ترجمة سورة المائدة

الترجمة الماراتية
ترجمة معاني سورة المائدة باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. हे ईमान राखणाऱ्यांनो! आपले वचन-करार पूर्ण करा. तुमच्यासाठी चार पायांचे पाळीव पशू हलाल (वैध) केले गेले आहेत, त्यांच्याखेरीज, जे वाचून तुम्हाला ऐकविले जात आहेत. परंतु एहरामच्या स्थितीत शिकार करू नका. निःसंशय अल्लाहने जे इच्छिले त्याचा आदेश देतो.
२. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहच्या धर्म-प्रतिकांचा (शआईरचा) अवमान करू नका, ना आदरणीय महिन्यांचा, ना कुर्बानीकरिता हरम (काबागृहा) पर्यंत नेल्या जाणाऱ्या आणि गळ्यात पट्टा घातलेल्या जनावराचा, ना आदरणीय घरा (काबागृहा) कडे जाणाऱ्या लोकांचा जे अल्लाहची दया आणि प्रसन्नता शोधत आहेत. आणि जेव्हा एहराम उतरवाल तेव्हा मग शिकार करू शकतात आणि ज्यांनी तुम्हाला आदरणीय मसजिदीपासून रोखले, त्यांची शत्रूता तुम्हाला हद्द ओलांडण्यास प्रवृत्त न करावी आणि नेकी व अल्लाहचे भय राखण्यात एकमेकांची मदत करा. अपराध आणि अत्याचाराच्या कामात मदत करू नका. अल्लाहचे भय बाळगून राहा. निःसंशय अल्लाह मोठा सक्त अज़ाब (कठोर शिक्षा-यातना) देणारा आहे.
३. तुमच्यावर हराम (अवैध) केले गेले आहे मेलेले जनावर आणि रक्त आणि डुकराचे मांस, आणि ज्यावर अल्लाहशिवाय दुसऱ्यांचे नाव घेतले गेले असेल आणि ते जनावर जे गळा दाबल्याने मेले आणि जे ठोस लागून मेले असेल आणि जे खाली कोसळून मेले आणि जे दुसऱ्या जनावराने शिंग मारल्याने मेले आणि ज्याचा काही हिस्सा हिंस्र पशूंनी खआऊन टाकला असेल, परंतु ज्याला तुम्ही जिबह करून टाकले आणि जे देवस्थानावर बळी दिले गेले असेल आणि फाँसे टाकून (जुगार सट्ट्याप्रमाणे) वाटणी करणे हे सर्व फार मोठे अपराध आहेत. आज काफिर (अनेकेश्वरवादी) तुमच्या दीन-धर्माद्वारे निराश झाले, यास्तव त्यांचे भय बाळगू नका, फक्त माझेच भय बाळगा. आज मी तुमच्यासाठी तुमच्या दीन-धर्माला परिपूर्ण केले आणि तुमच्यावर आपल्या कृपा-देणग्या पूर्ण केल्या आणि तुमच्यासाठी इस्लाम धर्म पसंत केला. तथापि जो भूकेने व्याकूळ होईल आणि कोणताही गुन्हा करू इच्छित नसेल तर खात्रीने अल्लाह माफ करणारा, मोठा दयाशील आहे.
४. ते तुम्हाला विचारतात की त्यांच्यासाठी कोणकोणते खाद्य उचित आहे. तुम्ही सांगा की तुमच्यासाठी स्वच्छ शुद्ध व पवित्र वस्तू उचित आहेत. आणि ते शिकारी जनावर, ज्याला तुम्ही प्रशिक्षण देऊन तयार केले असेल, ज्यांना काही गोष्टी शिकविता, ज्या अल्लाहने तुम्हाला शिकविल्या, तेव्हा जर तुमच्यासाठी ते जनावर, शिकार जखमी करून धरून ठेवील आणि त्याला सोडताना अल्लाहचे नाव त्याच्यावर घ्याल तर ती शिकार तुम्ही खाऊ शकता आणि अल्लाहचे भय राखा निःसंशय, अल्लाह लवकरच हिशोब घेणारा आहे.
५. आज सर्व पाक-साफ वस्तू तुमच्यासाठी हलाल (वैध) केल्या गेल्या आहेत. आणि ग्रंथधारकांनी जिबह केलेले जनावर तुमच्यासाठी हलाल आहे. आणि तुम्ही जिबह केलेले त्यांच्यासाठी हलाल आहे आणि सुशील सदाचारी ईमानधारक स्त्रिया आणि ज्यांना तुमच्यापूर्वी ग्रंथ (धर्मशास्त्र) दिले गेले, त्यांच्यातल्या सुशील, सदाचारी स्त्रिया, जेव्हा तुम्ही त्यांना त्यांचा महर अदा कराल, विवाह करून, दुराचार करण्यासाठी नव्हे आणि ना लपून छपून प्रेयसी बनविण्याकरिता आणि जो ईमानचा इन्कार करील तर त्याचे सर्व कर्म वाया गेले आणि तो आखिरतमध्ये तोट्यात राहील.
६. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही नमाजसाठी उठाल तेव्हा आपले तोंड व कोपरांपर्यंत आपले हात धुवून घ्या आणि दोन्ही हात पाण्याने ओले करून आपल्या डोक्यावरून फिरवून घ्या आणि आपले पाय, घोट्यापर्यंत धुवून घ्या आणि तुम्ही जर नापाक (अपवित्र) असाल तर स्नान करा आणि जर तुम्ही आजारी किंवा प्रवासात असाल, किंवा तुमच्यापैकी कोणी शौचास जाऊन येईल किंवा तुम्ही पत्नीशी सहवास केला असेल आणि पाणी मिळत नसेल तर साफ स्वच्छ मातीने तयम्मुम करून घ्या. ती माती आपल्या चेहऱ्यावर आणि हातांवर मळा, अल्लाह तुम्हाला अडचणीत टाकू इच्छित नाही. किंबहुना तुम्हाला स्वच्छ शुद्ध व पवित्र करू इच्छितो आणि यासाठी की तुमच्यावर आपली कृपा-देणगी पूर्ण करावी आणि यासाठी की तुम्ही कृतज्ञशील राहावे.
७. आणि आपल्यावर झालेली अल्लाहची कृपा देणगी आणि त्या वचन कराराचे स्मरण करा, ज्याचा तुमच्याशी करार झाला, जेव्हा तुम्ही म्हटले की आम्ही ऐकले आणि मान्य केले आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचे भय बाळगत राहा. निःसंशय अल्लाह मनात लपलेल्या गोष्टींनाही जाणतो.
८. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहकरिता सत्यावर अटळ राहून न्यायाच्या बाजूने साक्षी व्हा, आणि एखाद्या जमातीची शत्रूता तुम्हाला न्याय न करण्यावर प्रवृत्त न करावी. न्याय करा, ते अल्लाहचे भय राखण्याशी फार जवळचे आहे, आणि अल्लाहचे भय राखा. निःसंशय, अल्लाह तुमच्या प्रत्येक कर्माला चांगल्या प्रकारे जाणून आहे.
९. ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले, अल्लाहने त्यांच्याशी माफी आणि फार मोठ्या मोबदल्याचा वायदा केला आहे.
१०. आणि ज्यांनी ईमान राखले नाही आणि आमच्या आदेशांना खोटे ठरविले तेच जहन्नमी आहेत.
११. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहने तुमच्यावर जे उपकार केले आहेत, त्यांचे स्मरण करा, जेव्हा एका जनसमूहाने तुमच्यावर अत्याचार करू इच्छिले, तेव्हा अल्लाहने त्यांच्या हातांना तुमच्यापर्यंत पोहचण्यापासून रोखले, आणि अल्लाहचे भय बाळगून राहा आणि ईमान राखणाऱ्यांनी तर सर्वश्रेष्ठ अल्लाहवरच भरोसा ठेवला पाहिजे.
१२. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहने इस्राईलच्या पुत्रांकडून वचन-करार घेतला आणि त्यांच्यातूनच बारा सरदार आम्ही नियुक्त केले, आणि अल्लाहने फर्माविले, मी निश्चितच तुमच्यासोबत आहे, जर तुम्ही नमाज कायम राखाल आणि जकात देत राहाल आणि माझ्या पैगंबरांना मानत राहाल आणि त्यांची मदत करीत राहाल आणि अल्लाहला उत्तम कर्ज देत राहाल तर निःसंशय मी तुमचे अपराध माफ करीन आणि तुम्हाला अशा जन्नतींमध्ये दाखल करीन, ज्यांच्या खाली नहरी (प्रवाह) वाहत आहे. आता या वायद्यानंतरही तुमच्यापैकी जो इन्कार करील तर निःसंशय तो सरळ मार्गापासून दूर भटकला.
१३. मग जेव्हा त्यांनी वचन-कराराचा भंग केला, तेव्हा आम्ही त्यांच्यावर धिःक्काराचा मारा केला आणि त्यांची मने कठोर केलीत की ते अल्लाहच्या वाणीला तिच्या स्थानापासून बदलून टाकतात आणि जो उपदेश त्यांना दिला गेला, त्याचा फार मोठा भाग ते विसरले. त्यांच्या बेईमानी व दगाबाजीची एक न एक खबर तुम्हाला मिळत राहील. परंतु थोडेसे (लोक) असेही नाहीत, तरीही तुम्ही त्यांना माफ करीत राहा. आणि माफ करीत राहा. निःसंशय अल्लाह उपकार करणाऱ्यांना पसंत करतो.
१४. आणि जे स्वतःला ख्रिश्चन म्हणवून घेतात, आम्ही त्यांच्याकडूनही वायदा घेतला होता, त्यांनीही त्याचा मोठा हिस्सा ध्यानी राखला नाही, जी शिकवण त्यांना दिली गेली होती, तेव्हा आम्हीही त्यांच्या दरम्यान शत्रूता आणि तिरस्कार निर्माण केला, जो कयामतपर्यर्ंत राहील आणि जे काही हे करतात लवकरच अल्लाह त्यांना ते सर्व दाखवून देईल.
१५. हे ग्रंथधारकांनो! तुमच्याजवळ आमचे पैगंबर (मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) आले आहेत, जे अनेक अशा गोष्टी सांगत आहेत, ज्या ग्रंथा (तौरात आणि इंजील) च्या गोष्टी तुम्ही लपवित होते, आणि बहुतेक गोष्टींना सोडत आहात. तुमच्याजवळ अल्लाहतर्फे नूर (दिव्य तेज) आणि स्पष्ट असा ग्रंथ (पवित्र कुरआन) येऊन पोहोचला आहे.१
____________________
(१) नूर आणि स्पष्ट ग्रंथ, दोघांशी अभिप्रेत एकच ‘पवित्र कुरआन’ आहे यांच्यामधील ‘वाव’ (अरबी शब्द) भाष्यकरिता आहे. तथापि दोघांशी अभिप्रेत एकच अर्थात कुरआन आहे. ज्याचा स्पष्ट पुरावा पवित्र कुरआनाची पुढची आयत आहे, ज्यात म्हटले जात आहे की याच्याद्वारे अल्लाह मार्ग दाखवितो जर नूर आणि ग्रंथ दोन भिन्न गोष्टी असत्या तर वाक्य असे राहिले असते- ‘अल्लाह या दोघांद्वारे मार्गदर्शन करतो.’ परंतु असे नाही. यास्तव कुरआनातील या शब्दांद्वारे स्पष्ट झाले की नूर आणि स्पष्ट ग्रंथ या दोघांशी अभिप्रेत कुरआनच आहे असे नव्हे की नूरशी अभिप्रेत नबी (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) आणि स्पष्ट ग्रंथाशी अभिप्रेत पवित्र कुरआन, अर्थात हा आशय, इस्लाम धर्मात नवनवीन गोष्टींचा समाविष्ट करणाऱ्या, मनगढत रचना करणाऱ्या लोकांनी आपल्या मनाने घेतला आहे.
१६. ज्याच्याद्वारे अल्लाह त्या लोकांना सलामतीचा मार्ग दाखवितो, जे त्याच्या प्रसन्नतेच्या मार्गावर चालतील आणि त्यांना अंधारातून बाहेर काढून आपल्या दया-कृपेच्या दिव्य तेजाकडे आणतो आणि त्यांना सरळ मार्ग दाखवितो.
१७. निःसंशय ते लोक काफिर (अविश्वासी) झाले, जे म्हणाले की मरियम-पुत्र मसीह अल्लाह आहे. त्यांना सांगा की जर मरियम-पुत्र मसीह आणि त्याची माता आणि साऱ्या जगातील सर्व लोकांना तो नष्ट करू इच्छिल तर असा कोण आहे, ज्याला अल्लाहसमोर (वाचविण्याचा) तिळमात्र अधिकार आहे? आणि आकाशांमध्ये व धरतीवर आणि जे काही या दोघांच्या दरम्यान आहे, सर्वत्र अल्लाहचीच राज्य-सत्ता आहे. तो जे काही इच्छितो, निर्माण करतो आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.
१८. आणि यहूदी व ख्रिश्चन म्हणतात की आम्ही अल्लाहचे पुत्र आणि मित्र आहोत. तुम्ही सांगा की मग अल्लाह तुमच्या अपराधांपायी तुम्हाला शिक्षा का देतो? नव्हे, किंबहुना तुम्ही त्याच्या सृष्ट निर्मितीत एक मानव आहात. तो ज्याला इच्छितो, माफ करतो आणि ज्याला इच्छितो शिक्षा-यातना देतो. आकाशांची व जमिनीची आणि यांच्या दरम्यानची राज्यसत्ता केवळ अल्लाहचीच आहे, आणि त्याच्याचकडे परतावयाचे आहे.
१९. हे ग्रंथधारकांनो! पैगंबरांच्या आगमनात एक दीर्घ काळाच्या खंडानंतर आमचे रसूल (मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) येऊन पोहोचले आहेत, जे तुमच्यासाठी धर्म विधानांचे निवेदन करीत आहेत यासाठी की तुम्ही असे न म्हणावे की आमच्याजवळ कोणी शुभ समाचार देणारा आणि सचेत करणारा आला नाही. तेव्हा तुमच्याजवळ एक शुभ समाचार देणारा आणि सचेत करणारा (अंतिम रसूल) येऊन पोहोचला आहे. निःसंशय अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.
२०. आणि स्मरण करा जेव्हा मूसा (अलैहिस्सलाम) यांनी आपल्या लोकांना म्हटले की हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! अल्लाहच्या त्या उपकाराची आठवण करा की त्याने तुमच्यामधून पैगंबर बनविले आणि तुम्हाला राज्य प्रदान केले आणि तुम्हाला ते प्रदान केले, जे साऱ्या जगात कोणालाही प्रदान केले नाही.
२१. हे माझ्या लोकांनो! त्या पवित्र भूमीत दाखल व्हा, जी अल्लाहने तुमच्या नावे लिहून दिली आहे. आणि आपली पाठ दाखवू नका की ज्यामुळे मोठे हानिकारक व्हाल.
२२. त्यांनी उत्तर दिले, हे मूसा! तिथे तर शक्तिशाली लढवय्ये लोक आहेत. आणि जोपर्यंत ते तिथून निघून जात नाहीत, तोपर्यंत आम्ही कधीही जाणार नाहीत, मात्र जर ते तिथून निघून जातील तर मग आम्ही (आनंदाने) तेथे जाऊ.
२३. परंतु जे अल्लाहचे भय बाळगत होते, त्यांच्यापैकी दोन मनुष्य म्हणाले, ज्यांच्यावर अल्लाहने कृपा देणगी केली, की तुम्ही त्यांच्यावर (आक्रमणासाठी) दरवाजातून दाखल व्हा, जेव्हा दाखल व्हाल तेव्हा तुम्हीच वरचढराहाल, आणि ईमान राखत असाल तर अल्लाहवरच भरोसा ठेवा.
२४. ते म्हणाले, हे मूसा! आम्ही कधीही तिथे जाणार नाहीत, जोपर्यंत ते तिथे राहतील, यास्तव तुम्ही आणि तुमचा रब (पालनहार) दोघे जाऊन लढा, आम्ही इथेच बसतो.
२५. मूसा म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मी फक्त स्वतःवर आणि आपला भाऊ (हारून) वर अधिकार राखतो, तेव्हा आमच्या आणि या दुराचारी लोकांच्या दरम्यान अलगाव निर्माण कर.
२६. अल्लाहने फर्माविले, ती भूमी त्यांच्यावर चाळीस वर्षांपर्यंत हराम (निषिद्ध) राहील, ते धरतीवर भटकत फिरतील, यास्तव तुम्ही (हे मूसा!) या दुराचारी लोकांबद्दल खेद करू नका.
२७. आणि आदमच्या दोन पुत्रांचा किस्सा त्यांना वाचून ऐकवा. जेव्हा त्या दोघांनी एक एक कुर्बानी सादर केली तेव्हा एकाची कुर्बानी स्वीकारली गेली आणि दुसऱ्याची स्वीकारली गेली नाही, तेव्हा तो म्हणाला की मी निश्चित तुला ठार करीन, त्यावर तो म्हणाला की अल्लाह, दुराचारापासून दूर राहणाऱ्या लोकांचीच कुर्बानी कबूल करतो.
२८. जर तू माझी हत्या करण्यासाठी हात पुढे करशील तर मी तुझी हत्या करण्यासाठी आपला हात पुढे करू शकत नाही, मी अल्लाहचे भय राखतो जो समस्त विश्वाचा स्वामी आणि पालनहार आहे.
२९. मी इच्छितो की तू माझा गुन्हा आणि स्वतःचा गुन्हा गोळा कर आणि जहन्नमी लोकांपैकी हो आणि अत्याचारी लोकांचा हाच वाईट मोबदला आहे.
३०. तरीही त्याच्या मनाने आपल्या भावाची नाहक हत्या करण्यास प्रवृत्त केले आणि त्याने आपल्या भावाला शेवटी मारून टाकले, ज्यामुळे तो नुकसान उचलणाऱ्यांपैकी झाला.
३१. मग अल्लाहने एक कावळ पाठविला, जो जमीन खोदत होता, यासाठी की त्याला हे दाखवावे की, आपल्या मृत भावाचे प्रेत त्याने कशा प्रकारे लपवावे. तो म्हणू लागला, अरेरे! खेद आहे माझ्यावर! काय मी असे करण्यायोग्यही राहिलो नाही की आपल्या भावाचे प्रेत या कावळ्याप्रमाणे जमिनीत गाडू शकलो असतो? मग तर तो खूप दुःखी आणि लज्जित झाला.
३२. याच कारणाने आम्ही इस्राईलच्या संततीकरिता निर्धारीत केले की जो मनुष्य एखाद्याची, याविना की तो एखाद्याचा मारेकरी असेल, किंवा धरतीवर उत्पात माजविणारा असेल, हत्या करील तर त्याने जणू समस्त लोकांची हत्या केली आणि जो मनुष्य एखाद्याचा जीव वाचवील, तर त्याने जणू समस्त मानवांना जीवन-दान दिले आणि त्यांच्याजवळ आमचे रसूल (पैगंबर) अनेक स्पष्ट निशाण्या घेऊन आले, परंतु तरीही त्यांच्यापैकी अधिकांश लोक जुलूम-अत्याचार करणारेच राहिले.
३३. जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी युद्ध करतात आणि धरतीवर फसाद (उत्पात) माजवितात तर त्यांना या अपराधाची शिक्षा म्हणून ठार मारले पाहिजे, किंवा त्यांना सूळावर चढविले पाहिजे किंवा त्यांचा एका बाजूचा हात आणि दुसऱ्या बाजूचा पाय कापून टाकला जावा अथवा त्यांना देशाबाहेर काढले जावे. ही अपमानाची शिक्षा त्यांना या जगाच्या जीवनात आहे आणि आखिरतमध्ये तर त्यांच्यासाठी महाभयंकर अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.
३४. तथापि ज्यांनी पकडीत येण्यापूर्वीच तौबा (क्षमा-याचना) केली असेल तर खात्रीने अल्लाह मोठा माफ करणारा, मोठा मेहरबान आहे.
३५. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहचे भय बाळगून राहा आणि त्याच्या दिशेने सान्निध्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करा१ आणि त्याच्या मार्गात जिहाद करा, यासाठी की तुम्हाला सफलता लाभावी.
____________________
(१) मूळ शब्द ‘वसीला’ अर्थात हेतुप्राप्तीसाठी व निकटता प्राप्त करण्यासाठी प्रयोगात आणले जाणारे माध्यम. ‘अल्लाहचे जवळीक प्राप्त करण्याचे साधन शोधा’चा खरा अर्थ असे कर्म की ज्यामुळे तुम्हाला अल्लाहची मर्जी आणि त्याचे जवळीव लाभावे. इमाम शौकानीच्या कथनानुसार वसीला म्हणजे ते सत्कर्म की ज्याद्वारे मनुष्य अल्लाहचे जवळीव प्राप्त करतो. त्याचप्रमाणे वर्जित आणि हराम केलेल्या वस्तू आणि कर्मापासून अलिप्त राहिल्यानेही अल्लाहचे जवळीक प्राप्त होते. तथापि मूर्ख लोकांनी हे खरे माध्यम सोडून कबरीत गाडल्या गेलेल्या लोकांना आपला ‘वसीला’ बनवून घेतले आहे, ज्याला इस्लामी धर्मशास्त्रात तिळमात्र जागा नाही.
३६. निःसंशय, जे लोक काफिर (इन्कारी) आहेत, त्यांनी जर अल्लाहच्या शिक्षा-यातने (अज़ाब) पासून सुटका होण्याकरिता, धरतीवर जे काही आहे, ते सर्वच्या सर्व दंड म्हणून देऊन टाकले आणि तेवढेच आणखी घेऊन आले, तरीदेखील कयामतीच्या दिवशी अज़ाबपासून सुटका होण्याकरिता कबूल केले जाणार नाही, आणि त्यांच्याकरिता दुःखदायक शिक्षा-यातनेचा क्रम जारी राहील.
३७. ते जहन्नममधून बाहेर पडण्याची खूप इच्छा करतील, परंतु त्यातून कधीच बाहेर पडू शकणार नाहीत. त्यांच्यासाठी तर निरंतर अज़ाब आहे.
३८. चोरी करणारा व चोरी करणारीचे हात कापून टाका. हे त्याच्या दुष्कर्माचे फळ आणि अल्लाहतर्फे शिक्षा आहे आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह शक्तिशाली आणि हिकमतशाली आहे.
३९. जो मनुष्य अपराधानंतर (अल्लाहकडे) क्षमा याचना करील, आणि आपले आचरण सुधारेल तर अल्लाह त्याची तौबा (क्षमा याचना) कबूल करतो. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह माफ करणारा, दया करणारा आहे.
४०. काय तुम्ही नाही जाणत की आकाशआंची व जमिनीची राज्य सत्ता केवळ अल्लाहकरिताच आहे? तो ज्याला इच्छितो अज़ाब (शिक्षा-यातना) देतो, आणि ज्याला इच्छितो माफ करतो. अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.
४१. हे पैगंबर! तुम्ही त्यांच्यासाठी दुःखी होऊ नका जे इन्कार करण्यात धाव घेत आहेत, जे आपल्या तोंडाने म्हणाले की आम्ही ईमान राखले आणि त्यांच्या मनाने ईमान राखले नाही आणि जे यहूदी झाले, त्यांच्यातले काही खोटे बोलण्याचे अभ्यस्त आणि दुसऱ्या लोकांचे गुप्तहेर आहेत, जे तुमच्याजवळ आले नाहीत. ते वाणीला (वचनाला) मूळ स्थानापासून हटवून तिचा अर्थ बदलून टाकतात आणि असे सांगतात की जर तुम्हाला हा आदेश मिळाला तर कबूल करा आणि न मिळाल्यास अलग राहा. जर अल्लाह एखाद्यास भटकत ठेवू इच्छिल तर त्याच्यासाठी अल्लाहवर तुम्हाला किंचितही अधिकार नाही. अशाच लोकांच्या हृदयांना अल्लाह पाक (पवित्र) करू इच्छित नाही. याच लोकांसाठी या जगात अपमान आणि आखिरतमध्ये मोठा जबरदस्त अज़ाब आहे.
४२. हे कान लावून खोट्या गोष्टी ऐकणारे आणि मन तृप्त होईपर्यंत हराम खाणारे आहेत. जर हे तुमच्याजवळ येतील तर तुम्हाला अधिकार आहे, वाटल्यास त्यांच्या दरम्यान फैसला करा, वाटल्यास करू नका. जर तुम्ही त्यांच्यापासून तोड फिरवूनही घ्याल तरीही ते तुम्हाला कसलेही नुकसान पोहचवू शकत नाही आणि जर तुम्ही फैसला कराल तर त्यांच्या दरम्यान न्यायासह फैसला करा. निःसंशय, न्याय करणाऱ्यांशी अल्लाह प्रेम राखतो.
४३. आणि (आश्चर्याची गोष्ट अशी की) स्वतःजवळ तौरात असताना, ज्यात अल्लाहचा आदेश आहे, ते कसे तुम्हाला फैसला करणारा बनवितात, मग त्यानंतर आदेश मानण्याचे टाळतात. वास्तविक हे लोक (खऱ्या अर्थाने) ईमानधारक नाहीत.
४४. आम्ही तौरात आवतरीत केली, ज्यात मार्गदर्शन आणि नूर (दिव्य प्रकाश) आहे. यहूदी लोकांमध्ये याच तौरातद्वारे अल्लाहला मानणारे पैगंबर आणि अल्लाहवाले आणि धर्मज्ञानी लोक फैसला करीत असत कारण त्यांना अल्लाहच्या या ग्रंथाचे रक्षण करण्याचा आदेश दिला गेला होता आणि ते यावर स्वीकारणारे साक्षी होते. आता तुम्ही लोकांचे भय बाळगू नका, किंबहुना माझे भय बाळगा. माझ्या आयतींना थोड्याशा किंमतीवर विकू नका आणि जो, अल्लाहने अवतरीत केलेल्या संदेशा (वहयी) च्या आधारावर फैसला न करील तर असे लोक पुरेपूर काफीर आहेत.
४५. आणि आम्ही (तौरातमध्ये) यहूदींच्या हक्कात ही गोष्ट निर्धारीत केली की जीवाच्या बदल्यात जीव, आणि डोळ्याच्या बदल्यात डोळा आणि नाकाच्या बदल्यात नाक आणि कानाच्या बदल्यात कान आणि दाताच्या बदल्यात दात आणि खास जखमांचाही बदला आहे, मग जो कोणी त्यास माफ करील तर ते त्याच्यासाठी पश्चात्ताप आहे आणि जे लोक अल्लाहच्या आदेशानुसार फैसला करणार नाहीत तर असेच लोक अत्याचारी आहेत.
४६. आणि आम्ही त्यांच्यामागे मरियम-पुत्र ईसाला पाठविले, जे आपल्या पूर्वीचा ग्रंथ तौरात सत्य असल्याचे सांगत होते आणि आम्ही त्यांना इंजील (हा ग्रंथ) प्रदान केला. ज्यात नूर (दिव्य प्रकाश) आणि मार्गदर्शन होते आणि तो आपल्या पूर्वीचा ग्रंथ तौरात सत्य असल्याचे सांगत होता आणि ते स्पष्ट मार्गदर्शन आणि शिकवण होती, अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता.
४७. आणि इंजील बाळगणाऱ्यांकरिता हे बंधनकारक ठरते की जे काही अल्लाहने इंजीलमध्ये अवतरीत केले आहे, त्याच्याचनुसार फैसला करावा आणि जो मनुष्यदेखील अल्लाहने अवतरीत केल्यानुसार फैसला करणार नाही किंवा मानणार नाही तर असे लोक दुराचारी आहेत.
४८. आणि आम्ही तुमच्याकडे हा सत्यपूर्ण ग्रंथ अवतरीत केला आहे, जो आपल्या पूर्वीच्या समस्त आसमानी ग्रंथांची सत्यता दर्शवितो आणि त्यांचा संरक्षक आहे. यास्तव तुम्ही त्यांच्या दरम्यान, अल्लाहने अवतरीत केलेल्या ग्रंथानुसार फैसाला करा, या सत्याकडे पाठ फिरवून त्यांच्या इच्छा आकांक्षांवर जाऊ नका. तुमच्यापैकी प्रत्येकासाठी आम्ही एक शरीअत (धर्मशास्त्र) आणि मार्ग निर्धारीत केला आहे. अल्लाहने इच्छिले असते तर तुम्हा सर्वांचा एकच जनसमूह (उम्मत) बनविला असता. परंतु तो असे इच्छितो की, जे काही तुम्हाला दिले आहे, त्यात तुमची कसोटी घ्यावी, तेव्हा तुम्ही चांगल्या मोबदल्याच्या दिशेने त्वरा करा, तुम्हा सर्वांना अल्लाहच्याचकडे परत जायचे आहे. मग तो तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट दाखवून देईल, ज्यासंदर्भात तुम्ही मतभेद राखता.
४९. आणि तुम्ही त्यांच्या तंट्यात अल्लाहने अवतरीत केलेल्या वहयीनुसार फैसला करा. त्यांच्या इच्छा अभिलाषांचे अनुसरण करू नका आणि त्यांच्यापासून सावध राहा की कदाचित हे तुम्हाला अल्लाहच्या अवतरीत केलेल्या एखाद्या आदेशापासून डळमळीत न करावेत. जर हे तोंड फिरवतील तर खात्रीने अल्लाहचा हाच इरादा आहे की त्यांना त्यांच्या काही अपराधांची शिक्षा देऊनच टाकावी आणि अधिकांश लोक अवज्ञाकारी असतात.
५०. काय हे लोक पुनश्च अज्ञानतापूर्ण फैसला इच्छितात? आणि ईमान राखणाऱ्यांकरिता अल्लाहपेक्षा उत्तम फैसला करणारा आणि आदेश करणारा आणखी कोण असू शकतो?
५१. हे ईमानधारकांनो! तुम्ही यहूदींना आणि ख्रिश्चनांना दोस्त बनवू नका, हे तर आपसातच एकमेकांचे दोस्त आहेत. तुमच्यापैकी जो कोणी यांच्याशी दोस्ती करील तर तो त्यांच्यापैकीच ठरेल. अत्याचारी लोकांना अल्लाह कधीही (सरळ) मार्ग दाखवित नाही.
५२. तुम्ही पाहाल की ज्यांच्या मनात विकार आहे ते धावत जाऊन त्यांच्यात मिसळतात आणि म्हणतात की आम्हाला भय वाटते की कदाचित असे न व्हावे की एखादे संकट आमच्यावर कोसळावे, फार शक्य आहे की अल्लाहने विजय प्रदान करावा किंवा आपल्याकडून अन्य एखादा फैसला करावा मग तर हे आपल्या मनात लपविलेल्या गोष्टीबद्दल खूप लज्जित होतील.
५३. आणि ईमानधारक म्हणतील की काय हेच ते लोक होते, जे मोठ्या विश्वासाने अल्लाहची शपथ घेऊन म्हणतात की आम्ही तुमच्यासोबत आहोत, त्यांचे सर्व कर्म वाया गेले आणि ते असफल झाले.
५४. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुमच्यापैकी जो कोणी आपल्या दीन-धर्मापासून परावृत्त होईल, तर सर्वश्रेष्ठ अल्लाह लवकरच अशा जनसमूहाच्या लोकांना आणील अल्लाह ज्यांच्याशी प्रेम राखील आणि तेदेखील अल्लाहशी प्रेम करत असतील. ईमानधारकांसाठी ते कोमलहृदयी असतील, परंतु काफिरांसाठी मात्र कठोर आणि निर्दयी असतील, ते अल्लाहच्या मार्गात जिहाद करतील, कोणा निंदा-नालस्ती करणाऱ्यांच्या आरोपाची पर्वा करणार नाहीत. ही अल्लाहची कृपा आहे, ज्याला इच्छितो, प्रदान करतो, अल्लाह सर्वशक्तिमान आहे आणि अतिशय ज्ञान बाळगणारा आहे.
५५. (हे ईमानधारकांनो!) तुमचा मित्र स्वतः अल्लाह आणि त्याचा पैगंबर आहे आणि ईमान राखणारे लोक आहेत. जे नमाज कायम करतात आणि जकात देत राहतात आणि अल्लाहसमोर (एकाग्रचित्त होऊन) झुकणारे आहेत.
५६. आणि जो मनुष्य, सर्वश्रेष्ठ अल्लाहशी, त्याच्या पैगंबराशी आणि ईमानधारकांशी दोस्ती राखील तर त्याने विश्वास ठेवला पाहिजे की अल्लाहचे दासच वर्चस्वशाली राहतील.
५७. (ईमानधारकांनो!) तुम्ही अशा लोकांना आपला मित्र बनवू नका, जे तुमच्या दीन-धर्माला खेळ-तमाशा बनवून थट्टा उडवितात, मग ते त्यांच्यापैकी असोत ज्यांना तुमच्यापूर्वी ग्रंथ दिला गेला किंवा काफिर (इन्कारी) असोत जर तुम्ही (खरोखर) ईमानधारक असाल तर अल्लाहचे भय बाळगून राहा.
५८. आणि जेव्हा तुम्ही नमाजकरिता (अजान) पुकारता तेव्हा ते त्यास खेळ-तमाशा ठरवितात, हे अशासाठी की ते अक्कल बाळगत नाहीत.
५९. तुम्ही सांगा, हे यहूद्यांनो आणि ख्रिश्चनांनो! तुम्ही आमच्याशी केवळ या कारणास्तव वैर राखता की आम्ही अल्लाहवर आणि जे काही आमच्याकडे उतरविले गेले आहे आणि जे काही यापूर्वी उतरविले गेले आहे त्यावर ईमान राखले आहे आणि यासाठीही की तुमच्यात अधिकांश लोक दुराचारी आहेत.
६०. तुम्ही सांगा की काय मी तुम्हाला सांगू की याहून जास्त वाईट मोबदला प्राप्त करणारा अल्लाहच्या जवळ कोण आहे? तो, ज्याचा सर्वश्रेष्ठ अल्लाहने धिःक्कार केला असेल आणि त्यावर क्रोधित झाला असेल आणि त्यांच्यापैकी काहींना वानर आणि डुक्कर बनविले आणि ज्यांनी खोट्या दैवतांची उपासना केली तर हेच लोक वाईट दर्जाचे आहेत आणि हेच सत्य-मार्गापासून फार जास्त भटकलेले आहेत.
६१. आणि जेव्हा ते तुमच्याजवळ येतात, तेव्हा म्हणतात की आम्ही ईमान राखले जरी ते इन्कार सोबत घेऊन आले होते आणि त्याच इन्कारासोबत (या जगातून) गेलेतही आणि हे जे काही लपवित आहेत, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.
६२. आणि तुम्ही पाहाल की यांच्यापैकी बहुतेक जण अपराधाच्या कामांकडे अत्याचार आणि विद्रोहाकडे आणि हराम माल (धन) खाणयाकडे धाव घेत आहेत. जे काही हे करीत आहेत, ते अतिशय वाईट कर्म आहे.
६३. त्यांना त्यांचे संत-महंत आणि धर्मज्ञानी लोक खोटे बोलण्यापासून आणि हराम (अवैध) खाण्यापासून रोखत का नाही? निःसंशय ही वाईट कर्मे आहेत, जी हे करीत आहेत.
६४. आणि यहूदी म्हणाले, अल्लाहचा हात बांधलेला आहे, (उलट) त्यांचेच हात बांधलेले आहेत आणि त्यांच्या या कथनामुळे त्यांचा धिःक्कार केला गेला. किंबहुना अल्लाहचे दोन्ही हात खुले आहेत. ज्याप्रकारे इच्छितो, खर्च करतो, आणि जे काही तुमच्याकडे, तुमच्या पालनकर्त्यातर्फे उतरविले गेले आहे, ते त्यांच्यापैकी बहुतेकांच्या विद्रोह आणि इन्कारात वाढकरते, आणि आम्ही त्यांच्यात आपसात कयामतापर्यंत शत्रूता आणि द्वेष मत्सर पेरले आहे. ते जेव्हा जेव्हा युद्धाची आग भडकवू इच्छितात, अल्लाह तिला विझवितो. हे जमिनीवर दहशत आणि उत्पाद माजवित फिरतात आणि अल्लाह अशा विध्वंस करणाऱ्यांशी प्रेम राखत नाही.
६५. आणि जर या ग्रंथधारकांनी ईमान राखले असते आणि अल्लाहचे भय बाळगले असते तर आम्ही त्यांच्या दुष्कृत्यांवर पडदा टाकला असता आणि निश्चितच त्यांना कृपा देणग्यांनी भरलेल्या जन्नतमध्ये दाखल केले असते.
६६. जर त्यांनी तौरात आणि इंजील आणि त्या धर्मशास्त्रांचे पालन केले असते जे त्यांच्याकडे, त्यांच्या पालनकर्त्यातर्फे उतरविले गेलेत तर त्यांना आपल्या वरूनही आणि पायाखालूनही भरपूर (अन्नसामग्री) खायला लाभले असते. त्याच्याताला एक समूह मधल्या मार्गावर आहे, मात्र अधिकांश दुराचारी आहेत.
६७. हे पैगंबर! तुमच्याकडे, तुमच्या पालनकर्त्यातर्फे जो (संदेश) उतरविला गेला आहे, तो लोकांपर्यंत पोहचवा. जर तुम्ही असे केले नाही, तर त्याच्या संदेशाचा हक्क अदा केला नाही आणि अल्लाह लोकांपासून तुमचे रक्षण करील निःसंशय अल्लाह इन्कारी लोकांना मार्गदर्शन करीत नाही.
६८. तुम्ही सांगा की, हे ग्रंथधारकांनो! तुम्हाला कसलाही आधार नाही, जोपर्यंत तौरात आणि इंजील आणि जेदेखील (धर्मशास्त्र) तुमच्या पालनकर्त्यातर्फे तुमच्याकडे उतरविले गेले आहे, त्याचे पालन न कराल आणि तुमच्याकडे जे (पवित्र कुरआन) तुमच्या पालनकर्त्यातर्फे अवतरीत केले गेले आहे, ते यांच्यातल्या बहुतेक लोकांच्या हट्ट आणि इन्कारास वाढविल. तेव्हा या इन्कारी लोकांबद्दल तुम्ही दुःख करू नका.
६९. ईमानधारक, यहूदी, ताऱ्यांचे उपासक आणि ख्रिश्चनांपैकी जोदेखील अल्लाह आणि अंतिम दिवसा (कयामत) वर ईमान राखील आणि सत्कर्म करीत राहील तर अशा लोकांना, ना कसले भय राहील, ना ते दुःखी होतील.
७०. आम्ही इस्राईलच्या पुत्रां (यहूदीं) कडून वायदा घेतला आणि त्यांच्याकडे पैगंबरांना पाठविले, जेव्हा एखादा पैगंबर त्यांच्याजवळ असा आदेश घेऊन आला ज्याला त्यांचे मन स्वीकारत नव्हते तर त्यांनी एका गटाला खोटे ठरविले आणि एका गटाची हत्या करीत राहिले.
७१. आणि समजून बसले की काहीच शिक्षा मिळणार नाही, यास्तव आंधळे बहीरे झाले, तरीही अल्लाहने त्यांना माफ केले.असे असतानाही त्यांच्यापैकी अधिकांश लोक आंधळे बहीरे झाले आणि अल्लाह त्यांच्या कर्मांना खूप चांगल्या प्रकारे पाहणारा आहे.
७२. ते लोक काफिर (इन्कारी) झालेत, ज्यांनी म्हटले की मरियमचा पुत्र मसीह हाच अल्लाह आहे, वास्तविक मसीहने (स्वतः) म्हटले की हे इस्राईलच्या पुत्रांनो! माझ्या आणि तुमच्या पालनकर्त्या अल्लाहची उपासना करा कारण जो कोणी अल्लाहसोबत दुसऱ्याला सहभागी ठरवील तर अल्लाहने त्याच्यासाठी जन्नत हराम केली आहे आणि त्याचे ठिकाण जहन्नम आहे, आणि अत्याचारी लोकांचा कोणीही मदत करणारा नसेल.
७३. ते लोकही पूर्णतः काफिर झाले, ज्यांनी म्हटले की अल्लाह तीनचा तिसरा आहे. वास्तविक अल्लाहशिवाय कोणीही उपास्य नाही आणि जर हे लोक असे बोलणे सोडणार नाहीत तर त्यांच्यापैकी जे इन्कार करत राहतील तर त्यांना निश्चितच मोठा सक्त अज़ाब पोहोचेल.
७४. हे लोक अल्लाहकडे का नाही झुकत आणि का नाही क्षमा याचना करीत? अल्लाह अतिशय माफ करणारा आणि मोठा दया करणारा आहे.
७५. मरियमचे पुत्र मसीह केवळ एक पैगंबर असण्याखेरीज आणखी काहीही नाही. त्यांच्या पूर्वीही अनेक पैगंबर होऊन गेलेत. त्यांची माता एक सुशील आणि सत्यनिष्ठ स्त्री होती. दोघे (माता-पुत्र) जेवण करीत असत. तुम्ही पाहा आम्ही कशा प्रकारे त्यांच्यासमोर प्रमाण प्रस्तुत करतो, मग विचार करा की ते कशा प्रकारे परतविले जातात.
७६. तुम्ही सांगा की, काय तुम्ही अल्लाहशिवाय त्यांची भक्ती- उपासना करता जे ना तुम्हाला नुकसान पोहचविण्याचा अधिकार राखतात, ना कसल्याही प्रकारच्या फायद्याचा. अल्लाह चांगल्या प्रकारे ऐकणारा आणि पूर्णतः ज्ञानी आहे.
७७. सांगा, हे ग्रंथधारकांनो! आपल्या दीन-धर्मात अतिशयोक्ती करू नका आणि अशा लोकांच्या इच्छा अभिलाषांचे अनुसरण करू नका, जे पूर्वीपासून भटकलेले आहेत. आणि बहुतेकांना पथभ्रष्ट करून गेलेत आणि सरळ मार्गापासून दूर झाले आहेत.
७८. इस्राईलच्या संततीमधील इन्कारी लोकांचा (हजरत) दाऊद आणि मरियम-पुत्र हजरत ईसा यांच्या तोंडून धिःक्कार केला गेला, या कारणाने की ते आज्ञा भंग करणारे होते आणि मर्यादेचे उल्लंघन करीत होते.
७९. ते आपसात एकमेकांना वाईट कामांपासून, जे ते करीत असत, रोखत नव्हते, निश्चितच जे काही ते करीत, अतिशय वाईट होते.
८०. त्यांच्यातल्या अधिकांश लोकांना तुम्ही पाहाल की ते इन्कारी लोकांशी मैत्री करतात. जे काही त्यांनी आपल्या पुढे पाठविले आहे ते अतिशय वाईट आहे. (परिणामी) सर्वश्रेष्ठ अल्लाह त्यांच्याशी नाराज झाला आणि ते नेहमी अज़ाब (शिक्षा-यातने) मध्ये राहतील.
८१. जर त्यांनी अल्लाहवर, पैगंबरांवर आणि जे अवतरीत केले गेले आहे त्यावर ईमान राखले असते तर इन्कारी लोकांशी मैत्री केली नसती, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक दुराचारी आहेत.
८२. निःसंशय, तुम्हाला ईमानधारकांचे सक्त (कट्टर) वैरी यहूदी आणि अनेकेश्वरवादी आढळून येतील आणि ईमानधारकांचे सर्वाधिक निकटचे मित्र तुम्हाला जरूर त्यांच्यात आढळतील, जे स्वतःला ख्रिश्चन म्हणतात, हे अशासाठी की त्यांच्यात धर्मज्ञानी- विद्वान आणि संत-महात्मा आहेत, आणि या कारणास्तव की ते घमेंड करीत नाहीत.
८३. आणि जेव्हा ते पैगंबराकडे अवतरित झालेला संदेश ऐकतात, तेव्हा तुम्हाला त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहताना दिसतील. या कारणाने की त्यांनी सत्य ओळखून घेतले. ते म्हणतात, हे आमच्या पालनकर्त्या! आम्ही ईमान राखले, तेव्हा तू आम्हालाही साक्ष देणाऱ्यांमध्ये लिहून घे.
८४. आणि आम्ही का म्हणून ईमान न राखावे अल्लाहवर आणि त्या सत्यावर, जे आमच्याजवळ येऊन पोहोचले आहे आणि ही आशा न बाळगावी की आमचा पालनहार आम्हाला नेक सदाचारी लोकांमध्ये सामील करील.
८५. तर अल्लाहने त्यांच्या या दुआ (प्रार्थना) मुळे त्यांना (जन्नतच्या) अशा बागा प्रदान केल्या, ज्यांच्याखाली प्रवाह वाहत आहेत, ज्यात ते सदैव राहतील आणि नेक लोकांचा हाच मोबदला आहे.
८६. आणि जे काफिर (इन्कारी) झाले आणि ज्यांनी आमच्या आयतींना खोटे ठरविले, तेच जहन्नमी आहेत.
८७. हे ईमानधारकांनो! त्या पाक (स्वच्छ- शुद्ध) वस्तूंना हराम ठरवून का ज्या अल्लाहने तुमच्यासाठी हलाल ठरविल्या आहेत, आणि मर्यादेच्या बाहेर जाऊ नका निःसंशय अल्लाह अतिरेक करणाऱ्यांशी प्रेम राखत नाही.
८८. आणि अल्लाहने जी अन्न-सामुग्री तुम्हाला प्रदान केली आहे, त्यातून स्वच्छ-शुद्ध हलाल वस्तू खा आणि अल्लाहचे भय बाळगा, ज्याच्यावर तुम्ही ईमान राखता.
८९. अल्लाह तुमच्या व्यर्थ, निरर्थक शपथांबद्दल तुमची पकड करीत नाही तथापि अशाच शपथांबद्दल पकड करतो, ज्या तुम्ही पक्क्या इराद्याने घेतल्या. त्याचे प्रायश्चित्त दहा गरीबांना भोजन देणे, बऱ्यापैकी, जसे आपल्या घरच्या लोकांना खाऊ घालता किंवा त्यांना कपडे लत्ते देणे किंवा एक गुलाम अथवा दासी मुक्त करणे, आणि ज्याला हे शक्य नसेल तर त्याने तीन दिवस रोजे (उपवास- व्रत) राखावे. हे तुमच्या त्या शपथांचे प्रायश्चित्त आहे, जेव्हा तुम्ही अशी शपथ घ्याल. आणि आपल्या शपथांवर कायम राहून त्यांचे रक्षण करा, अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ अल्लाह तुमच्यासाठी आपले आदेश स्पष्टतः सांगतो यासाठी की तुम्ही आभार मानावेत.
९०. हे ईमान राखणाऱ्यांनो! मद्य, जुगार आणि देव-स्थान आणि भविष्य वर्तविणारे फांसे हे सर्व अमंगल सैतानी कामे आहेत, तेव्हा तुम्ही यापासून दूर राहा, यासाठी की सफल व्हावे.
९१. सैतान तर इच्छितोच की मद्य आणि जुगाराद्वारे तुमच्या दरम्यान शत्रूता आणि द्वेष मत्सर निर्माण करावे आणि तुम्हाला अल्लाहच्या स्मरणापासून व नमाजपासून रोखावे, तेव्हा तुम्ही अशा कामांपासून दूर का राहात नाही?
९२. आणि अल्लाहच्या आदेशाचे पालन करा आणि पैगंबरांचे आज्ञापालन करा आणि सावधगिरी पाळा आणि जर तुम्ही तोंड फिरवले तर लक्षात ठेवा की आमच्या पैगंबराची जबाबदारी स्पष्ट संदेश पोहचविण्याची आहे.
९३. ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म केले, अशांवर गुन्हा नाही जर पूर्वी काही खाल्ले असेल, वस्तुतः नंतर ते परहेजगार (दुष्कर्मापासून दूर राहणारे) बनले, आणि ईमानधारक झाले व सत्कर्म करू लागले, परहेजगारीवर कायम राहिले आणि ईमानावर अटळ राहिले, मग अल्लाहची अवज्ञा करण्यापासून दूर राहिले आणि नेकी (च्या मार्गा) वर चालत राहिले आणि अल्लाह अशा नेक काम करणाऱ्यांशी प्रेम राखतो.
९४. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाह काही शिकारद्वारे तुमची परीक्षा घेतो, ज्या पर्यंत तुमचे हात आणि तुमचे भाले पोहोचू शकतील, यासाठी की अल्लाहने हे जाणून घ्यावे की कोण त्याला न पाहता भय राखतो जो मनुष्य यानंतरही मर्यादा पार करील, त्याच्यासाठी कठोर सजा आहे.
९५. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही (हज किंवा उमराप्रसंगी) एहरामच्या अवस्थेत असाल तर शिकार करू नका आणि तुमच्यापैकी जो कोणी त्याला मारेल तर त्याला फिदिया द्यावा लागेल त्याच्यासारख्याच पाळीव जनावराने, ज्याचा फैसला तुमच्यापैकी दोन न्याय करणारे करतील जे कुर्बानीकरिता काबापर्यंत पोहचविले जाईल किंवा फिदिया म्हणून गरीबांना भोजन द्यावे लागेल किंवा त्याच्या बरोबरीने रोजे (उपवास-व्रत) ठेवावे लागतील, यासाठी की आपल्या कर्माचे फळ चाखावे, जे पूर्वी झाले, अल्लाहने ते माफ केले आणि जो कोणी या (मनाई आदेशा) नंतर पुन्हा असे करील तर अल्लाह त्याचा सूड घेईल, अल्लाह मोठा शक्तिशाली सूड घेणारा आहे.
९६. तुमच्यासाठी समुद्रातील (प्राण्याची) शिकार पकडणे व खाणे हलाल केले गेले आहे. तुमच्या वापरासाठी आणि प्रवाशांसाठी, आणि जोपर्यंत तुम्ही एहरामच्या अवस्थेत असाल, खुश्कीची शिकार हराम केली गेली आहे आणि अल्लाहचे भय राखा, ज्याच्याजवळ तुम्ही एकत्र केले जाल.
९७. अल्लाहने काबागृहाला, जे आदर-सन्मानपूर्ण घर आहे, लोकांकरिता कायम राहण्याचे कारण बनविले आणि आदरणीय महिन्याला आणि हरममध्ये कुर्बानी दिल्या जाणाऱ्या जनावरांनाही आणि त्या जनावरांनाही, ज्यांच्या गळ्यात पट्टे असतील, हे अशासाठी की तुम्ही या गोष्टीवर विश्वास राखावा की निःसंशय अल्लाह आकाशांच्या व जमिनीच्या समस्त चीज-वस्तूंचे ज्ञान राखतो आणि निःसंशय अल्लाह प्रत्येक गोष्टीचे चांगल्या प्रकारे ज्ञान राखतो.
९८. तुम्ही जाणून असा की सर्वश्रेष्ठ अल्लाह शिक्षा यातनाही कठोर देणारा आहे आणि अल्लाह मोठा माफ करणारा आणि अतिशय दया करणाराही आहे.
९९. पैगंबराचे कर्तव्य तर केवळ पोहचविण्याचे आहे आणि अल्लाह सर्व काही जाणतो, जे काही तुम्ही जाहीर करता आणि जे काही तुम्ही लपविता.
१००. तुम्ही सांगा की नापाक आणि पाक (गलिच्छ व स्वच्छ शुद्ध) समान नाहीत, मग तुम्हाला नापाकची विपुलता चांगली वाटत असली तरी, अल्लाहचे भय बाळगून राहा हे बुद्धिमानांनो! यासाठी की तुम्ही सफल व्हावे.
१०१. हे ईमान राखणाऱ्यांनो! अशी गोष्ट विचारू नका की जी जाहीर केली गेली तर तुम्हाला वाईट वाटेल आणि जर कुरआन उतरतेवेळी विचाराल तर तुम्हाला त्याचे उत्तर उघड दिले जाईल. यापूर्वी जे झाले ते अल्लाहने माफ केले आणि अल्लाह मोठा माफ करणारा सहनशील आहे.
१०२. तुमच्यापूर्वी काही लोकांनी असेच प्रश्न विचारले, नंतर त्याचे इन्कारी झाले.
१०३. बहीरा, साएबा, वसीला आणि हाम वगैरेचा अल्लाहने आदेश दिला नाही, परंतु इन्कारी लोक अल्लाहवर मिथ्या आरोप ठेवतात, आणि त्यांच्यातले बहुतेक जण अक्कल बाळगत नाही.
१०४. आणि जेव्हा त्यांना सांगितले गेले की त्या (पवित्र कुरआना) कडे आणि पैगंबर (मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) कडे या, तेव्हा ते म्हणाले की ज्या (रीति-रिवाजा) वर आम्हाला आमचे वाडवडील आढळलेत, ते आम्हाला पुरेसे आहे. मग त्यांचे ते वाडवडील काही जाणत नसावेत आणि सन्मार्गावर नसावेत, तरीही?
१०५. हे ईमान राखणाऱ्यांनो! आपली काळजी घ्या, जेव्हा तुम्ही सत्य मार्गावर चालत असाल, तर जो मनुष्य पथभ्रष्ट होईल तर त्यामुळे तुमचे काहीच नुकसान नाही, अल्लाहच्याच जवळ तुम्हा सर्वांना जायचे आहे, मग तो तुम्हा सर्वांना सांगेल तुम्ही कसकसे कर्म करीत होते.
१०६. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याचा मृत्युसमय जवळ आला असेल तेव्हा वसीयत (मृत्युपत्र) करतेवेळी तुमच्यातले दोन न्याय करणारे साक्षी म्हणून असले पाहिजे किंवा तुमच्याखेरीज इतर दोन जण जर तुम्ही जमिनीवर प्रवास करीत असाल आणि अचाानक मृत्युचे संकट तुमच्यावर यावे (संशयाच्या स्थितीत) तुम्ही दोघा (साक्षीं) ना (जमातची) नमाज झाल्यानंतर रोखा, मग ते दोघे अल्लाहची शपथ घेतील की आम्ही या (साक्ष देण्या) च्या मोबदल्यात कसलेही मूल्य घेऊ इच्छित नाही, मग कोणी जवळचा नातेवाईक का असेना आणि आम्ही अल्लाहची साक्ष लपवू शकत नाही, जर आम्ही असे केले तर दोषी ठरू.
१०७. नंतर जर असे कळाले की ते दोघे (साक्षी) एखआद्या अपराधआस पात्र ठरले आहेत, तर अशा लोकांपैकी ज्यांच्या विरोधात गुन्हा घडला होता, आणखी दोन व्यक्ती, ज्या सर्वांत जवळच्या असतील, जिथे ते दोघे उभे होते, त्या जागी या दोघांनी उभे राहावे, मग ते अल्लाहची शपथ घेतील की आमची साक्ष या दोघांच्या साक्षीपेक्षा अधिक खरी आहे. आणि आम्ही मर्यादा पार केली नाही असे केल्यास आमची गणना अत्याचारी लोकांमध्ये होईल.
१०८. हा सर्वाधिक जवळचा मार्ग आहे की ते लोक खरी साक्ष देतील किंवा त्यांना हे भय असेल की शपथ घेतल्यानंतर पुन्हा शपथ उलट पडेल आणि अल्लाहचे भय राखा आणि ऐका! अल्लाह दुराचारी लोकांना मार्गदर्शन करीत नाही.
१०९. ज्या (कयामतच्या) दिवशी अल्लाह समस्त पैगंबरांना एकत्र करील, मग विचारेल की तुम्हाला काय उत्तर मिळाले होते? ते म्हणतील, आम्हाला काहीच माहीत नाही. गैब (अपरोक्ष) जाणणारा तूच आहेस.
११०. जेव्हा अल्लाह फर्माविल, हे मरियम-पुत्र ईसा! तुमच्यावर आणि तुमच्या मातेवर मी केलेल्या कृपा देणगीचे स्मरण करा. जेव्हा मी पवित्र आत्मा (जिब्रील) द्वारे तुमची मदत केली. तुम्ही पाळण्यात असताना व मोठ्या वयात लोकांशी संभाषण करीत राहिले आणि जेव्हा आम्ही ग्रंथ व हिकमत आणि तौरात व इंजीलचे ज्ञान दिले आणि जेव्हा तुम्ही माझ्या हुकूमाने पक्षीरूप पुतळा मातीने तयार करीत असत आणि त्यात फुंक मारीत असत, तेव्हा माझ्या हुकूमाने तो (जिवंत) पक्षी बनत असे, आणि तुम्ही माझ्या हुकूमाने जन्मजात आंधळ्याला आणि कोढी इसमाला चांगले करीत असत, आणि माझ्या हुकूमाने मेलेल्यांना (जिवंत करून) बाहेर काढीत असत आणि जेव्हा मी इस्राईलच्या पुत्रांना तुमच्यापासून रोखले. जेव्हा तुम्ही त्यांच्याजवळ मोजिजा घेऊन आले तेव्हा त्यांच्यातले इन्कारी लोक म्हणाले, की ही केवळ उघड जादू आहे.
१११. आणि ज्याअर्थी मी हवारींना प्रेरित केले की तुम्ही माझ्यावर आणि माझ्या पैगंबरांवर ईमान राखा, तेव्हा ते म्हणाले, आम्ही ईमान राखले आणि तुम्ही साक्षी राहा की आम्ही पूर्णतः आज्ञाधारक आहोत.
११२. स्मरण करा, जेव्हा हवारी म्हणाले की हे मरियम-पुत्र ईसा! काय तुमचा पालनकर्ता आमच्यावर आकाशातून (भोजनाची) एक थाळी उतरवू शकतो? ईसा म्हणाले, ईमान राखत असाल तर अल्लाहचे भय बाळगा.
११३. ते म्हणाले की आम्ही त्यातून खआऊ इच्छितो आणि आमच्या मनाला समाधान लाभावे आणि आमची खात्री व्हावी की तुम्ही आम्हाला खरे सांगितले आणि आम्ही त्यावर साक्षी राहावे.
११४. मरियम-पुत्र ईसा म्हणाले, हे अल्लाह! आमच्यावर आकाशातून एक थाळी उतरव, जी आमच्या पूर्वीच्या आणि नंतरच्या लोकांकरिता आनंदाची गोष्ट ठरावी आणि तुझ्यातर्फे एक निशाणी ठरावी आणि अम्हाला रोजी (आजिविका) प्रदान कर. तू उत्तम रोजी देणारा आहेस.
११५. अल्लाहने फर्माविले की मी ते भोजन तुम्हा लोकांसाठी उतरवित आहे, मग तुमच्यापैकी जो कोणी यानंतरही कुप्र (इन्कार) करील तर मी त्याला अशी सक्त सजा देईन की तशी सजा साऱ्या जगात कोणालाही देणार नाही.
११६. आणि (त्या वेळेचेही स्मरण करा) जेव्हा सर्वश्रेष्ठ अल्लाह फर्माविल की हे मरियम-पुत्र ईसा! काय तुम्ही त्या लोकांना असे सांगितले होते की मला आणि माझ्या मातेला अल्लाहशिवाय उपास्य बनवून घ्या? ईसा उत्तर देतील की मी तर तुला प्रत्येक व्यंग- दोषापासून मुक्त (पाक) समजतो तेव्हा मला अशा प्रकारे शोभेल की मी अशी गोष्ट बोलावे, जी बोलण्याचा मला काहीच हक्क नाही, जर मी असे बोललो असेल तर तुला ते माहीतही असेल. तू तर माझ्या मनातील गोष्टही जाणतो, मात्र तुझ्या मनात जे काही आहे, ते मी नाही जाणत. केवळ तूच अपरोक्ष गोष्टींचा ज्ञाता आहेस.
११७. मी त्यांना केवळ तेच सांगितले, ज्याचा तू मला आदेश दिला की तुमचा व माझा पालनकर्ता असलेल्या अल्लाहची उपासना करा आणि जोपर्यंत मी त्यांच्यात राहिलो, त्यांच्यावर साक्षी राहिलो, आणि जेव्हा तू मला उचलून घेतले तेव्हा तूच त्यांचा देखरेखकर्ता होता, आणि तू प्रत्येक गोष्टीवर साक्षी आहे.
११८. जर तू यांना अज़ाब (शिक्षा-यातना) देशील तर हे तुझेच दास आहेत आणि जर तू यांना माफ करशील तर तू मोठा जबरदस्त हिकमत बाळगणारा आहे.
११९. अल्लाह फर्माविल की हा तो दिवस आहे की सत्यनिष्ठ लोकांचे सत्य त्यांच्याकरिता लाभदायक ठरेल. त्यांना (जन्नतच्या) बागा मिळतील, ज्यांच्याखाली प्रवाह वाहत असतील, ज्यात ते नेहमी नेहमी राहतील. अल्लाह त्यांच्याशी प्रसन्न आणि ते अल्लाहशी खूश असतील. ही फार मोठी सफलता आहे.
१२०. अल्लाहचीच राज्य-सत्ता आहे आकाशांमध्ये व जमिनीवर आणि जे काही यांच्या दरम्यान आहे त्यावरदेखील! आणि अल्लाह सर्व काही करण्याचे सामर्थ्य बाळगतो.
Icon