ترجمة سورة الطور

الترجمة الماراتية
ترجمة معاني سورة الطور باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. शपथ आहे तूरची
२. आणि लिखित ग्रंथाची.
३. जो पातळ चामड्याच्या खुल्या पृष्ठांमध्ये आहे.
४. आणि आबाद घराची.
५. आणि बुलंद छताची.
६. आणि उफाळलेल्या सागराची.
७. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याचा प्रकोप होईलच.
८. त्याला कोणी रोखणारा नाही.
९. ज्या दिवशी आकाश थरथरु लागेल.
१०. आणि पर्वत चालायला लागतील.
११. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांचा सर्वनाश आहे.
१२. जे आपल्या वाह्यात गोष्टींमध्ये खेळत बागडत आहेत.
१३. ज्या दिवशी त्यांना धक्के देऊन जहन्नमच्या आगीकडे आणले जाईल.
१४. हीच ती (जहन्नमची) आग होय, जिला तुम्ही खोटे ठरवित होते.
१५. (आता सांगा) काय ही जादू आहे? की तुम्ही पाहातच नाहीत?
१६. दाखल व्हा यात (जहन्नममध्ये) आता तुमचे धीर-संयम राखणे आणि न राखणे तुमच्यासाठी सारखेच आहे. तुम्हाला केवळ तुमच्या कर्मांचा मोबदला दिला जाईल.
१७. निःसंशय, नेक सदाचारी लोक जन्नतमध्ये सुखांमध्ये आहेत.
१८. त्यांना, त्यांच्या पालनकर्त्याने जे देऊन ठेवले आहे त्यावर खूश आहेत आणि त्यांना त्यांच्या पालनकर्त्याने जहन्नमच्या अज़ाब (शिक्षा-यातने) पासूनही वाचविले.
१९. तुम्ही मजेने खात-पीत राहा, त्या कर्मांच्या मोबदल्यात जी तुम्ही करीत होते.
२०. बरोबरीने मांडलेल्या सुंदर आसनांवर तक्के लावून, आणि आम्ही त्याचा विवाह मोठ्या नेञाच्या हूर (परीं) शी करविला आहे.
२१. आणि ज्या लोकांनी ईमान राखले, आणि त्यांच्या संततीनेही ईमान राखण्यात त्यांचे अनुसरण केले, आम्ही त्यांच्या संततीला त्यांच्यापर्यंत पोहचवू आणि आम्ही त्यांच्या कर्मांमधून काहीच कमी करणार नाही. प्रत्येक मनुष्य आपापल्या कर्मांच्या बदली गहाण आहे.
२२. आणि आम्ही त्यांच्यासाठी मेवे आणि स्वादिष्ट मांसाची अधिकता करू.
२३. (आनंदाने) ते एकमेकांपासून (मद्याचे) प्याले हिसकावून घेत असतील, त्या मद्याच्या स्वादात ना वाह्यात गोष्टी बोलतील आणि ना अपराध असेल.
२४. आणि त्यांच्या चारी बाजूला सेवेसाठी (सेवक म्हणून) लहान मुले फिरत असतील, जणू काही ते मोती होते, ज्यांना लपवून ठेवले होते.
२५. आणि ते आपसात एकमेकांकडे तोंड करून विचारपूस करतील.
२६. म्हणतील की याच्यापूर्वी आपल्या कुटुंबियांमध्ये फार भय राखत होतो.
२७. तेव्हा अल्लाहने आमच्यावर फार मोठा उपकार केला आणि आम्हाला होरपळून टाकणाऱ्या अति उष्ण हवेच्या प्रकोपा (अज़ाब) पासून वाचविले.
२८. आम्ही याच्या पूर्वीही त्याला पुकारत होतो. निःसंशय, तो मोठा उपकार करणारा आणि मोठा दया करणारा आहे.
२९. तेव्हा तुम्ही समजावित राहा, कारण की तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेने ना तर ज्योतिषी आहात, ना वेडसर.
३०. काय (काफिर) असे म्हणतात की हा कवी आहे, आम्ही त्याच्यासाठी काल चक्रा (अर्थात मृत्यु) ची प्रतीक्षा करीत आहोत.
३१. (तुम्ही) सांगा की तुम्ही प्रतीक्षा करा मी देखील तुमच्यासोबत प्रतीक्षा करणाऱ्यांपैकी आहे.
३२. काय त्यांच्या अकला त्यांना हेच शिकवितात? किंवा हे लोक आहेतच उध्दट (विद्रोही)?
३३. काय हे म्हणता की या (पैगंबरा) ने (कुरआन) स्वतः रचले आहे, वस्तुतः हे ईमान राखत नाहीत.
३४. बरे, जर हे सच्चे आहेत तर मग यासारखी एक तरी गोष्ट यांनी आणून दाखवावी.
३५. काय हे एखाद्या (निर्माण करणाऱ्या) च्या विना स्वतः (आपोआप) निर्माण झाले आहेत? किंवा हे स्वतः निर्माण करणारे आहेत?
३६. काय त्यांनीच आकाशांना आणि जमिनीला निर्माण केले आहे? किंबहुना हे विश्वास न राखणारे लोक आहेत.
३७. अथवा काय यांच्याजवळ तुमच्या पालनकर्त्याचे खजिने आहेत? किंवा (त्या खजिन्यांचे) हे संरक्षक आहेत?
३८. किंवा यांच्याजवळ एखादी शिडी आहे, जिच्यावर चढून हे ऐकतात? (जर असे आहे) तर ऐकणाऱ्याने एखादे स्पष्ट प्रमाण सादर करावे.
३९. काय अल्लाहकरिता सर्व कन्या आहेत आणि तुमच्यासाठी पुत्र?
४०. काय तुम्ही यांच्याकडून काही मजुरी मागता की हे त्या ओझ्याने दाबले जात आहेत?
४१. काय यांच्याजवळ परोक्ष ज्ञान आहे की हे लिहून घेत असतात?
४२. काय हे लोक एखादा कावेबाजपणा करू इच्छितात? तर (विश्वास ठेवा) की कपट कारस्थान करणारा गट काफिरांचा आहे.
४३. काय अल्लाहखेरीज त्यांचा कोणी दुसरा माबूद (उपास्य) आहे? (कदापि नाही) अल्लाह त्यांच्या सहभागी ठरविण्यापासून (शुद्ध) आणि पवित्र आहे.
४४. जर हे लोक आकाशाचा एखादा तुकडा जरी कोसळताना पाहतील तरी हेच म्हणतील की हे थरावर थर ढग आहेत.
४५. तेव्हा तुम्ही त्यांना सोडा, येथे पर्यर्ंत की यांची आपल्या त्या दिवसाशी भेट व्हावी ज्यात हे बेशुद्ध केले जातील.
४६. ज्या दिवशी त्यांना त्यांची चाल (खेळी) काहीच कामी येणार नाही आणि ना त्यांना मदत केली जाईल.
४७. निःसंशय, अत्याचारी लोकांकरिता याखेरीजही अन्य शिक्षा-यातना आहेत, परंतु त्या लोकांपैकी अधिकांश लोक हे जाणत नाहीत.
४८. तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाच्या प्रतीक्षेत धीर - संयम राखा. निःसंशय, तुम्ही आमच्या डोळ्यांसमोर आहात आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठाल, आपल्या पालनकर्त्याची पवित्रतेसह प्रशंसा करा.
४९. आणि रात्री देखील त्याचे महिमागान करा आणि ताऱ्यांच्या अस्तास जाण्याच्या वेळीही.
Icon