ترجمة معاني سورة الرّوم
باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية
.
من تأليف:
محمد شفيع أنصاري
.
ﰡ
३. जवळच्या प्रदेशात आणि ते पराजित झाल्यानंतर भविष्यात वर्चस्वशाली होतील.
४. काही वर्षांच्या आतच, याच्यापूर्वी आणि यानंतरही अधिकार फक्त अल्लाहचाच आहे, आणि त्या दिवशी ईमान राखणारे खूश होतील.
५. अल्लाहच्या मदतीने तो ज्याला इच्छितो मदत करतो, आणि खरा विजेता आणि वर्चस्वशाली आणि दयावान तोच आहे.
६. अल्लाहचा वायदा आहे. अल्लाह आपल्या वायद्यांचा भंग करीत नाही, परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत.
७. ते तर (फक्त) ऐहिक जीवनाच्या बाह्य स्वरूपालाच जाणतात. आणि आखिरतपासून तर अगदी गाफील आहेत.
८. काय त्या लोकांनी आपल्या मनात यावर विचार नाही केला की अल्लाह ने आकाशांना व जमिनीला आणि त्यांच्या दरम्यान जे काही आहे त्या सर्वांना उत्तम अनुमानाने,१ निर्धारित वेळेपर्यंत (च) निर्माण केले आहे, तथापि अधिकांश लोक आपल्या पालनकर्त्याच्या भेटीचा इन्कार करतात.
____________________
(१) किंवा एक उद्देश आणि सत्यासह निर्माण केले आहे, व्यर्थ नाही आणि तो उद्देश हा की नेक सदाचारी लोकांना सत्कर्मांचा मोबदला आणि दुराचारी लोकांना त्यांच्या दुष्कर्मांची शिक्षा दिली जावी, म्हणजे, काय ते आपल्या अस्तित्वावर विचार चिंतन करीत नाही की कशा प्रकारे त्याला तुच्छतेपासून उच्चता प्रदान केली आणि पाण्याच्या एका तुच्छ थेंबापासून त्याची रचना केली, मग आकाश व जमिनीला एका खास हेतुसाठी लांब रुंद केले. याखेरीज त्या सर्वांसाठी एक निर्धारित वेळ ठरवली, अर्थात कयामतचा दिवस, ज्या दिवशी हे सर्व काही समाप्त होईल. याचा अर्थ असा की जर यांनी या सर्व गोष्टींवर विचार केला असता तर निश्चितपणे अल्लाहचे अस्तित्व, तो रब (स्वामी व पालनकर्ता) असण्याची आणि उपासनायोग्य असण्याची आणि त्याच्या असीम सामर्थ्याची त्यांना जाणीव झाली असती, त्यांना तसे ज्ञान लाभले असते आणि उत्स्फूर्तपणे त्यांनी ईमान राखले असते.
९. काय त्यांनी जमिनीवर हिंडून फिरून पाहिले नाही की त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांचा परिणाम (अंत) कसा (वाईट) झाला? ते यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली होते आणि त्यांनी देखील जमीन पेरली-नांगरली होती आणि यांच्यापेक्षा जास्त आबादी केली होती. आणि त्यांच्याजवळ त्यांचे रसूल (पैगंबर) ईश-चमत्कार (मोजिजे) घेऊन आले होते. हे तर अशक्य होते की अल्लाहने त्यांच्यावर जुलूम अत्याचार केला असता. परंतु (खरे पाहता) ते स्वतः आपल्या प्राणांवर अत्याचार करीत होते.
१०. मग शेवटी वाईट लोकांची परिणीती वाईट झाली, यासाठी की ते अल्लाहच्या आयतींना खोटे ठरवीत आणि त्यांची थट्टा उडवीत.
११. अल्लाहच सृष्टी-निर्मितीचा आरंभ करतो, मग तोच तिला दुसऱ्यांदा निर्माण करील, मग तुम्ही सर्व त्याच्याचकडे परतविले जाल.
१२. आणि ज्या दिवशी कयामत प्रस्थापित होईल, त्या दिवशी अपराधी आश्चर्यचकित होतील.
१३. आणि त्यांनी ठरविलेल्या सर्व सहभाग्यांपैकी एकही त्यांची शिफारस करणार नाही.१ आणि स्वतः हेदेखील आपल्या आराध्य दैवतांचा (सहभागी ईश्वरांचा) इन्कार करतील.
____________________
(१) सहभाग्यांशी अभिप्रेत त्या काल्पनिक (मिथ्या) देवता होत, ज्यांची त्यांचे उपासक या श्रद्धाने पूजा करत होते की हे अल्लाहजवळ आमची शिफारस करतील आणि आम्हाला अल्लाहच्या अज़ाबपासून वाचवतील. परंतु इथे अल्लाहने हे स्पष्ट केले की अल्लाहसोबत दुसऱ्यांनाही ईश्वर ठरविणाऱ्यांकरिता, अल्लाहच्या ठिकाणी, कोणीही शिफारस करणार नसेल.
१४. आणि ज्या दिवशी कयामत प्रस्थापित होईल, त्या दिवशी (सर्व समूह) विभागले जातील.
१५. मग जे ईमान बाळगून सत्कर्म करीत राहतील, त्यांना जन्नतमध्ये खूश केले जाईल.
१६. आणि ज्यांनी (कुप्र) इन्कार केला होता, आणि आमच्या आयतींना व आखिरतच्या भेटीला खोटे ठरविले होते, त्या सर्वांना शिक्षा - यातनाग्रस्त करून हजर केले जाईल.
१७. तेव्हा अल्लाहची स्तुती-प्रशंसा करीत राहा, जेव्हा तुम्ही संध्याकाळ कराल आणि जेव्हा सकाळ कराल.
१८. आणि सर्व स्तुती- प्रशंसेस योग्य, आकाशात व जमिनीवर तोच आहे तिसऱ्या प्रहरी आणि दुपारच्या वेळीही त्याची पवित्रता वर्णन करा.
१९. तोच जिविताला मेलेल्यातून बाहेर काढतो आणि मेलेल्यास, जिवितातून बाहेर काढतो, आणि तोच जमिनीला तिच्या मृत्यूनंतर जिवंत करतो. अशाच प्रकारे तुम्ही (देखील) बाहेर काढले जाल.
२०. आणि अल्लाहच्या निशाण्यांपैकी आहे की तुम्हाला मातीपासून निर्माण केले, मग आता मनुष्य बनून (चालत फिरत) पसरत आहात.
२१. आणि त्याच्या निशाण्यांपैकी आहे की तुमच्याच (मानव) जातीमधून पत्न्या निर्माण केल्या, यासाठी की तुम्ही त्यांच्यापासून सुख शांती प्राप्त करावी. त्याने तुमच्या दरम्यान प्रेम आणि करुणा निर्माण केली. निःसंशय, विचार चिंतन करणाऱ्यांकरिता यात अनेक निशाण्या आहेत.
२२. आणि त्याच्या सामर्थ्याच्या निशाण्यांपैकी आकाशांची व जमिनीची निर्मिती, आणि तुमच्या भाषा आणि वर्णांची विभिन्नता (देखील) होय. बुद्धिमानांकरिता निश्चितच यात मोठ्या निशाण्या आहेत.
२३. आणि त्याच्या सामर्थ्याचा निशाण्यांपैकी तुमच्या रात्र आणि दिवसाच्या झोपेत आहे आणि त्याच्या कृपेला (अर्थात आजिविकेला) तुमचे शोधणे (ही) आहे. जे लोक कान लावून (लक्षपूर्वक) ऐकणारे आहेत, त्यांच्यासाठी यात मोठ्या निशाण्या आहेत.
२४. आणि त्याच्या निशाण्यांपैकी एक निशाणी ही देखील आहे की तो तुम्हाला भयभीत व आशावान बनविण्याकरिता विजेची चमक दाखवितो, आणि आकाशातून पाणी वर्षवितो आणि त्याद्वारे मृत जमिनीला जिवंत करतो. यात देखील बुद्धिमान लोकांकरिता मोठ्या निशाण्या आहेत.
२५. आणि त्याची एक निशाणी ही देखील आहे की आकाश आणि धरती त्याच्या आदेशाने कायम आहेत, मग जेव्हा तो तुम्हाला हाक मारेल, केवळ एक वेळच्या पुकारण्यानेच तुम्ही सर्व जमिनीतून बाहेर पडाल.
२६. आणि आकाश व धरतीच्या समस्त वस्तूंचा तोच स्वामी (मालक) आहे आणि सर्वच्या सर्व त्याच्या हुकुमाच्या अधीन आहेत.
२७. आणि तोच आहे जो पहिल्यांदा सृष्टी निर्माण करतो, तोच पुन्हा दुसऱ्यांदा निर्माण करील आणि हे त्याच्याकरिता फारच सोपे आहे. त्याचीच उत्तम आणि उच्च गुणविशेषता आहे१ आकाशांमध्ये आणि धरतीतही. तो मोठा जबरदस्त बुद्धिकौशल्य (हिकमत) बाळगणारा आहे.
____________________
(१) अर्थात एवढ्या गुणांनी व असीम सामर्थ्याने युक्त स्वामी, सर्व उपमांपेक्षा महान आणि उच्चतम आहे. तो अतुलनीय आहे. (सूरह शूरा-११)
२८. अल्लाहने एक उदाहरण स्वतः तुमचेच सांगितले. जे काही आम्ही तुम्हाला प्रदान केले आहे, काय त्यात तुमच्या दासांपैकी कोणी तुमचा भागीदार आहे की तुम्ही आणि तो यात समान पदाचे असावेत? १ आणि तुम्ही त्याचे भय अशा प्रकारे राखता, जसे स्वतः आपल्या लोकांचे? आम्ही बुद्धिमानांकरिता अशाच प्रकारे स्पष्टतः आयती निवेदन करतो.
____________________
(१) अर्थात ज्याअर्थी तुम्हाला हे पसंत नाही की तुमचे नोकर चाकर, जे तुमच्यासारखे माणूस आहेत ते तुमच्या संपत्तीचे भागीदार व तुमच्या समान व्हावेत, मग हे कसे असू शकते की अल्लाहचे दास, मग ते फरिश्ते असोत, पैगंबर असोत, औलिया असोत, किंवा दगड मातीचे बनविलेले देवता असोत, ते अल्लाहचे सहभागी व्हावेत, वस्तूतः तेही अल्लाहचे दास आहेत आणि त्याची निर्मिती आहे. यास्तव ज्याप्रमाणे पहिली गोष्ट अशक्य तर दुसरीही अशक्य. म्हणून अल्लाहसोबत दुसऱ्यांची उपासना करणे आणि त्यांनाही कष्टनिवारक व संकटविमोचक समजणे नितांत चुकीचे आहे.
२९. खरी गोष्ट अशी की हे अत्याचारी ज्ञानाविना इच्छा-आकांक्षांचे भक्त आहेत, त्याला कोण मार्ग दाखविल ज्याला अल्लाह पथभ्रष्ट करील? त्यांना कोणी एकही मदत करणारा नाही.
३०. तेव्हा तुम्ही एकाग्रचित्त होऊन आपला चेहरा दीन (धर्मा) कडे केंद्रित करा. अल्लाहचा तो स्वाभाविक (धर्म) ज्यावर त्याने लोकांना निर्माण केले आहे. अल्लाहच्या रचनेत परिवर्तन नाही. हाच खरा दीन (धर्म) आहे. परंतु अधिकांश लोक समजत नाहीत.
३१. (लोकांनो!) अल्लाहकडे आकर्षित होऊन त्याचे भय बाळगत राहा आणि नमाज कायम राखा आणि अनेक ईश्वरांची भक्ती करणाऱ्यांपैकी होऊ नका.
३२. त्या लोकांपैकी ज्यांनी आपल्या दीन (धर्मा) ला क्षत-विक्षत करून टाकले आणि स्वतःही समूहा-समूहात विभाजित झाले. प्रत्येक समूह आपल्याजवळ जे आहे, त्यातच मग्न आहे.
३३. आणि लोकांना जेव्हा एखादे दुःख पोहचते, तेव्हा आपल्या पालनकर्त्याकडे रुजू होऊन दुआ- प्रार्थना करू लागतात आणि जेव्हा तो आपल्यातर्फे दया-कृपेची गोडी चाखवितो, तेव्हा त्यांच्यातला एक गट आपल्या पालनकर्त्यासोबत दुसऱ्याला त्याचा सहभागी ठरवू लागतो.
३४. यासाठी की, जे काही आम्ही त्यांना प्रदान केले आहे कृतघ्नता दाखवावी. ठीक आहे. तुम्ही लाभ उचलून घ्या. फार लवकर तुम्हाला माहीत पडेल.
३५. काय आम्ही यांच्यावर एखादी सनद अवतरित केली आहे, जी त्यास निवेदिते, ज्यास हे अल्लाहसोबत सहभागी ठरवीत आहेत.
३६. आणि जेव्हा आम्ही लोकांना रहमत (दया-कृपे)ची गोडी चाखिवतो तेव्हा ते खूप आनंदित होतात आणि जर त्यांना आपल्या हातांच्या दुष्कर्मामुळे एखादे दुःख पोहचते, तेव्हा अचानक ते निराश होतात.
३७. काय त्यांनी हे नाही पाहिले की अल्लाह ज्याला इच्छितो भरपूर आजिविका (रोजी) देतो आणि ज्याला इच्छितो कमी. यातही त्या लोकांकरिता निशाण्या आहेत, जे ईमान राखतात.
३८. यास्तव जवळच्या नातेवाईकाला, गरीबाला, प्रवाशाला, प्रत्येकाला त्याचा हक्क द्या. हे त्यांच्यासाठी अधिक चांगले आहे जे अल्लाहच्या मुखाचे दर्शन घेऊ इच्छितात. असेच लोक मुक्ती प्राप्त करणारे आहेत.
३९. आणि तुम्ही जे काही व्याजाने देता की लोकांचे धन वाढत राहावे ते अल्लाहच्या येथे वाढत नाही आणि जे काही (सदका-दान आणि) जकात (कर्तव्य दान) तुम्ही अल्लाहचे मुख पाहण्या (मर्जी संपादण्या) करिता द्याल तर असेच लोक आपले (धन) वाढविणारे आहेत.
४०. अल्लाह तो आहे, ज्याने तुम्हाला निर्माण केले, मग आजिविका प्रदान केली, मग मृत्यु देईल, पुन्हा दुसऱ्यांदा जिवंत करील. आता सांगा, तुम्ही ठरविलेल्या (अल्लाहच्या) सहभागींपैकी एक तरी असा आहे जो या गोष्टींपैकी काहीतरी करू शकत असेल. अल्लाहकरिता पवित्रता आणि श्रेष्ठता आहे अशा त्या प्रत्येक सहभागीपेक्षा, ज्याला हे लोक मनाने रचून घेतात.
४१. खुष्की आणि पाण्यात लोकांच्या दुष्कर्मांमुळे उत्पात (फसाद) पसरला, यासाठी की त्यांना, त्यांच्या काही दुष्कर्मांचे फळ अल्लाहने चाखवावे. (फार) संभव आहे की त्यांनी (दुष्कर्म करणे) थांबवावे.
४२. तुम्ही सांगा, जरा जमिनीवर हिंडून फिरून पाहा तरी की पूर्वी होऊन गेलेल्या लोकांचा शेवट कसा झाला, ज्यांच्यात अधिकांश लोक अनेक ईश्वरांची पूजा करणारे होते.
४३. तेव्हा तुम्ही तुमचे तोंड त्या सरळ आणि सच्चा दीन (धर्मा) कडेच राखा, याआधी की तो दिवस यावा, ज्याचे परतणे अल्लाहतर्फे नाहीच. त्या दिवशी सर्व वेगवेगळे होतील.
४४. (सत्याचा) इन्कार करणाऱ्यांवर त्यांचा इन्कार ओढवेल, आणि सत्कर्म करणारे आपल्याच विश्रामगृहाला सुंदर बनवित आहेत.
४५. यासाठी की अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना फल प्रदान करावे. ज्याने ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिला तो काफिरांना दोस्त राखत नाही.
४६. आणि त्याच्या निशाण्यांपैकी शुभ समाचार देणाऱ्या वाऱ्यांना चालविणेही आहे, यासाठी की तुम्हाला आपल्या दया-कृपेची गोडी चाखवावी, आणि यासाठी की त्याच्या आदेशाने नौका चालवाव्यात आणि यासाठी की त्याच्या कृपेचा तुम्ही शोध घ्यावा, आणि यासाठी की तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी.
४७. आणि आम्ही तुमच्या पूर्वीही (आपल्या) पैगंबरांना त्यांच्या जनसमूहांकडे पाठविले, ते त्यांच्याजवळ प्रमाण (पुरावे) घेऊन आले, मग आम्ही तुमच्या अपराधांचा सूड (प्रतिशोध) घेतला. ईमान राखणाऱ्यांना मदत करणे आमच्यावर अनिवार्य आहे.
४८. तो अल्लाहच होय जो वारे वाहवितो, ते ढगांना उचलतात, मग अल्लाह आपल्या मर्जीने त्यांना आकाशात पसरवितो आणि त्यांचे तुकडे तुकडे करतो, मग तुम्ही पाहता की त्यांच्यातून (पाण्याचे) थेंब बाहेर पडतात आणि ज्यांना अल्लाह इच्छितो, त्या दासांवर तो पर्जन्यवृष्टी करतो तेव्हा ते खूप आनंदित होतात.
४९. आणि विश्वास करा की पाऊस त्यांच्यावर पडण्यापूर्वी ते निराश होत होते.
५०. तेव्हा तुम्ही अल्लाहच्या कृपा-चिन्हांना पाहा की जमिनीच्या मृत्युनंतर कशा प्रकारे अल्लाह तिला (पुन्हा) जिवंत करतो. निःसंशय, तोच मेलेल्यांना (पुनश्च) जिवंत करणारा आहे आणि तो प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे.
५१. आणि जर आम्ही वेगवान वारा वाहवू आणि हे लोक आपल्या शेतीला (कोमेजलेली) पिवळी पडलेली पाहतील तर मग त्यानंतर ते कृतघ्नता दाखवू लागतील.
५२. निःसंशय, तुम्ही मृतांना ऐकवू शकत नाही आणि ना बहिऱ्यांना (आपली) पुकार ऐकवू शकता, जेव्हा ते पाठ फिरवून वळले असतील.
५३. आणि ना तुम्ही आंधळ्यांना त्यांच्या मार्गभ्रष्टतेतून काढून मार्गदर्शन करणारे आहात. तुम्ही तर केवळ अशाच लोकांना ऐकवू शकता जे आमच्या आयतींवर ईमान राखतात आणि ते आज्ञाधारकही आहेत.
५४. अल्लाह तो आहे, ज्याने तुम्हाला कमजोर अवस्थेत निर्माण केले, मग त्या दुर्बलतेनंतर शक्ती-सामर्थ्य प्रदान केले, मग त्या शक्तीनंतर कमजोरी आणि म्हातारपण दिले. तो जे इच्छितो निर्माण करतो, तो सर्वांना चांगल्या प्रकारे जाणतो आणि सर्वांवर पूर्ण सामर्थ्य राखतो.
५५. आणि ज्या दिवशी कयामत येईल, अपराधी लोक शपथपूर्वक सांगतील की (जगात) एक क्षणाशिवाय जास्त राहिलो नाहीत. अशाच प्रकारे बहकलेलेच राहिले.
५६. आणि ज्या लोकांना ज्ञान आणि ईमान प्रदान केले गेले, ते उत्तर देतील की, तुम्ही तर जसे की अल्लाहच्या ग्रंथात आहे, कयामतच्या दिवसापर्यंत राहिलात. आजचा हा दिवस कयामतचाच दिवस आहे. परंतु तुम्ही तर विश्वासच ठेवत नव्हते.
५७. तेव्हा त्या दिवशी अत्याचारी लोकांना त्यांचे प्रमाण-पुरावे काहीच उपयोगी पडणार नाहीत आणि ना त्यांच्याकडून क्षमा-याचनेची मागणी केली जाईल, ना कर्म मागितले जाईल.
५८. आणि निःसंशय, आम्ही या कुरआनात लोकांसमोर सर्व उदाहरणे प्रस्तुत केली आहेत. तुम्ही त्यांच्याजवळ कोणतीही निशाणी आणाल तरी ते हेच म्हणतील की तुम्ही खोटे आहात.
५९. अल्लाह, त्या लोकांच्या हृदयांवर, जे समज बाळगत नाहीत, अशाच प्रकारे मोहर (सील) लावतो.
६०. यास्तव तुम्ही धीर-संयम राखा. निःसंशय, अल्लाहचा वायदा सच्चा आहे. तुम्हाला त्या लोकांनी हलके (अधीर) जाणू नये, जे विश्वास बाळगत नाहीत.