ترجمة سورة لقمان

الترجمة الماراتية
ترجمة معاني سورة لقمان باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. अलिफ. लाम. मीम
२. या दिव्य ज्ञानयुक्त ग्रंथाच्या आयती आहेत.
३. जो अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता मार्गदर्शन आणि (सर्वथा) दया-कृपा आहे.
४. जे लोक नेहमी वक्तशीरपणे नमाज पढतात आणि जकात (धर्मदान) देतात, आणि आखिरतवर (पूर्ण) विश्वास ठेवतात.
५. हेच ते लोक होत, जे आपल्या पालनकर्त्यातर्फे मार्गदर्शनावर आहेत आणि हेच लोक मुक्ती प्राप्त करणारे आहेत.
६. आणि काही लोक असेही आहेत जे निरर्थक, वाह्यात गोष्टी विकत घेतात की अज्ञानतेसह लोकांना अल्लाहच्या मार्गापासून दूर करावे आणि त्याला थट्टा-मस्करी बनवावे. हेच ते लोक होत, ज्यांच्यासाठी अपमानित करणारा अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.
७. आणि जेव्हा त्याच्यासमोर आमच्या आयती वाचून ऐकविल्या जातात तेव्हा घमेंडीने अशा प्रकारे तोंड फिरवितो की जणू त्याने ऐकलेच नाही, जणू काही त्याच्या दोन्ही कानात बधिरता आहे. तुम्ही त्याला दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातने) ची खबर द्या.
८. निःसंशय, ज्या लोकांनी ईमान स्वीकारले व जे सत्कर्म करीत राहिले त्याच्याकरिता सुखांनी युक्त अशी जन्नत आहे.
९. जिथे ते सदैव काळ राहतील, अल्लाहचा सच्चा वायदा आहे. तो मोठा प्रभुत्वशाली आणि पूर्णतः बुद्धिकौशल्य (हिकमत) बाळगणारा आहे.
१०. त्यानेच आकाशांना खांबांविना बनविले आहे. तुम्ही त्यांना पाहता आणि त्याने जमिनीवर पहाड रोवले, यासाठी की तिने तुम्हाला कंपित करू न शकावे आणि प्रत्येक प्रकारचे सजीव जमिनीत पसरविले आणि त्याने आकाशातून पाऊस पाडून प्रत्येक प्रकारच्या सुंदर जोड्या उगविल्या.
११. ही आहे अल्लाहची सृष्टी (मखलूक), आता तुम्ही मला याच्याखेरीज दुसऱ्या कोणाची सृष्टी तर दाखवा (काही नाही) हे अत्याचारी लोक उघड मार्गभ्रष्टतेत आहेत.
१२. आणि आम्ही निःसंशय लुकमानला बुद्धिकौशल्य प्रदान केले१ की तुम्ही अल्लाहशी कृतज्ञशील राहा. प्रत्येक कृतज्ञशील मनुष्य आपल्याच फायद्याकरिता कृतज्ञता व्यक्त करतो, जो कोणी कृतघ्नता दर्शवील तर त्याने जाणून घ्यावे की अल्लाह निःस्पृह, प्रशंसनीय आहे.
____________________
(१) हजरत लुकमान अल्लाहचे सदाचारी दास होते. अल्लाहने त्यांना बुद्धी, हिकमत आणि धार्मिक बाबींमध्ये उच्च स्थान प्रदान केले होते. त्यांना एकाने विचारले, तुम्हाला हे ज्ञान ही बुद्धी कशी प्राप्त झाली, ते म्हणाले, सरळ मार्गावर राहिल्याने, ईमानदारी अंगीकारल्याने आणि व्यर्थ गोष्टींपासून अलिप्त राहिल्याने, गप्प राहिल्याने. ते गुलाम होते. त्यांचा मालक म्हणाला, बकरी कापून त्याचे सर्वांत चांगले दोन हिस्से आणा. शेवटी ते जीभ आणि हृदय घेऊन आले. दुसऱ्या एका प्रसंगी मालक म्हणाला, बकरी कापून तिचे सर्वांत वाईट दोन हिस्से आणा. त्यांनी पुन्हा जीभ आणि हृदय काढून आणले. यावर विचारले असता त्यांनी सांगितले की जीभ आणि हृदय जर ठीक असेल तर ते सर्वांत चांगले आहेत आणि ते बिघडले तर त्यांच्यापेक्षा वाईट काहीच नाही. (इब्ने कसीर)
१३. आणि जेव्हा लुकमान उपदेश करताना आपल्या पुत्रास म्हणाले, हे माझ्या प्रिय पुत्रा! अल्लाहसोबत दुसऱ्या कोणाला सहभागी ठरवू नकोस. निःसंशय, अल्ला चा सहभागी ठरविणे फार मोठा अत्याचार आहे.
१४. आम्ही माणसाला माता-पित्याविषयी शिकवण दिली आहे. त्याच्या मातेने यातनांवर यातना सहन करून त्याला गर्भात ठेवले आणि त्याचे दूध सोडविण्यात दोन वर्षे लागली. तेव्हा तू माझे आणि आपल्या माता-पित्याचे आभार मान. शेवटी माझ्याचकडे परतून यायचे आहे.
१५. आणि जर ते दोघे (माता-पिता) तुझ्यावर या गोष्टीचा दबाव टाकतील की तू माझ्यासोबत (दुसऱ्याला) सहभागी ठरव, ज्याचे तुला ज्ञान नसावे, तेव्हा तू त्यांचे आज्ञापालन करू नकोस, परंतु या जगात त्यांच्याशी भलेपणाचा व्यवहार कर आणि त्याच्या मार्गावर चालत राहा, जो माझ्याकडे झुकलेला असेल. तुम्हा सर्वांचे परतणे माझ्याचकडे आहे. तुम्ही जे काही करता त्यासंबंधी मी त्या वेळी तुम्हाला माहीत करेन.
१६. प्रिय पुत्रा! जर एखादी वस्तू राईच्या दाण्याइतकी असेल, मग तोही एखाद्या दगडाखाली असेल किंवा आकाशांमध्ये असेल किंवा जमिनीत असेल, तर तिला अल्लाह अवश्य आणील. अल्लाह अतिशय सूक्ष्मदर्श आणि जाणणारा आहे.
१७. हे माझ्या प्रिय पुत्रा! तू नमाज कायम राख, सत्कर्मांचा आदेश दे आणि दुष्कर्मांपासून रोखत जा, आणि जर तुझ्यावर संकट आले तर धीर-संयम राख (विश्वास ठेव) ही सर्व ताकीदी कामांपैकी आहेत.
१८. आणि लोकांसमोर आपले गाल फुगवू नका आणि जमिनीवर ताठपणाने घमेंड दाखवत चालू नका. कोणत्याही गर्विष्ठ , घमेंडी माणसाला अल्लाह पसंत करीत नाही.
१९. आणि आपल्या चालण्यात मध्यमता राखा, आणि आपला आवाज (स्वर) सौम्य राख, निःसंशय, गाढवाचा आवाज अतिशय वाईट आवाज आहे.
२०. काय तुम्ही नाही पाहत की अल्लाहने जमीन आणि आकाशाच्या प्रत्येक वस्तूला आमच्या सेवेस लावून ठेवले आहे आणि आपल्या उघड आणि लपलेल्या देण्या तुमच्यावर पूर्ण केल्या आहेत, आणि काही लोक अल्लाहविषयी कसल्याही ज्ञानाविना, मार्गदर्शनाविना आणि दिव्य ग्रंथाविना वाद घालतात.
२१. आणि जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहने अवतरित केलेल्या वहयी (प्रकाशना) चे अनुसरण करा, तेव्हा म्हणतात की आम्ही तर ज्या मार्गावर आपल्या वाडवडिलांना पाहिले आहे, त्याच मार्गाचे अनुसरण करू. मग सैतान त्यांच्या वाडवडिलांना जहन्नमच्या शिक्षा-यातनेकडे बोलवित असला तरी!
२२. आणि जो मनुष्य आपल्या चेहऱ्याला (स्वतःला) अल्लाहच्या हवाली करील आणि ती नेक सदाचारीही असेल तर निश्चितच त्याने मजबूत आधार धरला. समस्त कर्मांची परिणीती अल्लाहकडे आहे.
२३. आणि काफिरांच्या कुप्र (इन्कारा) ने तुम्ही दुःखी होऊ नका. शेवटी त्या सर्वांना आमच्याचकडे परतून यायचे आहे. त्या वेळी आम्ही त्यांना दाखवू जे काही ते करीत राहिले. निःसंशय, अल्लाह हृदयातील रहस्यभेदांनाही जाणतो.
२४. आम्ही त्यांना काहीसा फायदा असाच पोहचवित राहू, परंतु शेवटी आम्ही त्यांना अतिशय लाचारीच्या अवस्थेत सक्त शिक्षा-यातनेकडे हाकत नेऊ.
२५. आणि जर तुम्ही त्यांना विचाराल की आकाश आणि जमिनीचा निर्माण करणारा कोण आहे? तर हे अवश्य उत्तर देतील, अल्लाह! तेव्हा त्यांना सांगा की सर्व प्रशंसेस योग्य अल्लाहच आहे. परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक जाणत नाहीत.
२६. आकाशांमध्ये आणि धरतीत जे काही आहे ते सर्व अल्लाहचेच आहे निःसंशय, अल्लाह मोठा निःस्पृह आणि स्तुती-प्रशंसेस पात्र आहे.
२७. आणि साऱ्या धरतीवरील वृक्षांच्या जर लेखण्या होतील आणि सारे समुद्र शाई बनतील आणि त्यांच्यानंतर सात समुद्र दुसरे असतील तरीही अल्लाहची प्रशंसा संपू शकत नाही. निःसंशय, अल्लाह मोठा वर्चस्वशाली आणि हिकमत (बुद्धिकुशलता) बाळगणारा आहे.
२८. तुम्ही सर्वांना निर्माण करणे आणि मेल्यानंतर पुन्हा जिवंत करणे असेच आहे जसे एका जीवाला. निःसंशय, अल्लाह ऐकणारा, पाहणारा आहे.
२९. किंवा तुम्ही नाही पाहत की अल्लाह रात्रीला, दिवसात आणि दिवसाला रात्रीत दाखल करतो. सूर्य आणि चंद्राला त्यानेच आज्ञाधारक बनवून ठेवले आहे की प्रत्येक निर्धारित वेळेपर्यंत चालत राहावा तुम्ही जे काही कर्म करता, अल्लाह ते प्रत्येक कर्म जाणतो.
३०. हे सर्व (व्यवस्था) या कारणास्तव आहे की अल्लाह सत्य आहे, आणि त्याच्याखेरीज ज्यांना लोक (उपास्य समजून) पुकारतात, सर्व खोटे (मिथ्या) आहेत, आणि निःसंशय अल्लाह अतिउच्च आणि मोठा महान आहे.
३१. काय तुम्ही या गोष्टीवर विचार नाही करीत की पाण्यात नौका अल्लाहच्या कृपा-देणगीने चालत आहेत, यासाठी की त्याने तुम्हाला आपल्या निशाण्या दाखवाव्यात. निश्चितच यात प्रत्येक सबुरी राखणाऱ्या आणि कृतज्ञशील असणाऱ्याकरिता अनेक निशाण्या आहेत.
३२. आणि जेव्हा त्यांच्यावर लाटा, त्या सावल्यांप्रमाणे आच्छादित होतात तेव्हा ते (मोठा) विश्वास बाळगून अल्लाहलाच पुकारतात, आणि जेव्हा अल्लाह त्यांना त्यातून सोडवून खुष्कीकडे पोहचवितो, तेव्हा त्यांच्यापैकी काही संतुलित राहतात, आणि आमच्या आयतींचा इन्कार केवळ तेच लोक करतात, जे वचन भंग करणारे आणि कृतघ्न असतील.
३३. लोकांनो! आपल्या पालनकर्त्याचे भय राखा आणि त्या दिवसाचे भय ठेवा, ज्या दिवशी पिता आपल्या पुत्राला कसलाही लाभ पोहचवू शकणार नाही आणि ना पुत्र आपल्या पित्यास किंचितही लाभ पोहचविणारा असेल. लक्षात ठेवा! अल्लाहचा वायदा सच्चा आहे. पाहा! तुम्हाला ऐहिक जीवनाने धोक्यात टाकू नये आणि ना धोकेबाज (सैताना) ने तुम्हाला धोक्यात टाकावे.
३४. निःसंशय, अल्लाहच्याच जवळ कयामतचे ज्ञान आहे. तोच पर्जन्यवृष्टी करतो, आणि मातेच्या गर्भात जे काही आहे ते जाणतो. कोणीही जाणत नाही की उद्या काय कमवील? ना कोणाला हे माहीत आहे की तो कोणत्या भूमीवर मरण पावेल.१ लक्षात ठेवा, अल्लाहच संपूर्ण ज्ञान बाळगणारा आणि सत्य जाणणारा आहे.
____________________
(१) हदीसमधील उल्लेखानुसार पाच गोष्टी अपरोक्षा (गैब) च्या चाव्या आहेत. ज्यांना अल्लाहखेरीज कोणी जाणत नाही (सहीह बुखारी, तफसीर सूरह लुकमान आणि किताबुल इस्तिस्का) १) कयामत जवळ असल्याची निशाणी तर पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितली आहे. परंतु कयामत येण्याचे निश्चित ज्ञान, अल्लाहशिवाय कोणालाही नाही, ना फरिश्त्याला, ना एखाद्या पैगंबराला. २) पावसाची बाबही अशीच आहे. निशाणी व संकेताद्वारे अनुमान तर लावले जाऊ शकते, परंतु ही गोष्ट प्रत्येकाच्या अनुभवात व अवलोकनात आहे की हे अनमान कधी खरे ठरते तर कधी चुकीचे. येथपावेतो की हवामान खात्याची घोषणाही खरी ठरत नाही. तात्पर्य पावसाचेही निश्चित ज्ञान अल्लाहखेरीज कोणालाही नाही. ३) मातेच्या गर्भात, यंत्राद्वारे लिंग परीक्षणाचे अर्धवट अनुमान बहुधा शक्य आहे, परंतु गर्भातले बाळ भाग्यशाली आहे की कमनशिबी आहे, पूर्ण आहे की अपूर्ण सुंदर आहे की कुरुप, काळे आहे की गोरे इ. गोष्टींचेही ज्ञान फक्त अल्लाहला आहे. ४) मनुष्य उद्या काय करील? ते धार्मिक कार्य असेल की ऐहिक? कोणालाही उद्याविषयीचे ज्ञान नाही की उद्याचा दिवस त्याच्या आयुष्यात उजाडेल किंवा नाही? आणि आलाच तर तो उद्या काय काम करील? ५) मृत्यु कोठे होईल घरात की घराबाहेर, आपल्या देशात की परदेशात, तारुम्यात मृत्यु येईल की म्हातारपणी, आपली मनोकांक्षा पूर्ण झाल्यानंतर की त्यापूर्वीच? कोणाला कसलेही ज्ञान नाही.
Icon