ترجمة معاني سورة القمر
 باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية
            .
            
                                    من تأليف: 
                                            محمد شفيع أنصاري
                                                            .
                                                
            
                                                                                                            ﰡ
                                                                                        
                    
                                                                                    १. कयामत जवळ आली आणि चंद्र दुभंगला.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    २. हे जेव्हा एखादा मोजिजा (चमत्कार) पाहतात, तेव्हा तोंड फिरवितात, आणि म्हणतात ही तर पहिल्यापासून चालत आलेली जादू आहे.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ३. आणि त्यांनी खोटे ठरविले व आपल्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण केले. आणि प्रत्येक कार्य निश्चित वेळेवरच निर्धारित आहे.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ४. निःसंशय, त्याच्याजवळ त्या वार्ता येऊन पोहचल्या आहेत, ज्यात तंबी - ताकीदी (ची शिकवण) आहेत.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ५. आणि पूर्ण बुद्धिकौशल्याची गोष्ट आहे, परंतु या भयभीत करणाऱ्या गोष्टींनीही काही लाभ दिला नाही.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ६. (तेव्हा, हे पैगंबर!) तुम्ही त्यांच्याकडून तोंड फिरवा, ज्या दिवशी एक पुकारणारा अप्रिय गोष्टीकडे बोलाविल.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ७. हे झुकलेल्या नेत्रांनी कबरीमधून अशा प्रकारे उठून उभे राहतील की जणू इतस्ततः पसरलेला टोळ थवा.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ८. पुकारणाऱ्याकडे धावत जात असतील आणि काफिर म्हणतील की हा दिवस तर मोठा कठीण आहे!
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ९. त्यांच्यापूर्वी नूहच्या जनसमूहानेही आमच्या दासाला खोटे ठरविले होते. आणि वेडा दर्शवून झिडकारले होते.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    १०. तेव्हा त्याने आपल्या पालनकर्त्याजवळ दुआ (प्रार्थना) केली की मी तावडीत सापडलेलो आहे. तू माझी मदत कर.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ११. तेव्हा आम्ही आकाशाचे दरवाजे मुसळधार पावसाने उघडले.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    १२. आणि जमिनीतून झरे प्रवाहित केले, तेव्हा त्या कार्यासाठी जे भाग्यात लिहिले गेले होते, (दोघेही) पाणी एकत्रित झाले.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    १३. आणि आम्ही त्याला अशा नौकेत चढविले, जी तक्ते आणि मेखा असलेली होती.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    १४. जी आमच्या डोळ्यांसमोर चालत होती. हा मोबदला त्याच्यातर्फे, ज्याचा इन्कार केला गेला होता.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    १५. आणि निःसंशय, आम्ही या घटनेला निशाणी बनवून बाकी राखले तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    १६. तेव्हा (सांगा) कसा होता माझा प्रकोप आणि माझी भयपूर्ण तंबी.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    १७. आणि निःसंशय, आम्ही कुरआनाला समजण्याकरिता सोपे केले आहे१ तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?
____________________
(१) अर्थात त्याचा अर्थ व आशय समजणे त्यापासून बोध प्राप्त करणे आणि त्यास मुखोद्गत (तोंडी पाठ) करणे आम्ही सहज सुलभ केले आहे. वस्तुस्थिती अशी की पवित्र कुरआन आपल्या चमत्कार (मोजिजे) प्रभाव आणि भाषाशैलीच्या आधारे सर्वांत उच्चप्रतीचा ग्रंथ असतानाही एखादा मनुष्य थोडेसेही लक्ष देईल तर अरबी व्याकरण आणि भाषाशैलीच्या ग्रंथआंचे अध्ययन केल्याविनाही त्यास सहजपणे समजून घेईल. तद्वतच जगातील हा एकमेव असा ग्रंथ आहे, ज्याचा एकेक शब्द तोंडी पाठ केला जातो अन्यथा लहानसहान पुस्तकही अशा प्रकारे कंठस्थ करणे व ते स्मरणात राखणे मोठे कठीण आहे. जर मनुष्य आपल्या मन-मस्तष्काचे दरवाजे उघडून, त्याचे बोधप्राप्तीच्या नेत्रांनी पठण करील, बोधप्राप्तीसाठी ऐकेल आणि समजून घेणाऱ्या हृदयाने त्यावर विचार चिंतन करील तर लोक परलोक (हे जग आणि आखिरत) च्या सद्भाग्याचे दरवाजे त्याच्यावर उघडतील आणि हा ग्रंथ त्याच्या मनात खूप खोलवर जाऊन कुप्र आणि दुष्कर्मांची सर्व घाण दूर करतो.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    १८. आदच्या जनसमूहानेही खोटे ठरविले तेव्हा कसा होता माझा अज़ाब आणि माझी भयपूर्ण तंबी.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    १९. आम्ही त्यांच्यावर सतत वेगाने वाहणारी हवा (वादळी वारा) एका सततच्या अशुभ दिवशी पाठविली.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    २०. जी लोकांना उचलून आपटत होती, जणू मुळासकट उखडलेले खजुरीचे वृक्ष आहेत.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    २१. तेव्हा कसा होता माझा प्रकोप आणि माझे भयभीत करणे.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    २२. आणि निःसंशय, आम्ही कुरआनानला बोधप्राप्तीकरिता सोपे केले आहे तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    २३. समूदच्या जनसमूहाने (ही) खबरदार करणाऱ्यांना खोटे ठरविले.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    २४. आणि म्हणाले की, काय आमच्यापैकीच एका माणसाचे आम्ही अनुसरण करू लागावे? मग तर आम्ही अवश्य वाईटपणात आणि वेडेपणात पडलेले असू.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    २५. काय आम्हा सर्वांमधून फक्त त्याच्यावरच वहयी (प्रकाशना) अवतरित केली गेली? तेव्हा तो खोटारडा, घमेंडी आहे.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    २६. आता सर्व जाणून घेतील की उद्या कोण खोटारडा व घमेंडी होता.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    २७. निःसंशय, आम्ही त्यांच्या कसोटीकरिता सांडणी पाठवू तेव्हा (हे स्वालेह!) तुम्ही त्यांची प्रतीक्षा करा आणि धीर संयम राखा.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    २८. आणि त्यांना खबर द्या की पाण्याची त्याच्यात वाटणी आहे. प्रत्येक आपल्या पाळीवर हजर होईल.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    २९. तेव्हा त्यांनी आपल्या साथीदाराला बोलविले, ज्याने (सांडणीवर) हल्ला केला आणि (तिच्या) घोडनसा कापून टाकल्या.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ३०. तेव्हा कसा होता माझा अज़ाब आणि माझे भयभीत करणे.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ३१. आम्ही त्यांच्यावर एक भयंकर चित्कार पाठविला तेव्हा ते असे झाले, जणू कुंपण बनविणाऱ्याची तुडविलेली घास (चारा).
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ३२. आणि आम्ही बोधप्राप्तीकरिता कुरआनाला सोपे केले आहे तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ३३. लूतच्या जनसमूहाने देखील खबरदार करणाऱ्यांना खोटे ठरविले.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ३४. निःसंशय, आम्ही त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करणारी हवा पठविली, लूत (अलै.) यांच्या कुटुंबियांखेरीज, त्यांना प्रातःकाळी आम्ही सुरक्षा (मुक्ती) प्रदान केली.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ३५. आपल्या कृपेने प्रत्येक कृतज्ञशील (दासा) ला आम्ही अशा प्रकारे मोबदला देतो.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ३६. निःसंशय, त्या (लूत) ने त्यांना आमच्या पकडीचे भय दाखविले होते, परंतु त्यांनी भय दाखविणाऱ्यांबाबत शंका धरून वाद घातला.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ३७. आणि लूत (अलै.) यांना त्यांच्या अतिथींच्या संदर्भात फूस लावू इच्छिले तेव्हा आम्ही त्यांचे डोळे आंधळे केले (आणि सांगितले), माझ्या शिक्षा - यातनेची व भयपूर्ण तंबीची गोडी चाखा.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ३८. आणि निश्चित आहे की त्यांना सकाळीच एका ठिकाणी धरणाऱ्या निर्धारित अज़ाब (ईशशिक्षे) ने नष्ट करून टाकले.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ३९. तेव्हा माझ्या प्रकोपाचा आणि माझ्या तंबीचा स्वाद चाखा.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ४०. आणि निःसंशय, आम्ही कुरआनाला बोध आणि उपदेशाकरिता सोपे केले आहे. तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ४१. आणि फिरऔनच्या लोकांजवळही खबरदार करणारे आले.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ४२. त्यांनी आमच्या सर्व निशाण्यांना खोटे ठरविले तेव्हा आम्ही त्यांना मोठ्या जबरदस्त आणि शक्तिशाली पकडणाऱ्याप्रमाणे पकडले.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ४३. (हे मक्काच्या लोकांनो!) काय तुमच्या समुदायातील काफिर त्या समुदायांच्या काफिरांपेक्षा श्रेष्ठ आहेत की तुमच्यासाठी पूर्वीच्या ग्रंथांमध्ये सुटका लिहिलेली आहे?
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ४४. काय हे असे म्हणतात की आम्ही वर्चस्वशाली होणारे लोक आहोत?
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ४५. लवकरच हा समूह पराभूत केला जाईल आणि पाठ दाखवून पळ काढील.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ४६. किंबहुना कयामतची वेळ, त्यांच्या वायद्याची वेळ आहे आणि कयामत अतिशय कठीण आणि मोठी कटू बाब आहे.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ४७. निःसंशय, अपराधी लोक मार्गभ्रष्टतेत आणि यातनेत आहेत.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ४८. ज्या दिवशी ते तोंडघशी पाडून आगीत फरफटत नेले जातील (आणि त्यांना सांगितले जाईल) जहन्नमच्या आगीच्या स्पर्शाची गोडी चाखा.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ४९. निःसंशय, आम्ही प्रत्येक गोष्ट एका (निर्धारित) अनुमानावर निर्माण केली आहे.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ५०. आणि आमचा आदेश केवळ एकदा (चा एक शब्द) च असतो, जसे पापणीचे लवणे.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ५१. आणि आम्ही तुमच्यासारख्या कित्येकांना नष्ट करून टाकले आहे, तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ५२. आणि जे जे (कर्म) त्यांनी केले आहे ते सर्व कर्मपत्रात लिहिलेले आहे.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ५३. (अशा प्रकारे) प्रत्येक लहान मोठी गोष्ट लिहिलेली आहे.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ५४. निःसंशय, अल्लाहचे भय राखणारे लोक जन्नत आणि प्रवाहांमध्ये असतील.
                                                                         
                                                                                                                                        
                    
                                                                                    ५५. सचोटी व प्रतिष्ठेच्या स्थानी सामर्थ्यशाली मालका (अल्लाह) जवळ.