ﰡ
१. हे लोक तुम्हाला प्राप्त झालेल्या धन-संपत्तीविषयी विचारतात, तुम्ही सांगा की युद्धात प्राप्त झालेली धन-संपत्ती अल्लाहची आहे, आणि पैगंबराची आहे. यास्तव तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि आपले आपसातील नातेसंबंध सुधारून घ्या आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आदेशाचे पालन करा, जर तुम्ही ईमान राखणारे असाल.
२. ईमान राखणारेच असे असतात की जेव्हा अल्लाहचे वर्णन केले जाते, तेव्हा त्यांची हृदये भयभीत होतात, आणि जेव्हा अल्लाहच्या आयती त्यांना वाचून ऐकविल्या जातात तर त्या आयती त्यांच्या ईमानास वृद्धिंगत करतात आणि ते लोक आपल्या पालनकर्त्यावर भरोसा ठेवतात.
३. जे नमाज नियमितपणे पढतात आणि आम्ही जे काही त्यांना दिले आहे, त्यातून खर्च करतात.
४. सच्चे ईमान राखणारे हेच लोक आहेत. त्यांच्याकरिता मोठे दर्जे आहेत त्यांच्या पालनकर्त्याजवळ आणि क्षमा आणि मान सन्मानपूर्ण रोजी (आजीविका) आहे.
५. जसे की तुमच्या पालनकर्त्याने तुमच्या घरापासून सत्यासह तुम्हाला बाहेर काढले आणि ईमानधारकांच्या एका गटाला हे असह्य वाटत होते.
६. स्पष्ट कळून आल्यानंतर ते सत्याविषयी तुमच्याशी वाद घालत होते जणू काही ते मृत्युकडे हांकले जात असावेत आणि (त्याला) पाहत असावेत.
७. आणि तुम्ही लोक त्या वेळेची आठवण करा, जेव्हा अल्लाह तुमच्याशी त्या दोन गटांपैकी एकाचा वायदा करीत होता की जो तुमच्या हाती लागेल आणि तुम्ही या आशेवर होते की शस्त्रे नसलेला गट तुमच्या हाती लागावा आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहला मान्य होते की आपल्या हुकूमाने सत्याचे सत्य असणे सिद्ध करून द्यावे आणि त्या इन्कारी लोकांच्या मुळावर घाव घालावा.
८. यासाठी की सत्याचे सत्य असणे आणि असत्याचे असत्य असणे सिद्ध करावे, मग या अपराधी लोकांना अप्रिय का वाटेना.
९. त्या वेळेची आठवण करा, जेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्यास दुआ (प्रार्थना) करीत होते, मग सर्वश्रेष्ठ अल्लाहने तुमची दुआ कबूल केली की मी तुमची एक हजार फरिश्त्यांद्वारे मदत करीन जे लागोपाठ येत जातील.
१०. आणि अल्लाहनेही मदत केवळ या कारणास्तव केली की शुभ समाचार ठरावा आणि तुमच्या हृदयांना शांती समाधान लाभावे आणि विजय फक्त अल्लाहतर्फे आहे. निःसंशय अल्लाह अतिशय शक्तिशाली आणि हिकमत बाळगणारा आहे.
११. त्या वेळेची आठवण करा जेव्हा (अल्लाह) तुमच्यावर झोपेची गुंगी चढवित होता, आपल्याकडून शांती समाधान प्रदान करण्यासाठी आणि तुमच्यावर आकाशातून पर्जन्यवृष्टी करीत होता की या पाण्याद्वारे तुम्हाला पाक (स्वच्छ-शुद्ध) करावे आणि तुमच्यापासून सैतानी शंका-कुशंका दूर कराव्यात आणि तुमच्या हृदयांना मजबूत करावे आणि तुमचे पाय चांगले स्थिर करावेत.
१२. त्या वेळेची आठवण करा, जेव्हा तुमचा पालनकर्ता फरिश्त्यांना आदेश देत होता की मी तुमच्या सोबतीला आहे, यास्तव तुम्ही ईमानधारकांचे साहस वाढवा. मी आताच काफिरांच्या मनात भय टाकतो. यास्तव तुम्ही मानांवर घाव घाला आणि त्यांच्या एक एक सांध्यावर प्रहार करा.
१३. ही या गोष्टीची शिक्षा आहे की त्यांनी अल्लाहचा आणि त्याच्या पैगंबराचा विरोध केला आणि जे लोक अल्लाहचा आणि त्याच्या पैगंबराचा विरोध करतात, तर सर्वश्रेष्ठ अल्लाह सक्त सजा देणारा आहे.
१४. तेव्हा या शिक्षेची गोडी चाखा आणि लक्षात ठेवा की काफिरांकरिता (इन्कारी लोकांकरिता) आगीची शिक्षा-यातना ठरलेलीच आहे.
१५. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही काफिरांशी लढण्यास भिडाल, तेव्हा त्यांच्याकडून पाठ फिरवू नका.
१६. आणि जो मनुष्य त्याप्रसंगी त्यांच्याकडून पाठ फिरविल, परंतु जर कोणी लढण्याचा पवित्रा बदलत असेल किंवा जो आपल्या समूहाकडे आश्रय घेण्यासाठी येत असेल (तर गोष्ट वेगळी) मात्र जो दुसरा असे करील तर तो अल्लाहचा प्रकोप ओढवून घेईल आणि त्याचे ठिकाण जहन्नम असेल, आणि ते अतिशय वाईट ठिकाण आहे.
१७. तेव्हा तुम्ही त्यांना ठार मारले नाही, किंबहुना अल्लाहने त्यांना ठार केले आणि तुम्ही (मूठभर धूळ) नाही फेकली, परंतु अल्लाहने फेकली, आणि यासाठी की ईमानधारकांना आपल्यातर्फे, त्यांच्या प्रयत्नाचा फार मोठा मोबदला प्रदान करावा. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह खूप ऐकणारा, खूप जाणणारा आहे.
१८. (एक गोष्ट तर) ही झाली (दुसरी गोष्ट अशी) की सर्वश्रेष्ठ अल्लाहला काफिरांचे कट कारस्थान असफल करायचे होते.
१९. जर तुम्ही लोक निर्णय इच्छित असाल तर तो निर्णय तुमच्यासमोर आहे, आणि जर थांबाल तर हे तुमच्यासाठी फार उत्तम आहे आणि जर तुम्हीदेखील तेच काम कराल तर आम्हीदेखील तेच काम करू, मग तुमचा समुदाय तुमच्या काहीच उपयोगी पडणार नाही, मग संख्येने कितीही मोठा असो. खरी गोष्ट ही आहे की सर्वश्रेष्ठ अल्लाह ईमान राखणाऱ्यांच्या सोबत आहे.
२०. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहचे आणि त्याच्या पैगंबराचे फर्मान माना आणि त्या (फर्मानाला कबूल करण्या) पासून तोंड फिरवू नका, ऐकून आणि जाणून घेतानाही.
२१. आणि तुम्ही त्या लोकांसारखे होऊ नका, जे दावा तर करतात की आम्ही ऐकले, वास्तविक त्यांनी काहीच ऐकले नाही.
२२. निःसंशय समस्त प्राणीमात्रात अल्लाहच्या जवळ अतिशय वाईट ते लोक आहेत, जे बहीरे आहेत, मुके आहेत, जे किंचितही समजून घेत नाहीत.
२३. आणि जर अल्लाहला त्यांच्यात काही चांगुलपणा आढळला असता तर त्यांना श्रवणशक्ती प्रदान केली असती आणि जर त्यांना आता ऐकवीलही तरी ते तोंड फिरवतील दुर्लक्ष करीत.
२४. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आदेशांचे अनुसरण करा, जेव्हा पैगंबर तुम्हाला तुमच्या जीवनदायी विषयाकडे बोलावित असतील आणि स्मरण राखा की अल्लाह मानवाच्या आणि त्याच्या हृदयाच्या दरम्यान आड बनतो आणि निःसंशय तुम्हाला अल्लाहच्याच जवळ एकत्र व्हायचे आहे.
२५. आणि तुम्ही अशा संकटापासून स्वतःला वाचवा, जे विशेषतः अशाच लोकांवर कोसळणार नाही जे तुमच्यापैकी त्या अपराधआंचे दोषी आहेत आणि हे जाणून असा की सर्वश्रेष्ठ अल्लाह मोठा सक्त शिक्षा देणारा आहे.
२६. आणि त्या अवस्थेचे स्मरण करा, जेव्हा तुम्ही धरतीवर थोडे होते कमजोर दुबळे मानले जात होते. या भयाने राहत होते की लोकांनी कदाचित तुम्हाला लुटून न घ्यावे, तेव्हा अल्लाहने तुम्हाला राहायला जागा दिली आणि तुम्हाला आपल्या मदतीने सामर्थ्य प्रदान केले, आणि तुम्हाला स्वच्छ शुद्ध अन्न-सामुग्री प्रदान केली, यासाठी की तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी.
२७. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही अल्लाह आणि पैगंबराचा हक्क मारू नका आणि आपल्या सुरक्षित चीज-वस्तूंमध्ये विश्वासघात करू नका आणि तुम्ही चांगले जाणता.
२८. आणि तुम्ही ही गोष्ट जाणून असा की तुमचे धन आणि तुमची संतती एक कसोटी म्हणून आहे.१ (आणि हेही जाणून असा की) सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या जवळ फार मोठा मोबदला आहे.
____________________
(१) संपत्ती आणि संततीचे प्रेम माणसाला सर्वसामान्यतः विश्वासघात करण्यास व अल्लाह आणि पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे आदेश तोडण्यास विवश करते, यास्तव यांना कसोटी म्हटले गेले आहे. अर्थात यांच्याद्वआरे माणसाची परीक्षा घेतली जाते की ते प्रेम राखत असताना अल्लाह आणि पैगंबरांचे आज्ञापालन पूर्णतः करतो किंवा नाही? जर करत असेल तर या कसोटीत खरा उतरला अन्यथा असफल ठरला. अशा स्थितीतही धन-संपत्ती आणि संतती त्याच्याकरिता अल्लाहचा प्रकोप भोगण्याचे कारण बनतील.
२९. हे ईमान राखणाऱ्यांनो! जर तुम्ही अल्लाहचे भय बाळगत राहाल, तर अल्लाह तुम्हाला एक निर्णयाची गोष्ट प्रदान करील आणि तुमच्यापासून तुमचे अपराध दूर करील, आणि तुम्हाला माफ करील आणि अल्लाह मोठा कृपाशील आहे.
३०. आणि त्या घटनेचाही उल्लेख करा, जेव्हा काफिर (इन्कारी) लोक तुमच्याविषयी कट-कारस्थान रचत होते की तुम्हाला कैदी बनवून घ्यावे किंवा तुम्हाला ठार करावे किंवा तुम्हाला देशाबाहेर घालवावे आणि ते आपला कट रचत होते आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह आपली योजना आखत होता आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्वांत उत्तम योजना बनविणारा आहे.
३१. आणि जेव्हा त्यांच्यासमोर आमच्या आयती वाचून ऐकविल्या जातात तेव्हा म्हणतात की आम्ही ऐकले, जर आम्ही इच्छिले तर आम्हीदेखील याच्यासारखेच सांगून दाखवू. हे तर काहीच नाही फक्त पूर्वजांच्या पुरावा नसलेल्या गोष्टी आहेत.
३२. आणि जेव्हा ते लोक म्हणाले, हे अल्लाह! जर हा कुरआन खरोखरच तुझ्यातर्फे आहे तर आमच्यावर आकाशातून दगडांचा वर्षाव कर किंवा आमच्यावर एखादा दुःखदायक अज़ाब उतरव.
३३. आणि अल्लाह असे नाही करणार की त्यांच्यात तुम्ही असताना त्यांना शिक्षा-यातना देईल, आणि अल्लाह त्यांना शिक्षा देणार नाही, या अवस्थेत की ते क्षमा-याचनाही करीत असावेत.
३४. आणि त्यांच्यात असे काय आहे की, अल्लाहने त्यांना शिक्षा न द्यावी? असे असतानाही की ते लोकांना मसजिदे हराम (काबागृहा) पासून रोखतात, वास्तविक ते या मस्जिदीची देखभाल करणारे नाहीत. तिचे संरक्षक अल्लाहच्या आज्ञधारक दासांखेरीज कोणीही नाही, परंतु त्यांच्यातले अधिकांश लोक हे जाणत नाहीत.
३५. आणि त्यांची नमाज काबागृहाजवळ फक्त हीच होती, शिट्या वाजविणे, टाळ्या वाजविणे. तेव्हा आपल्या इन्कारापायी या शिक्षा-यातनेचा स्वाद चाखा.
३६. निःसंशय हे इन्कारी लोक आपले धन अशासाठी खर्च करीत आहेत की अल्लाहच्या मार्गापासून रोखावे तर हे लोक आपले धन असेच खर्च करत राहतील, मग ते धन त्यांच्यासाठी पश्चात्तापाचे कारण ठरेल, मग पराभूत होतील आणि काफिरांना जहन्नमकडे एकत्र केले जाईल.
३७. यासाठी की अल्लाहने नापाक (अस्वच्छ-अशुद्ध) लोकांना पाक (स्वच्छ शुद्ध) लोकांपासून वेगळे करावे आणि नापाक लोकांची एकमेकांशी भेट करून द्यावी, मग त्या सर्वांना एकत्र करावे, मग त्या सर्वांना जहन्नममध्ये टाकावे. असे लोक पूर्णतः तोट्यात आहेत.
३८. तुम्ही इन्कारी लोकांना सांगा की जर हे लोक (अशी हरकत) थांबवतील तर यांचे सर्व अपराध, जे पूर्वी केले आहेत, माफ केले जातील, आणि जर आपली तीच रीत कायम राखतील तर पूर्वीच्या (काफिरांसाठी) नियम लागू झालेलाच आहे.
३९. आणि तुम्ही त्यांच्याशी त्या वेळेपर्यंत संघर्ष करीत राहा की त्यांच्या श्रद्धेत बिघाड शिल्लक न राहावा आणि धर्म अल्लाहचाच व्हावा. मग जर हे (हरकती) थांबवतील तर अल्लाह त्यांच्या कर्मांना चांगल्या प्रकारे पाहतो.
४०. आणि जर तोंड फिरवतील तर विश्वास ठेवा की सर्वश्रेष्ठ अल्लाह तुमचा मित्र आहे. तो अतिशय चांगला मित्र आणि चांगला मदत करणारा आहे.
४१. आणि जाणून घ्या की, युद्धात हस्तगत केलेला कोणत्याही प्रकारचा माल (धन-संपदा) तुम्ही प्राप्त कराल तर त्याचा पाचवा हिस्सा तर अल्लाह आणि रसूल आणि नातेवाईक आणि अनाथ आणि गोरगरीब, आणि प्रवाशांकरिता आहे. जर तुम्ही अल्लाहवर ईमान राखले आहे आणि त्यावर जे आम्ही आपल्या दासावर त्या दिवशी अवतरित केले, जो सत्य आणि असत्याच्या दरम्यान अलगावाचा होता, ज्या दिवशी दोन्ही सैन्ये आपसात भिडली होती आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगणारा आहे. १
____________________
(१) अल्लाहने पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना स्वप्नात अनेकेश्वरवाद्यांची संख्या कमी दाखवली. तीच संख्या पैगंबरांनी आपल्या निकटस्थ अनुयायींना सांगितली, ज्यामुळे त्यांची हिंमत वाढली, जर या उलट काफिरांची संख्या जास्त दाखवली गेली असती तर सहाबांच्या मनात भय निर्माण झाले असते(हीम्मत कमि झाली असता) आणि आपसात मतभेद निर्माण झाले असते. परंतु अल्लाहने असे होण्यापासून ईमानधारकांना वाचविले.
४२. जेव्हा तुम्ही जवळच्या किनाऱ्यावर आणि ते दूरच्या किनाऱ्यावर होते आणि काफिला तुमच्यापासून (फार) खाली होता, जर तुम्ही आपसात वायदा केला असता तर ठरलेल्या वेळेवर पोहोचण्यात मतभेद केला असता, तथापि अल्लाहला एक काम करूनच टाकायचे होते, जे ठरले गेले होते, यासाठी की, जो नष्ट होईल, तो प्रमाणावर (अर्थात ठरलेले जाणून) नष्ट व्हावा आणि जो जिवंत राहील, तोदेखील प्रमाणावर (सत्य ओळखून) जिवंत राहावा, आणि अल्लाह चांगल्या प्रकारे ऐकणारा, जाणणारा आहे.
४३. जेव्हा तुम्हाला तुमच्या स्वप्नात अल्लाहने त्यांची संख्या कमी दाखवली. जर त्यांना जास्त दाखविले असते तर तुम्ही भ्याड बनले असते आणि याबाबत आपसात मतभेद करू लागले असते, परंतु अल्लाहने (यापासून) वाचविले. निःसंशय अल्लाह छातीतल्या (मनात लपलेल्या) गोष्टीही जाणणारा आहे.
४४. आणि जेव्हा त्याने भेट होतेवेळी त्यांना तुमच्या नजरेत फार कमी (संख्येने) दाखविले आणि तुम्हाला त्यांच्या नजरेत कमी दाखविले अशासाठी की अल्लाहने ते कार्य तडीस न्यावे, जे करायचेच होते आणि सर्व कार्ये अल्लाहकडेच वळविली जातात.
४५. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही एखाद्या (शत्रू) सैन्याशी भिडाल, तेव्हा अटळ राहा आणि अल्लाहचे जास्तीत जास्त स्मरण करा, यासाठी की तुम्हाला सफलता प्राप्त व्हावी.
४६. आणि अल्लाहचे आणि त्याच्या रसूल (पैगंबर) चे आज्ञापालन करीत राहा, आपसात मतभेद ठेवू नका, अन्यथा भ्याड व भित्रे व्हाल, आणि तुमचा पाया डळमळीत होईल आणि तुमचा जोम नाहीसा होईल आणि धैर्य-संयम व विश्वास राखा. निःसंशय अल्लाह धीर-संयम राखणाऱ्यांच्या पाठीशी आहे.
४७. आणि त्या लोकांसारखे होऊ नका, जे मोठी घमेंड दाखवित आणि लोकांमध्ये अभिमान व अहंकार करीत आपल्या घरापासून चालले होते आणि अल्लाहच्या मार्गापासून रोखत होते. जे काही ते करीत आहेत अल्लाह त्यास घेरून टाकणारा आहे.
४८. आणि जेव्हा त्यांच्या कर्मांना सैतान त्यांना सुशोभित करून दाखवित होता आणि सांगत होता की माणसांपैकी कोणीही आज तुमच्यावर वर्चस्वशाली होऊ शकत नाही. मी स्वतः तुमचा समर्थक आहे, परंतु जेव्हा दोन्ही गट जाहीर झाले, तेव्हा आपल्या उलटपावली फिराला आणि म्हणू लागला की मी तर तुमच्यापासून वेगळा आहे, विभक्त आहे. मी ते काही पाहत आहे जे तुम्ही पाहत नाही. मी अल्लाहचे भय बाळगतो आणि अल्लाह मोठा सक्त अज़ाब देणारा आहे.
४९. जेव्हा मुनाफिक (ढोंगी) लोक म्हणत होते आणि तेदेखील, ज्यांच्या मनात रोग होता की त्यांना तर त्यांच्या धर्माने धोक्यात टाकले आहे. आणि जो मनुष्यदेखील अल्लाहवर भरोसा करील तर सर्वश्रेष्ठ अल्लाह निश्चितच मोठा जबरदस्त आणि हिकमतशाली आहे.
५०. आणि तुम्ही जर ते दृश्य पाहिले असते जेव्हा फरिश्ते काफिरांचे (ईमान न राखणाऱ्यांचे) प्राण काढतात, त्यांच्या तोंडावर आणि कमरेवर मारतात (आणि म्हणतात) तुम्ही जळण्याच्या शिक्षेची गोडी चाखा.
५१. हे त्या कर्मांमुळे, जी तुमच्या हातांनी पूर्वीच पाठवून ठेवलीत. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह आपल्या दासांवर किंचितही जुलूम- अत्याचार करीत नाही.
५२. फिरऔनच्या अनुयायींच्या अवस्थेसारखे आणि त्यांच्या बुजूर्ग लोकांच्या की त्यांनी अल्लाहच्या आयतींवर विश्वास ठेवला नाही, तेव्हा अल्लाहने त्यांच्या अपराधांपायी त्यांना धरले. निःसंशय अल्लाह मोठा जबरदस्त आणि त्याची शिक्षा मोठी सक्त आहे.
५३. हे अशासाठी की सर्वश्रेष्ठ अल्लाह असा नाही की एखाद्या जनसमूहावर एखादी कृपा देणगी (नेमत) प्रदान करून पुन्हा बदलून टाकील, जोपर्यंत तो स्वतः आपल्या त्या अवस्थेला बदलून टाकत नाही, जी त्यांची स्वतःची होती१ आणि हे की सर्वश्रेष्ठ अल्लाह ऐकणारा जाणणारा आहे.
____________________
(१) अर्थात हे की जोपर्यंत एखादा जनसमूह अल्लाहशी कृतज्ञशीलतेचा मार्ग अंगिकारून आणि अल्लाहने सांगितलेल्या अनुचित गोष्टींचा अव्हेर करून आपली अवस्था व आचरण बदलत नाही, तोपर्यंत अल्लाह त्यांच्यावर आपल्या कृपा देणग्यांणचे द्वार उघडे ठेवतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सर्वश्रेष्ठ अल्लाह दृष्कृत्यां मुळे आपल्या कृपा देणग्या संमपुष्टात आणतो, आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या दया कृपेस पात्र होण्यासाठी दुष्कृत्यांपासून अलिप्त राहणे अत्यावश्यक आहे.
५४. फिरऔनचे लोक आणि त्याच्या पूर्वीच्या लोकांप्रमाणे की त्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या गोष्टींना खोटे ठरविले, तेव्हा आम्ही त्याच्या अपराधांपायी त्यांना बरबाद करून टाकले आणि फिरऔनवाल्यांना बुडवून टाकले आणि हे सर्व अत्याचारी होते.
५५. समस्त सजीवांमध्ये सर्वाधिक वाईट अल्लाहच्या जवळ ते लोक आहेत जे कुप्र (इन्कार) करतात, मग ते ईमान राखत नाहीत.
५६. ज्यांच्याकडून तुम्ही वचन घेतले, तरीही ते दरवेळेस आपल्या वचनाचा भंग करतात आणि कधीही अल्लाहचे भय राखून वागत नाही.
५७. यास्तव जेव्हा तुम्ही त्याच्यावर युद्धात वर्चस्वशाली ठराल, तेव्हा त्यांना असा जबरदस्त मार द्या की त्यांच्या मागे असलेल्यांनीही पळ काढावा. कदाचित त्यांनी बोध ग्रहण करावा.
५८. आणि जर तुम्हाला एखाद्या जनसमूहाकडून धोका किंवा दगाबाजी केली जाण्याचे भय असेल तर समानतेच्या स्थितीत त्यांचा समझोता तोडून टाका. अल्लाह विश्वासघात (अपहार) करणाऱ्यांशी प्रेम राखत नाही.
५९. आणि इन्कारी लोकांनी हा विचार करू नये की ते पळ काढतील. यात शंका नाही की ते लाचार व अगतिक करू शकत नाही.
६०. आणि तुम्ही त्यांच्याशी लढण्याकरिता आपल्या क्षमतेनुसार सामर्थ्य तयार करा आणि घोडे तयार ठेवण्याचेही की त्याद्वारे तुम्ही अल्लाहच्या शत्रूंना आणि आपल्या शत्रूंना भयभीत करू शकावे, आणि त्यांच्याखेरीज इतरांनाही, ज्यांना तुम्ही जाणत नाहीत, अल्लाह त्यांना चांगल्या प्रकारे जाणतो आणि जे काही अल्लाहच्या मार्गात खर्च कराल ते तुम्हाला पुरेपूर दिले जाईल आणि तुमच्या हक्काचे नुकसान केले जाणार नाही.
६१. आणि जर ते समझोत्याकडे झुकतील, तर तुम्हीही समझोत्याकडे झुका आणि अल्लाहवर भरोसा ठेवा. निःसंशय अल्लाह ऐकणारा जाणणारा आहे.
६२. आणि जर ते तुमच्याशी धोकेबाजी करू इच्छितील तर अल्लाह तुमच्यासाठी पुरेसा आहे. त्यानेच आपल्या मदतीद्वारे आणि ईमानधारकांद्वारे तुम्हाला समर्थन दिले आहे.
६३. आणि त्यांच्या मनात एकमेकांचे प्रेमही त्यानेच निर्माण केले आहे. जर तुम्ही धरतीच्या समस्त चीज-वस्तू खर्च केल्या असत्या, तरीही त्याच्या मनात प्रेम-भावना निर्माण करू शकत नव्हते, परंतु अल्लाहनेच त्यांच्या मनात प्रेम टाकले. निःसंशय तो वर्चस्वशाली हिकमत बाळगणारा आहे.
६४. हे पैगंबर! तुमच्यासाठी आणि तुमचे अनुसरण करणाऱ्या ईमानधारकांसाठी अल्लाह पुरेसा आहे.
६५. हे पैगंबर! ईमानधारकांना जिहाद (धर्मयुद्धा) साठी प्रोत्साहित करा. जर तुमच्यापैकी वीस धैर्यशालीही असतील तर ते दोनशे जणांवर वर्चस्वशाली राहतील आणि जर तुमच्यापैकी शंभर असतील तर एक हजार ईमान न राखणाऱ्यांवर वर्चस्वशाली राहतील. या कारणाने की ते नासमज लोक आहेत.
६६. आता अल्लाह तुमचे ओझे हलके करतो. तो चांगल्या प्रकारे जाणतो की तुमच्या दुर्बलता आहे, तेव्हा जर तुमच्यापैकी शंभर धैर्यशील असतील तर ते दोनशे जणांवर वर्चस्वशाली राहतील. आणि जर तुमच्यापैकी एक हजार असतील तर ते अल्लाहच्या हुकुमाने दोन हजार (शत्रूंवर) वर्चस्वशाली असतील आणि अल्लाह धैय-संयम राखणाऱ्या लोकांच्या सोबत आहे.
६७. पैगंबरांच्या हाती कैदी असायला नको, जोपर्यंत देशात हिंसक युद्ध न व्हावे. तुम्ही तर या जगाचे धन इच्छिता आणि अल्लाहचा इरादा आखिरतचा आहे आणि अल्लाह वर्चस्वशाली, हिकमत बाळगणारा आहे.
६८. जर पूर्वीपासूनच अल्लाहतर्फे हे लिखित नसते तर जे काही तुम्ही घेतले आहे, त्याच्याविषयी तुम्हाला एखादी सक्त शिक्षा झाली असती.
६९. आणि जे हलाल आणि स्वच्छ शुद्ध धन युद्धाद्वारे प्राप्त करून घ्याल ते खा आणि अल्लाहचे भय बाळगून राहा. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे.
७०. हे पैगंबर! आपल्या हाताखालच्या कैद्यांना सांगा की जर सर्वश्रेष्ठ अल्लाह तुमच्या मनात नेक इरादा पाहील तर जे काही तुमच्याडून घेतले गेले आहे, त्याहून चांगले तुम्हाला प्रदान करील आणि अल्लाह माफ करणारा, दया करणारा आहे.
७१. आणि जर ते तुमच्याशी विश्वासघात करण्याचा इरादा करतील, तर यांनी याच्यापूर्वी खुद्द अल्लाहशी विश्वासघात केलेला आहे. शेवटी त्याने त्यांना कैद करविले आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्वज्ञ, हिकमतशाही आहे.
७२. निःसंशय, ज्या लोकांनी ईमान राखले आणि अल्लाहसाठी देशत्याग केला अर्थात हिजरत केली आणि जिहाद केले धनाने व मनाने अल्लाहच्या मार्गात, आणि ज्यांनी अशा लोकांना आश्रय दिला, आणि त्यांना मदत केली तर ते एकमेकांचे आपसात मित्र आहेत आणि ज्यांनी ईमान राखले, पण देशत्याग केला नाही तर तुमच्याशी त्यांची किंचितही मैत्री नाही, परंतु जर ते धर्माच्या बाबतीत तुमच्याकडे मदत मागतील तर त्यांना मदत करणे तुमच्यासाठी आवश्यक आहे, मात्र त्या लोकांखेरीज, की तुमच्या व त्यांच्या दरम्यान प्रतिज्ञा करार झाला आहे आणि जे काही तुम्ही करीत आहात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे पाहत आहे.
७३. आणि काफिर (ईमान न राखणारे) एकमेकांचे मित्र आहेत, जर तुम्ही असे केले नाही तर देशात उपद्रव पसरेल आणि मोठा उत्पात निर्माण होईल.
७४. ज्या लोकांनी ईमान राखले आणि देशत्याग केला आणि अल्लाहच्या मार्गात जिहाद केले आणि ज्यांनी अशा लोकांना आश्रय दिला, आणि मदत पोहचविली तर हेच लोक सच्चे ईमानधारक आहेत, त्यांच्यासाठी क्षमा आणि मान-सन्मानपूर्ण रोजी (आजीविका) आहे.
७५. आणि ज्या लोकांनी यानंतर ईमान राखले आणि देशत्याग केला आणि तुमच्या सोबतीने जिहाद केला तर असे लोकही तुमच्यापैकीच आहेत आणि नातेवाईक त्यांच्यापैकी आपसात एकमेकांच्या जास्त निकट आहेत, अल्लाहच्या आदेशान्वये. निःसंशय अल्लाह सर्व काही जाणणारा आहे.