ترجمة معاني سورة الإنشقاق
 باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية
            .
            
                                    من تأليف: 
                                            محمد شفيع أنصاري
                                                            .
                                                
            
                                                                                                            ﰡ
                                                                                        
                    
                                                                                    १. जेव्हा आकाश विदीर्ण होईल.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    २. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश कान लावून ऐकेल, आणि त्याला तसे करणे भाग आहे.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ३. आणि जेव्हा जमिनीला (खेचून) पसरविले जाईल.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ४. आणि तिच्यात जे आहे ते ओकून बाहेर काढील आणि अगदी खाली होईल.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ५. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश कान लावून ऐकेल आणि ती त्यास पात्र आहे.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ६. हे मानवा! तू आपल्या पालनकर्त्याशी भेट होईपर्यंत हे प्रयत्न आणि सर्व कार्य आणि परिश्रम करून त्याची भेट घेणार आहेस.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ७. तर त्या वेळी ज्या माणसाच्या उजव्या हातात कर्म-पत्र दिले जाईल.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ८. त्याचा हिशोब मोठ्या सहजतेने घेतला जाईल.१
____________________
(१) सहज सोपा हिशोब असा की, ईमान राखणाऱ्याचे कर्म-पत्र प्रस्तुत केले जाईल, त्याचे दोष (अपराध) देखील त्याच्यासमोर आणले जातील. मग अल्लाह आपल्या असीम दया-कृपेने त्याला माफ करील. हजरत आयशा (रजि.) फर्मावितात की पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले, ज्याचा हिशोब घेतला गेला तो नाश पावला. मी म्हटले, हे अल्लाहचे रसूल! अल्लाह माझे आपणावर बलिदान करो. काय अल्लाहने नाही फर्माविले की ज्याच्या उजव्या हाता कर्म-पत्र दिले गेले, त्याचा हिशोब सह सोपा होईल. (हजरत आयशा यांच्या मते या आयतीनुसार तर ईमान राखणाऱ्याचाही हिशोब घेतला जाईल, परंतु तो नाश पावणार नाही.) पैगंबरांनी स्पष्ट केले, ही तर पेशी (हजर होणे) आहे. अर्थात ईमान राखणाऱ्याशी हिशोबाचा (सक्त) व्यवहार होणार नाही. एक सर्वसाधारण पेशी असेल. ईमान राखणाऱ्यांना अल्लाहसमोर हजर केले जाईल, ज्याला सक्तीने विचारपूस होईल तो नाश पावेल. (सहीह बुखारी, तफसीर सूरह इन्शिकाक)
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ९. आणि तो आपल्या कुटुंबियांकडे आनंदित होऊन परत जाईल.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    १०. परंतु ज्या माणसाचे कर्म-पत्र त्याच्या पाठीमागून दिले जाईल.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ११. तेव्हा तो मृत्युला बोलावू लागेल.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    १२. आणि भडकत्या जहन्नममध्ये दाखल होईल.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    १३. हा मनुष्य आपल्या कुटुंबात (जगात) आनंदित होता.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    १४. तो समजत होता की अल्लाहकडे परतून जाणारच नाही.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    १५. हे कसे शक्य आहे, वास्तविक त्याचा पालनकर्ता त्याला चांगल्या प्रकारे पाहात होता.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    १६. मला संध्याकाळच्या लालिमेची शपथ.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    १७. आणि रात्रीची आणि तिने गोळा केलेल्या वस्तूंची शपथ.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    १८. आणि पूर्ण चंद्राची शपथ.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    १९. निःसंशय, तुम्ही एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत पोहोचाल.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    २०. त्यांना झाले तरी काय की ईमान राखत नाहीत?
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    २१. आणि जेव्हा त्यांच्यासमोर कुरआन वाचले जाते, तेव्हा सजदा करीत नाहीत.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    २२. किंबहुना त्यांनी कुप्र (इन्कार) केला, ते खोटे ठरवित आहेत.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    २३. आणि हे जे काही मनात ठेवतात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    २४. तेव्हा तुम्ही त्यांना दुःखदायक शिक्षा यातनांची खूशखबर द्या.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    २५. तथापि ईमान राखणाऱ्या नेक सदाचारी लोकांना अगणित आणि कधीही न संपणारा मोबदला प्रदान केला जाईल.