूल करावी आणि अल्लाह जाणणारा, हिकमतशाली आहे.
२७. आणि अल्लाह इच्छितो की तुमची तौबा कबूल करावी आणि जे लोक कामवासनेच्या मागे लागले आहेत, ते इच्छितात की तुम्ही सन्मार्गापासून खूप दूर हटावे.
२८. अल्लाह तुमचा सर्व भार हलका करू इच्छितो आणि माणूस मोठा कमकुवत निर्माण केला गेला आहे.
२९. हे ईमान राखणाऱ्यांनो! आपसात एकमेकांची धन-संपत्ती नाहक हडप करू नका, परंतु आशा पध्दतीने की तुम्ही आपसात राजीखुशीने व्यापार-उद्योग करा. आणि स्वतःला जीवे ठार करू नका. निःसंशय अल्लाह तुमच्यावर दया करणारा आहे.
३०. आणि जे मनुष्य ही सीमा ओलांडून आणखी अत्याचार करील तर फार लवकर आम्ही त्याला आगीत टाकू आणि हे अल्लाहकरिता फार सोपे आहे.
३१. जर तुम्ही या मोठ्या अपराधांपासून स्वतःला वाचवाल, ज्यांच्याविषयी तुम्हाला मनाई केली जात आहे तर आम्ही तुमच्या लहान सहान अपराधांना माफ करू आणि मान सन्मानाच्या दरवाज्यात दाखल करू.
३२. आणि त्या गोष्टीची इच्छा धरू नका, जिच्यामुळे अल्लाहने तुमच्यापैकी एकाला दुसऱ्यावर श्रेष्ठता प्रदान केली आहे. पुरुषांचा हिस्सा तो आहे, जो त्यांनी कमविला आणि स्त्रियांसाठी तो हिस्सा आहे जो त्यांनी कमवीला अल्लाहजवळ त्याच्या दया-कृपेची याचना करा. निःसंशय अल्लाह प्रत्येक गोष्टीचे ज्ञान राखतो.
३३. आणि आई-बाप किंवा जवळचे नातेवाईक आपल्या मागे जे काही सोडून मरतील, त्याचे वारसदार आम्ही प्रत्येकाचे निश्चित केले आहेत आणि ज्यांच्याशी तुम्ही स्वतः वचन-करार केला आहे. त्यांना त्यांचा हिस्सा देऊन टाका. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्ट पाहात आहे.
३४. पुरुष, स्त्रीवर शासक (आणि संरक्षक) आहे. या कारणास्तव की अल्लाहने एकाला दुसऱ्यावर श्रेष्ठत्व प्रदान केले आहे आणि या कारणास्तव की पुरुषांनी आपले धन खर्च केले आहे. यास्तव नेक, आज्ञाधारक स्त्रिया पतीच्या अनुपस्थितीत अल्लाहच्या संरक्षणाद्वारे धन-संपत्ती व शील-अब्रूचे रक्षण करतात आणि ज्या स्त्रियांपासून तुम्हाला अवज्ञेचे भय असेल त्यांना चांगली ताकीद करा, त्यांचे अंथरुण वेगळे करा (तरीही न मानतील) तर मारा आणि जर तुमचे म्हणणे मानून घेतील तर त्यांच्यावर दोषारोप ठेवण्याचे निमित्त शोधू नका. निःसंशय अल्लाह मोठा महान आहे.
३५. जर तुम्हाला (पती-पत्नीमध्ये) मनमुटाव होण्याची भीती असेल तर एक न्याय करणारा पंच, पतीच्या कुटुंबातर्फे आणि एक पत्नीच्या कुटुंबातर्फे ठरवून घ्या. जर हे दोघे समझोता घडवून आणू इच्छितील तर अल्लाह त्या दोघांचा मिलाप करील. निःसंशय, अल्लाह जाणणारा, खबर राखणारा आहे.
३६. आणि अल्लाहची उपासना करा. त्याच्यासह दुसऱ्या कोणाला सहभागी करू नका आणि आई-बाप, नातेवाईक, अनाथ, गरीब दुबळे, जवळचे शेजारी, दूरचे शेजारी आणि सोबत असलेल्या प्रवाशांसीी भलेपणाचे, उपकाराचे वर्तन करा, तसेच प्रवाशी आणि तुमच्या ताब्यात असेलल्यांशीही. निःसंशय अल्लाह ऐट दाखविणाऱ्या घमेंडीशी प्रेम राखत नाही.
३७. जे लोक स्वतः कंजूषपणा करतात आणि इतरांनाही कंजूषपणा करण्यास सांगतात आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहने, जे आपल्या कृपेने त्यांना प्रदान केले आहे, ते लपवितात, तर आम्ही अशा कृतघ्न लोकांसाठी अपमानदायक अज़ाब (शिक्षा-यातना) तयार करून ठेवला आहे.
३८. आणि जे लोक आपले धन लोकांना दाखविण्यासाठी खर्च करतात, आणि अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखत नाही आणि ज्याचा सखा-सोबती सैतान असेल तर तो मोठा वाईट सोबती आहे.
३९. आणि त्यांचे काय बिघडले असते तर त्यांनी अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखले असते आणि अल्लाहने जे त्यांना देऊन ठेवले आहे, त्यातून खर्च करीत राहिले असते. अल्लाह त्यांना चांगल्या प्रकारे जाणणारा आहे.
४०. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह एका कणाइतकाही अत्याचार करीत नाही. आणि सत्कर्म (नेकी) असेल तर त्याला दुप्पट करतो आणि विशेषतः आपल्या जवळून फार मोठा मोबदला प्रदान करतो.
४१. तेव्हा काय अवस्था होईल, जेव्हा प्रत्येक जनसमूहा (उम्मत) मधून एक साक्ष देणारा आम्ही आणू आणि तुम्हाला त्या लोकांवर साक्षीदार बनवून आणू.१
____________________
(१) प्रत्येक उम्मत (जनसमूह) चा पैगंबर अल्लाहच्या दरबारात साक्ष देईल, हे अल्लाह, आम्ही तर तुझा संदेश आपल्या लोकांपर्यंत पोहचविला होता, आता त्यांनी मानले नाही तर यात आमचा काय दोष आहे? मग त्यांच्या कथनावर पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साक्ष देतील, हे अल्लाह! हे खरे सांगतात. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही साक्ष त्या कुरआनाद्वारे देतील जे त्यांच्यावर अवतरित झाले आणि ज्यात पूर्वी होऊन गेलेल्या पैगंबरांचे आणि त्यांच्या लोकांचे वृत्तांत आवश्यकतेनुसार सांगितले आहेत.
४२. ज्या दिवशी इन्कार करणारे आणि पैगंबराची अवज्ञा करणारे ही इच्छा करतील की त्यांना जमिनीशी सपाट (समतल) केले गेले असते तर फार बरे झाले असते आणि अल्लाहपासून ते काहीही लपवू शकणार नाहीत.
४३. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही नशेत चूर असाल तेव्हा नमाजच्या जवळ जाऊ नका, जोपर्यंत आपले म्हणणे समजू न लागाल आणि (संभोगानंतरच्या) अपवित्र अवस्थेत, जोपर्यंत स्नान न करून घ्याल, परंतु रस्त्याने जाताना (नमाजच्या स्थानावरून) जाणे होत असेल तर गोष्ट वेगळी आणि जर तुम्ही आजारी असाल, किंवा प्रवासात असाल किंवा तुमच्यापैकी कोणी शौचास जाऊन आला असेल किंवा तुम्ही स्त्रियांशी समागम केला असेल आणि तुम्हाला पाणी मिळत नसेल तर साफ स्वच्छ मातीने तयम्मुम करा आणि आपले तोंड आणि आपले हात (मातीने) मळून घ्या. निःसंशय अल्लाह मोठा माफ करणारा आणि क्षमाशील आहे.
४४. काय तुम्ही त्यांना नाही पाहिले, ज्यांना ग्रंथाचा काही भाग दिला गेला? ते मार्गभ्रष्टता खरेदी करतात आणि इच्छितात की तुम्हीही मार्गभ्रष्ट व्हावे.
४५. आणि अल्लाह तुमच्या शत्रूंना चांगल्या प्रकारे जाणणारा आहे आणि अल्लाह पुरेसा आहे दोस्त होण्यासाठी आणि अल्लाह पर्याप्त आहे मदतकर्ता होण्यासाठी.
४६. काही यहूदी, वाणी (कलाम) ला तिच्या योग्य स्थानापासून बदलून टाकतात. आणि म्हणतात की आम्ही ऐकले आणि अवज्ञा केली आणि ऐक त्याच्याविना की तुला ऐकले न जावे आणि आमची ताबेदारी कबूल करा (परंतु हे बोलताना) आपल्या जीभेला मोड देतात आणि दीन (धर्म) कलंकित करतात आणि जर हे लोक असे म्हणाले असते की आम्ही ऐकले आणि आम्ही मान्य केले आणि तुम्ही ऐका आणि आम्हाला पाहा तर हे त्यांच्यासाठी फार चांगले झाले असते आणि अधिक उत्तम ठरले असते. परंतु अल्लाहने त्यांच्या इन्कारामुळे त्यांचा धिःक्कार केला, तेव्हा हे फार कमी ईमान राखतात.
४७. हे ग्रंथधारकांनो! जे काही आम्ही अवतरित केले आहे, जे तुमच्याजवळ असलेल्या (ग्रंथा) ला सत्य असल्याचे सांगतो, त्यावर यापूर्वी ईमान राखा की आम्ही चेहरे बिघडवून टाकावेत आणि त्यांना फिरवून पाठीकडे करावे किंवा त्यांच्यावर धिःक्काराचा मारा करावा, जसा आम्ही शनिवारवाल्या लोकांवर केला आहे, आणि अल्लाहचा निर्णय पूर्ण झाल्याशिवाय राहात नाही.
४८. निःसंशय, अल्लाह आपल्यासह कोणाला सहभागी केले जाणे माफ करत नाही आणि याच्याखेरीज ज्याला इच्छिल माफ करील १ आणि जो अल्लाहसोबत दुसऱ्याला सहभागी करील तर त्याने अल्लाहवर फार मोठे असत्य रचले. २
____________________
(१) अर्थात असे अपराध की ज्यांची माफी मागितल्याविना ईमानधारकांनी मरण पावावे, तेव्हा अल्लाहने इच्छिल्यास एखाद्याला शिक्षा-यातना न देता माफ करील, परंतु बहुतेकांना शिक्षा दिल्यानंतर आणि बहुतेकांना पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या शिफारसीवर माफ करील, परंतु शिर्क (अल्लाहसह कोणाला सहभागी ठरविणे) कदापि माफ करणार नाही, कारण अनेकेश्ववाद्यांवर अल्लाहने जन्नतला हराम केले आहे. (२) अन्य एका ठिकाणी फर्माविले ‘1शिर्क फार मोठा अत्याचार आहे’ (लुकमान) हदीस वचनातही याला फार मोठे अपराध असल्याचे सांगितले गेले आहे.
४९. काय तुम्ही त्यांना नाही पाहिले जे स्वतला फार शुद्ध पवित्र असल्याचे सांगतात? किंबहुना अल्लाह ज्याला इच्छितो स्वच्छ, शुद्ध, पवित्र करतो, आणि कोणावर धाग्याइतकाही अत्याचार केला जाणार नाही.
५०. पाहा, हे लोक अल्लाहवर कशा प्रकारे खोटा आरोप ठेवतात आणि हे फार मोठा गुन्हा साबीत होण्यास पुरेसे आहे.
५१. काय तुम्ही त्यांना नाही पाहिले, ज्यांना ग्रंथाचा काही हिस्सा लाभला आहे जे मूर्त्यांवर आणि मिथ्या देवांवर ईमान (श्रद्धा) राखतात आणि इन्कारी लोकांच्या हक्कात म्हणतात की हे लोक ईमान राखणाऱ्यांपेक्षा अधिक सरळ आणि सत्य-मार्गावर आहेत.
५२. हेच लोक आहेत, ज्यांचा अल्लाहने धिःक्कार केला आहे आणि अल्लाह ज्याचा धिःक्कार करील तर तुम्हाला त्याची मदत करणारा कोणीही आढळणार नाही.
५३. काय त्यांच्याजवळ एखाद्या साम्राज्याचा हिस्सा आहे, असे असेल तर हे कोणाला तीळभरसुद्धा देणार नाहीत.
५४. हे लोकांशी द्वेष-मत्सर राखतात, त्याबद्दल, जे अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना प्रदान केले आहे, तेव्हा आम्ही इब्राहीमच्या संततीला ग्रंथ आणि हिकमतही प्रदान केली आणि मोठे साम्राज्यही प्रदान केले.
५५. मग त्यांच्यापैकी काहींनी तर ग्रंथावर ईमान राखले आणि काही त्यापासून थांबले तेव्हा (अशा लोकांसाठी) जहन्नमची आग पुरेशी आहे.
५६. ज्या लोकांनी आमच्या आयतींचा इन्कार केला, त्यांना आम्ही अवश्य आगीत टाकू, जेव्हा त्यांची कातडी शिजून गळून पडेल, आम्ही लगेच तिच्या जागी दुसरी कातडी बदलून टाकू यासाठी की त्यांनी अज़ाब (शिक्षा-यातना) चाखतच राहावे. निःसंशय अल्लाह जबरदस्त हिकमतशाली आहे.
५७. आणि ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले, आम्ही लवकरच त्यांना जन्नतच्या बागांमध्ये दाखल करू, ज्यांच्या खाली नहरी (प्रवाह) वाहत आहेत, ज्यात ते नेहमी राहतील. तिथे त्यांच्यासाठी पावित्र्यपूर्ण, शीलवान पत्न्या असतील आणि आम्ही त्यांना दाट सावलीत (आरामशीर जागी) ठेवू.
५८. सर्वश्रेष्ठ अल्लाह तुम्हाला आदेश देतो की अनामत (ठेव, धरोहर) त्यांच्या मालकांना परत करा, आणि जेव्हा लोकांच्या दरम्यान फैसला कराल तर न्यायपूर्वक फैसला करा. निःसंशय, ती फार चांगली गोष्ट आहे, ज्याची शिकवण अल्लाह तुम्हाला देत आहे आणि निःसंशय अल्लाह सर्व काही ऐकणारा, पाहणारा आहे.
५९. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहच्या आदेशाचे पालन करा आणि रसूल (पैगंबर) सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या आदेशाचे पालन करा आणि आपल्यापैकी शासक असलेल्यांचा आदेश माना, मग जर एखाद्या गोष्टीत मतभेद कराल तर तो अल्लाह आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याकडे रुजू करा, जर तुम्ही अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखत असाल. हे सर्वांत चांगले आहे आणि परिणामाच्या दृष्टीनेही फार उत्तम आहे.१
____________________
(१) अल्लाह आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याकडे रुजू करा याचा अर्थ पवित्र कुरआन आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमयांचे कथन आणि त्यांची आदर्श आचरणशैली आहे. आपसातील मतभेद मिटविण्यासाठी हा सर्वांत चांगला उपाय सांगितला गेला आहे. या नियमान्वये हेही स्पष्ट होते की त्यानंतर आणखी तिसऱ्या कोणाचा आदेश मानणे आवश्यक नाही.
६०. काय तुम्ही त्यांना नाही पाहिले, जे दावा करतात की, जे काही तुमच्यावर उतरविले गेले आहे आणि जे काही तुमच्या पूर्वी उतरविले गेले त्यावर ते ईमान राखतात, परंतु आपसातले तंटे सोडविण्यासाठी, अल्लाहऐवजी ते दुसऱ्यांजवळ जाऊ इच्छितात, वास्तविक त्यांना आदेश दिला गेला आहे की त्यांनी, त्याचा (सैतानाचा) इन्कार करावा. सैतान तर हे इच्छितोच की त्यांना बहकवून दूर फेकून द्यावे.
६१. आणि जेव्हा जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहने जो (पवित्र ग्रंथ) अवतरित केला आहे, त्याच्याकडे आणि पैगंबराकडे या, तेव्हा तुम्ही पाहाल की हे मुनाफिक (संधीसाधू) तुमच्याकडून तोंड फिरवून थांबतात.
६२. मग काय कारण आहे की जेव्हा त्यांच्यावर त्यांच्या वाईट कर्मांमुळे एखादे संकट येऊन कोसळते तर मग हे तुमच्याजवळ येऊन अल्लाहची शपथ घेतात, आणि सांगतात, आमचा इरादा तर केवळ भलाईचा आणि चांगले संबंध घडवून आणण्याचाच होता.
६३. हे असे लोक आहेत, ज्यांच्या मनातील रहस्यभेद, अल्लाहला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा, मात्र त्यांना शिकवण देत राहा, आणि त्यांना अशी गोष्ट बोला जी त्यांच्या मनावर प्रभाव टाकणारी असेल.
६४. आणि आम्ही प्रत्येक पैगंबर केवळ यासाठी पाठविला की अल्लाहच्या आदेशान्वये, त्याच्या आदेशाचे पालन केले जावे, आणि जर हे लोक, ज्यांनी स्वतःच्या प्राणांवर अत्याचार केला, तुमच्याजवळ आले असते आणि त्यांनी अल्लाहजवळ तौबा (क्षमा-याचना) केली असती आणि पैगंबरांनीही त्यांच्यासाठी माफी मागितली असती तर निःसंशय, अल्लाह या लोकांना मोठा माफ करणारा, दया करणारा आढळला असता.
६५. तेव्हा शपथ आहे तुमच्या पालनकर्त्याची, हे लोक (तोपर्यंत) ईमानधारक होऊ शकत नाही, जोपर्यंत सर्व आपसातील मतभेदात तुम्हाला न्याय-निवाडा करणारा स्वीकारीत नाही, मग जो फैसला तुम्ही कराल, त्यावर मनातून नाराजही नसावेत आणि आज्ञाधारकाप्रमाणे त्यांनी तो मान्य करून घ्यावा.
६६. आणि जर आम्ही त्यांच्यावर हे फर्ज (अनिवार्य) केले असते की स्वतःची हत्या करून घ्या, किंवा आपल्या घरातून निघून जा, तर त्यांच्यापैकी फार थोड्याच लोकांनी त्याचे पालन केले असते. आणि जर हे तेच करतील ज्याची त्यांना शिकवण दिली जाते तर निश्चितच त्यांच्यासाठी फार चांगले झाले असते आणि खूप मजबूतीचे ठरले असते.
६७. आणि मग तर आम्ही त्यांना आपल्या जवळून फार मोठा मोबदला प्रदान केला असता.
६८. आणि निःसंशय त्यांना सत्य व सरळ मार्ग प्रदान केला असता.
६९. आणि जो कोणी अल्लाह आणि रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या आदेशाचे पालन करील तर तो त्या लोकांसोबत राहील, ज्यांच्यावर अल्लाहने आपला इनाम फर्माविला आहे, जसे नबी (पैगंबर), सिद्दीक (सत्यवचनी) आणि शहीद व नेक सदाचारी लोक. हे फार चांगले सोबती आहेत.
७०. ही सर्वश्रेष्ठ अल्लाहतर्फे फार मोठी कृपा आहे आणि अल्लाह पर्याप्त आहे ज्ञान राखणारा.
७१. हे ईमान राखणाऱ्यांनो! आपल्या बचावाची सामग्री सोबत घ्या, मग समूहा-समूहाने किंवा सर्व एकत्र मिळून कूच करा.
७२. आणि निःसंशय तुमच्यापैकी काही असेही आहेत जे संकोच करतात, मग जर तुम्हाला एखादे नुकसान पोहोचते, तेव्हा म्हणतात की अल्लाहने माझ्यावर मोठी कृपा केली मी त्यांच्यासह हजर नव्हतो.
७३. आणि जर तुम्हाला अल्लाहची एखादी कृपा लाभली तर असे बोलू लागतील की जणू तुमच्या व त्यांच्या दरम्यान काही नातेच नव्हते, म्हणतील की, अरेरे! मी त्यांच्यासोबत असतो तर मोठी सफलता प्राप्त केली असती.
७४. तथापि ज्या लोकांनी या जगाचे जीवन, मरणोत्तर जीवना (आखिरत) च्या मोबदल्यात विकून टाकले आहे, त्यांनी अल्लाहच्या मार्गात लढले पाहिजे आणि जो अल्लाहच्या मार्गात लढता लढता शहीद होईल किंवा विजयी होईल तर खात्रीने आम्ही त्याला फार चांगला मोबदला प्रदान करू.
७५. बरे काय कारण आहे की तुम्ही अल्लाहच्या मार्गात आणि त्या दुर्बल पुरुष स्त्रिया आणि लहान लहान बालकांच्या सुटकेकरिता न लढावे? जे अशा प्रकारे दुआ (प्रार्थना) करीत आहेत की हे आमच्या पालनहार! या अत्याचारी लोकांच्या वस्तीतून आम्हाला बाहेर काढआणि आमच्यासाठी स्वतः आपल्यातर्फे एखादा हिमायती (समर्थक निश्चित कर, आणि आमच्यासाठी विशेषरित्या आपल्यातर्फे मदत करणारा पाठव.
७६. ज्या लोकांनी ईमान राखले आहे, ते तर अल्लाहच्या मार्गात जिहाद करतात आणि ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला आहे ते तर तागूत (सैतान) च्या मार्गात लढतात. तेव्हा तुम्ही सैतानाच्या मित्रांशी युद्ध करा. निःसंशय सैतानाचे (डावपेच) अतिशय कमकुवत आहेत.
७७. काय तुम्ही त्यांना नाही पाहिले, ज्यांना आदेश दिला गेला की आपल्या हातांना रोखून ठेवा आणि नमाज नियमित पढत राहा आणि जकात अदा करीत राहा, मग जेव्हा त्यांना जिहाद (धर्मयुद्धा) चा आदेश दिला गेला तेव्हा त्याच वेळी त्यांच्यातला एक समूह, लोकांपासून असा भयभीत होता, जणू अल्लाहचे भय असावे, किंबहुना यापेक्षा अधिक आणि म्हणू लागले, हे आमच्या पालनकर्त्या! तू आमच्यावर जिहाद अनिवार्य का केले? आणखी थोडे जीवन आम्हाला का व्यतीत करू दिले नाही? तुम्ही त्यांना सांगा की या जगाचा लाभ तर फार थोडासा आहे आणि अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता आखिरत कितीतरी उत्तम आहे, आणि तुमच्यावर एका धाग्याइतकाही अत्याचार केला जाणार नाही.
७८. तुम्ही कोठेही असा, मृत्यु कोणत्याही स्थितीत तुम्हाला येऊन धरील, मग तुम्ही मजबूत अशा किल्ल्यामध्ये असाल तरीही. आणि जर यांना एखादी भलाई प्राप्त होते, तेव्हा म्हणतात, की ही सर्वश्रेष्ठ अल्लाहतर्फे आहे, आणि जर एखादी असफलता पदरी पडते तेव्हा म्हणू लागतात, हे तुमच्यामुळे झाले. त्यांना सांगा, हे सर्व काही अल्लाहतर्फे आहे. यांना झाले तरी काय की एखादी गोष्ट नीट समजूनही घेत नाही.
७९. तुम्हाला जी काही भलाई लाभते, ती अल्लाहतर्फे आहे आणि जी काही हानि पोहचते ती स्वतः तुमच्याकडून आहे. आम्ही (हे पैगंबर!) तुम्हाला समस्त मानवजातीकरिता रसूल बनवून पाठविले आहे आणि अल्लाह या गोष्टीची साक्ष देण्यास पुरेसा आहे.
८०. जो कोणी या पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) चे आज्ञापालन करील, त्याने अल्लाहचे आज्ञापालन केले आणि जो तोंड फिरवील तर आम्ही तुम्हाला त्यांच्यावर देखरेख ठेवणारा बनवून पाठविले नाही.
८१. आणि हे म्हणतात की आम्ही आज्ञापालन करतो परंतु जेव्हा तुमच्या जवळून उठून बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्यातला एक गट, जी गोष्ट तुम्ही किंवा त्याने सांगितली आहे त्याविरूद्ध रात्री सल्लामसलत करतात. त्यांचा रात्रींचा वार्तालाप अल्लाह लिहून घेत आहे. तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहवर भरोसा ठेवा. काम बनविण्यासाठी अल्लाह पुरेसा आहे.
८२. काय हे लोक कुरआनवर विचार-चिंतन करीत नाही? जर हा ग्रंथ अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणातर्फे असता तर खात्रीने यात अनेक मतभेद आढळले असते.
८३. आणि जेव्हा त्यांना एखादी खबर शांती या भीतीची पोहोचते, ते लगेच तिचा प्रचार करायला सुरुवात करतात. जर यांनी ती खबर पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्यापर्यंत पोहचविली असती किंवा आपल्यातल्या जबाबदार लोकांच्या कानावर टाकली असती तर तिची जाच-पडताळ करणाऱ्यांनी तिची खरी हकीकत माहिती करून घेतली असती. आणि जर अल्लाहची कृपा आणि त्याची दयादृष्टी तुमच्यावर राहिली नसती तर काही लोकांना सोडून तुम्ही सर्व सैतानाच्या मागे चालणारे बनले असते.
८४. तेव्हा तुम्ही अल्लाहच्या मार्गात जिहाद करीत राहा. तुम्हाला फक्त तुमच्यासाठीच आदेश दिला जात आहे. ईमानधारकांना आकर्षित करीत राहा. फार शक्य आहे की, अल्लाह इन्कारी लोकांचा हल्ला रोखेल आणि अल्लाह मोठा शक्तिशाली आहे आणि शिक्षा देण्यातही फार कठोर आहे.
८५. जो मनुष्य एखादे पुण्य-कार्य आणि सत्कर्म करण्याची शिफारस करेल तर त्यालाही त्याचा काही हिस्सा मिळेल आणि जो दुराचार व दुष्कर्म करण्याची शिफारस करेल, त्याच्यासाठीही त्यात एक हिस्सा आहे, आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य राखतो.
८६. आणि जेव्हा तुम्हाला सलाम केला जाईल तर तुम्ही त्यापेक्षा चांगले प्रत्युत्तर द्या किंवा तेच शब्द परतून बोला. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेणार आहे.
८७. अल्लाह तो आहे, ज्याच्याशिवाय दुसरा कोणी (सच्चा) उपास्य नाही. तो तुम्हा सर्वांना निश्चितच कयामतच्या दिवशी एकत्र करील, ज्याच्या येण्याबाबत काहीच शंका नाही. अल्लाहपेक्षा जास्त सत्य वचन आणखी कोणाचे असू शकेल?
८८. तुम्हाला झाले तरी काय की मुनाफिकां (वरकरणी मुसलमानां) बाबत दोन गटांत विभागले जात आहात. त्यांना तर त्यांच्या करतूतींमुळे अल्लाहने तोंडघशी पाडले आहे. आता काय तुम्ही हे इच्छिता की त्याला मार्ग दाखवावा ज्याला अल्लाहने मार्गभ्रष्ट केले आहे? तेव्हा ज्याला अल्लाह मार्गभ्रष्ट करील, त्याच्यासाठी तुम्हाला कधीही, कोणताही मार्ग दिसून येणार नाही.
८९. यांना तर मनापासून वाटते की, जसे ते काफिर आहेत तसे तुम्हीही त्यांच्यासारखे ईमानाचा इन्कार करू लागावे आणि तुम्ही सर्व एकसमान व्हावे, यास्तव त्यांच्यापैकी कोणाला आपला खराखुरा मित्र बनवू नका, जोपर्यंत ते अल्लाहच्या मार्गात हिजरत (देश-त्याग) करीत नाहीत. मग जर (यापासून) तोंड फिरवतील तर त्यांना धरा आणि ठार करा, जिथेदेखील आढळतील. खबरदार! त्यांच्यापैकी कोणालाही आपला मित्र आणि सहाय्यक समजून घेऊ नका.
९०. परंतु जे त्या लोकांशी नाते राखतात, ज्यांच्या आणि तुमच्या दरम्यान समझोता झालेला असेल किंवा ते लोक जे तुमच्या जवळ येतात, ज्यांची मने संकुचित झाली आहेत की तुमच्याशी लढावे की आपल्या लोकांशी लढावे. अल्लाहने इच्छिले असते तर यांना तुमच्यावर वर्चस्व प्रदान केले असते आणि ते अवश्य तुमच्याशी लढले असते. तेव्हा जर असे लोक तुमच्यापासून दूर राहतील आणि लढाई न करतील आणि तुमच्याकडे संधी-समझोत्याचा प्रस्ताव मांडतील तर (अशा स्थितीत) अल्लाहने तुमच्यासाठी, त्यांच्याविरूद्ध लढाईचा कोणताही मार्ग ठेवला नाही.
९१. तुम्हाला दुसरे काही असेही लोक आढळतील, जे तुमच्यापासून आणि आपल्या जमातीच्या लोकांपासून सुरक्षित राहू इच्छितात, परंतु जेव्हा उपद्रवाकडे त्यांना वळविले जाते तर त्यात तोंडघशी पडतात. जर ते तुमच्यापासून हटले नाहीत आणि तुमच्याशी समझोता न करतील आणि आपले हात न रोखतील तर ते जिथे सापडतील तिथे त्यांना धरा आणि ठार करा. हेच ते लोक आहेत, ज्यांच्याबाबत आम्ही तुम्हाला खुले प्रमाण दिले आहे.
९२. कोणत्याही ईमानधारकाकरिता हे उचित नाही की त्याने एखाद्या ईमानधारकाची हत्या करावी. परंतु अजाणतेपणी तसे झाल्यास गोष्ट वेगळी. आणि जो मनुष्य एखाद्या ईमानधारकाची चुकीने हत्या करील तर त्याबद्दल त्याला एक ईमानधारक गुलाम (किंवा दासी) मुक्त करणे आणि मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना रक्ताची किंमत देणे आवश्यक आहे. परंतु त्याने माफ केले तर गोष्ट वेगळी. आणि ज्याची हत्या केली गेली तो मनुष्य जर तुमच्या शत्रू जमातीचा, पण मुस्लिम असेल तर एक मुस्लिम गुलाम मुक्त करणे आवश्यक आहे आणि जर ठार केली गेलेली व्यक्ती त्या जमातीची आहे ज्याच्या आणि तुमच्या (ईमानधारकांच्या) दरम्यान समझोता आहे तर रक्ताची किंमत त्याच्या नातेवाईकांना द्यावी लागेल, तसेच एक ईमानधारक (मुस्लिम) गुलामही मुक्त करावा लागेल आणि ज्याला तसा न आढळेल, त्याला दोन महिने सतत रोजे ठावावे लागतील अल्लाहकडून माफ करून घेण्यासाठी आणि अल्लाह जाणणारा व हिकमत बाळगणारा आहे.
९३. आणि जो कोणी एखाद्या ईमानधारकाला जाणूनबुजून ठार करील, तर त्याची शिक्षा जहन्नम आहे, ज्यात तो नेहमीकरिता राहील, त्याच्यावर अल्लाहचा प्रकोप आहे. अल्लाहने त्याचा धिःक्कार केला आहे आणि त्याच्यासाठी फार मोठी सजा-यातना तयार करून ठेवली आहे.
९४. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही अल्लाहच्या मार्गात निघाल, तेव्हा नीट जाच-पडताळ करून घेत जा आणि जो तुम्हाला सलाम करून बोलेल त्याला तुम्ही असेही म्हणू नका की तू ईमानधारक नाहीस. तुम्ही ऐहिक जीवनाच्या सुख-साधनांच्या शोधात आहात, तेव्हा अल्लाहजवळ विपुल सुख-साधने आहेत. पूर्वी तुम्हीसुद्धा असेच होते, मग अल्लाहने तुमच्यावर अनुग्रह (उपकार) केला. यास्तव तुम्ही नीट छान-बिन (चौकशी) करून घेत जा. निःसंशय अल्लाह तुमच्या कर्मांना चांगल्या प्रकारे जाणतो.
९५. जे ईमानधारक अकारण स्वस्थ बसून राहतील आणि जे अल्लाहच्या मार्गात आपल्या प्राणाने व धनाने जिहाद करत असतील तर दोघे समान ठरणार नाहीत. अल्लाहने त्यांना, जे आपले प्राण आणि धन लावून जिहाद करतात, स्वस्थ बसून राहणाऱ्यांवर दर्जाच्या दृष्टीने श्रेष्ठता प्रदान केली आहे. आणि तसे पाहता नेक मोबदल्याचा वायदा तर प्रत्येकाला दिला आहे. तथापि अल्लाहने जिहाद करणाऱ्यांना, स्वस्थ बसून राहणाऱ्यांवर महान मोबदल्याची श्रेष्ठता प्रदान केली आहे.
९६. आपल्यातर्फे दर्जाचीही, माफीचीही आणि दया-कृपेचीही, आणि अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.
९७. जे लोक स्वतःवर अत्याचार करतात, जेव्हा फरिश्ते त्यांचे प्राण ताब्यात घेतात तेव्हा म्हणतात की तुम्ही कोणत्या अवस्थेत होते? ते म्हणतात, आम्ही धरतीवर कमजोर होतो. तेव्हा फरिश्ते विचारतात, काय अल्लाहची जमीन विशाल, व्यापक नव्हती की तुम्ही तिच्यात स्थलांतर केले असते. अशाच लोकांचे ठिकाण जहन्नम आहे आणि ते मोठे वाईट ठिकाण आहे.
९८. परंतु जे पुरुष, ज्या स्त्रिया आणि लहान मुले लाचार-विवश आहेत, जे कसलीही उपाययोजना करू शकत नाहीत आणि ना मार्ग जाणतात.
९९. तेव्हा फार शक्य आहे की अल्लाह त्यांना माफ करील आणि अल्लाह मोठा माफ करणारा, क्षमाशील आहे.
१००. आणि जो कोणी अल्लाहच्या मार्गात हिजरत (देश-त्याग) करील, तर त्याला धरतीवर निवासाकरिता खूप विस्तृत जागा मिळेल आणि खूप समृद्धीही. आणि जो आपल्या घरापासून अल्लाह आणि त्याच्या पैगंबराकडे हिजरत करील, मग त्याला मृत्युने येऊन गाठावे, तरीदेखील त्याचा मोबदला अल्लाहजवळ निश्चित आहे आणि अल्लाह मोठा माफ करणारा, दयावान आहे.
१०१. आणि जेव्हा जमिनीवर प्रवास करीत असाल तेव्हा नमाज कस्र करण्यात (चार रकअतची नमाज दोन रकअत पढण्यात) तुमच्यावर काही गुन्हा नाही, जर तुम्हाला हे भय असेल की काफिर (श्रद्धाहीन) तुम्हाला त्रास देतील. निःसंशय काफिर लोक तुमचे खुले वैरी आहेत.
१०२. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या दरम्यान असाल आणि त्यांच्यासाठी नमाज कायम कराल, तेव्हा त्यांच्यातला एक गट तुमच्यासोबत शस्त्रानिशी सज्ज उभा राहिला पाहिजे, मग जेव्हा हे सजदा करून घेतील, तेव्हा यांनी तेथून हटावे, व तुमच्या पाठीमागे यावे आणि मग दुसरा गट, ज्याने अद्याप नमाज अदा केली नाही त्याने (पुढे) यावे आणि तुमच्यासोबत नमाज अदा करावी आणि आपला बचाव आणि आपली हत्यारे सोबत बाळगावित. काफिर तर इच्छितात की तुम्ही कसेही करून आपल्या हत्यारांपासून व आपल्या सामुग्रीपासून गाफील व्हावे तर मग त्यांनी अचाानक तुमच्यावर हल्ला करावा, मात्र जेव्हा तुम्हाला काही त्रास-यातना असेल किंवा जोरदार पाऊस अथवा आजारपणामुळे आपली हत्यारे उतरवून ठेवाल तर अशा वेळी तुमच्यावर काही गुन्हा नाही. आणि आपल्या बचावाची सामुग्री सोबत राखत जा. निःसंशय अल्लाहने इन्कार करणाऱ्यांसाठी अपमानदायक शिक्षा तयार करून ठेवली आहे.
१०३. मग जेव्हा तुम्ही नमाज पढून घ्याल जेव्हा उठता बसता आणि पहुडलेल्या स्थितीत अल्लाहचे स्मरण करीत राहा आणि शांतीपूर्ण स्थिती असेल तर नमाज कायम करा. निःसंशय, नमाज ईमानधारकांवर निश्चित आणि निर्धारीत वेळेवर अदा करणे फर्ज (अनिवार्य) केले गेले आहे.
१०४. आणि त्या लोकांचा पाठलाग करण्यात आळस करू नका. जर तुम्हाला त्रास-यातना होत आहे तर त्यांनाही त्रास-यातना होते, जशी तुम्हाला होते, आणि तुम्ही अल्लाहकडून त्या आशा-अपेक्षा बाळगता, ज्या ते बाळगत नाहीत, आणि अल्लाह सर्व काही जाणणारा, हिकमतशाली आहे.
१०५. निःसंशय, आम्ही तुमच्याकडे सत्यासह ग्रंथ अवतरीत केला आहे, यासाठी की तुम्ही लोकांच्या दरम्यान त्याला अनुसरून न्याय-निवाडा करावा, ज्याबाबत अल्लाहने तुम्हाला अवगत केले आणि अपहार करणाऱ्यांचे समर्थक बनू नका.
१०६. आणि अल्लाहजवळ क्षमा-याचना करीत राहा. निःसंशय अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.
१०७. आणि अशा लोकांशी बाजू घेऊन भांडू नका जे स्वतः आपलाच विश्वासघात करतात. निःसंशय, धोकेबाज विश्वासघातकीशी अल्लाह प्रेम राखत नाही.
१०८. ते लोकांपासून तर लपतात, परंतु अल्लाहपासून लपू शकत नाही. तो त्यांच्यासोबत आहे जेव्हा ते रात्री अप्रिय गोष्टींच्या योजना आखतात आणि अल्लाहने त्यांच्या कारवायांना घेरा टाकलेला आहे.
१०९. हे तुम्ही आहात की त्यांच्या हक्कात या जगात वाद घालता, परंतु कयामतच्या दिवशी त्यांच्यातर्फे कोण हुज्जत घालील आणि कोण त्यांचा समर्थक बनून उभा राहील?
११०. आणि जो कोणी वाईट कर्म करील किंवा स्वतः आपल्यावर अत्याचार करील, नंतर अल्लाहजवळ माफी मागील तर त्याला अल्लाह माफ करणारा, दया करणारा आढळून येईल.
१११. आणि जो गुन्हा करतो, तर त्या गुन्ह्याचे ओझे त्याच्याच (शिरा) वर आहे आणि अल्लाह सर्व काही जाणणारा, हिकमतशाली आहे.
११२. आणि जो कोणी दुष्कर्म करतो, मग एखाद्या निरपराधीवर त्याचा आरोप ठेवतो, तर त्याने मोठे कुभांड(मोेठा आळ घेतला) रचले आणि फार मोठा गुन्हा केला.
११३. आणि जर तुमच्यावर अल्लाहची दया-कृपा राहिली नसती, तर त्यांच्या एका गटाने तुम्हाला मार्गभ्रष्ट करण्याचे कारस्थान रचले होते, परंतु ते स्वतःलाच मार्गभ्रष्ट करतात आणि ते तुम्हाला काहीच नुकसान पोहचवू शकत नाही आणि अल्लाहने तुमच्यावर ग्रंथ आणि ज्ञान उतरविले आहे आणि तुम्ही जे जाणत नव्हते ते ज्ञान प्रदान केले आहे आणि तुमच्यावर अल्लाहची फार मोठी कृपा आहे.
११४. त्यांच्या बहुतेक गुप्त काानगोष्टींमध्ये कसलीही भलाई नाही. परंतु ज्याने उपकार, नेकी किंवा लोकांमध्ये सुधारणा होण्यासाठी आदेश दिला आणि जो हे कार्य अल्लाहची मर्जी (प्रसन्नता) प्राप्त करण्यासाठी करेल, आम्ही खरोखर त्याला फार मोठा मोबदला प्रदान करू.
११५. आणि जो कोणी, सरळ व सत्य मार्ग स्पष्ट झाल्यानंतर पैगंबर (मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांचा विरोध करील आणि ईमानधारकांच्या मार्गाशिवाय अन्य मार्गावर चालेल तर आम्ही त्याला त्याच दिशेने, जिकडे तो फिरत असेल, वळवून टाकू, मग त्याला आम्ही जहन्नममध्ये फेकून देऊ आणि ते मोठे वाईट स्थान आहे.
११६. अल्लाह, आपल्यासह दुसऱ्या कोणाला सहभागी केले जाणे कदापि माफ करणार नाही आणि याखेरीज इतर अपराधांना, तो ज्याला इच्छिल माफ करील आणि ज्याने अल्लाहसह अन्य कोणाला सहभागी ठरविले तो (सन्मार्गापासून) फार दूर बहकत गेला.
११७. हे तर अल्लाहला सोडून केवळ देवींना पुकारतात आणि वस्तुतः हे धिःक्कारलेल्या दुष्ट सैतानाला पुकारतात.
११८. ज्याचा अल्लाहने धिःक्कार केला आहे आणि त्याने (सैतानाने) म्हटले आहे की मी तुझ्या दासांमधून आपला ठराविक हिस्सा निश्चित घेईन.
११९. आणि त्यांना सरळ मार्गापासून भटकवित राहीन आणि त्यांना खोट्या आशा देत राहील आणि त्यांना शिकवण देईन की जनावरांचे कान चिरा आणि त्यांना सांगेन की अल्लाहने बनविलेले स्वरूप विकृत करा. ऐका! जो, अल्लाहला सोडून सैतानाला आपला मित्र बनवील तर तो उघड अशा तोट्यात राहील.
१२०. तो त्यांच्याशी तोंडी वायदे करत राहील आणि त्यांना भ्रमाच्या हिरव्या बागा दाखवित राहील (परंतु लक्षात ठेवा) सैतानाने त्यांच्याशी केलेले वायदे पूर्णपणे धोका आहे (मृगजळ) आहे.
१२१. हेच ते लोक आहेत, ज्यांचे ठिकाण जहन्नम आहे. जिथून त्यांना कदापि सुटका मिळणार नाही.
१२२. आणि ज्या लोकांनी ईमान राखले, आणि सत्कर्म केले आम्ही त्यांना त्या जन्नतीमध्ये दाखल करू, ज्यांच्या खाली नहरी (प्रवाह) वाहत आहेत. जिथे ते नेहमी नेहमी राहतील. हा अल्लाहचा वायदा आहे जो निःसंशय खरा आहे. आणि अल्लाहपेक्षा, आपल्या कथनात सच्चा आणखी कोण असू शकतो?
१२३. तुमच्या इच्छा-आकांक्षांनी आणि ग्रंथधारकांच्या इच्छा-आकांक्षांनी काहीही होणार नाही. जो वाईट कर्म करील, त्याची शिक्षा तो प्राप्त करील आणि त्याला अल्लाहखेरीज आपला कोणी मित्र आणि मदत करणारा आढळणार नाही.
१२४. आणि जो ईमानधारक असेल, मग तो पुरुष असो किंवा स्त्री आणि तो नेक आचरण करील, निःसंशय असे लोक जन्नतमध्ये दाखल होतील आणि तिळाइतकाही त्याचा हक्क मारला जाणार नाही.
१२५. आणि दीन-धर्म संदर्भात त्याहून चांगला कोण असू शकतो, जो अल्लाहकरिता पूर्णतः आत्मसमर्पण करील आणि तो नेक-सदाचारीही असेल आणि इब्राहीमच्या दीन-धर्माचे अनुसरण केलेला असेल जे एकाग्र होते आणि इब्राहीमला अल्लाहने आपला मित्र बनविले आहे.
१२६. आणि जे काही आकाशांमध्ये, आणि जमिनीवर आहे, सर्व अल्लाहचेच आहे आणि अल्लाहने प्रत्येक चीज-वस्तूला आपल्या घेऱ्यात घेतले आहे.
१२७. ते लोक स्त्रियांबाबत तुम्हाला विचारतात. तुम्ही त्यांना सांगा की स्वतः अल्लाह तुम्हाला त्यांच्याविषयी आदेश देतो आणि जे काही ग्रंथात (कुरआनात) तुमच्यासमोर वाचले जाते, त्या अनाथ स्त्रियां (मुलीं) विषयी, ज्यांना तुम्ही त्यांचा अनिवार्य हक्क देत नाही आणि त्यांच्याशी विवाह करू इच्छिता आणि कमजोर मुलांविषयी आणि हे की तुम्ही अनाथांबाबत न्याय करा आणि तुम्ही जेदेखील सत्कर्म कराल अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणणारा आहे.
१२८. आणि जर एखाद्या पत्नीला आपल्या पतीकडून उपेक्षा आणि दुर्लक्ष होण्याचे भय असेल तर त्या दोघांनी आपसात समझोता करून घेण्यात काही वाईट नाही आणि समझोता अधिक चांगला आहे आणि लोभ तर प्रत्येक मनात समाविष्ट केला गेला आहे आणि जर तुम्ही उपकार कराल आणि अल्लाहचे भय राखून आचरण अंगिकाराल तर अल्लाह तुमच्या प्रत्येक कर्माला जाणून आहे.
१२९. आणि तुम्ही मनापासून इच्छा केली तरीही पत्नींच्या दरम्यान कधीही न्याय करू शकणार नाहीत. यास्तव तुम्ही (एकीच्याचकडे) पूर्णपणे न झुकावे की दुसरीला अधर लोंबकळत सोडून द्यावे आणि जर तुम्ही सुधारणा करून घ्याल, आणि (अन्याय करण्यापासून) स्वतःला वाचवाल तर खात्रीने अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.
१३०. आणि जर दोन्ही विभक्त झाले तर अल्लाह आपल्या दया-कृपेने दोघांना निःस्पृह (बेपर्वा) करील आणि अल्लाह मोठा व्यापकता राखणारा हिकमत बाळगणारा आहे.
१३१. आणि आकाशांचे व जमिनीचे सर्व काही अल्लाहचेच आहे आणि आम्ही तुमच्या पूर्वीचे लोक, ज्यांना ग्रंथ दिला गेला होता, त्यांना आणि तुम्हाला हाच आदेश दिला की अल्लाहचे भय राखा आणि जर तुम्ही मानले नाही तर निःसंशय जे काही आकाशांमध्ये व जमिनीवर आहे सर्व अल्लाहचेच आहे आणि अल्लाह कोणाची गरज नसलेला, प्रशंसनीय आहे.
१३२. आणि जे काही आकाशांमध्ये व जमिनीवर आहे, सर्व अल्लाहचेच आहे आणि कार्य तडीस नेण्यास अल्लाह पुरेसा आहे.
१३३. लोकांनो! जर अल्लाहने इच्छिले तर तुम्हाला सर्वांना हटवून देईल, आणि दुसऱ्यांना आणील आणि अल्लाह असे करण्यास पूर्णतः समर्थ आहे.
१३४. जो मनुष्य या जगाचा मोबदला इच्छित असेल तर (लक्षात ठेवा की) अल्लाहजवळ या जगाचा व आखिरतचा (दोघांचाही) मोबदला हजर आहे आणि अल्लाह ऐकणारा व पाहणारा आहे.
१३५. हे ईमान राखणाऱ्यांनो! न्यायावर मजबूतीने कायम राहणारे आणि अल्लाहकरिता खरी साक्ष देणारे बना, मग तो साक्ष स्वतः तुमच्याविरूद्ध आणि तुमचे माता-पिता व नातेवाईकांच्या विरूद्ध का असेना, मग तो मनुष्य धनवान असो किंवा गरीब असो तर त्या दोघांपेक्षा अल्लाहचे नाते खूप (जवळचे) आहे. यास्तव न्याय करण्यात मनाला वाटेल ते करू नका, आणि जर चुकीचे निवेदन द्याल किंवा न मानाल तर (जाणून असा की) अल्लाह तुमच्या प्रत्येक कर्माला जाणून आहे.
१३६. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाह आणि त्याचे पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) आणि त्या ग्रंथा (पवित्र कुरआन) वर जो त्याने आपले पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्यावर अवतरीत केला आहे आणि त्या ग्रंथांवर जे यापूर्वी अवतरीत केले गेले, ईमान राखा आणि जो अल्लाह आणि त्याच्या फरिश्त्यांना आणि त्याच्या ग्रंथांना, त्याच्या पैगंबरांना आणि कयामतच्या दिवसाला न मानेल तो वाट चुकून दूर गेला.
१३७. निःसंशय, ज्यांनी ईमान राखले मग इन्कार केला, पुन्हा ईमान राखले मग इन्कार केला, इन्कार करण्यात पुढेच जात राहिले, अल्लाह त्यांना कदापि माफ करणार नाही आणि ना सरळ मार्ग दाखविल.
१३८. मुनाफिक लोकांना (वरकरणी मुसलमानांना) दुःखदायक शिक्षा-यातनेचा शुभ-समाचार द्या.
१३९. जे ईमानधारकांना सोडून इन्कारी लोकांना आपला मित्र बनवितात काय ते त्यांच्याशी दोस्ती करून मान-प्रतिष्ठा मिळवू इच्छितात? (लक्षात ठेवा) सर्व मान-प्रतिष्ठा अल्लाहकरिता आहे.
१४०. आणि अल्लाहने तुमच्यासाठी आपल्या ग्रंथात (पवित्र कुरआनात) हा आदेश उतरविला आहे की जेव्हा तुम्ही अल्लाहच्या आयतींशी इन्कार आणि थट्टा-मस्करी होत असल्याचे ऐकाल तेव्हा त्यांच्यासोबत त्या बैठकीत बसू नका जोपर्यंत ते दुसऱ्या गोष्टीवर बोलत नाहीत कारण त्या वेळी तुम्ही त्यांच्यासमान ठराल. निःसंशय अल्लाह, मुनाफिकांना आणि इन्कारी लोकांना जहन्नममध्ये एकत्र करणार आहे.
१४१. जे तुमच्या बाबतीत प्रतिक्षा करतात, मग जर अल्लाहतर्फे तुमचा विजय असेल तर हे म्हणतात की, काय आम्ही तुमच्यासोबत नव्हतो? आणि जर काफिर लोकांना थोडीशीही सफलता मिळाली तर म्हणतात की, काय आम्ही तुम्हाला (रक्षणआसाठी) घेरा टाकला नव्हता, आणि ईमानधारकांपासून तुमचा बचाव केला नव्हता? तेव्हा, कयामतच्या दिवशी अल्लाहच तुमच्या दरम्यान फैसला करील आणि अल्लाह कधीही काफिरांना (इन्कारी लोकांना) ईमानधारकांवर वर्चस्वशाली होऊ देणार नाही.
१४२. निःसंशय, मुनाफिक (दुतोंडी) लोक अल्लाहशी कपट करीत आहेत, आणि अल्लाह त्यांना त्या कपटनीतीचा मोबदला देणार आहे आणि जेव्हा नमाजसाठी उभे राहतात तर केवळ लोकांना दाखविण्यासाठी आणि अल्लाहचे स्मरण फार कमी करतात.
१४३. ते मधल्यामधेच (शंका-संशयाच्या) दुविधापूर्ण अवस्थेत आहेत ना पूर्णपणे त्यांच्या बाजूला आणि ना उचितरित्या यांच्या बाजूला, आणि ज्याला अल्लाह सरळ मार्गापासून दूर करील, तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणताही मार्ग आढळणार नाही.
१४४. हे ईमान राखणाऱ्यांनो! ईमानधारकांना सोडून इन्कारी लोकांना आपला मित्र बनवू नका. काय तुम्ही असे इच्छिता की आपल्यावर अल्लाहतर्फे (शिक्षेचे) खुले प्रमाण कायम करून घ्यावे?
१४५. निःसंशय, मुनाफिक लोक तर जहन्नमच्या सर्वांत खालच्या दर्जात जातील. निश्चितच तुम्हाला त्यांचा कोणताही मदत करणारा आढळणार नाही.
१४६. परंतु जर माफी मागतील आणि आपले आचरण सुधारतील आणि अल्लाहवर पूर्ण ईमान राखतील आणि प्रामाणिकपणे अल्लाहकरिताच दीन-धर्माचे कार्य करतील तर हे लोक ईमानधारकांच्या सोबत आहेत. अल्लाह ईमान राखणाऱ्यांना फार मोठा मोबदला प्रदान करील.
१४७. अल्लाह तुम्हाला शिक्षा-यातना देऊन काय करील जर तुम्ही कृतज्ञशील राहाल आणि ईमानासह राहाल आणि अल्लाह फार कदर करणारा आणि सर्व काही जाणणारा आहे.
१४८. उंच स्वरात वाईट गोष्ट जाहीर करणे अल्लाहला पसंत नाही, तथापि अत्याचारपीडिताला याची मुभा आहे, आणि अल्लाह ऐकणारा व जाणणारा आहे.
१४९. जर तुम्ही एखादे सत्कर्म उघडपणे करा किंवा लपवून करा अथवा एखाद्या वाईट गोष्टीला माफ कराल तर निःसंशय अल्लाह माफ करणारा, सामर्थ्यशाली आहे.
१५०. जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांवर ईमान राखत नाहीत आणि असे इच्छितात की अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांच्या दरम्यान दुरावा निर्माण करावा आणि म्हणतात की आम्ही काहींना मानतो आणि काहींना मानत नाही. आणि याच्या दरम्यान एक वेगळा मार्ग काढू इच्छितात.
१५१. निःसंशय, हे सर्व लोक पक्के काफिर आहेत१ आणि अशा इन्कारी लोकांसाठी आम्ही अतिशय कठोर शिक्षा-यातना तयार करून ठेवली आहे.
____________________
(१) ग्रंथधारकांविषयी यापूर्वी हे सांगितले गेले की ते काही पैगंबरांना मान्य करीत, तर काहींना मानत नसत. उदा. यहूदी लोक पैगंबर ईसा आणि हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना मानत नाहीत आणि ख्रिश्चन लोक हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमयांना मान्य करीत नाही. सर्वश्रेष्ठ अल्लाहने फर्माविले की पैगंबरांच्या दरम्यान फरक करणारे कट्टर काफिर आहेत.
१५२. आणि ज्या लोकांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांवर ईमान राखले, आणि त्यांच्यापैकी कोणाच्या दरम्यान फरक केला नाही, तर अशाच लोकांना अल्लाह त्यांचा पुरेपूर मोबदला देईल आणि अल्लाह मोठा माफ करणारा दया करणारा आहे.
१५३. (हे पैगंबर!) ग्रंथधारक तुमच्याजवळ अशी मागणी करतात की तुम्ही त्यांच्यावर आकाशातून एखादा ग्रंथ उतरवून दाखवा १ तेव्हा त्यांनी मूसाकडे यापेक्षा मोठी मागणी केली होती आणि म्हटले की आम्हाला स्पष्टपणे अल्लाहला दाखवा. मग त्यांना त्यांच्या या अत्याचारामुळे विजेने येऊन घेरले, मग त्यांनी स्पष्ट निशाण्या येऊन पोहचल्यावरही वासराला उपास्य बनविले. तरीही आम्ही त्यांना माफ केले आणि मूसा यांना स्पष्ट प्रमाण प्रदान केले.
____________________
(१) अर्थात ज्याप्रमाणे हजरत मूसा (अलैहिस्सलाम) तूर पर्वतावर गेले आणि येताना शिळांवर लिहिलेला तौरात घेऊन आले. त्याचप्रमाणे तुम्ही आकाशात जाऊन लिखित स्वरूपात पवित्र कुरआन घेऊन या. अर्थात ही मागणी केवळ उपद्रव, इन्कार आणि द्वेष मस्तरावर आधारीत होती.
१५४. आणि त्यांच्याकडून वचन घेण्याकरिता, आम्ही तूर पर्वताला त्यांच्यावर अधांतरीत ठेवले आणि त्यांना आदेश दिला की सजदा करीत दरवाज्यात प्रवेश करा आणि हाही आदेश दिला की शनिवारच्या दिवशी उल्लंघन करून नका आणि आम्ही त्यांच्याकडून अगदी पक्का वायदा घेतला.
१५५. मग त्यांनी आमच्याशी जो वायदा केला होता, त्यापासून मुकरले आणि अल्लाहच्या आयतींचा इन्कार करू लागले, येथपर्यंत की अल्लाहच्या पैगंबरांना नाहक ठार मारले आणि असेही म्हणू लागले होते की आमची मने आवरणाखाली आहेत, (असे नाही) किंबहुना अल्लाहने त्यांच्या इन्कार करण्यापायी त्यांच्या हृदयांना मोहरबंद केले आहे. तेव्हा त्यांच्यापैकी फार थोडेच लोक ईमान राखतात.
१५६. आणि त्यांच्या इन्कार करण्यामुळे आणि मरियमवर मिथ्या आरोप ठेवण्यामुळे.
१५७. आणि त्यांच्या या कथनामुळे की आम्ही मरियमचे पुत्र ईसा मसीहची हत्या करून टाकली, जे अल्लाहचे पैगंबर होते, वास्तविक ना तर त्यांनी हत्या केली, ना त्यांना सूळावर चढविले, परंतु त्यांच्यासाठी ईसाची छबी बनविली गेली१ निश्चितच ईसा यांच्याविषयी मतभेद करणारे संशयात पडले आहेत. केवळ अटकळीच्या गोष्टीवर चालण्याखेरीज त्यांना कसलेही ज्ञान नाही. एवढे निश्चित की त्यांचा वध केला गेला नाही.
____________________
(१) अर्थात जेव्हा हजरत ईसा यांना यहूद्यांच्या कटाची बातमी कळाली तेव्हा त्यांनी आपल्या अनुयायींना, ज्यांची संख्या १२ किंवा १७ होती, जमा केले आणि फर्माविले की तुमच्यापैकी कोण माझ्या जागी बलिदान देण्यास तयार आहे? यासाठी की अल्लाहने त्याचे स्वरूप अगदी माझ्यासारखे बनवावे. एक तरुण यासाठी तयार झाला, म्हणून हजरत ईसा यांना तेथून आकाशात उचलले गेले, त्यानंतर यहूदी आले आणि त्यांनी या तरुणाला सूळावर चढविले, ज्याला ईसासारखे बनविले गेले होते. यहूदी हेच समजत राहिले की आम्ही हजरत ईसा यांना सूळावर चढविले. वास्तविक हजरत ईसा त्याच क्षणी तिथे हजर नव्हतेच. त्यांना तर जिवंत अवस्थेत सशरीर आकाशात उचलले गेले होते. (इब्ने कसीर आणि फतहुल कदीर)
१५८. किंबहुना अल्लाहने त्यांना आपल्याकडे उचलून घेतले आणि अल्लाह जबरदस्त हिकमत बाळगणारा आहे.
१५९. ग्रंथधारकांपैकी कोणी असा नसेल जो (हजरत) ईसा यांच्या मृत्युपूर्वी त्यांच्यावर ईमान न राखेल, आणि कयामतच्या दिवशी ते त्यांच्यावर साक्षी राहतील.
१६०. यहूदी लोकांच्या जुलूम-अत्याचारामुळे आम्ही त्यांच्यावर हलाल (वैध) चीज वस्तूंना, हराम (अवैध) करून टाकले आणि त्यांचे अल्लाहच्या मार्गापासून लोकांना अडवण्यामुळे.
१६१. आणि त्यांच्या व्याज घेण्यामुळे, ज्यापासून त्यांना रोखले गेले होते, आणि लोकांचा माल (धन-दौलत) नाहक हडप केल्यामुळे, आणि आम्ही यांच्यातल्या काफिरांकरिता दुःखदायक शिक्षा-यातना तयार करून ठेवली आहे.
१६२. परंतु त्यांच्यात जे परिपक्व आणि मजबूत ज्ञान राखणारे आहेत, आणि ईमानधारक आहेत, जे त्यावर ईमान राखतात, जे तुमच्याकडे उतरविले गेले, आणि जे तुमच्यापूर्वी उतरविले गेले आणि नमाज कायम करणारे आहेत, जकात अदा करणारे आहेत, अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखणारे आहेत. हे असे लोक आहेत, ज्यांना आम्ही फार मोठा मोबदला प्रदान करू.
१६३. निःसंशय, आम्ही तुमच्याकडे त्याचप्रमाणे संदेश अवतरीत केला आहे, ज्याप्रमाणे नूह (अलैहिस्सलाम) आणि त्यांच्या नंतरच्या पैगंबरांकडे आम्ही संदेश अवतरीत केला, आणि इब्राहीम आणि इस्माईल आणि इसहाक आणि याकूब आणि त्यांच्या संततीवर आणि ईसा व अय्यूब आणि यूनुस आणि हारुन आणि सुलेमान यांच्याकडे आणि आम्ही दाऊद (अलैहिस्सलाम) यांना जबूर (ग्रंथ) प्रदान केला.
१६४. आणि तुमच्या पूर्वीच्या अनेक पैगंबरांचे वृत्तांत आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, आणि बहुतेक पैगंबरांचे सांगितले नाहीत आणि (हजरत) मूसा यांच्याशी अल्लाहने सरळ संभाषण केले.
१६५. (आम्ही या सर्वांना) शुभ वार्ता देणारा आणि सचेत करणारा रसूल (पैगंबर) बनविले, यासाठी की पैगंबरांना पाठविल्यानंतर लोकांना एखादे निमित्त वा सबब अल्लाहपुढे मांडण्याची संधी राहू नये आणि अल्लाह मोठा जबरदस्त आणि हिकमतशाली आहे.
१६६. जे काही तुमच्याकडे उतरविले गेले आहे, त्याविषयी अल्लाह स्वतः साक्ष देतो की ते त्याने आपल्या ज्ञानाने अवतरीत केले आहे आणि फरिश्तेदेखील साक्ष देतात आणि साक्ष देण्यास केवळ अल्लाह पुरेसा आहे.
१६७. निःसंशय, ज्यांनी इन्कार केला आणि अल्लाहच्या मार्गा (दीन-धर्मा) पासून रोखले, तर ते खूप दूर भटकले.
१६८. निःसंशय, ज्यांनी इन्कार केला आणि जुलूम-अत्याचार केला तर अल्लाह त्यांना माफ करणारा नाही आणि ना त्यांना एखादा सन्मार्ग दाखवील.
१६९. परंतु जहन्नमचा मार्ग, ज्यात ते सदासर्वदा राहतील आणि हे अल्लाहकरिता फार सोपे आहे.
१७०. लोक हो! तुमच्याजवळ तुमच्या पालनकर्त्यातर्फे सत्य घेऊन पैगंबर (मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) आले. त्यांच्यावर ईमान राखा. तुमच्यासाठी अधिक चांगले आहे आणि जर तुम्ही इन्कार केला तर आकाशांमध्ये व धरतीवर जे काही आहे सर्व अल्लाहचेच आहे आणि अल्लाह सर्वज्ञ आणि हिकमतशाली आहे.
१७१. हे ग्रंथधारकांनो! आपल्या दीन-धर्माबाबत अतिशयोक्ती करू नका, आणि अल्लाहच्या संबंधाने सत्य तेच बोला. निःसंशय मरियमपुत्र ईसा मसीह केवळ अल्लाहचे रसूल आणि कलिमा आहे जो मरियमकडे पाठविला गेला आणि त्याच्यातर्फे आत्मा आहे, यास्तव अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांवर ईमान राखा आणि अल्लाह तीन आहे असे म्हणू नका.१ हे म्हणणे थांबवा यातच तुमचे हित आहे. निःसंशय तुमचा उपास्य केवळ एक अल्लाह आहे. तो पाक-पवित्र आहे, यापासून की त्याची एखादी संतान असावी. त्याच्याचकरिता आहे जे काही आकाशांमध्ये व धरतीवर आहे आणि अल्लाह काम बनविण्यासाठी पुरेसा आहे.
____________________
(१) ख्रिश्चनांमध्ये अनेक गट आहेत. काहीजण हजरत ईसा यांना अल्लाह, काहीजण अल्लाहचे सहभागी तर काही अल्लाहचा पुत्र मानतात, मग जे अल्लाह मानतात ते तीन अल्लाहचे आणि हजरत ईसा यांना तीनपैकी एक असण्यावर श्रद्धा ठेवतात. यास्तव सर्वश्रेष्ठ अल्लाह फर्मावितो की तीन अल्लाह म्हणणे थांबवा. अल्लाह केवळ एक आहे.
१७२. मसीह, अल्लाहचे दास होण्यात कधीही तिरस्कार करीत नाहीत आणि ना निकटचे फरिश्ते, आणि जो अल्लाहची उपासना करण्यापासून तिरस्कार व घमेंड करील तर तो त्या सर्वांना आपल्याकडे एकत्र करील.
१७३. तेव्हा, ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले, त्यांना त्यांचा पुरेपूर मोबदला देईल, आणि आपल्या कृपेने आणखी जास्त प्रदान करील, परंतु ज्यांनी तिरस्कार केला आणि घमेंड केली त्यांना दुःखदायक शिक्षा-यातना देईल, मग त्यांना अल्लाहशिवाय आपला कोणी मित्र व मदत करणारा आढळणार नाही.
१७४. लोकांनो! तुमच्याजवळ तुमच्या पालनकर्त्यातर्फे प्रमाण येऊन पोहचले आहे १ आणि आम्ही तुमच्याकडे दिव्य तेज (पवित्र कुरआन) अवतरीत केले आहे.
____________________
(१) मूळ शब्द बुरहान अर्थात असे अकाट्य प्रमाण की ज्याच्यानंतर कसल्याही निमित्त किंवा बहाण्याला वाव न राहावा. अशी उपाययोजना की ज्यामुळे सर्व प्रकारच्या शंका-कुशंका नष्ट व्हाव्यात यास्तव पुढे याला आकाशीय दिव्य तेज (नूर) म्हटले गेले आहे.
१७५. मग ज्या लोकांनी अल्लाहवर ईमान राखले आणि त्याला मजबूतपणे धरले तर अल्लाह त्यांना आपल्या कृपाछत्रात घेईल आणि त्यांना आपल्याकडे येण्याचा सरळ मार्ग दाखवील.
१७६. ते तुम्हाला कलालाविषयी (अर्थात आई-बाप आणि संतती नसलेल्या मयताविषयी) विचारतात. तुम्ही सांगा, अल्लाह कलालाविषयी आदेश देतो की जर एखादा पुरुष मरण पावेल आणि त्याच्या वारसांमध्ये कोणी संतान नसेल आणि त्याला एक बहीण असेल तर तिच्यासाठी मयताने मागे सोडलेल्या धन-संपत्तीचा अर्धा हिस्सा आहे आणि तो त्या (बहिणी) चा वारस आहे. जर त्याला एखादी संतती नसेल, जर दोन बहिणी असतील तर त्या दोघींसाठी दोन तृतियांश हिस्सा आहे. त्यातून जे तो सोडून गेला. आणि जर भाऊ बहिणी दोन्ही असतील पुरुषही आणि स्त्रियाही तर पुरुषाकरिता, दोन स्त्रियांच्या हिश्याइतका हिस्सा आहे. अल्लाह तुमच्यासाठी स्पष्ट सांगत आहे, यासाठी की तुम्ही (इतस्ततः) भटकत फिरू नये आणि अल्लाह सर्व काही जाणणारा आहे.
Icon