surah.translation .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. हा. मीम.
२. (हा ग्रंथ) मोठ्या कृपावान, मोठ्या दयावानतर्फे अवतरित झाला आहे.
३. (असा) ग्रंथ आहे, ज्याच्या आयतीं (सूत्रां) चा स्पष्ट तपशील दिला गेला आहे (अशा स्थितीत की) कुरआन अरबी भाषेत आहे, त्या लोकांसाठी जे जाणतात.
४. शुभ समाचार ऐकविणारा आणि भय दाखविणारा आहे. तरीही त्यांच्यापैकी अधिकांश लोकांनी तोंड फिरविले आणि ते ऐकतही नाहीत.
५. आणि ते म्हणाले, तुम्ही ज्या गोष्टीकडे आम्हाला बोलावित आहात, त्यापासून आमची हृदये पडद्यात आहेत. आमच्या कानात बधीरता आहे (किंवा काही ऐकायला येत नाही) आणि आमच्या व तुमच्या दरम्यान एक आड-पडदा आहे. तेव्हा तुम्ही आपले काम करत जा, आम्हीही निश्चित आपले काम करीत राहू.
६. (तुम्ही) सांगा की मी तर तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे. माझ्यावर वहयी (प्रकाशना) केली जात आहे की तुम्हा सर्वांचा माबूद (उपास्य) केवळ एक अल्लाहच आहे, तेव्हा तुम्ही त्याच्याकडे ध्यान केंद्रित करा आणि त्याच्याकडे अपराधांची क्षमा मागा आणि त्या अनेक ईश्वरांच्या उपासकांकरिता सर्वनाश आहे.
७. जे जकात देत नाहीत आणि आखिरतचाही इन्कार करतात.
८. निःसंशय, ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले त्यांच्याकरिता असीम व अमर्याद मोबदला आहे.
९. (तुम्ही सांगा की, काय तुम्ही त्या (अल्लाह) चा इन्कार करता, आणि त्याचे सहभागी ठरविता, ज्याने दोन दिवसांत जमिनीला निर्माण केले. सर्व विश्वांचा स्वामी व पालनकर्ता तोच आहे.
१०. आणि त्याने जमिनीत तिच्यावरूनच पर्वत रोवले आणि तिच्यात समृद्धी राखली आणि तिच्यात राहणाऱ्यांच्या आहारा (अन्न सामुग्री) चेही अनुमान तिच्यातच केले, केवळ चार दिवसांतच. विचारणा (किंवा याचना) करणाऱ्यांकरिता समानरित्या.
११. मग आकाशाकडे उचावला जे धूरासारखे होते, तेव्हा त्याला आणि जमिनीला आदेश दिला की तुम्ही दोघे या इच्छेने किंवा अनिच्छेने दोघांना निवेदन केले की आम्ही राजीखुशीने हजर आहोत.
१२. तेव्हा दोन दिवसांत सात आकाश बनविलेत. प्रत्येक आकाशात त्याच्या योग्य आदेशांची वहयी पाठविली आणि आम्ही या जगाच्या आकाशाला ताऱ्यांनी सुशोभित केले व त्याचे रक्षण केले. ही योजना प्रभुत्वशाली व सर्वज्ञ अशा अल्लाहची आहे.
१३. आणि तरीही जर हे तोंड फिरवित असतील तर सांगा की मी तुम्हाला त्या वीजेच्या कडाडण्या (आकाशिय अज़ाब) चे भय दाखवितो, जो आद जनसमूह आणि समूद जनसमूहावर कोसळलेल्या, वीजेच्या कडाडण्यासमान असेल.
१४. त्याच्याजवळ जेव्हा त्यांच्या पुढून-मागून पैगंबर आले की तुम्ही अल्लाहखेरीज कोणाचीही उपासना करू नका, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की जर आमच्या पालनकर्त्याने इच्छिले असते, त्याने फरिश्त्यांना पाठविले असते. आम्ही तर तुमच्या प्रेषित्वाचा पूर्णतः इन्कार करतो.
१५. तर जेव्हा आदने अकारण धरतीवर घमेंड करायला सुरुवात केली आणि म्हणू लागले की आमच्याहून शक्तिशाली कोण आहे, काय त्यांना हे दिसून येत नाही की ज्याने त्यांना निर्माण केले आहे, तो त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. ते (शेवटपर्यर्ंत) आमच्या आयतींचा इन्कारच करीत राहिले.
१६. तेव्हा शेवटी आम्ही त्यांच्यावर एक सोसाट्याचे वादळ अशुभ दिवसात पाठविले, यासाठी की त्यांना ऐहिक जीवनात अपमानदायक शिक्षा - यातनेची गोडी चाखवावी, (विश्वास करा) की आखिरतचा अज़ाब, यापेक्षा जास्त अपमानित करणारा आहे आणि त्यांना मदतही केली जाणार नाही.
१७. आणि राहिलेत समूद, तर आम्ही त्यांनाही मार्गदर्शन केले, परंतु त्यांनी मार्गदर्शनाच्या तुलनेत आंधळेपणास जास्त महत्व दिले. ज्यामुळे त्यांना (पूर्णपणे) अपमानदायक शिक्षेच्या कडाडण्याने त्यांच्या करतूतींपायी धरले.
१८. आणि ईमान राखणाऱ्यांना व अल्लाहचे भय बाळगणाऱ्यांना आम्ही (पूर्णतः) वाचविले.
१९. आणि ज्या दिवशी अल्लाहचे वैरी जहन्नमकडे आणले जातील, आणि त्या (सर्वां) ना एकत्रित केले जाईल.
२०. येथेपर्यंत की जेव्हा जहन्नमच्या अगदी जवळ येऊन पोहचतील तेव्हा त्यांच्यावर त्यांचे कान आणि त्यांचे डोळे व त्यांच्या त्वचा त्यांच्या कर्मांची साक्ष देतील.
२१. आणि आपल्या त्वचांना म्हणतील की तुम्ही आमच्याविरूद्ध साक्ष का दिली, ते उत्तर देतील की आम्हाला त्या अल्लाहने बोलण्याचे सामर्थ्य प्रदान केले, ज्याने प्रत्येक वस्तूला बोलण्याचे सामर्थ्य प्रदान केले आहे. त्यानेच पहिल्यांदा तुम्हाला निर्माण केले आणि त्याच्याच कडे तुम्ही सर्व परतविले जाल.
२२. आणि तुम्ही (आपली दुष्कर्मे) या कारणाने लपवून ठेवतच नव्हते की तुमच्यावर तुमचे कान, तुमचे डोळे आणि तुमच्या त्वचा साक्ष देतील आणि तुम्ही असे समजत राहिलात की तुम्ही जे काही करीत आहात, त्यापैकी बहुतेक कर्मांशी अल्लाह अनभिज्ञ आहे.
२३. आणि तुमच्या या कुविचारांनी, जे तुम्ही आपल्या पालनकर्त्याविषयी केलेले होते, तुमचा सर्वनाश केला आणि शेवटी तुम्ही नुकसान उचलणाऱ्यांपैकी झालात.
२४. आता जर हे सहनशीलता राखतील, तरीही त्यांचे ठिकाण जहन्नमच आहे आणि जर हे तौबा (क्षमा-याचना) ही करू इच्छितील, तरीही त्यांना माफ केले जाणार नाही.
२५. आणि आम्ही त्यांचे काही साथीदार निर्धारित केलेले होते, ज्यांनी त्यांच्या पुढच्या मागच्या कर्मांना त्यांच्या नजरेत सुंदर सुशोभित बनवून ठेवले होते, आणि त्यांच्या बाबतीतही अल्लाहचा वायदा त्या जनसमूहांसोबत पूर्ण झाल, जे त्यांच्यापूर्वी जिन्नांचे आणि मानवांचे होऊन गेले आहेत. निःसंशय ते नुकसान उचलणारे सिद्ध ठरले.
२६. आणि काफिर म्हणाले, या कुरआनास ऐकूच नका (त्याचे पठण होत असताना) आणि वाह्यात बडबड करा, नवल नव्हे की तुम्ही वरचढ ठराल.
२७. तर निःसंशय, आम्ही त्या काफिरांना सक्त अज़ाब (शिक्षे) ची गोडी चाखवू आणि त्यांना त्यांच्या अतिशय वाईट कर्माचा मोबदला (निश्चितच) देऊ.
२८. अल्लाहच्या शत्रूंचा मोबदला (शिक्षा) जहन्नमची हीच आग आहे, ज्यात त्यांचे नेहमीचे घर आहे. (हा) मोबदला आहे, आमच्या आयतींचा इन्कार करणाऱ्यांचा.
२९. आणि काफिर लोक म्हणतील की हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला जिन्न आणि मानवांच्या त्या (दोन्ही समूहां) ना दाखव, ज्यांनी आम्हाला मार्गभ्रष्ट केले, (यासाठी की) आम्ही त्यांना आपला पायाखाली तुडवावे यासाठी की ते खूप खाली (सक्त शिक्षा - यातनाग्रस्त) व्हावेत.
३०. वास्तविक ज्या लोकांनी असे म्हटले की आमचा स्वामी व पालनकर्ता अल्लाह आहे, मग त्यावर अटळ राहिले१ तर त्यांच्याजवळ फरिश्ते (हे सांगत) येतात की तुम्ही मुळीच भयभीत आणि दुःखी होऊ नका. (किंबहुना) त्या जहन्नतचा शुभ समाचार ऐकवा, जिचा तुम्हाला वायदा दिला गेला आहे.
____________________
(१) अर्थात परिस्थिती कितीही कठीण असो, ईमानावर अटळ राहावे, त्यापासून परावृत्त होऊ नये. काहींनी कायम राहण्याचा अर्थ निष्कपटता असा घेतला आहे, म्हणजे केवळ एक अल्लाहचीच उपासना व आज्ञा पालन करणे. जसे हदीस वचनात उल्लेखित आहे की एका माणसाने पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना विनंती केली, ‘‘मला अशी गोष्ट सांगा की तुमच्यानंतर मला दुसऱ्या कोणाला विचारण्याची गरज न भासावी,’’ त्यावर पैगंबरांनी फर्माविले, ‘‘सांगा, मी अल्लाहवर ईमान राखले, मग यावर अटळ राहा.’’ (सहीह मुस्लिम किताबुल ईमान बाबु जामिअे औसाफिल इस्लाम)
३१. तुमच्या ऐहिक जीवनातही आम्ही तुमचे मित्र व मदत करणारे होतो आणि आखिरतमध्येही राहू. ज्या गोष्टीची तुमच्या मनाला इच्छा होईल आणि जे काही मागाल, ते सर्व तुमच्यासाठी (जन्नतमध्ये हजर) आहे.
३२. मोठा माफ करणाऱ्या, मोठा मेहेरबान अशा (अल्लाह) तर्फे हे सर्व काही पाहुणचाराच्या स्वरूपात आहे.
३३. आणि त्याच्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट बोलणारा कोण आहे, जो अल्लाहकडे बोलाविल, सत्कर्म करील आणि असे म्हणेल की मी खात्रीने मुस्लिमांपैकी आहे.
३४. आणि सत्कर्म व दुष्कर्म समान असू शकत नाही, वाईट गोष्टीचे भलेपणाने निवारण करा, मग तोच, ज्याच्या व तुमच्या दरम्यान शत्रूता आहे, असा होईल जणू जीवलग मित्र.१
____________________
(१) हे मोठे महत्त्वपूर्ण नैतिक मार्गदर्शन आहे की दुराचाराला सदाचाराने टाळा, अर्थात दुराचाराचे उत्तर उपकाराने, अत्याचाराचे क्षमाशीलतेने, क्रोधाचे. धैर्य संयमाने आणि अप्रिय गोष्टींचे, समजावून सांगून दिले जावे अशाने दूरचा जवळ आणि रक्तपिपासू तुमचा चाहता आणि जीवलग दोस्त बनेल.
३५. आणि ही गोष्ट त्यांच्याच सद्‌भाग्यात असते, जे धीर - संयम राखतात आणि तिला मोठ्या भाग्यवानांखेरीज कोणीही प्राप्त करू शकत नाही.
३६. आणि जर सैतानाकडून एखादी शंका निर्माण झाली तर अल्लाहचे शरण मागा. निःसंशय, तो मोठा ऐकणारा, जाणणारा आहे.
३७. आणि दिवस-रात्र आणि सूर्य व चंद्र देखील त्याच्या निशाण्यांपैकी आहेत. तुम्ही सूर्य आणि चंद्रासमोर नतमस्तक होऊ नका, किंबहुना आपला माथा त्या अल्लाहसमोर टेकवा, ज्याने त्या सर्वांना निर्माण केले आहे, जर तुम्हाला त्याचीच उपासना करायची आहे.
३८. तरीही जर ते घमेंड करतील तर ते (फरिश्ते) जे तुमच्या पालनकर्त्याच्या निकट आहेत, ते तर रात्रंदिवस त्याच्या पावित्र्याचा जाप करीत राहतात आणि (कधीही) थकत नाहीत.
३९. आणि त्या (अल्लाह) च्या निशाण्यांपैकी (हेही) आहे की तुम्ही जमिनीला दाबली गेलेली (कोरडी पडलेली) पाहता, मग जेव्हा आम्ही तिच्यावर पर्जन्यवृष्टी करतो, तेव्हा ती हिरवी टवटवीत होऊन वाढीस लागते, ज्याने तिला जिवंत केले तोच खात्रीने मृतांनाही जिवंत करणारा आहे. निःसंशय तो प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे.
४०. निःसंशय, जे लोक आमच्या आयतींमध्ये वाकडेपणा आणतात ते (काही) आमच्यापासून लपलेले नाहीत. (जरा सांगा) जो आगीत टाकला जावा, तो चांगला आहे किंवा तो, जो शांतिपूर्वक कयामतच्या दिवशी यावा. तुम्ही वाटेल ते करीत राहा. तो तुमचे सर्व केले करविले पाहात आहे.
४१. ज्या लोकांनी आपल्याजवळ कुरआन पोहोचल्यानंतरही त्याचा इन्कार केला (तेदेखील) आमच्यापासून लपलेले नाहीत निःसंशय, हा मोठा भव्य-दिव्य (सन्मानपूर्ण) ग्रंथ आहे.
४२. असत्य, त्याच्या जवळूनही जाऊ शकत नाही, ना त्याच्यापुढून, आणि ना त्याच्या मागून हा (ग्रंथ) त्या (अल्लाह) कडून अवतरित केला गेला आहे, जो मोठा हिकमतशाली आणि गुणसंपन्न आहे.
४३. (हे पैगंबर!) तुम्हालाही तेच सांगितले जात आहे, जे तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांनाही सांगितले गेले आहे. निःसंशय, तुमचा पालनकर्ता मोठा माफ करणारा आणि दुःखदायक शिक्षा - यातना देणारा आहे.
४४. आणि जर आम्ही त्याला अरबीऐवजी दुसऱ्या भाषेचा कुरआन बनविले असते, तर म्हणाले असते की याच्या आयती (वचने) स्पष्टपणे का नाही सांगितली गेलीत? हे काय की ग्रंथ अरबीऐवजी दुसऱ्या भाषेत आणि तुम्ही अरबी रसूल? (तुम्ही) सांगा की हा (ग्रंथ) ईमान राखणाऱ्यांकरिता मार्गदर्शन व रोगमुक्ती आहे आणि जे ईमान राखत नाहीत तर त्यांच्या कानांमध्ये बधीरता आहे आणि हा त्यांच्यासाठी अंधत्व आहे. हे असे लोक आहेत, ज्यांना दूरच्या ठिकाणापासून पुकारले जात आहे.
४५. आणि निःसंशय, आम्ही मूसा (अलै.) ला ग्रंथ प्रदान केला होता तेव्हा त्याच्यातही मतभेद केला गेला आणि जर ती गोष्ट नसती जी तुमच्या पालनकर्त्यातर्फे या आधीच निश्चित झालेली आहे, तर त्यांच्या दरम्यान (केव्हाच) फैसला झाला असता. हे लोक तर त्याच्याविषयी सक्त बेचैन करणाऱ्या संशयात आहेत.
४६. जो मनुष्य सत्कर्म करेल, ते तो आपल्या फायद्याकरिता आणि जो दुष्कर्म करेल तर त्या (पापा) चे ओझे त्याच्यावरच आहे आणि तुमचा पालनकर्ता दासांवर अत्याचार करणारा नाही.
४७. कयामतचे ज्ञान अल्लाहकडेच परतविले जाते आणि जे जे फळ आपल्या गाभ्यांमधून (बोंडामधून) बाहेर पडते आणि जी मादी गर्भवती असते आणि ज्या बाळाला ती जन्म देते, त्या सर्वांचे ज्ञान त्याला आहे, आणि ज्या दिवशी अल्लाह त्या (अनेकेश्वर उपासकांना) बोलावून विचारेल की माझे सहभागी कोठे आहेत? ते उत्तर देतील की आम्ही तर सांगून टाकले की आमच्यापैकी कोणीही त्याचा साक्षी नाही.
४८. आणि हे ज्यांची भक्ती - आराधना यापूर्वी करीत होते, ते सर्व त्यांच्या नजरेतून नाहीसे झाले आणि त्यांनी समजून घेतले की आता त्यांच्या सुटकेचा (मार्ग) नाही.
४९. भलेपणाची याचना करण्यापासून मनुष्य थकत नाही, आणि जर त्याला एखादा त्रास किंवा यातना पोहचते, तेव्हा हताश आणि नाउमेद होतो.
५०. आणि जी कष्ट - यातना त्याला पोहचली आहे, त्यानंतर जर आम्ही त्याला एखाद्या दया - कृपेची गोडी चाखवितो, तेव्हा तो उद्‌गारतो, मी तर यास पात्र होतोच आणि मला नाही वाटत की कयामत प्रस्थापित होईल आणि जर मला आपल्या पालनकर्त्याकडे परतविले गेलेच, तरीही खात्रीने त्याच्याजवळही माझ्यासाठी भलाईच असेल. निःसंशय, आम्ही त्या काफिरांना त्यांच्या कर्मांशी अवगत करू, आणि त्यांना कठोर शिक्षा - यातनेची गोडी चाखवू.
५१. आणि जेव्हा आम्ही माणसावर आपला उपकार करतो, तेव्हा तो तोंड फिरवितो आणि बाजू बदलून घेतो आणि जेव्हा त्याच्यावर दुःख कोसळले तेव्हा मात्र लांबलचक दुआ (प्रार्थना) करणारा बनतो.
५२. (तुम्ही) सांगा, बरे हे तर सांगा की जर हा कुरआन अल्लाहतर्फे आलेला असेल, मग तुम्ही त्यास मानले नाही तर त्याच्यापेक्षा अधिक पथभ्रष्ट आणखी कोण असेल, जो (सत्याचा) विरोध करण्यात दूर निघून जावा.
५३. लवकरच आम्ही त्यांना आपल्या निशाण्या जगाच्या किनाऱ्यां (क्षितिजां) मध्येही दाखवू आणि स्वतः त्यांच्या अस्तित्वातही, येथे पर्यर्ंत की त्यांना स्पष्टतः कळून यावे की सत्य हेच आहे. काय तुमच्या पालनकर्त्याचे प्रत्येक गोष्टीशी अवगत असणे पुरेसे नाही?
५४. विश्वास करा की हे लोक आपल्या पालनकर्त्यासमोर हजर होण्याबाबत साशंक आहेत. लक्षात ठेवा, अल्लाहने समस्त गोष्टींना घेरून ठेवले आहे.