surah.translation .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. साद, या बोध उपदेशपूर्ण कुरआनाची शपथ.
२. परंतु काफिर (इन्कारी लोक) घमेंड आणि विरोधात पडले आहेत.१
____________________
(१) अर्थात हा कुरआन तर निश्चितच शंका संशय विरहित आणि त्या लोकांसाठी बोध-उपदेश आहे, जे बोध-ग्रहण करतील, तथापि काफिर लोकांना यापासून कसलाही लाभ पोहचू शकत नाही, कारण त्यांच्या बुद्धीत गर्व, अहंकार आणि घमेंड भरलेली आहे आणि हृदयांमध्ये विरोध आणि वैरभावना. मूळ शब्द ‘इज्जत’ त्याचा अर्थ सत्याच्या विरोधात अकडणे, ताठरता दर्शविणे.
३. आम्ही याच्यापूर्वीही अनेक जनसमूहांना नष्ट करून टाकले, त्यांनी प्रत्येक प्रकारे आरडाओरड केली, परंतु ती वेळ सुटकेची नव्हती.
४. आणि काफिर लोकांना या गोष्टीबद्दल आश्चर्य वाटले की त्यांच्यापैकीच एक खबरदार करणारा आला आणि म्हणू लागले की हा जादूगार आणि खोटारडा आहे.
५. काय याने एवढ्या साऱ्या आराध्य दैवतांना एकच दैवत (माबूद) बनवून टाकले, खरोखर ही मोठा विचित्र गोष्ट आहे!
६. त्यांचे सरदार (प्रमुख) असे बोलत निघून जाऊ लागले, जा, आपल्या दैवतांवर मजबूत (अटळ) राहा. निःसंशय, या गोष्टीत काहीतरी उद्दिष्ट (स्वार्थ) आहे.
७. आम्ही तर ही गोष्ट प्राचीन धर्मांमध्येही ऐकली नाही काही नाही, ही केवळ मनाने रचलेली गोष्टी आहे.
८. काय आम्ही सर्वांपैकी त्याच्यावरच (अल्लाहची) वहयी अवतरित केली गेली? वस्तुतः हे लोक माझ्या वहयी (प्रकाशना) बाबत संशयग्रस्त आहेत,१ किंबहुना (खरेतर) त्यांनी माझ्या शिक्षा यातनेची गोडी अद्याप चाखलीच नाही.
____________________
(१) अर्थात त्यांचा इन्कार या कारणाने नाही की त्यांना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या सत्यतेचे ज्ञान नाही, किंवा त्यांच्या सुबोध असण्याचा इन्कार आहे, किंबहुना हे त्या वहयी (प्रकाशना) विषयीच संशयात पडले आहेत, जी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर अवतरली, जिच्यात सर्वांत उघड तौहीद (एकेश्वरवाद) चे आवाहन आहे.
९. काय त्यांच्याजवळ, तुमच्या वर्चस्वशाली, भरपूर प्रदान करणाऱ्या पालनकर्त्याच्या कृपेचे खजीने आहेत?
१०. किंवा आकाश आणि धरती आणि त्यांच्या दरम्यानच्या प्रत्येक गोष्टीचे राज्य त्यांचेच आहे, असे आहे तर दोऱ्या ताणून (आकाशात) चढून जावे.
११. हेदेखील (विशाल) सैन्यांपैकी पराभूत (लहानसे) सैन्य आहे.
१२. त्यांच्या पूर्वीही नूहचा जनसमूह आणि आदचा जनसमूह आणि खिळे (मेखां) वाल्या फिरऔनने खोटे ठरविले होते.
१३. आणि समूद व लूत जनसमूहाने आणि वनात राहणाऱ्यांनीही, हीच विशाल सैन्ये होती.
१४. यांच्यापैकी एक देखील असा नव्हता, ज्याने पैगंबरांना खोटे ठरविले नसेल, तेव्हा माझा अज़ाब त्यांच्यावर लागू झाला.
१५. आणि त्यांना केवळ एका तीव्र (भयंकर) चित्काराची प्रतीक्षा आहे, ज्यात कसलाही अडथळा (आणि विलंब) नाही.
१६. आणि (ते) म्हणाले की हे आमच्या पालनकर्त्या! आमचा वाटा तू आम्हाला हिशोबाच्या दिवसापूर्वीच प्रदान कर.
१७. तुम्ही त्यांच्या बोलण्यावर सहनशीलता राखा आणि आमचे दास दाऊदचे स्मरण करा जो मोठा शक्तिशाली होता, निःसंशय, तो (अल्लाहकडे) मोठा रुजू करणारा होता.
१८. आम्ही पर्वतांना त्यांच्या अधीन केले (ताब्यात दिले) होते की त्याच्यासोबत सकाळ संध्याकाळ अल्लाहच्या पवित्रतेचा जाप (तस्बीह) करावा.
१९. आणि (उडणाऱ्या) पक्षांनाही एकत्र होऊन सर्वच्या सर्व त्याच्या अधीन होते.
२०. आम्ही त्याचे राज्य मजबूत केले होते आणि त्याला हिकमत (बुद्धिकौशल्य) प्रदान केले होते आणि गोष्टीचा फैसला (सुचविला होता.)
२१. आणि काय तुम्हाला भांडण करणाऱ्यांची खबर पोहोचली, जेव्हा ते भिंत ओलांडून मेहराबमध्ये (उपासनेच्या ठिकाणी) आले.
२२. जेव्हा ते दाऊदजवळ पोहोचले, तेव्हा ते यांना पाहून घाबरले. ते म्हणाले, भिऊ नका, आमचा आपसातील तंटा आहे. आमच्यापैकी एकाने दुसऱ्यावर अत्याचार केला आहे, तेव्हा तुम्ही आमच्या दरम्यान न्यायपूर्वक फैसला करावा आणि अन्याय करू नका आणि आम्हाला सरळ मार्ग दाखवा.
२३. (ऐका!) हा माझा भाऊ आहे. याच्याजवळ नव्याण्णव मेंढ्या आहेत. आणि माझ्याजवळ एकच आहे. परंतु हा मला म्हणतो की तुझी ती एक देखील मला देऊन टाक आणि माझ्यावर बोलण्यात मोठा सक्त मामला (व्यवहार) करतो.
२४. (दाऊद) म्हणाले, त्याचे आपल्या मेंढ्यांसोबत तुझी एक मेंढी सामील करून घेण्याचा प्रश्न निश्चितच तुझ्यावर अत्याचार आहे. आणि अधिकांश भागीदार आणि सहभागी (असेच असतात की) एकमेकांवर जुलूम अत्याचार आणि अन्याय करतात, मात्र त्यांच्याखेरीज, ज्यांनी ईमान राखले आणि जे सत्कर्म करीत राहिले, तथापि असे लोक फारच कमी आहेत आणि दाऊद (अलै.) यांनी जाणुन घेतले की आम्ही त्यांची परीक्षा घेतली आहे, मग तर आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) जवळ तौबा (क्षमा याचना) करू लागले आणि मोठ्या विनम्रतेने खाली पडले (सजद्यात गेले) आणि (पूर्णपणे) रुजू झाले.
२५. तेव्हा आम्ही देखील त्यांची ही (चूक) माफ केली. निःसंशय, ते आमच्याजवळ मोठे उच्च स्थान राखणारे आणि सर्वांत चांगले ठिकाण बाळगणारे आहेत.
२६. हे दाऊद! आम्ही तुम्हाला धरतीवर खलीफा बनविले, तेव्हा तुम्ही लोकांच्या दरम्यान न्यायासह फैसला करा आणि आपल्या मनाच्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण करू नका, अन्यथा ती तुम्हाला अल्लाहच्या मार्गापासून हटविल. निःसंशय, जे लोक अल्लाहच्या मार्गापासून भटकतात, त्यांच्यासाठी सक्त अज़ाब (शिक्षा-यातना) आहे. अशासाठी की त्यांनी हिशोबाच्या दिवसाचा विसर पाडला आहे.
२७. आणि आम्ही आकाश व धरती आणि त्यांच्या दरम्यानच्या वस्तूंना (अस्तित्वांना) व्यर्थ (आणि अकारण) निर्माण नाही केले. ही शंका तर काफिर (इन्कारी) लोकांची आहे, तेव्हा काफिरांकरिता आगीचा विनाश आहे.
२८. काय आम्ही त्या लोकांना, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्मे केली त्या लोकांसमान ठरवू जे (रोज) धरतीवर उत्पात (फसाद) माजवित राहिले, किंवा नेक सदाचारी लोकांना दुराचाऱ्यांसारखं बनवू?
२९. हा मोठा शुभग्रंथ आहे, जो आम्ही तुमच्याकडे अशासाठी अवतरित केला आहे की लोकांनी याच्या आयतींवर विचार चिंतन करावे आणि बुद्धी राखणाऱ्यांनी यापासून बोध ग्रहण करावा.
३०. आणि आम्ही दाऊदला सुलैमान (नावाचा पुत्र) प्रदान केला. जो मोठा उत्तम दास होता आणि (अल्लाहकडे) खूप रुजू करणारा होता.
३१. जेव्हा त्यांच्यासमोर संध्याकाळी वेगात चालणारे खास घोडे सादर केले गेले.
३२. तेव्हा म्हणाले, मी आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या स्मरणावर या घोड्याच्या प्रेमाला प्राधान्य दिले, येथेपर्यंत की सूर्य बुडाला.
३३. या घोड्यांना पुन्हा माझ्यासमोर आणा, मग पोटऱ्यांवर आणि मानांवर हात फिरवू लागले.
३४. आणि आम्ही सुलेमानची कसोटी घेतली आणि त्यांच्या सिंहासनावर एक धड (मृत शरीर) टाकून दिले, मग ते ध्यानमग्न झाले.
३५. म्हणाले की हे माझ्या पालनकर्त्या मला क्षमा कर आणि मला असे राज्य प्रदान कर, जे माझ्याखेरीज कोणत्याही (माणसास) पात्र नसावे. तू फार मोठा दाता आहेस.
३६. तेव्हा आम्ही हवेला त्यांच्या अधीन केले. ती त्यांच्या आदेशानं, जिकडे ते इच्छित, नरमीने पोहचवू देत असे.
३७. आणि (शक्तिशाली) जिन्नांना देखील, त्यांच्या अधीन (ताबे) केले होते आणि प्रत्येक घर बनविणाऱ्याला आणि पाणबुड्याला.
३८. आणि इतर (जिन्नांना) देखील, जे शृंखलांनी जखडलेले राहत.
३९. हा आहे आमचा अनुग्रह, आता तुम्ही उपकार करा किंवा रोखून ठेवा, काही हिशोब नाही.
४०. आणि त्यांच्यासाठी आमच्याजवळ मोठी निकटता आहे, आणि फार चांगले ठिकाण आहैे.
४१. आणि आमचे दास अय्यूबचीही चर्चा करा, जेव्हा त्याने आपल्या पालनकर्त्याला पुकारले की मला सैतानाने दुःख - यातना पोहचविली आहे.
४२. आपला पाय जमिनीवर मारा. हे आंघोळीचे थंड आणि पिण्याचे पाणी आहे.
४३. आणि आम्ही त्याला त्याचे संपूर्ण कुटुंब प्रदान केले, किंबहुना तेवढेच आणखीही त्यासोबत आपल्या खास कृपेने, आणि बुद्धिमानांकरिता बोधप्राप्तीसाठी.
४४. आणि आपल्या हातात काड्यांचा गुच्छा घेऊन त्याने मार आणि शपथ तोडू नको.१ खरे तर असे की आम्हाला तो मोठा सहनशील दास आढळला. तो मोठा नेक सदाचारी दास होता आणि (अल्लाहकडे) मोठा रुजू करणारा.
____________________
(१) आजारपणाच्या दिवसात शुश्रुषा करणाऱ्या पत्नीशी कसल्या तरी गोष्टीवर नाराज होऊन हजरत अय्यूब यांनी तिला शंभर कोडे (ंहंटर) मारण्याची शपथ घेतली होती. रोगमुक्त झाल्यानंतर अल्लाहने सांगितले की शंभर काड्यांचा एक झाडू घेऊन तिला मार, म्हणजे तुझी शपथ पूर्ण होईल.
४५. आणि आमचे दास इब्राहीम, इसहाक आणि याकूब यांचीही (लोकांमध्ये) चर्चा करा जे हात आणि डोळे राखणारे होते.
४६. आम्ही त्यांना एक विशेष गोष्ट अर्थात आखिरतच्या स्मरणासोबत खासरित्या संबंधित करून घेतले होते.
४७. आणि हे सर्व आमच्याजवळ निवडक आणि सर्वाधिक चांगल्या लोकांपैकी होते.
४८. आणि इस्माईल, यसअ आणि जुलकिफ्ल यांचेही वर्णन करा. हे सर्व नेक लोक होते.
४९. हा उपदेश आहे आणि विश्वास करा की नेक सदाचारी लोकांसाठी सर्वांत उत्तम स्थान आहे.
५०. अर्थात सदैव काळ राहणारी जन्नत, ज्यांची दारे त्यांच्यासाठी खुली आहेत.
५१. ज्यांच्यात ते (मोठ्या चैनीने) तक्के लावून बसले असतील. वेगवेगळ्या प्रकारचे मेवे (फळे) आणि अनेक प्रकारची पेये मागत असतील.
५२. आणि त्यांच्याजवळ नजर खाली ठेवणाऱ्या समवयस्क हूर (पऱ्या) असतील.
५३. हीच ती गोष्ट जिचा वायदा तुम्हाला हिशोबाच्या दिवसाकरिता दिला जात होता.
५४. निःसंशय, ही आजिविका, आमचा (विशेष) उपहार आहे, जी कधीही संपणार नाही.
५५. हा तर झाला मोबदला (लक्षात ठेवा की) विद्रोही लोकांकरिता मोठे वाईट स्थान आहे.
५६. जहन्नम आहे, ज्यात ते दाखल होतील (अरेरे!) किती वाईट बिछोना आहे.
५७. हे आहे, त्यांनी ते चाखावे, गरम (उकळते) पाणी आणि पू.
५८. आणि काही इतर प्रकारच्या शिक्षा.
५९. हा एक समुदाय आहे, जो तुमच्यासोबत (आगीत) जाणार आहे. त्यांच्यासाठी कसलीही स्वागत नाही. हेच जहन्नममध्ये जाणार आहेत.
६०. (ते) म्हणतील की, किंबहुना तुम्हीच ते आहात ज्यांच्यासाठी कसलेही स्वागत नाही. तुम्हीच तर यास आधीपासूनच आमच्यासमोर आणून ठेवले होते. तेव्हा राहण्याचे मोठे वाईट स्थान आहे.
६१. (ते) म्हणतील की हे आमच्या पालनकर्त्या! ज्याने ती (कुप्रची प्रथा) आमच्यासाठी सर्वांत प्रथम सुरू केली असेल, त्याच्यासाठी जहन्नमची शिक्षा दुप्पट कर.
६२. आणि (जहन्नमवासी) म्हणतील की, हे काय! आम्हाला ते लोक दिसून येत नाहीत, ज्यांची गणना आम्ही वाईट लोकांमध्ये करीत होतो.
६३. काय आम्हीच त्यांना थट्टा-मस्करी बनवून ठेवले होते की आमचे डोळे त्यांच्यापासून बहकून गेले आहेत.
६४. निःसंशय, जहन्नमवाल्यांचे हे भांडण अवश्य होईल.
६५. सांगा की मी तर केवळ एक खबरदार करणारा आहे आणि एकमेव जबरदस्त अल्लाहखेरीज दुसरा कोणीही उपासनेस पात्र नाही.
६६. जो स्वामी व पालनकर्ता आहे आकाशांचा आणि धरतीचा, आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे, तो मोठा जबरदस्त (महान) आणि मोठा माफ करणारा आहे.
६७. सांगा की ही फार मोठी खबर आहे.
६८. तिच्यापासून तुम्ही तोंड फिरवित आहात.
६९. मला त्या उच्च पदस्थ फरिश्त्यां (च्या संभाषणा) चे किंचितही ज्ञान नाही, जेव्हा ते भांडण करीत होते.
७०. माझ्याकडे केवळ हीच वहयी केली जाते की मी तर स्पष्टपणे सावध करणारा आहे.
७१. जेव्हा तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने फरिश्त्यांना सांगितले, मी मातीपासून मानवाला निर्माण करणार आहे.
७२. तर जेव्हा मी त्याला यथायोग्य करीन आणि त्याच्यात आपला आत्मा फुंकीन, तेव्हा तुम्ही सर्व त्याच्यासमोर सजदा करा१ (माथा टेका)
____________________
(१) हा सजदा (माथा टेकणे) आभार किंवा आदराप्रित्यर्थ आहे, उपासनेचा सजदा नाही. आदर-सन्मानाचा हा सजदा पूर्वी उचित होता. यास्तव अल्लाहने सर्व फरिश्त्यांना, आदमला सजदा करण्याचा आदेश दिला. आता इस्लाम धर्मात सन्मानपूर्वक सजदा कोणाकरिताही उचित नाही. हदीसमधील उल्लेखानुसार पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले, ‘‘जर हे उचित असते तर मी पत्नीला आदेश दिला असता की तिने आपल्या पतीला सजदा करावा.’’ (मिश्कात, किताबुन्निकाह बाबु इशतिन्निसाए, संदर्भ तिर्मिजी, अलबानीच्या मते आपल्या साक्षींच्या आधारावर हे हदीसवचन खरे (उचित) आहे.)
७३. तेव्हा सर्व फरिश्त्यांनी सजदा केला.
७४. परंतु इब्लिसने (केला नाही) त्याने घमेंड केली आणि तो इन्कार करणाऱ्यांपैकी होता.
७५. (अल्लाहने) फर्माविले की हे इब्लिस! त्याला (आदमला) सजदा करण्यापासून तुला कोणत्या गोष्टीने रोखले, ज्याला मी आपल्या हातांनी बनविले, काय तू गर्विष्ठ झाला आहेस की तू उच्च दर्जा राखणाऱ्यांपैकी आहेस?
७६. (त्याने) उत्तर दिले की मी याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, तू मला आगीपासून निर्माण केले आणि याला मातीपासून निर्माण केले.
७७. फर्माविले की तू येथून निघून जा, तू तिरस्कृत (धिःक्कारित) झाला.
७८. आणि कयामतच्या दिवसापर्यंत तुझा माझ्यातर्फे धिःक्कार आहे.
७९. तो म्हणाला, हे माझ्या स्वामी! मला त्या दिवसापर्यंत सवड प्रदान कर, जेव्हा लोक (जिवंत करून) उठविले जातील.
८०. (अल्लाहने) फर्माविले, तू सवड दिल्या जाणाऱ्यांपैकी आहेस.
८१. निर्धारित वेळेच्या दिवसापर्यंत.
८२. म्हणाला, मग तर तुझ्या प्रतिष्ठेची शपथ! मी या सर्वांना अवश्य भटकवीन.
८३. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, जे निवडक (आणि प्रिय, पवित्र) असतील.
८४. फर्माविले, सत्य हेच आहे आणि मी सत्यच सांगत असतो.
८५. की मी तुझ्याद्वारे आणि तुझ्या सर्व अनुयायींद्वारे जहन्नमला भरून टाकेन.
८६. सांगा की मी याबद्दल तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाही आणि आणि मी बनावट करणाऱ्यांपैकी नाही.
८७. हा तर सर्व जगवाल्यांकरिता परिपूर्ण उपदेश आणि स्मरण आहे.
८८. निःसंशय, तुम्ही याची वास्तविकता थोड्याच काळानंतर (उचितरित्या) जाणून घ्याल.