ترجمة سورة الملك

الترجمة الماراتية
ترجمة معاني سورة الملك باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. मोठा समृद्धशाली आहे तो, ज्याच्या हाती राज्य (सत्ता) आहे आणि जो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगणारा आहे.
२. ज्याने जीवन आणि मृत्युला अशासाठी निर्माण केले की तुमची परीक्षा घ्यावी की तुमच्यापैकी चांगले कर्म कोण करतो आणि तो वर्चस्वशाली आणि माफ करणारा आहे.
३. ज्याने सात आकाश वर-खाली निर्माण केले (तेव्हा हे पाहणाऱ्यांनो!) रहमान (अल्लाह) च्या निर्मितीत कसलीही विसंगती आढळणार नाही. दुसऱ्यांदा परतून पाहा की काय एखादा (व्यंग - दोष) दिसून येतो?
४. मग परत पुन्हा दोन दोन वेळा पाहा, तुझी दृष्टी तुझ्याकडे अपमानित (आणि लाचार) होऊन थकलेली परत येईल.
५. आणि निःसंशय, आम्ही या जगाच्या आकाशाला दिव्यांनी (ताऱ्यांनी) सुशोभित केले आणि त्यांना सैतानांना मारण्याचे साधन बनविले. आणि सैतानांकरिता आम्ही (जहन्नमचा जाळणारा) अज़ाब तयार करून ठेवला आहे.
६. आणि आपल्या पालनकर्त्याशी इन्कार करणाऱ्यांकरिता जहन्नमचा अज़ाब (शिक्षा - यातना) आहे आणि ते किती वाईट स्थान आहे!
७. जेव्हा हे त्यात टाकले जातील, तेव्हा तिचा (जहन्नमचा) भयंकर आवाज ऐकतील आणि ती उकळत असेल.
८. (असे दिसेल की आताच) क्रोधातिरेकाने फाटून जाईल. जेव्हा जेव्हा त्यात एखादा समूह टाकला जाईल, तेव्हा त्याला जहन्नमचा रक्षक विचारेल की, काय तुमच्याजवळ कोणी खबरदार करणारा आला नव्हता?
९. ते उत्तर देतील, निःसंशय, आला तर होता, परंतु आम्ही त्याला खोटे ठरविले आणि म्हटले की अल्लाहने काहीच अवतरित केले नाही, तुम्ही फार मोठ्या मार्गभ्रष्टतेत आहात.
१०. आणि म्हणतील की जर आम्ही ऐकले असते किंवा समजून घेतले असते तर जहन्नमवाल्यांमध्ये (सामील) झालो नसतो.
११. जेव्हा त्यांनी आपले अपराध कबूल केले. आता हे जहन्नमी लोक दूर होवोत.
१२. निःसंशय, जे लोक आपल्या पालनकर्त्याचे न पाहताच भय बाळगतात, त्यांच्यासाठी माफी आहे आणि मोठा मोबदला आहे.
१३. आणि तुम्ही आपल्या गोष्टी अगदी हळू स्वरात बोला किंवा उंच आवाजात, तो तर छातीमध्ये (मनात लपलेल्या) गोष्टींनाही चांगल्या प्रकारे जाणतो.
१४. काय तोच नाही जाणणार, ज्याने निर्माण केले? मग तो सूक्ष्मदर्शी आणि खबर राखणाराही असावा.
१५. तो, तोच आहे, ज्याने तुमच्यासाठी जमिनीला सखल (आणि कोमल) बनविले, यासाठी की तुम्ही तिच्या रस्त्यांवर येणे-जाणे करीत राहावे आणि तिने दिलेल्या जीविके (अन्न-सामुग्री) ला खावे-प्यावे. त्याच्याचकडे (तुम्हाला) जिवंत होऊन उठून उभे राहायचे आहे.
१६. काय तुम्ही या गोष्टीपासून निर्भय झालात की आकाशांच्या स्वामीने तुम्हाला जमिनीत धसवून टाकावे आणि जमीन अकस्मात थरथरावी.
१७. किंवा काय तुम्ही या गोष्टीपासून निर्भय झाला आहात की आकाशांच्या स्वामीने तुमच्यावर दगडांचा वर्षाव करावा? मग तर तुम्हाला कळूनच येईल की माझे भय दाखवणे कसे होते?
१८. आणि त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीही खोटे ठरविले होते, (तर पाहा) त्यांच्यावर माझा प्रकोप (अज़ाब) कसा झाला?
१९. काय हे कधी आपल्या वर पक्ष्यांना पंख पसरविताना आणि (कधी) मिटविताना पाहत नाहीत? त्यांना रहमान (अल्लाह) नेच (वातावरणात व आकाशात) आधार दिलेला आहे. निःसंशय, प्रत्येक गोष्ट त्याच्या नजरेत आहे.
२०. अल्लाहखेरीज तुमची कोणती सेना आहे, जी तुम्हाला मदत करू शकेल, काफिर (इन्कार करणारे) तर पूर्णतः धोक्यातच आहेत.
२१. जर अल्लाह आपली रोजी रोखून घेईल तर (सांगा) कोण आहे जो तुम्हाला रोजी (जीविका) देईल? किंबहुना (काफिर) तर विद्रोह आणि सत्यापासून उद्विग्न होण्यावर अडून बसले आहेत.
२२. काय तो मनुष्य अधिक मार्गदर्शनावर चालणारा आहे, जो तोंडघशी पडून चालत असावा की तो, जो सरळ (पायांवर) मार्गावर चालत असेल?
२३. सांगा की तोच (अल्लाह) आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले आणि तुमचे कान, डोळे आणि हृदय बनविले, (परंतु) तुम्ही फार कमीच कृतज्ञता व्यक्त करता.
२४. सांगा की तोच आहे, ज्याने तुम्हाला धरतीवर (इतस्ततः) पसरविले, आणि त्याच्याचकडे तुम्ही एकत्रित केले जाल.
२५. आणि (काफिर) विचारतात की तो वायदा केव्हा प्रकट (पूर्ण) होईल, जर तुम्ही सच्चे असाल (तर सांगा)?
२६. (तुम्ही) सांगा की याचे ज्ञान तर केवळ अल्लाहलाच आहे. मी तर स्पष्टपणे खबरदार करणारा आहे.
२७. जेव्हा या लोकांना तो वायदा निकट आलेला आढळेल, त्या वेळी या काफिरांचे चेहरे बिघडतील, मग त्यांना सांगितले जाईल की, हेच आहे ते, ज्याची तुम्ही मागणी करीत होते.
२८. (तुम्ही) सांगा की, ठीक आहे. जर मला आणि माझ्या साथीदारांना अल्लाह नष्ट करील किंवा आमच्यावर दया कृपा करील (जे काही होवो, परंतु हे सांगा) की काफिरांना (इन्कार करणाऱ्यांना) कष्टदायक शिक्षा - यातनेपासून कोण वाचविल?
२९. (तुम्ही) सांगा की तोच रहमान (दयावान) आहे, आम्ही त्याच्यावर ईमान राखले आणि त्याच्यावरच आम्ही भरवसा केला. तुम्हाला लवकरच माहीत पडेल की उघड (स्वरूपाच्या) मार्गभ्रष्टतेत कोण आहे?
३०. (तुम्ही) सांगा, ठीक आहे, बरे हे तर सांगा की जर तुमचे (पिण्याचे) पाणी जमीन शोषून घेईल तर मग कोण आहे जो तुमच्यासाठी निथारलेले साफ पाणी घेऊन येईल?
Icon