ترجمة سورة المدّثر

الترجمة الماراتية
ترجمة معاني سورة المدّثر باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. हे वस्त्र पांघरूण घेणारे!
२. उभे राहा आणि खबरदार करा.
३. आणि आपल्या पालनकर्त्याचीच महिमा वर्णन करा.
४. आणि आपल्या वस्त्रांना पवित्र (स्वच्छ शुद्ध) राखत जा.
५. आणि अपवित्रता (मलीनता) सोडून द्या.
६. आणि उपकार करून जास्त प्राप्त करून घेण्याची इच्छा धरू नका.
७. आणि आपल्या पालनकर्त्याच्या मार्गात धैर्य-संयम राखा.
८. तर जेव्हा सूर (शंख) फुंकला जाईल.
९. तर तो दिवस अतिशय कठीण दिवस असेल.
१०. (जो) काफिरांकरिता सहज - सोपा नसेल.
११. मला आणि त्याला सोडून द्या, ज्याला मी एकटा निर्माण केले.
१२. आणि त्याला खूप धन देऊन ठेवले आहे.
१३. आणि हजर राहणारे पुत्र देखील.
१४. आणि मी त्याला पुष्कळशी व्यापकता (संपन्नता) देऊन ठेवली आहे.
१५. तरीही तो इच्छा बाळगतो की मी त्याला आणखी जास्त द्यावे.
१६. कदापि नाही, तो आमच्या आयतींचा विरोधक आहे.
१७. लवकरच मी त्याला कठीण चढ चढविन.
१८. त्याने विचार करून एक गोष्ट योजिली.
१९. त्याचा नाश होवो! त्याने कशी गोष्ट योजिली.
२०. तो पुन्हा नष्ट होवो! त्याने कशी गोष्ट योजिली!
२१. मग त्याने पाहिले.
२२. मग तोंडावर (कपाळावर) आठ्या घातल्या आणि तोंड वाकडे केले.
२३. मग मागे सरकला आणि गर्व केला.
२४. आणि म्हणाला, ही तर फक्त जादू आहे, जी साध्य केली जाते.
२५. (हे) मानवी कथनाखेरीज आणखी काही नाही.
२६. मी लवकरच त्याला जहन्नममध्ये टाकीन.
२७. आणि तुम्हाला काय माहीत की जहन्नम काय आहे?
२८. ती ना बाकी ठेवते आणि ना सोडते.
२९. त्वचेला होरपळून टाकते.
३०. आणि तिच्यावर एकोणीस (फरिश्ते तैनात) आहेत.
३१. आणि आम्ही जहन्नमचे रक्षक केवळ फरिश्ते ठेवले आहेत आणि आम्ही त्यांची संख्या केवळ काफिरांच्या कसोटीकरिता निर्धारित केली आहे. यासाठी की ग्रंथधारकांनी विश्वास करावा आणि ईमान राखणाऱ्यांच्या ईमानात वृद्धी व्हावी आणि ग्रंथधारक व मुस्लिमांनी संशय करू नये, आणि ज्यांच्या मनात रोग आहे त्यांनी व काफिरांनी म्हणावे की या अशा उदाहरणाने अल्लाहला काय अभिप्रेत आहे? अशा प्रकारे अल्लाह, ज्याला इच्छितो मार्गभ्रष्ट करतो आणि ज्याला इच्छितो सन्मार्ग दाखवितो. आणि तुमच्या पालनकर्त्याच्या लष्करांना त्याच्याखेरीज कोणीही जाणत नाही. हा समस्त मानवांकरिता (परिपूर्ण) बोध (आणि भलाई) आहे.
३२. कदापि नाही. चंद्राची शपथ
३३. आणि रात्रीची जेव्हा ती पालटते.
३४. आणि प्रातःकाळची, जेव्हा तो प्रकाशमान व्हावा.
३५. की (निःसंशय ती जहन्नम) मोठ्या गोष्टींपैकी एक आहे.
३६. माणसाला भयभीत करणारी
३७. त्या माणसांकरिता, जे तुमच्यापैकी पुढे जाऊ इच्छितील किंवा मागे हटू इच्छितील.
३८. प्रत्येक मनुष्य आपल्या कर्मांच्या ऐवजी गहाण आहे.
३९. परंतु उजव्या हाताचे
४०. (की) ते जन्नतींमध्ये (बसून) विचारत असतील
४१. अपराधी लोकांना
४२. तुम्हाला जहन्नममध्ये कोणत्या गोष्टीने टाकले?
४३. ते उत्तर देतील की आम्ही नमाज पढणारे नव्हतो.
४४. भुकेल्यांना जेवु घालत नव्हतो.
४५. आणि आम्ही निरर्थक गोष्ट (इन्कार) करणाऱ्यांसोबत निरर्थक गोष्टीत व्यस्त राहात होतो.
४६. आणि आम्ही मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरवित होतो.
४७. येथेपर्यंत की आमचा मृत्यु आला.
४८. तेव्हा त्यांना शिफारस करणाऱ्यांची शिफारस उपयोगी पडणार नाही.
४९. त्यांना झाले तरी काय की ते उपदेशापासून तोंड फिरवित आहेत.
५०. जणू काही बिचकलेली गाढवे होत.
५१. जे सिंहापासून पळत असावे.
५२. किंबहुना त्यांच्यापैकी प्रत्येक मनुष्य इच्छितो की त्याला स्पष्ट ग्रंथ दिले जावेत.
५३. असे कदापि (होऊ शकत) नाही, किंबहुना हे कयामतबाबत निर्भय आहेत.
५४. कदापि नाही! हा (कुरआन) एक उपदेश आहे.
५५. आता जो इच्छिल, त्यापासून बोध ग्रहण करील.
५६. आणि हे त्याच वेळी बोध ग्रहण करतील, जेव्हा अल्लाह इच्छिल. तो या गोष्टीस पात्र आहे की त्याचे भय राखावे आणि यासही पात्र की त्याने माफ करावे.
Icon