ترجمة سورة المرسلات

الترجمة الماراتية
ترجمة معاني سورة المرسلات باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. मनमोहक, सतत चालणाऱ्या मंद हवेची शपथ
२. मग जोरात (वेगाने) वाहू लागणारींची शपथ.
३. आणि (ढगांना) पसरविणारींची शपथ
४. मग सत्य - असत्याला वेगवेगळे करणारे!
५. आणि वहयी (प्रकाशना) आणणाऱ्या फरिश्त्यांची शपथ
६. जी (वहयी) आरोपाचे खंडन करण्यासाठी किंवा सचेत करण्यासाठी असते.
७. निःसंशय, ज्या गोष्टीचा तुमच्याशी वायदा केला जात आहे ती अगदी निश्चितपणे घडून येणार आहे.
८. तर जेव्हा तारे निस्तेज केले जातील.
९. आणि आकाशाचा विध्वंस केला जाईल.
१०. आणि जेव्हा पर्वत तुकडे तुकडे करून उडविले जातील
११. आणि जेव्हा पैगंबरांना निर्धारित वेळेवर आणले जाईल
१२. कोणत्या दिवसाकारीता (त्यांना) थांबविले गेले आहे?
१३. निर्णयाच्या दिवसाकरिता.
१४. आणि तुम्हाला काय माहीत की निर्णयाचा दिवस काय आहे?
१५. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी दुःस्थिती (विनाश) आहे.
१६. काय आम्ही पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना नष्ट नाही केले?
१७. मग आम्ही त्यांच्या पाठोपाठ नंतरच्या लोकांना आणले.
१८. आम्ही अपराधी लोकांशी असाच व्यवहार करतो.
१९. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता विनाश आहे.
२०. काय आम्ही तुम्हाला तुच्छ पाण्या (वीर्या) पासून निर्माण केले नाही?
२१. मग आम्ही त्यास मजबूत (आणि सुरक्षित) स्थानी ठेवले.
२२. एका निर्धारित वेळे पर्यर्ंत.
२३. मग आम्ही अनुमान लावले, तर आम्ही किती चांगले अनुमान लावणारे आहोत!
२४. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे.
२५. काय आम्ही जमिनीला संचयित करणारी नाही बनविले?
२६. जिवंत असलेल्यांनाही आणि मेलेल्यांनाही
२७. आणि आम्ही तिच्यात उंच (आणि वजनदार) पर्वत बनविले, आणि तुम्हाला सिंचित करणारे गोड पाणी पाजले.
२८. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे.
२९. त्या (जहन्नम) कडे जा, जिला तुम्ही खोटे ठरवित होते.
३०. चला त्या सावलीकडे, जिला तीन शाखा आहेत.
३१. जी वास्तविक ना छाया देणारी आहे आणि ना ज्वालापासून वाचवू शकते.
३२. निःसंशय, (जहन्नम) महालासारख्या चिंगाऱ्या फेकते
३३. जणू काही ते पिवळे उंट आहेत.
३४. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी दुर्दशा (विनाश) आहे.
३५. आज (चा दिवस) असा दिवस आहे की ते बोलूही शकणार नाहीत.
३६. ना त्यांना सबब मांडण्याची अनुमती दिली जाईल.
३७. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांची दुःस्थिती ( खराबी ) आहे.
३८. हा आहे फैसल्याचा दिवस. आम्ही तुम्हाला आणि पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना (सर्वांना) एकत्रित केले आहे.
३९. तेव्हा जर तुम्ही माझ्याशी एखादी चाल खेळू शकत असाल तर खेळून पाहा.
४०. दुःख आहे त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता.
४१. निःसंशय, नेक सदाचारी लोक सावलीत असतील आणि वाहत्या झऱ्यांमध्ये.
४२. आणि त्या फळांमध्ये, ज्यांची ते इच्छा करतील
४३. (हे जन्नतमध्ये राहणाऱ्यांनो!) मजेत खा आणि प्या, आपल्या कृत-कर्मांच्या मोबदल्यात.
४४. निःसंशय, आम्ही सत्कर्म (नेकी) करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो.
४५. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता मोठे दुःख आहे.
४६. (हे खोटे ठरविणाऱ्यांनो!) तुम्ही (या जगात) थोडे खाऊन पिऊन घ्या आणि लाभ प्राप्त करून घ्या. निश्चितच तुम्ही अपराधी आहात.
४७. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे.
४८. त्यांना जेव्हा सांगितले जाते की रुकूअ करा (झुका) तर करीत नाही.
४९. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांचा विनाश आहे.
५०. आता या (कुरआना) नंतर कोणत्या गोष्टीवर ईमान राखतील?
Icon