ترجمة سورة الواقعة

الترجمة الماراتية
ترجمة معاني سورة الواقعة باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. जेव्हा कयामत प्रस्थापित होईल.
२. जिचे घडून येण्यात काहीच असत्य नाही.
३. ती वर-खाली करणारी असेल.
४. जेव्हा जमीन भूकंपासह हालवून टाकली जाईल.
५. आणि पर्वत अगदी कण - कण केले जातील.
६. मग ते विखुरलेल्या धुळीसारखे होतील.
७. आणि तुम्ही तीन गटात विभागले जाल.
८. तेव्हा उजव्या हाताचे, किती चांगले आहेत उजव्या हाताचे!
९. आणि डाव्या हाताचे, काय अवस्था आहे डाव्या हाताच्या लोकांची!
१०. आणि जे पुढे जाणारे आहेत, ते तर आहेतच पुढे जाणारे.
११. ते अगदी सान्निध्य प्राप्त केलेले आहेत.
१२. सुख-विलासाच्या जन्नतींमध्ये आहेत.
१३. (फार मोठा) समूह तर पूर्वी होऊन गेलेल्यांपैकी असेल.
१४. आणि थोडेसे नंतरच्या लोकांपैकी.
१५. (हे लोक) सोन्याच्या तारांनी विणलेल्या आसनांवर.
१६. एकमेकांसमोर तक्के लावून बसले असतील.
१७. त्यांच्याजवळ अशी मुले, जी नेहमी (मुलेच) राहतील, ये-जा करतील.
१८. प्याले आणि सुरई घेऊन आणि मद्याचा प्याला घेऊन, जो मद्याने भरून वाहत असेल.
१९. ज्यामुळे ना डोके गरगरु लागेल आणि ना बुद्धी भ्रष्ट होईल.
२०. आणि असे मेवे घेऊन, जे ते पसंत करतील.
२१. आणि पक्ष्यांचे मांस, जे त्यांना (फार) आवडेल.
२२. आणि मोठमोठ्या डोळ्यांच्या (मृगनयनी) हूर (पऱ्या)
२३. ज्या लपलेल्या मोत्यांसारख्या आहेत.
२४. हा मोबदला आहे त्याच्या कर्मांचा
२५. तिथे ना ते निरर्थक गोष्ट ऐकतील आणि ना अपराधाची गोष्ट
२६. केवळ सलामच सलाम (शांती सलामती) चा आवाज असेल.
२७. आणि उजव्या हाताचे किती चांगले आहेत उजव्या हाताचे!
२८. ती काटे नसलेली बोरे,
२९. आणि थरांवर थर केळी,
३०. आणि लांब लांब सावल्या,
३१. आणि वाहते पाणी,
३२. आणि खूप जास्त फळांमध्ये,
३३. जे ना संपतील, ना रोखले जातील,
३४. आणि उंच उंच बिछायतीवर असतील.
३५. आम्ही त्या (च्या पत्नीं) ना खास प्रकारे बनविले आहे.
३६. आणि आम्ही त्यांना कुमारिका बनविले आहे.
३७. प्रेम करणाऱ्या, समवयस्क आहेत.
३८. उजव्या हाताच्या लोकांकरिता आहे.
३९. (फार) मोठा समूह आहे पूर्वीच्या लोकांपैकी
४०. आणि (फार) मोठा समूह आहे नंतरच्या लोकांपैकी.
४१. आणि डाव्या हाताचे, कसे आहेत डाव्या हाताचे.
४२. उष्ण हवा आणि गरम (उकळत्या) पाण्यात असतील
४३. आणि काळ्याकुट्ट धुराच्या सावलीत
४४. जी ना थंड आहेत ना सुखदायक
४५. निःसंशय हे लोक यापूर्वी फार सुख-संपन्न अवस्थेत वाढले होते.
४६. आणि घोर अपराधांवर आग्रह करीत होते.
४७. आणि म्हणत की काय जेव्हा आम्ही मरण पावू आणि माती व हाडे होऊन जावू तर काय आम्ही दुसऱ्यांदा जिवंत करून उभे केले जावू?
४८. आणि काय आमचे वाडवडील देखील?
४९. (तुम्ही) सांगा की निःसंशय, सर्व पूर्वीचे आणि नंतरचे
५०. एका निर्धारित दिवसाच्या वेळी अवश्य एकत्र केले जातील
५१. मग तुम्ही हे मार्गभ्रष्ट झालेल्यांनो, खोटे ठरविणाऱ्यांनो!
५२. जक्कूमचे झाड जरूर खाल
५३. आणि त्याच्यानेच पोट भराल
५४. मग त्यावर गरम उकळते पाणी प्याल
५५. मग पिणारेही तहानलेल्या उंटांसारखे
५६. कयामतच्या दिवशी त्यांचा हाच पाहुणचार आहे
५७. आम्ही तुम्हा सर्वांना निर्माण केले, मग तुम्ही का नाही मानत?
५८. बरे हे तर सांगा की जे वीर्य तुम्ही टपकविता,
५९. काय त्यापासून (मानव) तुम्ही बनवितात की आम्ही निर्माण करतो?
६०. आम्हीच तुमच्या दरम्यान मृत्युला भाग्य (निश्चित) केले आहे, आणि आम्ही त्यापासून हरलेलो नाही.
६१. की तुमच्या जागी तुमच्यासारखे दुसरे निर्माण करावेत, आणि तुम्हाला नव्या रुपात (या जगात) निर्माण करावे, जे तुम्ही जाणत नाहीत.
६२. आणि तुम्हाला पहिल्या निर्मितीचे ज्ञानही आहे, तरीही तुम्ही बोध का नाही प्राप्त करीत?
६३. बरे, मग हेही सांगा की तुम्ही जे काही पेरता,
६४. त्याला तुम्ही उगविता की आम्ही त्यास उगविणारे आहोत?
६५. आम्ही इच्छिले तर त्याचा चुराडा (कण कण) करून टाकू आणि तुम्ही आश्चर्याने बोलतच राहावे!
६६. की आमच्यावर तर भुर्दंड पडला!
६७. किंबहुना आम्ही तर पूर्णपणे वंचित राहिलो.
६८. बरे तर हे सागा की जे पाणी तुम्ही पीता
६९. त्यास ढगांमधून तुम्ही अवतरित केले आहे की आम्ही पाऊस पाडतो?
७०. आम्ही इच्छिले तर त्या (पाण्या) स कडू (जहर) करून टाकू, मग तुम्ही आमच्याशी कृतज्ञता का नाही व्यक्त करीत?
७१. बरे हेही सांगा की जी आग तुम्ही पेटविता
७२. तिचे झाड तुम्ही निर्माण केले आहे की आम्ही त्याचे निर्माणकर्ते आहोत?
७३. आम्ही तिला बोध प्राप्त करण्याचे साधन आणि प्रवाशांच्या फायद्याची गोष्ट बनविले आहे.
७४. तेव्हा आपल्या महान पालनकर्त्याच्या नावाचे गुणगान करा.
७५. तर मी शपथ घेतो ताऱ्यांच्या कोसळण्याची
७६. आणि जर तुम्हाला ज्ञान असेल तर ही फार मोठी शपथ आहे.
७७. की निःसंशय हा कुरआन मोठा प्रतिष्ठासंपन्न आहे.
७८. जो एका सुरक्षित ग्रंथात (लिहिलेला) आहे.
७९. ज्याला केवळ स्वच्छ शुद्ध (पाक) लोकच स्पर्श करू शकतात.
८०. हा सर्व विश्वांच्या पालनकर्त्यातर्फे अवतरित केला गेला आहे.
८१. तर काय तुम्ही अशा गोष्टीला साधारण (आणि तुच्छ) समजता?
८२. आणि आपल्या वाट्याला हेच घेता की यास खोटे ठरवित फिरावे?
८३. तर जेव्हा (प्राण) कंठाशी येऊन पोहचावा
८४. आणि तुम्ही त्या वेळी (डोळ्यांनी) पाहात राहावे.
८५. आणि आम्ही तुमच्या तुलनेत त्या माणसाच्या अधिक जवळ असतो, परंतु तुम्ही पाहू शकत नाही.
८६. तेव्हा जर तुम्ही एखाद्याच्या आज्ञेच्या अधीन नाहीत
८७. आणि त्या कथनात सच्चे असाल तर तो प्राण परतवून दाखवा.
८८. तर जो कोणी (अल्लाहच्या दरबारात) निकटतम असेल
८९. त्याच्यासाठी ऐषआराम आहे (उत्तम भोजन आहे आणि देणग्यांनी युक्त अशी जन्नत आहे.
९०. आणि जो मनुष्य उजव्या हाताच्या लोकांपैकी आहे
९१. तरीही सलाम (शांती सलामती) आहे तुझ्यासाठी की तू उजव्या हाताच्या लोकांपैकी आहेस.
९२. परंतु जर कोणी खोटे ठरविणाऱ्या मार्गभ्रष्ट लोकांपैकी आहे
९३. तर उकळत्या पाण्याने त्याचा पाहुणचार आहे
९४. आणि जहन्नममध्ये जायचे आहे.
९५. ही (वार्ता) अगदी सत्य आणि निश्चित आहे.
९६. तेव्हा तुम्ही आपल्या (अतिमहान) पालनकर्त्याच्या नावाचे पावित्र्य वर्णन करा.
Icon