ترجمة معاني سورة الصف
باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية
.
من تأليف:
محمد شفيع أنصاري
.
ﰡ
१. आकाशांची आणि धरतीची प्रत्येक वस्तू अल्लाहच्या पवित्रतेचे गुणगान करते आणि तोच वर्चस्वशाली आणि हिकमत बाळगणारा आहे.
२. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही ती गोष्ट का सांगता, जी (स्वतः) करीत नाही.
३. तुम्ही जे करीत नाही ते बोलणे अल्लाहला नापसंत आहे.
४. निःसंशय, अल्लाह त्या लोकांना प्रिय राखतो, जे त्याच्या मार्गात पंक्तिबद्ध (रांगारांगांनी) होऊन जिहाद करतात, जणू ते शिसा पाजलेली इमारत होय.
५. आणि (स्मरण करा) जेव्हा मूसाने आपल्या समुदायाच्या लोकांना म्हटले की हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही मला क्लेश यातना का देत आहात, वास्तविक तुम्हाला चांगले माहीत आहे की मी तुमच्याकडे अल्लाहचा रसूल (पैगंबर) आहे. तर जेव्हा ते लोक वाकडेच राहिले तेव्हा अल्लाहने त्यांच्या हृदयांना आणखी वाकडे करून टाकले, आणि अल्लाह अवज्ञाकारी जनसमूहाला मार्ग दाखवित नाही.
६. आणि जेव्हा मरियमचे पुत्र ईसा म्हणाले, हे (माझ्या लोकांनो!) इस्राईलची संतती! मी तुम्हा सर्वांकडे अल्लाहचा रसूल (पैगंबर) आहे, माझ्या पूर्वीचा ग्रंथ तौरातचे समर्थन करणारा आहे आणि आपल्यानंतर येणाऱ्या एका पैगंबराची खूशखबर ऐकविणारा आहे, ज्यांचे नाव अहमद आहे. मग जेव्हा ते त्यांच्यासमोर स्पष्ट निशाण्या घेऊन आले, तेव्हा ते म्हणू लागले की ही तर उघड जादू आहे!
७. आणि त्या माणसाहून अधिक अत्याचारी कोण असेल, जो अल्लाहबद्दल असत्य रचेल? वास्तविक त्याला इस्लामकडे बोलाविले जाते. आणि अल्लाह अशा अत्याचारी लोकांना मार्गदर्शन करीत नाही.
८. अल्लाहच्या दिव्य तेजाला (नूरला) ते आपल्या फुंकीन विझवू इच्छितात. आणि अल्लाह आपले दिव्य तेच उच्च पदांपर्यंत घेऊन जाणारा आहे, मग इन्कार करणाऱ्या (काफिरांना) कितीही वाईट वाटो.
९. तोच आहे ज्याने आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सत्य धर्म देऊन पाठविले, यासाठी की त्यास अन्य सर्व धर्मांवर वर्चस्वशाली करावे, मग अनेक ईश्वरांची भक्ती-उपासना करणाऱ्यांना कितीही अप्रिय वाटो.
१०. हे ईमान राखणाऱ्यांनो! काय मी तुम्हाला तो व्यापार दाखवू जो तुम्हाला कष्ट यातनादायक शिक्षा-यातनेपासून वाचविल.१
____________________
(१) हे कर्म (अर्थात ईमान राखणे व जिहाद करणे) व्यापार या अर्थाने घेतले आहे, कारण याच्यातही त्यांना व्यापारासारखा लाभ होईल आणि तो लाभ कोणता आहे? जन्नतमध्ये प्रवेश आणि जहन्नमपासून मुक्ती. तेव्हा याहून मोठा लाभ आणखी काय असेल? याच गोष्टीला दुसऱ्या एका ठिकाणी अशा प्रकारे सांगितले गेले आहे- ‘इन्नल्लाहस्तरा मिनल्मुअ्मिनीन अ््न्फ़ुसहुम् व अम्वालहुम् बिअन्न लहुमुल्जन्नत.’ ‘‘अल्लाहने ईमान राखणाऱ्यांशी त्यांच्या प्राणआंचा व संपत्तीचा सौदा जन्नतच्या बदल्यात केला आहे.’’ (सूरह तौबा-१११)
११. अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखा आणि अल्लाहच्या मार्गात आपल्या तन, मन आणि धनाने जिहाद करा, हे तुमच्यासाठी अधिक चांगले आहे जर तुम्ही ज्ञान बाळगत असाल.
१२. अल्लाह तुमचे अपराध माफ करील आणि तुम्हाला त्या जन्नतींमध्ये दाखल करील ज्यांच्या खाली प्रवाह वाहत असतील आणि स्वच्छ शुद्ध घरांमध्ये, जे ‘अदन’च्या जन्नतमध्ये असतील. ही फार मोठी सफलता आहे.
१३. आणि तुम्हाला एक दुसरी देणगीही प्रदान करील, जी तुम्ही इच्छिता, ती आहे अल्लाहची मदत आणि लवकरच प्राप्त होणारा विजय आणि ईमान राखणाऱ्यांना खूशखबर द्या.
१४. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही अल्लाहचे सहाय्यक बना,१ ज्याप्रमाणे (हजरत) मरियमचे पुत्र (हजरत) ईसा यांनी हवारींना (मित्रांना) सांगितले, कोण आहे जो अल्लाहच्या मार्गात माझा मदतनीस बनेल? (त्यांचे) मित्र म्हणाले की, आम्ही अल्लाहच्या मार्गात मदतनीस आहोत. तेव्हा इस्राईलच्या संततीपैकी एका गटाने तर ईमान राखले आणि एका गटाने कुप्र (इन्कार) केला,२ तर आम्ही ईमान राखणाऱ्यांना त्यांच्या शत्रूंच्या
____________________
(१) सर्व परिस्थितीत आपल्या वचनांद्वारे आणि आचरणाद्वारे तसेच धन आणि प्राणाद्वारेही, जेव्हा आणि ज्या वेळी देखील आणि ज्या अवस्थेतही अल्लाह आणि त्याचा पैगंबर आपल्या धर्माच्या मदतीसाठी हाक मारील, तुम्ही त्वरित त्यांच्या हाकेला होकार देऊन म्हणाल, आम्ही हजर आहोत, ज्याप्रमाणे हजारोंनी हजरत ईसा यांच्या आवाहनावर म्हटले होते. (२) हे यहूदी होते, ज्यांनी ईसा (अलै.) यांच्या प्रेषितत्वाचा केवळ इन्कारच केला नाही किंबहुना त्यांच्यावर आणि त्यांच्या आईवर लांझनही लावले. काहींच्या मते हा मतभेद आणि अलगाव त्या वेळी झाला जेव्हा हजरत ईसाला आकाशात उचलून घेतले गेले. एक म्हणाला की ईसा यांच्या रूपात अल्लाह (ईश्वर) च धरतीवर प्रकट झाला होता. (असे सनातन धर्मात ईशदूतांना अवतार मानले गेले आहे.) आता तो पुन्हा आकाशात चालला गेला. हा पंथ ‘याकूबिया’ संबोधिला जातो. ‘नस्तुरिया’ पंथाचे लोक म्हणाले की ते (हजरत ईसा) अल्लाहचे पुत्र होते. पित्याने पुत्राला आकाशात बोलावून घेतले. तिसरा असे म्हणाला की ते अल्लाहचे उपासक आणि त्याचे पैगंबर (संदेशवाहक) होते. अर्थात हे सांगणारा संप्रदायच खरा व उचित होता.